04 December 2020

News Flash

दोन ‘परफेक्शनिस्ट’आणि एक आवाहन संजय पवार

‘आमची सुनीता ‘परफेक्शनिस्ट’ आहे,’ असं पुलं जेव्हापासून जाहीरपणे म्हणायला लागले, तेव्हापासून पांढरपेशा मध्यमवर्गीयांत या विशेषणाला विशेष जागा मिळाली.

| April 13, 2014 06:20 am

‘आमची सुनीता ‘परफेक्शनिस्ट’ आहे,’ असं पुलं जेव्हापासून जाहीरपणे म्हणायला लागले, तेव्हापासून पांढरपेशा मध्यमवर्गीयांत या विशेषणाला विशेष जागा मिळाली. त्यानंतर जागतिकीकरणाच्या पसाऱ्यात सरकारी-निमसरकारी नोकऱ्या कमी होऊन व्यक्तिगत नैपुण्याला महत्त्व देऊन ‘करार’ पद्धतीचे ‘जॉब्स’ सुरू झाले, तेव्हापासून ‘परफेक्शनिस्ट’ या शब्दाला वेगळेच वलय प्राप्त झाले.
पुलंकडे राबता खूप लोकांचा. मग ऐनवेळी वसंता (देशपांडे) किंवा कुमार (गंधर्व) आले की त्यांच्या जेवणापासून साऱ्या व्यवस्था सुनीताबाई कशा तत्पर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करत. (उदा. जास्तीचे दूध मागवणे, नाश्ता, जेवणाच्या वेळा सांभाळणे, आणि प्रसंगी शिस्त म्हणून एखादी गोष्ट निग्रहाने नाकारणे, इ. इ.) आता सर्वसाधारण घरातली सर्वसाधारण स्त्री हीसुद्धा या गोष्टी सहज म्हणून करते. पण ती सुनीता देशपांडे नसल्याने ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून नावाजली जात नाही. मोठय़ांचं सगळंच मोठं आणि मोठय़ांचं छोटंही मोठंच!
सांगायचा मुद्दा हा, की रस्त्यावर भेळेची गाडी लावणारा अथवा चार स्टीलच्या डब्यांतून नाश्ता विकणारा कोणी- ते डबे, प्लेट, कचरापेटी यांचं एक मिनिएचर त्याने असं केलेलं असतं, की कोणताही फाफटपसारा न मांडता तो त्या तीन फुटांच्या जागेत परफेक्ट व्यवसाय करतो. अगदी सायकलवर चहा विकणाराही यात येतो. पण अशा परफेक्शनिस्टांची नोंद होत नाही.
मात्र, एखाद्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवून मोठे झालेले, अनेक विक्रम नावावर असलेले, लोकांच्या गळ्यातले ताईत बनलेले कुणी या सगळ्या उपर ‘परफेक्शनिस्ट’ असतील, तर मग ते हिमालयातले ‘एव्हरेस्ट’च! ते ‘सुमरमॅन’ ठरतात. ते श्वाससुद्धा परफेक्ट लयीत आणि पापण्यांची उघडझापही परफेक्ट टायमिंगमध्ये करत असावेत असेच सर्वाना वाटते. जगात सगळ्यात शक्तिमान एक शक्ती आहे, असं न मानणाऱ्या आमच्यासारख्या नतद्रष्टांना अशा परफेक्शनिस्टांतही मग खोट दिसली नाही तरच नवल! सर्वाचा रोष पत्करून हे बोट ठेवणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटते. आणि आम्ही बोट ठेवलेल्या जागेसंबंधी त्यांनी विचार करून कृती केली तर ते अधिक परफेक्ट होतील.. त्यासाठीच हे आवाहन.
यातला पहिला ‘परफेक्शनिस्ट’ आहे सर्वात तरुण भारतरत्न, विक्रमादित्य सचिन तेंडुलकर. विक्रमांचे हिमालय, आल्पस् निर्माण करून नुकताच तो निवृत्त झालाय.
