काबाडकष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना मुखर करणारे इंद्रजित भालेराव यांच्या समग्र कवितांची समीक्षा करणारा ‘इंद्रजित भालेराव यांची कविता- आकलन, आस्वाद आणि आक्षेप’ हा ग्रंथ भगवान काळे यांनी संपादित केला आहे. २४ ऑक्टोबरला तो साक्षात प्रकाशन, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील संपादकीयाचा हा काही अंश..
इंद्रजित भालेराव हे १९८९ साली प्रकाशित झालेल्या पहिल्याच ‘पीकपाणी’ या कवितासंग्रहाने काव्यरसिक-समीक्षकांना परिचित झाले. ‘पीकपाणी’ या कवितासंग्रहापासून सुरू झालेला त्यांचा काव्यप्रवास ‘भूमीचे मार्दव’ या कवितासंग्रहापर्यंत आजतागायत सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या कवितेने एकूणच मराठी कवितेत आपला वेगळा असा प्रभाव निर्माण केला आहे. कविता लेखकाबरोबरच कविता सादरीकरणाच्या अप्रतिम शैलीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची कविता पोहचली आहे. कविता अशा वेगवेगळ्या स्तरांवर पोहचण्याचे भाग्य फारच थोडय़ा कवींच्या वाटय़ाला येते. अनाकलनीय प्रतिमांच्या भाषेत त्यांची कविता कधी बोलत नाही; सध्या सरळ बोलीभाषेत त्यांची कविता थेटपणे वाचक-श्रोत्यांपर्यंत पोहोचते आणि आपला परिणाम साधते. काय सांगायचे आहे, याबद्दल त्यांची धारणा पक्की आहे. ज्या परिसर आणि समाजाशी त्यांचे घट्ट नाते आहे, ज्या परिसर आणि समाजाने त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत त्याबद्दलच ही कविता बोलते. शेती, शेतकरी आणि त्या अनुषंगाने येणारा निसर्ग यांच्याशी या कवितेचे घट्ट नाते आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांबरोबर त्यांचे गुणदोष, त्यांच्या धारणा, रूढी-परंपरा, समज-अपसमज, लोकसंकेत यांच्यासह संपूर्ण कृषिजीवन त्यांची कविता विविध बारकाव्यांसह आपल्या आवाक्यात घेताना दिसते. म्हणूनच संपूर्ण कृषिसंस्कृतीचे दर्शन त्यांच्या कवितेतून होताना दिसते. शब्दांना शेणामातीचा दरवळ अपेक्षिणारी त्यांची कविता केवळ अभावाचे चित्रण न करता कृषिसंस्कृतीतील सौदर्यस्थळांचाही वेध घेते. अशा विविधांगी आशयामुळे त्यांची कविता एकसुरी होत नाही. कृषिसंस्कृतीशी संबंधित असणारे सर्व घटक, पशुपक्षी, झाडेझुडपे, गवत, विविध हंगाम, पाऊस, शेतीची अवजारे अशा सर्व गोष्टी कवितेचा विषय होताना दिसतात. या सर्व बाबी कवितेचा विषय होतात, यातही एक सहजता आहे. प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि भोगलेल्या शेतकरी जीवनाच्या वास्तवामुळे ही सहजता आणि उत्कटता कवितेत उतरली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील अपार कष्ट, त्याचे अभावग्रस्त जगणे याचे चित्रण करताना त्यांची कविता अधिक टोकदार होते. म्हणून गव्हासारख्या पिकावरील कवितेतही शेतकऱ्याचे अभावग्रस्त जगणे ते अधोरेखित करतात.
