News Flash

इतिहासाचे चष्मे : इतिहास समजून घेताना..

या लेखमालेद्वारे भारतीय इतिहासाला समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील असे २५ चष्मे सादर करण्यात येतील..

चित्रसौजन्य : जर्मनीतील बॉन येथील हत्तीच्या गोष्टीचे शिल्प (छाया : अमेय पिंपळखरे) 

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

hrajopadhye@orfonline.org

महाकाय भारतीय इतिहास, संस्कृती किंवा धर्मव्यवस्थांचं स्वरूप समजून घेण्यासाठी कोणतीही एकच एक साचेबद्ध अभ्यासप्रणाली पुरेशी पडत नाही. या अभ्यासासाठी कधी परस्परविसंगत, तर कधी एकमेकांवर साचल्या जाणाऱ्या किंवा पूरक ठरणाऱ्या अशा अभ्यासतत्त्वांचा आधार घ्यावा लागतो. या लेखमालेद्वारे भारतीय इतिहासाला समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील असे २५ चष्मे सादर करण्यात येतील..

‘शिवमहिम्नस्तोत्र’ हे भारतीय शैव उपासनाविश्वातील एक महत्त्वाचं स्तोत्र. नितांतसुंदर शब्दकळा, शैव दर्शनांतील विविध सिद्धांतांचे संदर्भ व शैव सिद्धांताला अनुकूल अशा प्रतिमा यांनी नटलेल्या या स्तोत्राच्या सुरुवातीला शिवशंकराची करुणा भाकताना रचनाकार म्हणतो, ‘‘वेद, सांख्य, योग, शैव मत, वैष्णव मत इत्यादी वेगवेगळ्या मतांचे पालन आपापल्या आवडीनुसार, सोयीनुसार उपासनाविश्वात केले जात असले तरीही त्यांचे अंतिम ध्येय मात्र- हे शिवशंकरा, तूच आहेस.’’ अशाच प्रकारची धारणा ‘एक सद्विप्रा: बहुधा वदन्ति।’ (सत्याला/ ईश्वरी तत्त्वाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.) वैदिक ऋषींचीही असल्याचे दिसून येते. अर्थात उपासना-श्रद्धा हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे हे खरे. मात्र, वेगवेगळ्या मार्गानी एका विवक्षित ध्येयाकडे जाण्याची कल्पना वेगवेगळ्या भारतीय दर्शनप्रणालींत वेगवेगळ्या रीतीने, कमी-अधिक प्रमाणात अनेकदा दिसून येते. बौद्ध ग्रंथामध्ये उद्गम असलेली आणि मग जगभर विख्यात झालेली सात आंधळ्यांची – आपापल्या आकलनानुसार हत्तीचा आकार कल्पिण्याची प्रसिद्ध कथा काहीशी याच अंगाने जाते. खरं तर केवळ भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या बहुतांश प्राचीन ज्ञानपरंपरांमध्ये एखाद्या विशिष्ट विषयाचा किंवा तत्त्वाचा विचार करताना त्याकडे पाहायचे, आकलन करवून घेत संबंधित विषय आत्मसात करायचे वेगवेगळे मार्ग, विचारप्रणाली एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात, ही जाणीव कमी-अधिक प्रमाणात जागती असल्याचे दिसून येते.