पांढऱ्या कपडय़ांतील ‘जंटलमनस् गेम’ (कारण ब्रिटिशांचे अपत्य!) असलेल्या क्रिकेटमध्ये ‘सुनील गावसकरनंतर कोण?’ हा ‘नेहरूंनंतर कोण?’एवढाच मोठा प्रश्न होता. पण त्याचे उत्तर गावसकरनाच माहीत होतं. शिरीष कणेकरांच्या स्टॅण्डअप् कॉमेडी कार्यक्रमासाठी कणेकरांनी गावसकरना निमंत्रण दिले तेव्हा ते म्हणाले, ‘माझ्याऐवजी तेंडल्याला बोलव! तो पुढचा हीरो आहे.’ अशी आठवण कणेकरांचं लेखन वाचताना वाचल्याचं आठवते.
यथावकाश ‘तेंडल्या’ने १० नंबरच्या जर्सीसह क्रिकेटमधलं अढळ ध्रुवताऱ्यासारखं लखलखीत यश मिळवलं. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच नाही, तर एकूणच विनम्र व्यक्तिमत्त्वाचा आयकॉन ठरला. निवृत्त होताना त्याने केलेलं भाषणही उत्कृष्ट ‘निरोपा’चा नमुना म्हणून ऐतिहासिक नोंदीत राहील. ‘भारतरत्न’ त्याला नियम बदलून किंवा नवा नियम करून दिलं गेलं. त्यावरही ध्यानचंद, खाशाबा जाधव असे ज्येष्ठतेचे मुद्दे उपस्थित झाले. ते सोडता समस्त भारतीयांनी ते आनंदाने, अभिमानाने सरकारतर्फे देऊ केले. अ-राजकीय व्यक्तीला ‘भारतरत्न’ देण्यासाठी सरकारवर एवढा दबाव कधीच आला नसेल.
मात्र, साध्या प्राध्यापकाच्या घरात जन्माला आलेल्या, देशी मराठी प्रशिक्षकाकडे क्रिकेटचे धडे घेतलेल्या या परफेक्शनिस्टने इतकं सारं घेऊन झाल्यावर देण्याची वेळ आलीय असं वाटतं. क्रिकेटमधला प्रत्येक क्षण त्याचा स्वत:चा आहे. त्याची मेहनत, त्याची एकाग्रता याचं ते फळ आहे. त्यावर त्याचा आणि त्याचाच हक्क आहे. पण सचिन खेळायला लागल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत क्रिकेट आमूलाग्र बदललं. पांढऱ्या कपडय़ातली पाच दिवसांची कसोटी जाऊन रंगीत कपडय़ांतलं ५० षटकांचं क्रिकेट आलं. सूर्यप्रकाशातच खेळला जाणारा हा खेळ कृत्रिम प्रकाशात रात्रीही रंगू लागला. चेंडूचा ‘पोस्ट ऑफिस रेड’ रंग जाऊन तो पांढरा, निळा झाला. सामने वाढले. दौरे वाढले. १२ महिने २४ तास क्रिकेट खेळलं जाऊ लागलं. टी-२०, आयपीएल म्हणजे एक आकडी लॉटरीसारखा जुगारच. क्रिकेटला घोडय़ाच्या शर्यतीपेक्षाही अधिक करमणुकीचं आणि सट्टेबाजीचं स्वरूप आलं. मॅच फिक्सिंगने त्यात गुन्हेगारीचाही प्रवेश झाला. त्यातले दोषी आजही उजळ माथ्याने फिरताहेत.
हे सर्व सचिन क्रिकेट खेळत असतानाच आजूबाजूला घडत होतं. पण सचिन ‘मी बरा.. माझा खेळ बरा’ या भूमिकेतून कशावरही भाष्य करत नव्हता. म्हणजे त्यावेळी तो क्रिकेटमधला मनमोहन सिंग किंवा ए. के. अँटोनी होता!
