रोज आरशात पाहताना कालच्यापेक्षा आज आपण वेगळेच दिसतोय असे कधी वाटत नाही. पण २५ वर्षांपूर्वीचा फोटो पाहिला की वाटते, ‘अरेच्चा! तीच का मी ही?’ समाजचित्राचेही असेच असते. दोन काळांतील दोन चित्रे जवळ जवळ ठेवली तरच हा बदल आपल्या लक्षात येतो.
२५ वर्षांपूर्वी साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजारांबरोबरच ‘कुपोषण’ हीसुद्धा मोठी भेडसावणारी समस्या होती. मूल कोणतीही तक्रार घेऊन आले असेल तरीही आम्हाला त्याची प्रतिबंधक लसींची माहिती आणि आहाराविषयीची माहिती नीट विचारून घ्यावी लागत असे. प्रत्येक मुलाचे वजन व उंची नोंदवावी लागत असे आणि औषधांबरोबरच लसी व आहाराविषयी सल्ला दिल्याशिवाय आमचे काम पूर्ण होत नसे. त्या काळात कुपोषण म्हणजे मुख्यत: आहारातील विविध घटकांची कमतरता असे. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा पंडुरोग, ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी होणारा रातांधळेपणा, ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी होणारा मुडदूस यांचे प्रमाण तेव्हा खूपच असे. ‘जंत पडणे’ हे तर सगळय़ांनी गृहीतच धरले होते. इतके, की कधी कधी ‘याला जंतच पडत नाहीत’ अशी तक्रार घेऊनही पालक येत. या सगळ्यांपेक्षा त्रासदायक असे उष्मांकाची कमतरता! ही मुले म्हणजे नुसती हाडेकाडे दिसत. वजन खूपच कमी. गाल व पोट खपाटीला गेलेले. अंगावर सुरकुत्या. मोठे मोठे खोल गेलेले डोळे. आणि चेहऱ्यावर वार्धक्याची कळा! पण त्यातल्या त्यात हा प्रकार औषधोपचार करण्यास सोपा असे. कारण या मुलांची भूक शाबूत असे. पालकांच्या इच्छेला आहारविषयक मार्गदर्शनाची आणि औषधांची जोड मिळाली की ही मुले भराभर वाढत. आम्हाला खरे लढावे लागे ते विशेषत: प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या कुपोषणाला. याला वैद्यकीय भाषेत ‘क्वाशिऑरकॉर’ म्हणतात. हा म्हणजे कुपोषणाचा राजाच. असा एखादा रुग्ण आला की त्याचा महिनाभर तरी वॉर्डात मुक्काम असे. त्याच्यापायी सगळ्या डॉक्टरांच्या डोक्याची झिलई होत असे.
‘क्वाशिऑरकॉर’ म्हटले की मला कैलासच आठवतो. कैलासला ‘क्वाशिऑरकॉर’ झाला होता. या विचित्र शब्दाचा अर्थ आहे- ‘‘्र’’ल्ली२२ ऋ ल्ली ुीूं४२ी ऋ ३ँी ३ँी१.’ आईला दुसरे बाळ होते. पहिल्या बाळाला अंगावरचे दूध मिळणे बंद होते. वरचे काही खायला घालायची आईकडे समज नसते. कधी पैसा नसतो. कधी सवड नसते. थोडक्यात, दुसऱ्या बाळामुळे पहिल्या बाळाची उपासमार झालेली असते. कैलासच्या सगळ्या अंगावर सूज होती. रक्त कमी होते. शरीरात वेगवेगळय़ा घटकांची, जीवनसत्त्वांची, क्षारांची कमतरता होती. पचनशक्ती कमी झाल्यामुळे हगवण होती. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जंतुसंसर्ग झाला होता. सर्वात मुख्य म्हणजे त्याला अजिबात भूक लागत नव्हती. जगण्याचा कसलाही उत्साह नव्हता. नजरेत कोणतीही उत्सुकता नव्हती.
या आजारावर उपचार करणे सोपे नसते. ‘सर्व घटक कमी आहेत, तर ते औषधाद्वारे वा इंजेक्शनद्वारे द्यावेत-’ एवढे साधे-सरळ ते नसते. एखादा घटक दिला की इतर घटकांचा तोल इतका ढासळतो, की कधी कधी रुग्णाच्या जिवावर बेतते. या मुलांना औषधाचे दुष्परिणामही खूप होतात. अशा रुग्णावर उपचार करताना एकाच वेळी हवेत चार-पाच चेंडू उडवत ठेवणाऱ्या कसरतपटूचे नैपुण्य लागते. आम्ही कैलासवर फार काळजीपूर्वक उपचार करीत होतो. आठवडा झाला तरी त्याच्यात कोणतीच सुधारणा दिसेना. उलट सूज प्रचंड वाढली. त्याचा अगदी फुटबॉल झाला होता. अंगावरची कातडी भाजल्यावर जशी सोलून निघते तशी सोलून निघाली होती. तोंड आले होते. मुख्य म्हणजे तो घासभरसुद्धा अन्न घेत नव्हता. त्याचा पुतळय़ासारखा चेहरा आणि निर्विकार डोळे पाहवत नव्हते. औषधोपचार म्हणून जो करायचा होता तो करून झाला होता. आई-वडील वेगवेगळे पदार्थ खायला आणत. पण तो तोंड म्हणून उघडत नव्हता. त्याला किती खेळणी दिली, हसवायचा प्रयत्न केला, पण.. तो निर्विकार डोळय़ांनी फक्त पाहत राही.
