महाराष्ट्र राज्य झाले, तरीही मराठी क्रीडा पत्रकारितेनं म्हणावी तशी उसळी घेतली नव्हती. ज्येष्ठ क्रीडा-पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या एका मथळ्यानं ती किमया साधली! खेळाइतकीच जादूगिरी क्रीडा पत्रकारितेत असू शकते, हे ‘विविकं’च्या लेखणीनं दाखवून दिलं. करमरकरांचा अमृतमहोत्सव आज सुरू होतो आहे. या निमित्त त्यांच्या दीर्घ वाटचालीचा त्यांनीच घेतलेला मागोवा, खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी!
‘ब्रेबर्न स्टेडियममध्ये लाख लाख जांभई!’
.. मुंबईतील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या माझ्या समालोचनातील हे वाक्य दैनिक ‘लोकमित्र’च्या संपादकांना खूपच भावलं. त्या वाक्याचा त्यांनी पहिल्या पानासाठी बनवला चक्क आठ कॉलमी ठसठशीत मथळा! हे एक वाक्य माझ्या जीवनाला कलाटणी देऊन गेलं.
ही गोष्ट १९६० ची. तेव्हा मी मुंबई विद्यापीठात एम. ए. करत होतो, अन् फावल्या वेळात पत्रकारिता! संयुक्त महाराष्ट्र समितीचे असामान्य नेते एस. एम. जोशी यांनी बंद पडू लागलेल्या ‘लोकमान्य’ दैनिकास सहकारी तत्त्वावर ‘लोकमित्र’ या नावाने संजीवनी दिली होती. त्या दैनिकात पार्ट-टाइमर म्हणून स्थानिक खेळांच्या बातम्या आणि इतर काही पत्रकारिता मी करत होतो. भारत-पाक कसोटीत दुसऱ्या दिवशी पॉली उम्रीगर- विजय मांजरेकर जोडी जमू लागली आणि पाक कर्णधार फझल महमदने खेळ कुजवणारे डावपेच चालवले. उजव्या वा डाव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या माऱ्यासाठी त्या- त्या बाजूला क्षेत्ररक्षकांचे कडे लावायचे व फटकेबाजी थांबवायची. तास- दीड तासाच्या या रडी डावाने ब्रेबर्नमधील ५० हजार प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला.
क्रिकेटमध्ये असले डावपेच अनपेक्षित नव्हते. सहसा त्याचे वर्णन त्या जमान्यातील मराठी दैनिकांत ‘संथ फलंदाजी’ किंवा ‘उम्रीगर-मांजरेकर जोडी जमली’ अशा ठोकळेबाज शब्दांत केलं जायचं. ‘लाख लाख जांभई’ हा शब्दप्रयोग चपखल; पण त्या काळातील मराठी समालोचनात आगळावेगळा. त्यानं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. आणि मला वाटतं की, १९६२ च्या सुरुवातीस ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये पत्रकार भरती करताना मला बोलावलं गेलं त्याचं काही श्रेय होतं त्या मथळ्याला!
त्याक्षणी जाणवलं नाही, तरी नंतर लक्षात येत गेलं, की मराठी वाचकांची खेळांविषयीच्या बातम्या, मुलाखती, किस्से वाचण्याची भूक अतृप्त होती. भारतातील इंग्रजी दैनिकांत खेळांसाठी स्वतंत्र पान असे. खुसखुशीत मजकूर व छायाचित्रं यांनी ते सजवलं जात असे. असं काही आपल्या मातृभाषेत- मायमराठीत वाचायला मिळावं, ही त्यांची तीव्र भावना होती. चाकोरीबाहेरच्या त्या आकर्षक मथळ्याने त्यांना आपल्या अतृप्त इच्छा अंशत: पूर्ण होण्याची चाहूल लागली असावी. हे सारं एकविसाव्या शतकात सांगताना पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की, हे अप्रूप, ही नवलाई १९६० च्या सुमाराची!