पण आता तो निवृत्त झालाय. आता त्याला एकाग्रतेची जरुरी नाही. खेळावर लक्ष ठेवायची गरज नाही. मग आयपीएल, श्रीनिवासन, मयप्पन याबद्दल कधी बोलणार तो? निवृत्त झाल्यावर तो आज कुठे या दुकानाचं उद्घाटन कर, स्वत:चं चांदीचं नाणं वितरीत कर, लोकांच्या वाटेत येणारं स्वत:च्या विक्रमाचं शिल्प खुलं कर.. यातच रमलाय. मुद्दा असा आहे-खेळातील निवृत्तीआधीच काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यसभा सदस्य झालेल्या सचिनची या सरकारबद्दल भावना काय? ज्या राजीव शुक्लांनी त्याला ही सदस्यता देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्या शुक्लांनी मुंबईत मोक्याचा भूखंड लाटला होता.
राज्यसभा सदस्य म्हणजे सन्मानार्थ काढलेला पोस्टाचा स्टॅम्प नव्हे! राज्यसभा सदस्य म्हणून काय करणार, हे त्याने जाहीर करावं. ‘सचिन अगदी आजही ‘इनोसंट’ आहे/ वाटतो!’ म्हणणाऱ्यांना हा ‘इनोसंट बॉय’ फेरारीवरचा टॅक्स आणि बांद्रय़ातल्या घराला स्पेशल परवानगी मागताना ‘मॅच्युअर’ होतो, हे दिसत नाही. कॅन्सरग्रस्त मुलांना भेटून आनंद देणारा, मुलींच्या शिक्षणाला हातभार लावणारा सचिन मुंबईतील ‘मैदाने वाचवा’ मोहिमेचा सूत्रधार, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर का होत नाही? परळ, नायगाव, वरळी, गिरगाव, गोरेगाव, सायन, धारावी इथल्या क्रिकेटवेडय़ा गरीब मुलांमधला क्रिकेटर शोधण्यासाठी सचिन काही योजना का हाती घेत नाही? त्याला त्याचे ‘बांद्रा ते दादर’ दिवस आठवत नाहीत? की आता पंचतारांकित बीकेसीमध्ये अर्जुनसोबत सराव एवढंच त्याचं लक्ष्य आहे? सिगरेट, दारूच्या जाहिरातीला नकार देणारा सचिन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं पाणी बेसुमार उपसणाऱ्या कोल्ड्रिंकची जाहिरात मात्र करतो. तहानलेला महाराष्ट्र काय पेप्सीने तहान भागवणार? सर्वात भ्रष्ट अशा आयपीएलच्या जुगारात या विक्रमादित्याला एक उद्योगपती काही कोटींना खरेदी करू शकतो? त्याच्या खाजगी कार्यक्रमांना मग अनिवार्य उपस्थिती म्हणून तो जातो? सिगरेट/ दारूच्या जाहिरातीसारखं आयपीएलला नाही म्हणण्याचं धैर्य सचिनसारख्या खेळाडूंनी दाखवलं असतं तर आज ललित मोदी, श्रीनिवासन, मयप्पन, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा असल्या कथलांना सोन्याचा भाव आला नसता. राज्यसभा सदस्य म्हणून इतर खेळांप्रती असलेली सरकारी अनास्था दूर करून त्यांना प्रायोजक मिळवून देण्यासाठी सचिन काही करेल, की स्वत:साठी प्रायव्हेट गोल्फ क्लब शोधेल? ‘अर्जुनला साधी वागणूक द्या’ असं पत्रकारांना सांगणारा सचिन स्वत: त्याला टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसमध्ये मग का घेऊन जात असे?