साधारणत: ११ व्या शतकाच्या मध्यात भारतात येऊन गेलेल्या अल् बेरुनी या इराणी विद्वान प्रवाशाने भारतातील तत्त्वज्ञ आणि सामान्य जनता या दोहोंतील जगाविषयीच्या दृष्टिकोनातील फरक टिपून ठेवला आहे. आज संपूर्ण जगात आणि अर्थातच आपल्याही देशात वेगवेगळ्या मतप्रणालींच्या अनुयायांचे, पाईकांचे एकमेकांशी असलेले संबंध अतिशय संवेदनशील झालेले दिसून येतात. वेगवेगळ्या विचारव्यूहांचा एकमेकांशी झालेला संघर्ष, त्यातून उदयाला आलेले राजकारण, धर्मकारण आणि समाजकारण यांचा इतिहास विविध समाजशास्त्रज्ञ व इतिहासकारांनी आपल्या अभ्यासातून समाजापुढे आणला आहे. या साऱ्या ऐतिहासिक संघर्षांचे मूळ वैचारिक मतभेद, दृष्टिकोनांतील फरक, जीवनमानातील आणि आचारपद्धतींतील भेद यांत दडलेले दिसून येते. संबंधित अस्मिता या ‘स्वत्व’विषयक कल्पनांच्या प्रामाण्याविषयी असलेल्या अत्याग्रहातून आकाराला येतात. आधुनिक काळात या प्रामाण्यविषयक कल्पनांना अतिशय गतिमान अशा राजकीय व सामाजिक व्यवस्थांचे आयाम मिळाल्यामुळे या संघर्षांचे पैलू अधिकाधिक जटिल झाल्याचे दिसते. भरीस भर म्हणून समाजमाध्यमांचा विस्फोट झाल्यावर बहुसंख्याक जनतेला आपले विचार आणि अस्मिता प्रकट करण्याचे हक्काचे साधन प्राप्त झाले व त्यातून या साऱ्या गुंतागुंतीला अधिक संवेदनशील रूप मिळाल्याचे दिसत आहे.

सुरुवातीला नोंदविलेल्या अल् बेरुनीच्या निरीक्षणानुसार अभ्यासक, विचारवंत आणि सामान्य जनता यांच्यात निर्माण झालेली दरी आज नऊ शतकांनंतरदेखील तशीच असल्याचे पुन्हा जाणवते आहे. आणि म्हणूनच जनता आणि विद्वान-अभ्यासकांचा वर्ग या दोन्ही गटांनी याबाबतीत अधिक जागरूक राहण्याची गरज आज जाणवू लागली आहे. प्रत्यक्ष राजकीय, सामाजिक जीवनात आणि समाजमाध्यमांवरील आभासी सृष्टीत दिसून येणाऱ्या आजच्या संघर्षांपैकी बहुतांश संघर्ष हे राजकीय विचारसरणी आणि धार्मिक, जातीय, सामूहिक वगैरे अस्मितांभोवती फिरत असल्याचे दिसून येते. या अस्मितांचा उदय हा प्रत्येकाच्या वैयक्तिक अथवा सामूहिक धारणा, संस्कार व त्यातून आपापल्या परीने करवून घेतलेल्या भूतकाळाच्या किंवा समाजाच्या आकलनातून- थोडक्यात, वर नमूद केलेल्या हत्तीच्या गोष्टीतील हाताला लागेल त्या आकारानुसार हत्तीचा आकार ठरवण्याच्या रीतीने होत असतो. यातून दोन गोष्टी घडताना दिसतात. पहिली म्हणजे यातून भारंभार तज्ज्ञ, नामवंत अभ्यासक, ज्येष्ठ विश्लेषक वगैरे मंडळी अवतीर्ण होतात. त्यातून ज्ञानसाधनांचे सार्वत्रिकीकरण होत असले तरीही शास्त्रीय अभ्यासाच्या चौकटीचे, समाजातील ज्ञानव्यवस्थांचे आणि पर्यायाने समाजाचे यातून नुकसानच होते. दुसरा परिणाम म्हणजे मुख्य प्रवाहातील अभ्यासक-विद्वान यांचा सामान्य जनमानसाशी असलेला संपर्क किंवा जवळीक संपून गेल्याची सार्थ तक्रारदेखील वाढीस लागलेली दिसून येते. यातून विद्वत्वर्ग आणि अभ्यासकीय वर्तुळाच्या बाहेर असलेला वाचकवर्ग व जनता यांच्यातला विसंवाद स्पष्टपणे डोके वर काढू लागल्याचं समाजमाध्यमांतून दिसू लागलं आहे. भारतासारख्या विस्तृत आणि अतिशय गुंतागुंतीची सामाजिक पृष्ठभूमी असलेल्या भूप्रदेशांमध्ये हे प्रश्न अधिक गुंतागुंत वाढवणारे ठरतात. त्यामुळे आंतरविद्याशाखीय पद्धती व ज्ञानमीमांसाशास्त्राच्या (Hermeneutics) अंगाने इतिहास व परंपरांचा परामर्श वेगवेगळ्या माध्यमांतून घेत राहणे हा एक औचित्यपूर्ण व सकारात्मक असा तोडगा वा मार्ग ठरू शकतो.