एके दिवशी आमच्यातील एकाने थोडे लोणचे कैलासच्या आईला दिले, त्याने त्याच्या तोंडाला थोडी चव येईल म्हणून! आणि खरेच- त्या दिवशी प्रथमच कैलासने अर्धी वाटी दूधभात लोणच्याबरोबर खाल्ला. हळूहळू कैलास पुरेसे अन्न घेऊ लागला. खात असताना त्याच्याकडे पाहणे मला फार आनंदाचे वाटे. एके दिवशी राऊंड चालू असताना कैलास आमच्याकडे पाहून चक्क हसला. फार सुंदर हसू होते ते. त्या हसण्याने ‘आता मी जगणार आहे!’ अशी ग्वाहीच जणू कैलासने दिली.
कैलासची गोष्ट आजच्या डॉक्टरांना काल्पनिक वाटेल; कारण इतक्या टोकाचे कुपोषण आता पाहायला मिळत नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, सर्वसामान्यांचा वाढलेला आर्थिक स्तर, कुटुंबनियोजनाचा प्रसार आणि स्त्रीशिक्षण ही त्यामागची महत्त्वाची कारणे असावीत.
आजचे समाजचित्र वेगळेच आहे. लंबक आता दुसऱ्या टोकाकडे सरकतो आहे. कुपोषणाचे दुसरे टोक आहे-लठ्ठपणा! उष्मांकांचा अतिरेक! आज कॉलेजमधील २० टक्के मुले लठ्ठ आहेत. नेहा ही त्यांची प्रतिनिधीच म्हणता येईल. नेहा प्रथम माझ्याकडे आली तेव्हा पाच वर्षांची होती. उडत्या चालीची, हसऱ्या चेहऱ्याची, गोड, गुलाबी परी! अगदी किरकोळ तक्रारींसाठी आई तिला घेऊन येई. वजन-उंचीची नोंद करताना मला वाटे, ‘सगळे अगदी असावे तसे आहे.’ आईला मात्र कधी समाधान नसे. ‘काही खात नाही डॉक्टर ती! भूक लागायचे औषध द्या ना!,’ असा आग्रह करायला ती कधी विसरायची नाही. आणि ‘ती खातेय तेवढं तिला पुरतंय,’ असं सांगायला मीही कधी कंटाळायची नाही. चांगली आर्थिक स्थिती असलेल्या सुशिक्षित घरातली नेहा एकुलती एक मुलगी होती. ‘जास्तीत जास्त खाऊ घालणे म्हणजेच प्रेम करणे!’ अशी समजूत असलेली तिची आई सतत तिच्या भोवती होती. आइस्क्रीम, चॉकलेट्स, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स, वेफर्स.. सगळे काही हवे ते आणि हवे तसे उपलब्ध! नेहाला इकडची काडी तिकडे करायला लागत नसे. स्कूलबस घराच्या दारातून शाळेच्या आवारात सोडी. घरी आल्यावर करमणुकीसाठी टी.व्ही. असेच.
अनेकदा तिला सावध करूनही या सगळय़ाचा परिणाम व्हायचा तोच झाला. पंधराव्या वर्षी तिचे वजन ६५ किलो झाले. आता ती स्वत:च्या दिसण्याबाबत संवेदनशील झाली होती. आपले वजन तिला कमी करायचे होते. पण मार्ग सोपा नव्हता. जे चविष्ट आहे ते अनिष्ट आहे, हे कळत होते; पण खाण्याचे व्यसन सुटत नव्हते. व्यायाम करायची मुळीच सवय नव्हती. ती मग सगळा राग आईवर काढी आणि अधूनमधून माझ्यावर. चुटकी बजाके वजन कमी करणारे औषध तिला हवे होते. ती पुन्हा पुन्हा विचारी, ‘‘तुमचे वैद्यकशास्त्र इतके प्रगत आहे म्हणता आणि साधे वजन कमी करण्याचे औषध नाही?’’ शेवटी एक दिवस मी तिला ड्रॉवरमधून एक गोळी काढून दिली आणि सांगितले, ‘‘ही घे जादूची गोळी. यामुळे तुझे वजन नक्कीच कमी होईल.’’ ती संशयाने माझ्याकडे पाहत राहिली. म्हणाली, ‘‘फक्त एकच गोळी? कधी घ्यायची?’’ मी म्हटलं, ‘‘छे! छे! ही गोळी घ्यायची नाही. ताठ उभे राहायचे. गोळी खाली टाकायची. गुडघ्यात पाय न वाकवता गोळी उचलायची. पुन्हा ताठ उभे राहायचे. गोळी खाली टाकायची.. असे सकाळी २० वेळा, दुपारी २० वेळा आणि रात्री २० वेळा करायचे. हां! आणि या गोळीचे पथ्य कडक आहे बरं का! या गोळीला हात लावायच्या आधी दोन तास आणि नंतर दोन तास काहीही खायचे-प्यायचे नाही.’’ हसता हसता नेहाच्या आणि माझ्या दोघींच्या डोळय़ांत पाणी आले.
वाढलेले वजन कमी करणे आणि ते तसेच कमी ठेवणे जवळजवळ अशक्य आहे. लठ्ठपणावरचा सर्वात परिणामकारक उपाय म्हणजे मुळात लठ्ठपणा येऊच न देणे, हा आहे. आणि हे मात्र अगदी शक्य आहे. फक्त त्याबाबत पालकांमध्ये जागरूकता हवी. वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झालेले असले तरी योग्य आहाराचे आणि व्यायामाच्या सातत्याचे संस्कार करण्याला आज तरी पर्याय नाही.     

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा