मुमताज शेख

आज १४ फेब्रुवारी. प्रेमदिन! परंतु आज ‘लव्ह जिहाद’, आंतरधर्मीय विवाहविरोधी कायदे यांचे काटेरी कुंपण प्रेमाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मग घटनेने नागरिकांना दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे काय? प्रेम ही माणसाची अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्यावर बंधने आणणे सर्वथा गैर आहे. सरकारला ही उठाठेव करण्याचे काहीच कारण नाही. याबद्दलचे अनुभव कथन करणारे लेख..

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
governor rule in delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी? नेत्यांच्या विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण; केजरीवालांच्या अटकेमुळे परिस्थिती चिघळणार?

‘प्यार किया तो डरना क्या

जब प्यार किया तो डरना क्या..

प्यार किया कोई चोरी नहीं कि

छुप छुप आहें भरना क्या..

जब प्यार किया तो डरना क्या..’

हे गाणं आठवण्याचं कारण म्हणजे आजचा व्हॅलेंटाइन डे! (प्रेम साजरा करण्याचा दिवस! आता तर पूर्ण आठवडा ‘व्हॅलेंटाइन वीक’ म्हणून साजरा केला जातो.) यानिमित्ताने प्रेमी जोडपी तसेच होऊ घातलेली जोडपी आपल्या प्रेमाच्या आणाभाका घेत असतात. परंतु गेली काही वर्षे प्रेम साजरे करू नका, कोणी कोणावर प्रेम करायचे हे सांगणारे, त्यास अटकाव करणारे आणि प्रसंगी शिक्षा देणारे धर्म-संस्कृतिरक्षक ‘प्रेम’ या भावनेलाच ग्रहण लावू पाहत आहेत.

मी आणि राहुल (माझा जोडीदार).. मी मुस्लीमधर्मीय आणि राहुल बौद्धधर्मीय. आम्ही दोघे ‘कोरो’ या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहोत. आमची लव्ह स्टोरी तशी सामान्य प्रेमी-प्रेमिका एकत्रित आले, एकमेकांना प्रपोज केलं आणि लग्न झालं अशी नसून, आधीच्या लग्नात घटस्फोट घेतलेली आणि सोबत एक लहान मुलगी असलेली मी आणि तो घरातला सर्वात मोठा, उच्च शिक्षण घेत असलेला, घरात सगळ्यांची जबाबदारी आणि घरच्यांच्या अपेक्षा असणारा असा राहुल- आम्ही काही ठरवून प्रेमात पडलो नाही. (तसं कोणीच पडत नाही म्हणा!) पण आमच्या प्रेमाचा केंद्रबिंदू ही माझी मुलगी मुस्कान ही होती. ज्या वेळी हे सगळं घडत होतं तेव्हाचा काळ हा माझ्यासाठी आणि मुस्कानसाठी खूप वाईट होता. मी तर अशा परिस्थितीत होते की, जगायचं कसं, मुलीला सांभाळायचं कसं, आपलं पुढचं आयुष्य कसं जाईल, या विचारांनी खचून गेले होते. या काळात राहुल मुस्कानच्या आयुष्यात एक मित्र बनून आला. त्याने तिला पुन्हा एकदा लहान मुलांमध्ये आणलं.. ज्या प्रेमापासून ती दूर होती ते प्रेम त्याने तिला दिलं. मी नेहमी म्हणते, राहुलचं पहिलं प्रेम मुस्कान आहे, नंतर त्याने मला प्रपोज केलं.. ज्याला मी चार वेळा नकार दिला. मला पुन्हा लग्न आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींत पडायचंच नव्हतं. अगोदरच होरपळून निघालेली असल्याने हिंमत होत नव्हती. परंतु मुस्कानने सांगितलं की, ‘‘माँ, राहुल से शादी कर ले.’’ त्यानंतर कुठे आम्हा दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.

खरं तर आम्हाला फार काही त्रास झाला नाही किंवा काही अडचण आली नाही. माझ्या घरच्यांनी अगोदरच मला घरातून हाकलून दिलं होतं आणि मी एकटी माझ्या मुलीसोबत राहत होते. त्यामुळे तसंही घरच्यांनी टाकलंच होतं. राहुलच्या घरी मात्र विरोध होणार होता आणि तो स्वाभाविकही होता. आपल्या समाजात एकल बाईने पुनर्विवाह करणे- आणि तेही तिला ‘कुंवारा’ मुलाने स्वीकारणं हे आजही तेवढंसं स्वीकारलं जात नाही. त्यात राहुलसमोर जास्त आव्हानं होती. त्याच्या घरी त्याला विरोध आणि संघर्ष झालाच; परंतु समाजातील लोकांनी व मित्रांनी राहुलला नको ते सल्लेही दिले. ज्यात- कुत्रं आवडलं म्हणून घरी आणायचं नसतं, त्या मुस्लीम लोकांचा प्लॅन असतो की आयुष्यात एका तरी इतर धर्माच्या व्यक्तीला मुस्लीम धर्मात आणण्याचा, त्यामुळे मी त्याला फसवेन, त्याने लग्न न करता मला ठेवावी, असे अनेक पुरुष करतातच ना, त्याला काय होतंय.. असे हे सल्ले! त्याच्या भल्यासाठी म्हणे!