धर्मविज्ञानाच्या नामवंत अभ्यासिका प्रा. डायना एक यांनी म्हंटल्याप्रमाणे, ज्ञानमीमांसाशास्त्र हे शास्त्र वेगवेगळ्या संकल्पना आणि ग्रंथ समजून घेण्यासाठी वापरले जाते. आपल्या भोवताली दिसून येणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतींतून निर्माण झालेल्या भौतिक प्रतिमा आणि कलाविष्कारांप्रमाणेच लोकजीवनातल्या वेगवेगळ्या प्रवाहांतील लोकधारणा, कर्मकांडं आणि दैनंदिन जीवनमानातून अभिव्यक्त होणाऱ्या वेगवेगळ्या तत्त्वांना समजून घेण्यासाठी हे शास्त्र अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. महाकाय, सहस्रशीर्ष अशा भारतीय इतिहास, संस्कृती किंवा धर्मव्यवस्थांचं स्वरूप समजून घेण्यासाठी कोणतीही एकच एक साचेबद्ध अभ्यासप्रणाली अनुसरणं बहुतांशी पुरेसं पडत नाही.

या अभ्यासासाठी कधी परस्परविसंगत, तर कधी एकमेकांवर साचल्या जाणाऱ्या (OVERLAP) किंवा पूरक ठरणाऱ्या अशा अभ्यासतत्त्वांचा आधार घ्यावा लागतो. या लेखमालेद्वारे भारतीय इतिहासाला समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील असे २५ चष्मे वाचकांसमोर सादर करण्यात येतील. एखाद्या हॅँडबुकद्वारे संबंधित विषयातील महत्त्वाची तत्त्वे मांडली जावीत, तसे भारतीय इतिहासाला आणि इतिहासविषयक धारणांना आकार देणारे २५ कळीचे मुद्दे किंवा संकल्पनाविषय (THEMES) निवडून त्यांच्या चौकटीत इतिहासातील मुख्य घटनांचा परामर्श घेणे, हा या सदरामागील मुख्य हेतू आहे. या २५ संकल्पनाविषयांची यादी येणेप्रमाणे : अस्मिता, स्मृती, वसाहतवाद, मिथके, अनुभव-प्रचीती, स्थलांतर, समूहवाद, जातव्यवस्था, पुरोगामित्व, वसाहतवाद, लिंगभाव, बळ (POWER) व बलाधारित संघर्ष, कामभावना, पावित्र्यविषयक संकल्पना, शोषण, कुटुंबव्यवस्था,  भौगोलिक रचना, आहारविवेक, गूढवाद, प्राचीन विज्ञान, कला, साहित्यातून दिसणारा समाज, पौर्वात्यवाद, बुद्धी, राष्ट्रवाद, विखंडनवाद (DECONSTRUCTION).

या २५ विषयांची सूची पाहिली असता यापैकी काही विषय हे मुख्यत: मानवी समाजात आढळून येणाऱ्या उपजत जाणिवा, संवेदनांचा विषय आहेत. काही विषय हे सामाजिक व्यवस्थांनी जन्माला घातलेल्या प्रणालीचा चिकित्सक मागोवा घेताना अभ्यासचच्रेतून पुढे आलेल्या महत्त्वाच्या समाजशास्त्रीय संकल्पना आहेत. या २५ संकल्पना भारतीय इतिहासाच्या अध्ययनासाठीची, अकादमिक चिकित्सेत शिरण्यासाठीची २५ द्वारे ठरतील, यादृष्टीने विषयांची मांडणी करण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे. अर्थात महाकाय भूभागात पसरलेल्या, हजारो वर्षे जुन्या व गतिमान राहिलेल्या या इतिहासपटावरील प्रत्येक विषयाला, घटनेला किंवा संकल्पनेला स्पर्श करणे महाकठीण काम आहे, ही जाणीव आपल्याला कायम लक्षात ठेवावी लागेलच. याशिवाय हे करताना काही वेळा संकल्पनांचे ओवरलॅपिंग(overlapping) होण्याची शक्यता बळावते. मात्र, असे क्वचित घडले तरी ते विषयाच्या किंवा संकल्पनांच्या आकलनासाठी अधिक उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. या २५ संकल्पना विशद करताना त्यांच्या मूळ वाच्यार्थापासून सुरुवात करत ऐतिहासिक संदर्भात त्यांच्या अर्थाची व्याप्ती कसकशी वाढत गेली, याचा धांडोळा घेतला जाईल. या संकल्पनांचा धांडोळा घेताना संबंधित संकल्पनांच्या वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक आयामांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐतिहासिक घटना, वेगवेगळ्या मिथकात्म कथा, नाटय़, काव्यग्रंथांतील प्रसंगांचे दाखले देत त्यांचे विश्लेषण यानिमित्ताने केले जाईल.