दैनिक ‘लोकमित्र’भोवती एस. एम. जोशी यांच्यासारख्या लोकमान्य टिळक आणि डॉ. आंबेडकरांनंतरच्या सर्वोत्तम नेत्याचं वलय जरूर होतं; पण त्याचा खप मात्र माफक होता. ‘लोकसत्ता’, ‘मराठा’ यांच्या खालोखालचाच होता. पण त्या दिवसापासून प्रेस बॉक्समध्ये माझी थोडीशी दखल घेतली जाऊ लागली. त्यानंतर सी. सी. आय.मध्येच भारत विरुद्ध अमेरिका हा डेव्हिस चषकाचा टेनिस सामना झाला. तेव्हा मला प्रेस-पास देण्यास काही अमराठी संघटक खळखळ करू लागले होते. तेव्हा क्रिकेट समालोचक डिकी रत्नाकर चटकन् पुढे सरसावले, ‘‘त्यांना पास दिलाच पाहिजे,’’ असे त्यांनी आदेशवजा शब्दांत संघटकांना सांगितले. शैलीदार रामनाथन् कृष्णन् अन् विलक्षण चपळ विम्बल्डन विजेता चक मॅकीन्ले यांच्यातील बहारदार चकमकींनी तो सामना संस्मरणीय बनवला होता. कृष्णन् फटके पेरायचा, पण जणू रबराचे पाय लाभलेला  चक मॅकीन्ले तिथपर्यंत पोचायचाच. असं नाटय़ रंगलं पाच सेट! पण त्या सामन्याची माझ्यासाठी आणखी एक आठवण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे चिटणीस नारायणराव ऊर्फ मामा करमरकर यांनी माझ्या वृत्तान्तांचे माझ्या वरिष्ठांकडे रोज फोनवर केलेले कौतुक. मायमराठी क्रीडा-पत्रकारितेस मिळू लागलेली ही मान्यता होती.
पण मराठी पत्रकारितेतील ही एक दारुण कमतरता हेरली कुणी? एखाद्या दर्दी क्रीडाशौकिनानं? उत्तुंग खेळाडूनं? धोरणी राजकारण्यानं? शिक्षणमहर्षीनं?
ही बाब अचूक हेरली- आणि विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता किंवा तिचं स्तोम न माजवता ती अमलात आणून मोकळे झाले, ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आद्य संपादक द्वा. भ. कर्णिक! कम्युनिझमकडून मानवतावादाकडे वळणाऱ्या मानवेंद्रनाथ ऊर्फ एम. एन. रॉय यांचे ते अनुयायी. खेळांसाठीच्या स्वतंत्र व दैनंदिन पानाशिवाय वर्तमानपत्र परिपूर्ण होणार नाही, ही त्यांची धारणा. त्यासाठी किमान एक फुलटाइम- म्हणजे पूर्णवेळ नोकरीवर असलेला श्रमिक क्रीडा पत्रकार नेमलाच पाहिजे, यासाठी त्यांनी टाइम्स व्यवस्थापनास राजी केले. महाराष्ट्र टाइम्सच्या स्थापनेपासून- म्हणजे जून १९६२ पासून मला याकामी मोलाची साथ दिली वसंत भालेकरांनी! आपली नोकरी, संसार व सिनेक्षेत्रातील लेखन सांभाळून रोज अडीच- तीन तास अर्ध-वेळाची क्रीडा पत्रकारिता ते हसतमुखाने करत राहिले.
द्वा. भ. कर्णिकांनंतर सुमारे तीन दशकं क्रीडा-पत्रकारितेस प्रोत्साहन दिलं नंतरचे संपादक गोविंद तळवलकरांनी! परदेशी नव्हे तरी देशातील कसोटी क्रिकेट सामने, डेव्हिस चषक टेनिस सामने, राष्ट्रीय क्रीडास्पर्धा, कबड्डी- खो खो- कुस्ती आदी खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा, महाराष्ट्र ऑलिम्पिक, विविध खेळांच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा तसेच महापौर चषक स्पर्धा यांच्यापासून ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे दोन आठवडी अधिवेशन.. आदींच्या दैनंदिन समालोचनास तळवलकर महाराष्ट्र टाइम्सचा प्रतिनिधी २५ वर्षे पाठवत राहिले.