शेतकऱ्याचे अभावग्रस्त जगणे, प्रचलित व्यवस्थेत त्यांचे होणारे शोषण या गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. शेतकऱ्यांच्या शोषणाला जबाबदार असलेल्या घटकांचे त्यांना पक्के भान आहे. म्हणून समाजव्यवस्थेला कालचा वामन आणि नव्या अर्थप्रधान व्यवस्थेला आजचा वामन यांची जातकुळी वरकरणी भिन्न वाटत असली तरी शेतकऱ्यांच्या शोषणाबाबत त्यांची असलेली एकवाक्यता ते अधोरेखित करतात. शहरातल्या दुष्मानाबरोबर पोटचे हनुमानही शेतकऱ्यांच्या शोषणाचे लाभार्थी आहेत, हे त्यांना माहीत आहे.
शेतकऱ्याला सृष्टीचे सहावे तत्त्व समजावे असे मानणारी त्यांची कविता शेतकऱ्याला, जगाच्या पोशिंद्यांच्या रूपात बघते, जगाचा पालनकर्ता समजते; म्हणूनच शेतकऱ्यांचे ‘बाप’पण त्यांच्या कवितेत जागोजाग दिसते. या बापाचे पिळले जाणे त्यांना पाहवत नाही. त्यासंबंधीची चीड कवितेतून व्यक्त होताना दिसते.
जागतिकीकरणाच्या झपाटय़ात उद्ध्वस्त होत जाणाऱ्या शेतीव्यवस्थेचे चित्रण त्यांच्या कवितेत येते, संघर्षांची भाषा त्यांची कविता बोलू लागते. अस्मानी आणि सुलतानी संकटांना निमूटपणे सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना संघर्ष करण्याचे आवाहन करते. अत्यंत संयम आणि समतोल प्रकृतिधर्म असणारी त्यांची ‘पीकपाणी’मधील कविता ‘टाहो’मधील काही कवितांत वेगळे रूप घेऊन येताना दिसते. शेतीव्यवस्थेच्या परिवर्तनाची भूमिका घेऊन कुणब्यांच्या येणाऱ्या पिढय़ांना नव्या लढाईसाठी सिद्ध होण्याचे आवाहन करते. म्हणूनच कृषिव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवू पाहणाऱ्या शेतकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांची    कविता आपली भावना व्यक्त करण्यास अधिक जवळची वाटते. शोषितांच्या एका मोठय़ा वर्गाच्या भावना अत्यंत निष्ठेने व्यक्त करण्याचे सामथ्र्य त्यांच्या कवितेने दाखवून दिले आहे. रसिक आणि समीक्षकांचा वर्ग ओलांडून सामान्यांपर्यंत पोहचलेली अलीकडच्या काळातील ‘शीक बाबा शीक, लढायला शीक’ ही एकमेव कविता आहे. जनसामान्यांच्या भावना मुखर करण्यातच कवितेची फलश्रुती असते.
इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ठळकपणे लक्षात येणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील स्त्री-चित्रण. मुळातच पारंपरिक लोकगीते, जात्यावरच्या ओव्या यांचे संस्कार पचवलेली त्यांची कविता आहे. आई आणि बहिणीच्या तोंडून ऐकलेल्या ओव्यांनी त्यांच्या कवितेला बळ दिल्याचे ते मान्य करतात. ग्रामीण स्त्रियांच्या सुख-दु:खाची वेगवेगळी रूपे त्यांनी जवळून अनुभवली आहेत. त्यामुळे त्यातील बारकाव्यांसह उत्कटपणे आलेले चित्रण त्यांच्या कवितेत दिसते. आई, सासू, सून, बहीण, आजी अशा विविध नात्यांबरोबरच दाईच्या रूपातील दलित स्त्रीही या कवितेत भेटते. शेतीव्यवस्थेत स्त्रियांच्या वाटय़ाला येणारे कष्ट आणि रांगडय़ा किंवा रानटीपणाकडे झुकलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांचा होणारा कोंडमारा भालेराव यांनी अत्यंत समर्थपणे टिपला आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा स्त्रीची परिस्थिती तर आणखीच वाईट. घरदार आणि समाज सांभाळताना तिची होणारी घालमेल याचे चित्रण ते अत्यंत सूचकतेने करतात.
