News Flash

या मातीतील सूर : इये मराठीचिये नगरी

लोकसंगीतापर्यंत विविध गानप्रकारांचा उगम, जडणघडण, त्यातली सौंदर्यस्थळे, त्यांचा सांस्कृतिक-सामाजिक प्रभाव आदीची चिकित्सा करणारे सूरमयी सदर.

(संग्रहित छायाचित्र)

नरेंद्र भिडे

narendra@narendrabhide.com

मराठीजनांवर अधिराज्य करणाऱ्या नाटय़संगीतापासून लोकसंगीतापर्यंत विविध गानप्रकारांचा उगम, जडणघडण, त्यातली सौंदर्यस्थळे, त्यांचा सांस्कृतिक-सामाजिक प्रभाव आदीची चिकित्सा करणारे सूरमयी सदर..

मराठी संगीत ही एक अत्यंत व्यापक अशी संज्ञा आहे. लावणी, पोवाडा आणि अभंग म्हणजे मराठी संगीत, असा एक सार्वत्रिक समज आहे. दुर्दैवाने काही मराठी माणसांनाही यापलीकडे मराठी संगीत म्हणून काही आहे किंवा महाराष्ट्रीय म्हणता येईल असं संगीत आहे, याची फारशी जाणीव नाही. या सदरामध्ये मराठी संगीताच्या सर्व नाही, तरी बऱ्यापैकी पलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

मराठी संगीत हे दुर्दैवानं पंजाबी संगीत किंवा बंगाली रवींद्र संगीतासारखं भारतभर लोकांना फारसं ऐकू गेलेलं नाही. एखाद्या गाण्यामध्ये जर ‘विठ्ठल विठ्ठल’ किंवा ‘पांडुरंग हरी’ असा जयघोष ऐकू आला तर तो अभंग. किंवा ‘जी जी रं जी..’ असं ऐकू आलं तर ती लावणी किंवा पोवाडा, असा एक  सर्वसाधारण समज लोकांमध्ये पसरलेला आहे. अर्थात वर उल्लेख केलेल्या पंजाबी, बंगाली आणि भारतातील सर्वच संगीताचं थोडय़ाफार प्रमाणात हे असंच आहे. पंजाबी संगीत म्हणजे भांगडा आणि मृदंगम किंवा घटम्सारखी वाद्यं वाजली की ते दाक्षिणात्य संगीत.. एवढंच ज्ञान सर्वसामान्य भारतीय माणसाला असतं. त्यापलीकडे जाऊन या सर्व संगीतामध्ये आणि प्रामुख्यानं मराठी संगीतामध्ये काय दडलेलं आहे. त्याला काय इतिहास आहे, वर्तमान काय आहे आणि त्याला काय भविष्य आहे, या सगळ्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या सर्व संगीताचा मराठी चित्रपटसृष्टीतल्या वेगवेगळ्या गाण्यांमध्ये कसा वापर झाला आणि त्या अनुषंगाने तो वापर करणारे विविध संगीतकार, अरेंजर, वादक इ. महान कलावंतांच्या कामगिरीचा आढावासुद्धा या सदरातून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. याचबरोबरीनं स्त्री-गीतं, वेगवेगळ्या सणांची गाणी, हादग्याची गाणी, भावगीतं, वेगवेगळे श्लोक, आधुनिक नाटकातलं संगीत, चित्रपटातली गाणी.. अशा अनेक प्रकारांनी मराठी संगीताची कक्षा रुंदावण्याचं कार्य केलं आहे. त्याचाही धांडोळा घेण्याचा मानस आहे.

मराठी संगीताचं सर्वात प्राचीन रूप – जे मराठी लोकांना माहीत आहे – ते ‘ओवी’ या नावाने प्रसिद्ध आहे. ओवी म्हणजे काय, तर ओवी हा एक काव्यप्रकार आहे आणि त्याच्या रचनेला एक स्वतंत्र स्वत:ची अशी ढब आहे. या ओवीची विभागणी चार चरणांमध्ये केलेली आढळते. बरेचदा त्यातले पहिले तीन चरण हे एका लांबीचे असतात आणि चौथा चरण छोटा असतो. रामप्रहरी घरातली कामं करण्याकरता उठलेल्या आयाभगिनी दळण दळताना या ओव्या गात. या ओव्यांच्या संगीतामध्ये एक विशिष्ट प्रकारचा शांतपणा आहे. घरातील इतर लोक आणि विशेष करून लहान मुलं यांची झोपमोड होता कामा नये आणि तरीही काम करताना स्वत:चं मनोरंजनसुद्धा व्हावं, या हेतूने या ओव्यांच्या चाली बांधल्या गेल्याचं जाणवतं. मध्य सप्तकातल्या पंचमाच्या वर या ओव्यांमधले सूर जात नाहीत. बाकी कुठल्याही वाद्यांची साथ इथे आवश्यकच नाही. जात्याची घरघर आणि त्यातून मिळणारा एक संतत सूर.. यापलीकडे कुठलंही संगीत संयोजन या ओव्यांमध्ये नाही.