संपादकांच्या पातळीवर क्रीडा-पत्रकारितेला प्रोत्साहनास अशा तऱ्हेनं मराठीत सुरुवात झाली. पहिल्याच आठवडय़ात पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर व बापू नाडकर्णी यांच्या मुलाखती मी घेतल्या. त्या माझ्या नावाने देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तेव्हा मुलाखतीवर किंवा बातमीवर पत्रकाराचे नाव देण्याची आजच्यासारखी प्रथा नव्हती. ती त्यांनी माझ्यापासून सुरू केली. उम्रीगर-काँट्रॅक्टर दोघेही भारतीय क्रिकेट कर्णधार मुंबईकर पारशी. त्यांच्यातील काही मतभेदांचे प्रतिबिंब त्यांच्या मुलाखतीत उमटले. त्यासंबंधात खुलासा करण्यासाठी ते दोघेही म.टा.च्या कचेरीत जातीने आले. कर्णिक काहीसे भारावले. ‘‘मराठी मातृभाषा नसलेल्या नामवंत खेळाडूंपर्यंत तुम्ही म.टा. पोचवलात. मुख्य म्हणजे तुमच्याविषयी, वृत्तान्ताच्या अचूकतेविषयी त्यांची तक्रार नाही,’’ संपादक मला म्हणाले, ‘‘उम्रीगर, नाडकर्णी, काँट्रॅक्टर आदी बडय़ा कसोटीवीरांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. त्याला तुम्ही जोडलंत.’’
म. टा.चे पहिले वृत्त-संपादक दि. वि. गोखले आणि त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतरचे साखळकर, पुरुषोत्तम महाले आदी वारसदार हेही क्रीडा विभागाचे तळवलकर यांच्यासह भक्कम आधारस्तंभ. गोखले सावरकरवादी, तर साखळकर-महाले हे समाजवादी. या तिघांचे बालपण रा. स्व. संघात गेलेले असो वा राष्ट्र सेवादलात; त्यांना कबड्डी, खो-खो आदी खेळांत रस. दि. वि. गोखले पूर्वी फ्री प्रेस जर्नल समूहाच्या ‘नवशक्ति’चे वृत्त-संपादक होते. चार मिनिटांपेक्षा कमी वेळात एक मैल धावण्याचा विश्वविक्रम डॉ. रॉजर बॅनिस्टर यांनी केला तेव्हा ‘नवशक्ति’त त्या बातमीस न्याय देण्याचा प्रयत्न आपण कसा केला होता, ते गोखले सांगत. टाइम्स समूह देशात सर्वदूर पसरलेला. या सर्वोत्तम व्यासपीठाचा लाभ क्रीडा-पत्रकारितेने उठवला पाहिजे, ही त्यांची इच्छा. ‘‘इंग्रजी पत्रकारितेत खेळांचे पान रूढ व मान्यताप्राप्त आहे,’’ ही आपली भावना ते बोलून दाखवताना सांगत की, ‘‘मराठी दैनिकांनी आपापसात स्पर्धा करण्यात संतुष्ट राहू नये. आपली स्पर्धा इंग्रजी दैनिकांशीही आहे.’’