क्रिकेटमधल्या देवानं आता मनुष्यावतार घ्यावा व घडाघडा बोलावं. मेंबर ऑफ पार्लमेंट (सीनिअर हाऊस) म्हणून गाऱ्हाणी मांडावीत. खेळांचं धोरण, संधी, व्यवस्था, निधी यासाठी बोलावं. प्रत्यक्ष काम करावं. निवृत्तीनंतर त्याने महाराष्ट्र, भारत बघावा. भारताला ऑलिम्पिकपासून सर्व स्तरांच्या जागतिक खेळांत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. हॉकी, फुटबॉल यांनाही राजकारणमुक्त करावं. थोडक्यात- बांद्रा ते प्रभुकुंज आणि प्रभुकुंज ते कृष्णकुंज याच्या पलीकडेही दुनिया आहे, हे सचिन रमेश तेंडुलकर या भारतरत्नाने लक्षात घ्यावे.
यानंतर आपले दुसरे परफेक्शनिस्ट अभिनेते आमीर खान. त्यांनीही असाच आपला दबदबा तयार केलाय. शिवाय सामाजिक जाणिवेचं अस्तर. त्यामुळे इतर ‘खान’ मंडळींपेक्षा आपण वेगळे ‘खानदानी’- ही ओळख तयार करण्यात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्त्व! ‘सत्यमेव जयते’मधून छोटय़ा पडद्यावरील त्यांचं आगमनही ‘सामाजिक भान, जाणीव असलेला’ म्हणून आदराने स्वीकारलं गेलं. सत्यमेव जयतेचं पहिलं पर्व लोकांनी स्वीकारलं. त्यांना ते आवडलं. त्यातली काही तथ्ये धक्कादायक होती. मात्र, कार्यक्रमाचं स्वरूप, दर्जा उत्तम होता.
दुसऱ्या पर्वाच्या जाहिराती सुरू झाल्या आणि वाटलं, ‘मि. परफेक्शनिस्ट’ यांचा अहं जरा वाढलाय! सर्वच प्रोमो/ जाहिरातींत- ‘बघा मी कसा..’, किंवा ‘मी दाखवतो..’ ‘तुम्हारे संडे बर्बाद करने आ रहा हूँ..’ वगैरे जरा ‘टू मच’ होतं. तसं तर वृत्तवाहिन्या आल्यापासून अशा अनेक प्रश्नांना वाचा फुटल्यात. आयबीएन लोकमतचा रिपोर्ताज, एबीपी माझाचे स्पेशल रिपोर्टस्, झी चोवीस तासचा ‘माझा जिल्हा’ इ. कार्यक्रम हेच दाखवतात. शिवाय हिंदी/ इंग्रजी वाहिन्यांनीही असे प्रश्न, माणसं दाखवलीत. त्यामुळे परफेक्शनिस्टचा हा टेंभा खटकलाच.
आमचा मुद्दा वेगळाच आहे, स्त्रिया, दलित, हॉस्पिटल, कचरा, पोलीस, राजकीय पक्ष, विचार, अमुक कायदे, लोकपाल वगैरे, सिटीजन चार्टर वगैरे सगळं ठीक मि. आमीर खान. पण संपूर्ण देशाची ४७ साली भौगोलिक आणि ९२ साली मानसिक फाळणी झाल्यानंतर मुस्लीम समाजाबद्दल जी भावना इतर समूह व समुदायांत आहे, त्याला कधी वाचा फोडणार? मुस्लीम तरुणांना देशद्रोही, अतिरेकी म्हणून का पाहिलं जातं? मदरशांत काय चालतं? मुख्य प्रवाहात मुस्लीम तरुणांना का आणलं जात नाही? का त्यांना असुरक्षित वाटतं? का त्यांना धर्माधता आकर्षित करते? यावर का नाही त्यांना बोलते करत? मुस्लीम धर्मातील अंधश्रद्धा, रूढी यावर कधी बोलणार? दलित मुस्लिमांचं काय? मुस्लीम महिलांना पुन्हा अनेक शतके मागे नेणाऱ्या शहाबानो प्रकरणापासून इशरत जहाँपर्यंत नेमकं काय घडलं? जावेद फावडाचं काय झालं? गावपातळीपासून विद्यापीठ स्तरापर्यंत ‘इस्लामी जिहाद’साठी पेटवणारे नेमके कोण आहेत? का ते असं करतात? आरएसएसची जर झाडाझडती होऊ शकते, तर यांची का नाही? अझरुद्दीनला फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरल्यावर आपण ‘अल्पसंख्य’ असल्याची जाणीव का होते?
गुजरात दंगलीबाबत भाष्य केल्यावर मि. खान तुमचे चित्रपट तिथे वितरित करण्यास नकार देण्यात आला. या अघोषित सेन्सॉरशिपबद्दल कधी बोलणार? ‘गुजरात दंगलीबाबत मोदींना कोर्टानं क्लीन चीट दिली आहे..’ असं आता शरद पवारही म्हणताहेत, मग राजनाथसिंह ‘आमच्याकडून काही चुकत असेल तर माफ करा’ असं का म्हणतात? काय चुकीचं केलं त्यांनी? विचारणार त्यांना मि. परफेक्शनिस्ट?
तलाकपीडित मुस्लीम स्त्रियांसाठी, समाजप्रबोधनासाठी मुस्लीम सत्यशोधक आज कितीतरी वर्षे काम करतंय. सय्यदभाई, राजन अन्वर, ताहेर पूनावाला.. कितीतरी जणांनी समाजाविरोधात, रूढींविरोधात उभं राहण्याचं जे धारिष्टय़ दाखवलं, ते दाखवतील मि. आमीर खान? २०१३ सालीही चिपळूणजवळील हमीद दलवाईंच्या घराजवळून ग्रंथदिंडी काढायला विरोध होत असेल तर शबाना, जावेद, आमीर, राहुल बोस, नंदिता दास यांच्या चॅनेलीय,पेज थ्री किंवा पंचतारांकित सेमिनारची नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायची गरज आहे!
परफेक्शनिस्ट आमीर खान, आपण ज्या समाजातून आला त्या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत दयनीय अवस्था आहे. एखाद्याच शाहरुखची ‘मन्नत’ पुरी होते. एखादाच आमीर ‘अमीर’ होतो. एखादीच शबाना कैफीच्या पोटी जन्मते. दलित आणि मुस्लिमांच्या व्होट बँका का तयार होतात? का त्यांना गृहीत धरले जाते? का त्यांचे कळप होतात?
या अशा प्रश्नांसाठी आणि त्यांच्या उत्तरासाठी आम्ही पाच नाही, ५२ रविवार बर्बाद करायला तयार आहोत. लेकिन ऐसा प्रोग्राम, शो बनाओगे तुम? है हिंमत? सत्य कटू असतं याची प्रचीती घरापासूनही येऊ दे परफेक्शनिस्ट मि. आमीर खान.
शेवटची सरळ रेघ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शेवटच्या आजारपणात तळलेले वडे दिले जात होते असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला. ते ऐकल्यावर उभ्या महाराष्ट्राला ‘वडापाव’ नावाचं देशी फास्ट फूड देणाऱ्या बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत तेच खायला मिळावं? आणि पुतण्याच्या सूपसाठी मान हलवावी लागली? हे प्रश्न पडतात. यावर त्या प्रसिद्ध ‘चढता सूरज’ या कव्वालीतील काही ओळी आठवतात.
साँस टूटते ही सब रिश्ते टूट जाएँगे
बाप, माँ, बहन, बीवी, बच्चे छूट जाएँगे
तेरे जितने है भाई वक्त का चलन देंगे
छिनकर तेरी दौलत दो ही गज कफन देंगे..                   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2014 6:20 am

Web Title: two perfectionist and an appeal
Next Stories
1 कार्यकर्त्यांनी ‘पालख्या’ उचलणे बंद करावे
2 अरविंद केजरीवाल का उल्टा चष्मा!
3 दाग अच्छे है.. ‘अन्ना’ है ना!
Just Now!
X