तोच प्रकार वासुदेवाचा. हातात टाळांची एक जोडी, डोक्यावर मोरपिसांची टोपी आणि सोबत एक पावा किंवा बासरी एवढंच घेऊन ही स्वारी घरापुढच्या अंगणात सकाळी हजर होत असे. या वासुदेवाची गाण्याची पद्धत ही लोकांना जाग यावी आणि जेवढं शक्य होईल तेवढय़ा दूरवर हा आवाज पोहोचावा, या पद्धतीने आखली गेलेली दिसते. खर्जात गाणारा वासुदेव मी तरी बघितलेला नाही. ‘पाची बोटांनी.. उजव्या हातानी’सारखी पारंपरिक गाणी हे वासुदेव तारसुरात गाऊन लोकांना जागं करीत, पण तारस्वरात असूनसुद्धा या गाण्यात गोडवा पुरेपूर भरलेला असे.

मराठी संगीत हे अशा अनेक लोकसंगीत प्रकारांवर बेतलेलं आहे. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे कीर्तन. हातात नारदी वीणा, शेजारी टाळ वाजवणारे आणि गायनाची साथ करणारे कलावंत आणि एक मृदंग वादक एवढाच काय तो ऑर्केस्ट्रा. कीर्तनी बाजातील गाणं हे लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांना जोडणारा एक छानसा दुवा आहे. कीर्तनकार बऱ्याचदा भारतीय शास्त्रीय संगीतातले जे प्रमुख राग आहेत त्यांचा आधार घेऊन अभंग गात अथवा त्याचे निरूपण करत असत. याच कीर्तनी परंपरेचा पुढे किर्लोस्करांनी नाटय़संगीतामध्ये भरपूर वापर केला. भास्करबुवा बखले आणि गोविंदराव टेंबे यांनी ‘स्वयंवर ’आणि ‘मानापमान’च्या निमित्तानं नाटय़संगीताला एक हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय वळण दिलं, पण तोपर्यंत नाटय़संगीतात ‘साक्या, दिंडय़ा’अशा कीर्तनातल्या रचनांचाच वापर भरपूर प्रमाणावर होत असे.

‘शाहिरी संगीत’ हासुद्धा मराठी संगीताचा एक मोठा आणि महत्त्वाचा पाया आहे. अज्ञानदासाचा पोवाडा हा अफझल खान वधाचं वर्णन करणारा पोवाडा म्हणून आपल्याला माहीत आहे. त्या पोवाडय़ासही आज साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत. इतिहासातील मोठय़ा योद्धय़ांचा आणि शासकांचा गौरव करणारा हा पोवाडा नंतरच्या काळात सामाजिक उत्थानाचं महत्त्वाचं कार्य करणारा एक मनोरंजक आणि त्वेषानं भरलेला गानप्रकार म्हणून रूढ पावला.

अज्ञानदासापासूनची ही परंपरा होनाजी बाळा, राम जोशी, पठ्ठे बापूराव, अनंत फंदी असं शृंगारिक वळण घेत शाहीर साबळे, शाहीर अमरशेख आणि शाहीर विठ्ठल उमप इथपर्यंत येऊन पोहोचली. याशिवाय गोंधळ, वाघ्या-मुरळीसारख्या, अठरापगड जातीतील महान कलावंतांनी विकसित केलेल्या लोकसंगीत प्रकारांचं, अस्सल मराठी रसिकांवर आजही तेवढंच गारूड आहे. मराठी संगीत हे या संत, तंत आणि पंतकवींच्या रचनांवर पुढे विकसित झालं आणि रुजलं.

आज आपण मराठी म्हणून जे संगीत ऐकतो, त्याला कितीही आधुनिक रूप आपण दिलेलं असलं, तरी त्याची पाळंमुळं ही याच संगीतात खोलवर दडलेली आहेत. आजच्या संगीतकारांनी याचा पुरेपूर अभ्यास करून या सर्व पारंपरिक संगीताचा वापर आपल्या रचनांमध्ये करणं आवश्यक आहे. लोकांना माहीत असलेल्या वरवरच्या चाली आणि तेच तेच शब्द यापलीकडे हे संगीत खूप खोलवर पसरलेलं आहे याची जाण ठेवावी. मराठी संगीत हे केवळ लावणी, पोवाडा आणि गोंधळापुरतं मर्यादित न राहता ते त्याच्या सर्व खुबींसह सर्वदूर पोहोचावं, ही सर्व संगीतकर्मीची जबाबदारी आहे. तसं झालं तरच हे संगीत टिकणार आहे. अन्यथा नुसता ढोलकीचा एक तुकडा, ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर आणि ‘जी जी रं जी..’ची झील यापलीकडेही काही आहे, याचं विस्मरण व्हायला फारसा वेळ लागणार नाही. जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाच्या रेटय़ात या सर्व परंपरा अस्तंगत होत चाललेल्या आहेत. त्यात या मराठी संगीताची भर पडेल, इतकंच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:08 am

Web Title: types of anthem lokrang ya matitil sur narendra bhide article abn 97
Next Stories
1 खेळ मांडला.. : कसोटी क्रिकेटची कसोटी!
2 स्वत:ची ओळख होण्याचे वर्ष
3 समृद्ध जाणिवांचं संचित
Just Now!
X