इंग्रजी दैनिकांच्या तुलनेत सर्वच भारतीय भाषांप्रमाणे मराठी दैनिकांचा आवाका मर्यादित. बंगालीत ‘आनंद बझार पत्रिका’, मल्याळममध्ये ‘मल्याळम मनोरमा’ व ‘मातृभूमी’ दैनिकांचा केरळात प्रचंड दबदबा. मुंबई, पुणे येथे मात्र मराठीपेक्षा इंग्रजी दैनिकांचा वाढता प्रसार व प्रभाव. पण क्रीडाक्षेत्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्र टाइम्सच्या हातून काहीसा विचित्ररीत्या का होईना, इतिहास घडवला गेला. एका फसव्या फोनवर विसंबून माझ्या एका सहकाऱ्याने ‘उद्या रविवारचे कांगा क्रिकेट सामने रद्द!’ अशी चुकीची बातमी दिली. त्याचा परिणाम काय व्हावा? मुंबईतील इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आदी भाषांतील सुमारे १५ दैनिकांपैकी फक्त म.टा.नेच ही बातमी दिली. पण ती ग्राह्य़ मानून साऱ्याच्या साऱ्या ४९ खेळपट्टय़ा बनवल्या गेल्या नव्हत्या व  (विनाकारण) सारेच्या सारे ४९ सामने रद्द करावे लागले! मुंबई क्रिकेट असोसिएशनने यातून बोध घेतला आणि सामने होणार वा नाहीत, याविषयीचे अधिकृत लेखी पत्रक शनिवारी सायंकाळी काढण्याचा बदल त्यांच्या कार्यपद्धतीत केला. मराठी दैनिकाच्या वर्चस्वाचीच ही पावती!
कुस्तीत ‘महाराष्ट्र केसरी’ मॅटवर ठरवला जावा, हा आग्रह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मान्य केला. (त्याआधी म.टा.ची टीका झोंबल्यामुळे कुस्तीतील एका वजनदार पुढाऱ्याने कार्यकर्त्यांना सारा खर्च देऊन मुंबईत गोळा केले व म. टा.वर मोर्चा टीए-डीए देऊन आणला. त्यानंतर काही मोठे पेहेलवान म. टा.मध्ये आले व त्या मोर्चाबद्दलची त्यांनी व्यक्तिश: नाराजी व्यक्त केली.) मुंबई हॉकी संघटनेत नगरवाला गटाविरुद्ध लुई कॉड्रेरो निवडून आले. रात्री मी त्यांना अभिनंदनाचा व शुभेच्छांचा फोन केला. इंग्रजी दैनिकांनी तेवढी तसदी घेतली नसावी. याचा एक परिणाम असा झाला की, त्यानंतरच्या प्रत्येक वार्तालापात माझ्यासारख्या एका मराठी पत्रकाराशी ते सर्वप्रथम बोलत. एका  छोटय़ा इंग्रजी दैनिकाच्या क्रीडा-संपादकास ती गोष्ट लागायची.  त्यावर ‘नवभारत’च्या शिवशंकर सिंग यांनी खास त्यांच्या शैलीत ऐकवले : ‘‘म. टा.च्या छपाईत जितका न्यूजप्रिंट वाया जातो, तेवढा तुझा अंक छापण्यास पुरेसा पडेल!’’ आता हेही जरा अतीच होतं. पण भारतीय भाषांतील दैनिकांची कोंडलेली व्यथा त्यातून व्यक्त होत होती.
माझ्या आयुष्यातील व त्यासह मराठी क्रीडा-पत्रकारितेतील एक टप्पा आता पूर्ण होतोय. केवळ त्यामुळेच मायमराठीच्या काही कर्तृत्वाचे ओझरते उल्लेख करतो. खो-खो व व्हॉलीबॉलमधील राष्ट्रीय व राज्यपातळीवरील दुफळी दूर करण्यात मी यशस्वी झालो. नागपूरमधील खासदार व इंटकचे नेते श्री. वा. धाबे हे समांतर खो-खो संघटना चालवत. ते मुंबईत- म्हणजे सरदारगृहात आले रे आले, की मला फोन करत. मी त्यांना एकच विनंती करायचो की, प्रतिस्पर्धी संघटना एकत्र आणा. मग ते मला सरदारगृहात बोलवायचे. वर्षभरातील पाच-सात भेटीगाठींतून माझ्या मनधरणीतून एकजूट सोपी झाली. महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेमध्ये मुंबईतले गगनसिंग व पुण्यातील एस. बाजीराव यांना एकत्र आणण्यासाठी त्या खेळातील बुजुर्ग व काँग्रेसचे खासदार एम. आर. कृष्णा यांची मी भेट घेतली. दिल्लीत एका कसोटी सामन्याच्या समालोचनासाठी गेलेलो असताना कृष्णा यांना गाठलं. आम्ही दोनदा भेटलो, बोललो, मार्ग काढला. बाजीराव यांना उपाध्यक्षपद व निवड समितीचे अध्यक्षपद अशी ऑफर दिली गेली. दोन गट एकत्र आले. (पण गेल्या दीड दशकात मात्र पुन्हा गटबाजी अनावर झालीय, ही गोष्ट वेगळी.)
