अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ या राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकातील प्रस्तावनेचा संपादित अंश..

मार्च महिन्यात टाळेबंदी सुरू झाली. घराबाहेर पडणं बंद झालं. मित्र घरी येईनात. कधीही न संपणारं भुयार घरातच तयार झालं. आजूबाजूला लिबलिबित, चिकट काळोख.. पुढची वाटच दिसत नाही.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Everything You Need To Know About Pune Famous Tourist place sarasbag history name and many more
पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…

खरं तर गेली दहा-बारा र्वष मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलंय. सहसा बाहेर पडत नाही. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू होतं. पण करोनानं एकटेपण लादलं. ही सक्ती नकोशी झाली. रोजची कामं सुरू होती. रिपोर्टिगही रुटुखुटु सुरू होतं. तरी मन मानेना. अस्वस्थता सोसवेना.

मनात आलं, पुस्तकांची नीट व्यवस्था लावावी. आधी माळ्यावरची ट्रंक काढली. बुक शेल्फ नंतर करू म्हटलं. एक-एक करून सगळे उर्दू ‘दीवान’ (कवितासंग्रह) टुणकन् उडय़ा मारून खाली उतरले नि माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले. मन निखळ आनंदानं भरून गेलं. किती आठवणी या पुस्तकांच्या. देवनागरी लिपीत छापलेल्या उर्दू ऩज्म नि गजला. १९७०-१९९० या वीस वर्षांत जमतील तेवढे सगळे ‘दीवान’ विकत घेतले होते. एक-एक कवितासंग्रह म्हणजे झगझगतं झुंबर.

रात्री दाग़ देहलवी वाचून काढला. आठवडय़ाभरात सौदा, ऩजीर, अक़बराबादी, अकबर इलाहाबादी, मोमिन, ़जौक़, मिर्झा ग़ालिब.. कितव्यांदा वाचत होतो, ठाऊक नाही. बरेच शेर मला तोंडपाठ आहेत. ते पुन्हा पुन्हा स्वत:शी गुणगुणू लागलो.

करोना म्हणजे संहार. शायरी म्हणजे जीवन. सुखदु:खानं लकाकणारं, आदिम ऊर्जेनं थळथळणारं, सृजनानं नटलेलं, माणुसकीनं तेजाळलेलं जीवन. मरणावर मात करू पाहणारं जीवन.

मनात आलं- उर्दू कवींवर लिहावं. रोज रात्री आयपॅडवर बोटं चालू लागली. पहिले चार लेख एक धुंदीतच लिहून काढले. मग चार-पाच दिवसांचा ब्रेक. एक खोल श्वास घेतला अन् पुन्हा लिहू लागलो. लिहिता लिहिता वाटलं, आयपॅडचा पियानो झाला की काय. की-बोर्डमधून तरन्नुमचे हलके  हलके  सुखसूर पाझरू लागले.

मनात म्हटलं, ही कवितेची किमया; ही कवीची मातब्बरी. आपण नुसते हमाल. ‘फोडिले भंडार, धन्याचा हा माल..’ कवी म्हणजे आत्मचेतनेचं फू ल आणि कवितेची प्रत्येक ओळ म्हणजे देवानं रंगवलेलं फुलपाखरू.

काम करता करता शेर गुणगुणू लागलो..

‘देख ़िजंदाँ से परे रंगे-चमन जोश-ए-बहार

ऱक्स करना है तो फिर पाँव की जंजीर न देख’

(मजरूह सुलतानपुरी)

(तुरुंगवास भोगावा लागतोय म्हणून वैतागतोस का? गजांपलीकडे जरा पाहा, वसंत बघ आपले रंग सगळीकडे उधळतोय, बघ की; जगाला विसरून नाच, पायांतल्या बेडय़ांकडे लक्ष देऊ नकोस.)

करोनानं एक शिकवलं. स्वत:त खोल बुडी मार. बरोबर कविता असू दे. यापुढे अनेकवचनी जगण्यात अर्थ नाही. लाखो र्वष तारका, ग्रह एकमेकांचा आब सांभाळून, लाखो योजन अंतर असूनही एकमेकांशी शुद्ध चित्तानं संवाद साधत असतात. एकटे जळत असतात नि सगळे मिळून जगाला निळा प्रकाश देत असतात. हे करून पाहायला हवं. हीच वेळ आहे.

मनाला उभारी आली.

मी स्वत:ला म्हणालो- ‘‘चल, शायरीचं बोट धर नि आत उतर. खोल आत एक डोह आहे. तिथे असेल कदाचित माणुसकीचं पाणी नि आनंदाची कमळं. चल शोधू. हीच वेळ आहे.’’

गेली तीसेक र्वष भारतातले उर्दू लेखक दहशतवाद, राजकारण, मुसलमानांचं दुभंगलेपण, अस्वस्थ सामाजिक परिस्थिती, आधुनिकतेची आव्हानं या समकालीन विषयांवर विलक्षण ताकदीनं आणि कलात्मक भान ठेवून लिहिताहेत. उर्दू ही भारताची भाषा आहे, या आस्थेनं लिहिताहेत. मं़जूर एहतेशामसारखे लेखक हिंदीत लिहिताहेत. अहमद फ़रा़ज पाकिस्तानातले; पण भारतीय संस्कृ तीचे आरोह-अवरोह त्यांना ठाऊक होते. जावेद अख़्तर यांचा ‘तरकीश’ कवितासंग्रह आधी देवनागरीत छापून आला.

भाषा माणसाला बदलते. माणूसही भाषेला आपल्या परीनं नवं वळण लावत असतो. ही एक प्रक्रिया असते आणि ती अनेक शतकं  चालते. यामुळे माणसाचं जगणं समृद्ध होतं. त्याला/ तिला संस्कृतीचं भान येतं.

भाषा आधी बोलायची असते. लिहिणं ही नंतरची गोष्ट. मूल जेव्हा पहिला शब्द उच्चारतं, तेव्हा आईला आनंद होतो. भाषेचे आनंदाश्रू मात्र आपल्याला दिसत नाहीत. भाषा स्वत: मौन पाळते, ती दिसतही नाही; पण वाऱ्याप्रमाणे सगळ्यांना लपेटून घेते. भाषेचं बळ उच्चारात आहे आणि ती थेट काळजाला स्पर्श करते. उच्चार हीच उर्दूची ताकद आहे.

दैनंदिन व्यवहारामुळे भाषा टिकते हे खरं; पण  यावरच समाधान मानायचं काय? भाषा समृद्ध झाली पाहिजे. तिच्यातले अनेक झरे बाहेर आले पाहिजेत; अर्थाची अनेक वलयं तिच्याभोवती उजळली पाहिजेत. मुख्य म्हणजे ती सतत बोलली गेली पाहिजे.

किरकोळ दुकानदार, वाणी, कलाल नि सैनिक यांच्या रोजच्या बोलण्यातून उर्दू जन्माला आली; पण पुढे तिनं फार मोठा पल्ला गाठला. एका भव्य काळाचं निरुपण के लं. याचं कारण उर्दू ही मुळात मौखिक परंपरेतली आहे. उच्चाराला महत्त्व आहे. शेर लिहिला, असं ते म्हणत नाहीत- ‘कहा’ म्हणतात. ‘क्या खूब शेर कहा है आपने!’ भाषेला ‘़जुबाँ’ असा शब्द आहे. मनातला शब्द आधी जिभेवर येतो; नंतर कागदावर उतरतो.

माणसं आणि भाषा यांच्यात एक हार्दिक संगनमत असावं लागतं, की मग काहीतरी शुभमय घडतं. ही प्रक्रिया एकाच वेळी अनेक स्तरांवर सुरू असते. अगदी सहजपणे. जसं खडकात पाणी. जवळजवळ दोनशे र्वष उर्दू ही संक्रमणाच्या प्रदीर्घ नि बहुआयामी प्रोसेसमधून जात होती. टप्प्याटप्प्यानं.

दाग़ देहलवी म्हणतो :

‘नहीं खेल ए ‘दाग़’ यारों से कह दो

की आती है उर्दू ़जबाँ आते आते’

(मित्रांना सांगा, हा पोरखेळ नाहीये;

उर्दू भाषा येते. कशी? तर येता येता येते.)

उर्दू ही भारतीय भाषा आहे. भारतात तिचा जन्म झाला. इथल्या गाव-कसब्यांत, चौकांत नि बाजारात ती लहानाची मोठी झाली. इथल्या डोंगर-पठारांवर ती धावली, खेळली; नदीकाठी बसून तिनं बुडणाऱ्या सूर्याशी हितगुज केलं. आकाशातले तारे मोजले.

उर्दूच्या चेहऱ्यावर लोकसंस्कृ तीचं सौम्य तेज झळाळतंय. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत्येय.

भारत-मोगल आणि ब्रिटन-मोगल हे इतिहासातले महत्त्वाचे टप्पे उर्दूशिवाय अपुरेच राहिले असते. उर्दूनं या दोन भिन्न संस्कृ तींमध्ये संवादकाची भूमिका उत्तम प्रकारे बजावली. ती विचारविनिमयाचं, देवाणघेवाणीचं माध्यम झाली.

उर्दू भले सरंजामशाही वातावरणात वाढली असेल; पण तिनं जीर्ण, बुरसटलेली मूल्यव्यवस्था ठामपणे नाकारली. माणुसकी जपली. मीर तक़ी मीर, ़जौक़, मिर्झा ग़ालिब यांच्या गजलांत आधुनिक अनुभूती आहे.

उर्दू काव्य म्हणजे रोगट रोमँटिसिजम असा आपल्याकडे बऱ्याच लोकांचा समज आहे. तो निराधार आहे. उर्दूत protest literature पुष्कळ आहे.

कवी हा मुळात विद्रोही असतो- subversive असतो. तो किडलेल्या समाजव्यवस्थेविरुद्ध उभा राहतो. हा विचार उर्दूत अठराव्या शतकातच रुजला होता. फारसी-तुर्की साहित्यात ही परंपरा बाराव्या शतकात रूढ झाली. तिला ‘शहर अशोब’ असं म्हणतात. दिल्लीकर कवींनी ही परंपरा उर्दूत आणली.

नादिरशाहच्या आक्रमणानंतर दिल्लीचा विध्वंस झाला. अनेक कवी संतापले. त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर खरमरीत टीका केली. हा आक्रोश ‘शहर अशोब’ परंपरेतला होता. मीर म्हणतो :

‘अब खराबा हुआ जहानाबाद

वर्ना हर एक कदम पे यहाँ घर था’

(दिल्लीचा पुष्कळ विध्वंस झालाय; अन्यथा इथे प्रत्येक पावलावर एक घर होतं.)

कवी सौदानं दुसऱ्या आलमगीर बादशाहला एकदा फटकारलं होतं :

‘इस ़जमाने का जो देखा तो है उलटा इन्साफ़

गुर्ग आ़जाद रहे और हो शुबाँ पहरे में’

(काय काळ आलाय पाहा- लांडगे मोकळे हिंडताहेत आणि शेळ्यांवर पहारा!)

शहर अशोब परंपरेमुळे उर्दू गजलला सामाजिक आशयाची डूब मिळाली. आत्मनिष्ठ वृत्तीचा बुरखा झुगारून उर्दू भाषा समकालीन विषयांना, सामाजिक-राजकीय संक्रमणाला भिडू शकते, हे सिद्ध झालं. हस्तक्षेप (intervene) करणं, ही कवितेची जबाबदारी असते. गजलनं ती उत्तम प्रकारे पार पाडली.

दुसरं, गजल म्हणजे फक्त गुल-बुलबुल किंवा शमा-परवाना हा गैरसमज बऱ्याच प्रमाणात दूर झाला. शहर अशोब परंपरेच्या बळावरच अकबर इलाहाबादी, डॉ. मोहम्मद इक्बाल, फ़ै़ज अहमद फ़ै़ज यांनी पुढे ‘राजकीय’ कविता लिहिल्या. त्यामुळे उर्दू कविता खऱ्या अर्थानं आधुनिक झाली. एकेकदा अलंकारयुक्त, दुबरेध शैलीचा अतिरेक होतो, हेही खरं. पण म्हणून उर्दू भाषेला कमी लेखण्याचं कारण नाही. अपचन झालं म्हणून कोणी धान्याच्या गोदामाला आग लावत नाही.

विसाव्या शतकातल्या कैक उर्दू कवींनी शहर अशोब शैलीत मौल्यवान रचना केल्या आहेत. हिंदी सिनेमातदेखील अशी आर्त विलापगीतं आहेत. उदाहरणार्थ, ‘सीने में जलन आँखों में तूफान-सा क्यूँ है’ ही शहरयार यांची ‘गमन’ चित्रपटातली गजल आणि ‘घरौंदा’ चित्रपटातलं गुल़जारांचं ‘एक अके ला इस शहर में / आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता है’ हे गीत, ‘प्यासा’तलं ‘जला दो, जला दो, जला दो यह दुनिया; यह दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ हे साहिरचं गाणं म्हणजे शहर अशोब शैलीतलं अभिजात शोकगीत!

गजलमुळे उर्दू थेट लोकांकडे गेली. मुशायऱ्यांना हजारो लोक.. शिपाई, वाणी, शिक्षक, खानसामा, मजूर हजर असायचे. यामुळे लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकटी मिळाली.

माझ्या मनातली उर्दू कशी दिसते ते सांगतो. ग़ालिबचाचाचं बोट धरून ती लाल किल्ल्याच्या उद्ध्वस्त बागेत उभी आहे. उदास संधिप्रकाशात दोघांचे क्लांत चेहरे उजळून निघालेत. ग़ालिब उर्दूला म्हणतो :

‘मेरी किस्मत में ग़म गर इतना था

दिल भी यारब कई दिये होते’

(माझ्या नशिबात इतकं दु:ख होतं तर तेवढीच हृदयंही का दिली नाहीस?)

उर्दू चाचाला बिलगते.

उर्दूच्या प्रेमापोटी हे लिखाण झालं. भाषेवर प्रेम करावं, हेच बरं. अभिमान ही गोष्ट वाईट. तुम्हालाही उर्दूचं प्रेम लागो. भाषाप्रेम यासारखा उत्तम संसर्गजन्य रोग नाही. उर्दूला दंडवत.

हे पुस्तक कवींचं, कवितांचं आहे. कवी हा फकीर असतो. झोळीतले मोती चौकात उधळून तो अथांगापलीकडच्या गावी निघून जातो. आपण ते मोती वेचायचे. तुम्ही आणि मी.