इतिहासलेखन म्हणजे अभ्यासकाने संबंधित वर्तमानाचे इतिहासातील तपशिलावर केलेले अध्यारोपण असते असे नेहमी म्हटले जाते. भारतीय इतिहासासंदर्भात संस्कृती किंवा धर्म वगैरे संज्ञा वापरल्या जाताना त्या ऐतिहासिक व राजकीय धारणांची वेगवेगळी ओझी घेऊन त्या- त्या वर्तमानात अभिव्यक्त होत असतात. वसाहतकाळात पाश्चात्त्य राजकीय आणि शिक्षणव्यवस्थेद्वारे भारतीय इतिहास किंवा संस्कृती, धर्म इत्यादीसंदर्भातील राजकीय, सांस्कृतिक विशेषत्वाची जाणीव एकसंध, एकसाची होऊ लागली असा दावा बरेचसे आधुनिक इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ व वसाहतोत्तर काळाचे अभ्यासक करतात, तर आधुनिक अभ्यासकांचाच एक गट वरील संज्ञांसोबत येणारे ऐतिहासिक व राजकीय जाणिवांचे ओझे वसाहतपूर्व काळापासूनच भारतीय समाज वागवत आला आहे असे मानतो. वरील २५ चष्म्यांतून भारतीय इतिहासाकडे पाहताना या दोन्ही मतांचा परामर्श घेत दोन्ही मतांचे औचित्य तपासायचा प्रयत्नदेखील आपसूक या सदराद्वारे केला जाईल.

लेखाच्या सुरुवातीला म्हंटल्यानुसार, शिवमहिम्न स्तोत्रातील श्लोक किंवा बौद्धपरंपरेतील हत्तीच्या कथेशी साधर्म्य दाखवणाऱ्या या जाणिवा आधुनिक मानववंशशास्त्रज्ञांना वॉलेस स्टीव्हन्स या अमेरिकी मॉडर्निस्ट कवीच्या ‘थर्टीन वेज ऑफ लुकिंग अ‍ॅट द बर्ड’ नावाच्या काव्यात दिसून आल्या. एका काळ्या रंगाच्या पक्ष्याकडे पाहतानाचे १३ वेगळे दृष्टिकोन स्टीव्हन्सने या कवितेच्या छोटय़ा छोटय़ा कडव्यांतून दिलेले दिसतात. हे दृष्टिकोन कवीला दिसलेली पक्ष्याची वेगवेगळी रूपडी, कवीची मानसिकता आणि त्याचे आकलन किंवा मूड्स यांतून आकाराला आलेले दिसतात. मात्र, या लेखमालेच्या अनुषंगाने हाताळण्यात येणारे संकल्पना-विषय हे काटेकोर अकादमिक शिस्त बाळगून हाताळले जातील. हे संकल्पनाविषय आजच्या राजकीय-सांस्कृतिकदृष्टय़ा आत्यंतिक भावनिक आणि स्फोटक झालेल्या समाजात मांडणे अतिशय जिकिरीचे काम आहे. तरीही कुठल्याही वैयक्तिक, राजकीय किंवा सांस्कृतिक संस्कारांच्या चौकटीपासून अलिप्त राहून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, ही ग्वाही देत या नव्या लेखमालेचा आरंभ आपण करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:20 am

Web Title: understanding history lokrang itihaasa che chasme article abn 97
Next Stories
1 ते दिवस..
2 दखल : कहाणी.. त्यांच्या लढय़ाची!
3 नव्या क्रांतीची धुरा तरुणांच्या खांद्यावर!
Just Now!
X