क्रीडा-पत्रकारिता चोख करत असताना क्रीडाविकासाला थोडीफार मदत व्हावी यासाठी पत्रकार वेळ काढू शकतो, त्यासाठी पत्रकारिता कारणी लावू शकतो. दिल्ली एशियाडमध्ये राष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघात प्रशिक्षक मोरेश्वर गुर्जर यांच्या शिष्या बहुसंख्येने. पण महाराष्ट्राचे क्रीडा खाते त्यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांची वार्षिक वेतनवाढ थांबवत होते! याला काय म्हणावं? दिल्लीतील म. टा.चे प्रतिनिधी अशोक जैन यांच्यामार्फत मी तत्कालीन केंद्रीय मंत्री नरसिंह राव यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, निवेदन स्वीकारलं व काही दिवसांतच गुर्जर सरांवरचा अन्याय दूर केला. १९८२ च्या दिल्ली एशियाडला ऑलिम्पिक ब्राँझ-विजेते खाशाबा जाधव व अ‍ॅथलेटिक्स तज्ज्ञ जाल पार्डीवाला हे निमंत्रित नव्हते. केंद्रीय मंत्री रामनिवास मिर्धा यांच्या वार्तालापात ही धक्कादायक बातमी त्यांच्या नजरेस आणली. मिर्धाजी मोठे मिश्कील. ‘‘दिल्लीत अ‍ॅग्रिकल्चर आहे, पण कल्चर नाही!,’’ ते म्हणाले. ‘स्मरणपत्र पाठव, चुकीची दुरुस्ती करू,’ असं आश्वासन त्यांनी दिलं. पुन्हा अशोक जैन यांच्यामार्फत त्यांच्या हाती पत्र दिलं. आणि खाशाबा-पार्डीवाला यांच्या हाती पडला- त्यांचा हक्काचा खास पास! पण दिल्लीचं अ‍ॅग्रिकल्चर-कल्चर असं की, एका रस्त्याला नाव दिले गेले- खाशाबा यादव! हो.. यादव!
खो-खो सब-ज्युनिअर व ज्युनिअर मुला-मुलींना राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उतरण्यासाठी आपापला खर्च करावा लागे. ही गोष्ट मला फार खटकायची. एकनाथ साटम, रमेश वरळीकर प्रभृतींच्या मदतीने मी निधी उभारू लागलो. लोकवर्गणीतून जवळपास ५० हजार रुपये जमवल्यावरच मुख्यमंत्री शरद पवार यांची मदत घेण्याचं पथ्य पाळलं. सरकारी अनुदान लाभलं २५ हजारांचं. सुमारे दोन-तीन वर्षांत लोकवर्गणी जमवली त्याच्या सातपट! त्यापाठोपाठ उभारले मुंबई खो-खो संघटनेसाठी प्रसार-निधी, कार्यकर्ता गौरव निधी : सगळे मिळून सात-आठ लाख!