परंतु दोन व्यक्ती परस्परसहमतीने एकमेकांचे जोडीदार बनू शकतात, नाही पटले तर वेगळे होऊ शकतात, हा भारतीय संविधानाने बहाल केलेला अधिकार आहे, हे आम्हाला समाजाने सांगितले नाही.

आम्ही लग्न केल्यानंतर अफवाही पसरवण्यात आली की, राहुलने धर्मातर केलं आहे, कारण त्याची बायको अजूनही तिचंच (म्हणजे मुमताज शेख) नाव लावते, वगैरे. खरं तर आम्हाला त्या वेळी समाजाची पडलीच नव्हती. पडली होती ती आमच्यामुळे आमच्या कुटुंबीयांना काही त्रास होऊ नये याची. पण तसं काही झालं नाही. संघटना आमच्यासोबत ठाम उभी राहिली. आमचे काम व ओळख आमच्या कामी आली. आणि काही किरकोळ घटना सोडल्या तर फार काही घडलं नाही. माझे मामा माझ्या पाठीशी उभे राहिले. राहुलने त्याच्या घरी जुळवून घेतले आणि आम्ही आज आनंदाने जगतो आहोत. मुस्कानसोबत आता कबीर आमच्या सोबत आहे. आम्ही चौघं आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत.

आता मला सांगा, इथे कुठे ‘लव्ह जिहाद’ आहे? किंवा कोणी कोणावर   जबरदस्ती केली आहे? पण काही धर्मवेडय़ा लोकांसाठी असे कार्यक्रम हे त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि टोकाचे ध्रुवीकरण करण्यासाठी असतात. म्हणूनच त्यांच्याकरता हा लेखनप्रपंच. प्रेमासारख्या सुंदर भावनेला संस्कृती/ धर्म/ जात/ वर्ग / जिहादच्या नावाखाली दडपून टाकण्याचे आणि व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे मोठे कारस्थान अनेक वर्ष सुरू आहे. या कारस्थानाचे अनेक बळी आपण पाहिले आहेत.

या कारस्थानाचे आणखी बळी जाऊ नयेत आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य हे मूल्य अधिक खोलवर रुजावे  म्हणून आम्ही गेली काही वर्ष ‘कोरो’ आणि महिला मंडळ फेडरेशनच्या वतीने वस्त्यावस्त्यांमध्ये १४ फेब्रुवारी हा ‘प्रेम दिन’ म्हणून साजरा करीत आहोत. या दिवसाच्या निमित्ताने आम्ही अनेक कार्यक्रम करत असतो. प्रेम ही ज्याची त्याची खासगी बाब आहे. तरीही ही भावना जाहीरपणे साजरी करण्याची गरज आज कधी नव्हे इतकी जाणवते आहे. कारण आपल्या देशात काही राज्यांत ‘लव्ह जिहाद’चे कायदे अमलात आले आहेत. येत्या काळात कदाचित देशभरात असे कायदे आल्यास काय होईल याची कल्पनाही करवत नाही. ज्या राज्यांत असे कायदे लागू केले गेले आहेत, याच्या परिणामस्वरूप आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय लग्न करणाऱ्यांना पकडून देणे, त्या जोडप्यांविरुद्ध- त्यातही जर मुस्लीम असेल तर त्यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे या गोष्टी सुरू झाल्या आहेत.

मुळात माझ्या देशातील संविधानाने मला व्यक्तिस्वातंत्र्य  बहाल केले आहे.  मी कोणत्या धर्मात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही, पण मी माझा धर्म स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क मला संविधान देते. आणि सध्या याच हक्काचं उल्लंघन सुरू आहे. एक व्यक्ती म्हणून मी कसं जगावं, वागावं, खावं, प्यावं, कोणाशी लग्न करावं हे ठरविण्याचा अधिकार मला आहे. परंतु संकुचित मानसिकता असणाऱ्या लोकांना हे पटत नाही आणि मग असे लोक ‘लव्ह जिहाद’ वगैरे काहीतरी पसरवतात. कडवा मुसलमानद्वेष हा संघाचा आणि संघाची शाखा असलेल्या भाजपचा एककलमी आणि जुना कार्यक्रम आहे. त्यांना काहीही करून मुसलमानमुक्त भारत करायचा आहे. त्यामुळे जमेल तिथे ते या धर्माला पुढे आणतात आणि कधी ‘घरवापसी’, तर कधी ‘लव्ह जिहाद’ असे कार्यक्रम पुढे आणले जातात.

‘लव्ह जिहाद’ ही नवी संकल्पना पुढे आणली गेली आहे. मुळात जिथे लव्ह असते तिथे जिहाद नसतोच मुळी. खरं तर या नावातच एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याचं काम सुरू आहे. लग्न फक्त हिंदू-मुस्लीम स्त्री-पुरुषच करतात, आणि त्यात मुस्लीम मुले किंवा मुली या फसवून प्रेमात पडतात आणि जबरदस्तीने धर्मातर करून लग्न लावतात, असा प्रोपोगंडा केला जात आहे. आमचे असे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्ने केलेली आहेत. त्यापैकी कोणीही कोणावर जबरदस्तीने धर्म किंवा नाव बदलण्यासाठी दबाव आणलेला नाही. आणि यात सर्वच धर्माचे लोक आहेत. पण हे सकारात्मक चित्र लोकांसमोर आणलं जात नाही. ते आणण्याची, ते लोकांना ओरडून सांगण्याची आज गरज आहे.

wmumtajcorommf@gmail.com