शेतकरी कुटुंबातील स्त्री हाच शेतीव्यवस्थेचा खरा आधार आहे. उपजत असलेली सोशिकता दुर्गुण ठरावा एवढय़ा पातळीवर आहे; परंतु दुसरा पर्यायही तिच्यासमोर उपलब्ध नाही. अशा या स्त्रीच्या विविध भावना भालेराव यांच्या कवितेत प्रक ट झाल्या आहेत. प्रेम, शृंगार, विरह, भावनिक घुसमट यांच्या विविध तऱ्हा त्यांनी चित्रित केल्या आहेत. ‘कुळंबिणीची कहाणी’ या दीर्घ कवितेतून आलेले स्वत:चे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या स्त्रीरूपाचे आणखी वेगळे दर्शन घडते. कृषिसंस्कृतीशी अतूट नाते ठेवून ‘मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं’ असा संस्कार येणाऱ्या पिढय़ांवर करणारी, स्वत:च्या सुखाचा विचार न करता नातेसंबंधांना महत्त्व देणारी स्त्री त्यांच्या कवितेत भेटते.
इंद्रजित भालेराव यांना गावगाडय़ाची पक्की समज आहे. शेतकरी आलुतेदार-बलुतेदार यांच्या परस्पर संबंधांतील बारकावे त्यांना माहीत आहेत. गावगाडय़ात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर होणारा अन्याय, जातीजातींमधील परपस्परसंबंध त्यातील तणावांसह ते व्यक्त करतात. कुटुंब, नातेसंबंध, भावभावकी, गावातील राजकारण असा गावगाडय़ाचा मोठा पट त्यांच्या कवितेतून साक्षात होतो. कृषिव्यवस्था केंद्रस्थानी असलेल्या ग्रामजीवनातील सर्व वृत्ती-प्रवृत्ती त्यांनी चित्रित केल्या आहेत. मानवी नाते संबंधांबरोबरच ग्रामसंस्कृतीचे निसर्गाशी असलेले महत्त्व, पेरणी, सुगी या हंगामांना असलेले महत्त्व त्यांच्या कवितेत उत्कटपणे येते. गाव आणि गावाभोवतालचा निसर्ग, वेगवेगळी झाडे, विविध पिके आणि त्या पिकांचे गुणधर्म, गवताचे वेगवेगळे प्रकार या सर्व गोष्टींनी त्यांच्या        कवितेत प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या कवितेतून येणारा निसर्ग रस-रूप-गंध आणि चव घेऊन अवतरतो. निसर्गाचे इतके सहृदय चित्रण आणि सर्जनाच्या पातळीवर त्याचा केलेला आविष्कार यापूर्वी व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनातच प्रामुख्याने दिसतो. वेगवेगळी पिके आणि गवतावरील त्यांच्या कविता केवळ माहितीच्या पातळीवर राहत नाहीत तर त्यामागे असलेल्या लोकधारणा, लोकजीवनात प्रचलित असलेले त्यांच्याबद्दलचे बरे-वाईट संदर्भ कवितांना वेगळे संदर्भमूल्य प्राप्त करून देतात.
त्यांच्या कवितेवर लोकगीते, लोकलय, ओवी आणि अभंग यांचा फार मोठा प्रभाव आहे. संस्कारक्षम वयात कानावर पडलेल्या जात्यावरच्या ओव्या, भजने, आरत्या, अभंग यांनी आपल्या कवितेत समृद्ध केल्याचे ते मान्य करतात. म्हणूनच संत तुकाराम, संत जनाबाई चौधरी, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ आदींच्या रचना त्यांच्या पूर्वसुरी ठरतात. त्यांच्या कवितेची  भाषा वाडय़ातल्या ग्रामीण माणसाची भाषा आहे.

Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?