कोल्हापूरमधील मेहनती, पण कमालीचे अव्यवहारी संघटक कुमार आगळगावकर  यांच्यासाठी सुमारे ७० हजारांचा गौरव निधी उभारला. मुंबईबाहेर बास्केटबॉलचे लोण पसरवणारे प्रशिक्षक अशोक आरस यांचा गौरव निधी एक लाखावर नेला. सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो संघटना, फेडरेशन चषक कबड्डी निधी, अपघातग्रस्त खेळाडू निधी यांच्या उभारणीतही माझ्यासारख्या पत्रकाराचा मोठा वाटा होता. हे सर्व करताना एक खबरदारी सतत घेतली. देणगीदारास जिथल्या तिथे पावती लगेच द्यायची, अन् प्रत्येक पावती पुस्तकाची एकत्रित रक्कम चेकने बँकेत भरायची. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. तूर्त एवढे पुरे.
ही सामाजिक दृष्टी मला दिली- लोकशाही समाजवादी चळवळीने. एस. एम. जोशी, मधु लिमये, जॉर्ज फर्नाडिस आणि त्या साऱ्यांचे गुरू डॉ. राममनोहर लोहिया यांनी. खेळ व व्यायाम हाही अन्न-वस्त्र-निवारा यांच्या खालोखालचा मानवी हक्क आहे. शिक्षण, आरोग्य व खेळ हेही प्रत्येक नागरिकाला मिळालेच पाहिजेत.. हक्काने मिळाले पाहिजेत. कलमाडी, शरद पवार, बॅ. वानखेडे यांना मोठी हौस बांधकामांची; स्टेडियम व क्लब हाऊस उभारत जाण्याची. दिल्लीतील एशियाड व राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, चंद्राबाबू नायडू यांच्या हैदराबादमधील तथाकथित आफ्रो-आशियाई क्रीडास्पर्धा, बालेवाडीतील राष्ट्रीय क्रीडास्पर्धा व युवा राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, आंध्र व झारखंड येथील राष्ट्रीय क्रीडास्पर्धा यांचे व्यवहार निदान दहा हजार कोटींचे तरी असतील. मायावतींना जसं वेड लागलं होतं हत्तींचे पुतळे उभारण्याचं, तसंच क्रीडाक्षेत्रातील पुढारीवर्गाला बांधकामांचं. कंत्राटं देण्याचं. खेळाच्या नावाने सात पिढय़ांची कमाई करण्याचं. कलमाडींविरुद्ध १९९२ पासून मी आवाज उठवला. पण कलमाडींना थोडीशी शिक्षा होण्यासाठीही २०१२ साल उजाडावं लागलं! अर्थात हा लढा कलमाडी या व्यक्तीशी नाही, तर कलमाडी-प्रवृत्तीच्या विरोधात आहे. भावी वापराचा आराखडा न आखता पंधरवडय़ाला जल्लोषावर करोडो कोटी उधळण्याच्या अय्याशीविरोधात आहे.
सरतेशेवटी एक गोष्ट आग्रहाने सांगेन- आज खेळांचं स्वरूप हौशी वा अमॅच्युअर राहिलेलं नाही. त्याला आता रूप आलंय व्यावसायिकतेचं, उद्योगसमूहाचं. अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन, दक्षिण कोरिया या प्रगत जगात खेळ बनलाय मोठा उद्योग- व्यवसाय, इंडस्ट्री. हजारो कोटी डॉलर्सच्या उलाढालीचं. भारतीय क्रीडाक्षेत्रही त्याच दिशेनं छोटी-मोठी पावलं टाकतंय. मोठमोठी पावलं क्रिकेटमध्ये. छोटी छोटी पावलं फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, गोल्फ, हॉकी आदी खेळांत. औद्योगिक मुलामा खेळावर चढतोय. त्या ओघात मालक-मजूर संघर्षांच्या धर्तीवर संघटक-खेळाडू, संघटक विरुद्ध संघटक आदी आर्थिक तंटे आले. विविध स्वरूपांच्या करारमदारांमुळे कमिशन, लाच, किक-बॅक, कोर्टबाजी, इ. इ. क्रीडावैद्यक, क्रीडा-मनोबल आदी शास्त्रेही त्याचबरोबर विकसित होत आहेत. पण पैशाची वाहती गंगा वातावरण बदलवतेय.
या साऱ्या गोष्टी क्रीडा-पत्रकारांनी समजावून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी संबंधित विषयांतील जाणकारांशी जाणीवपूर्वक संबंध जोडले पाहिजेत.
टेलिव्हिजनने क्रीडाक्षेत्रात घडवलेल्या क्रांतीचं आव्हान स्वीकारण्यासाठी टेलिव्हिजनचीही मदत घेतली पाहिजे! जे लोक सामन्याचा आँखो देखा हाल टीव्हीवर बघतात, त्यांना त्यापेक्षा अधिक काही, वेगळं काही देण्याचं आव्हान आज क्रीडा-पत्रकारांपुढे आहे. टीव्हीवर आणि वेबवर खेळातील विविध बारकाव्यांचे तक्ते व तपशील दिले जातात. ते अभ्यासले पाहिजेत. याबाबत इंग्रजीतील काही क्रीडा-पत्रकारांचा कित्ता गिरवला पाहिजे.
इथे लक्षात घेतलं पाहिजे की, टीव्ही आणि वेब तुम्हाला भरपूर माहिती पुरवतो. काही चोखंदळ समीक्षक विशिष्ट दृष्टिकोनही तुमच्यापुढे ठेवतात. जोकोविच-डेलपोर्तो यांच्यात पावणेपाच तास रंगलेल्या टेनिस सामन्यात ताशी किती मैल वेगाने दोघे रट्टे मारत होते, ते अचूक सांगितलं जातं. त्यासाठी आवश्यक असलेली ताकद, फिटनेस व रग त्यांनी कसा कमावला, याचा वेध पत्रकाराने घेतला पाहिजे. दहापैकी दहा गुण सर्वप्रथम मिळवणारी जिम्नॅस्ट नादिया कोमेन्सी, सुमारे साडेनऊ सेकंदांत १०० मीटर्स धावणारा युसेन बोल्ट, तीन ऑलिम्पिक गाजवणारा जलतरणपटू मायकल फेल्पस् आदी क्रीडाक्षेत्रातील महामानवांच्या महानतेचा वेध त्यांनी घेतला पाहिजे. आणि बरंचसं जग अशी भरारी मारत असताना एकशे दहा कोटी भारतीयांचं जीवन इतकं भकास का, हा प्रश्न स्वत:ला सतत विचारत राहिलं पाहिजे. मगच इंग्रजी व मराठी क्रीडा-पत्रकारितेतील वाढती दरी कमी होऊ लागेल.
खेळ हा जीवनातील एक निरागस आनंददायी अनुभव आहे. बोर्ग-मॅकेन्रो, फेडरर-नदाल, जोकोविच-डेलपोर्तो झुंजी, जागतिक जिम्नॅस्टिक्समधील कसरती अन् डायव्हिंगमधील सूर मारण्यातील चढाओढ, हॉकीपटू धनराज व समीउल्ला खान यांच्या चढाया, पेले-गारींचा-नेमार या ब्राझिलियन फुटबॉलपटूंची जादूगिरी आणि शारजात अव्वल ऑस्ट्रेलियन संघासमोर सचिन तेंडुलकरच्या त्या दोन लाजवाब खेळी.. या व अशा खेळांनी दिलेला आनंद अवर्णनीय आहे. महायुद्धापासून मुक्त असलेल्या गेल्या ६८ वर्षांतील तणावग्रस्त दुनियेस प्राणवायू व टॉनिक पुरवत आले आहेत खेळ. माझ्यासारखा एक क्रीडा-पत्रकार म्हणूनच आपल्या व्यवसायाचं ऋण मानतो.. आजवरची वाटचाल जीवनास अर्थपूर्ण करणारी मानतो.
मराठी क्रीडा-पत्रकारितेचे रोपटं लावलंय. ते जोपासण्याचं आव्हान आहे क्रीडा-पत्रकारांपुढे, त्यांच्या संपादकांपुढे व त्यांच्या व्यवस्थापनापुढे!