रेखा देशपांडे

डॉ. श्रीराम लागू हे मराठी रंगभूमीवरचं एक अनोखं पर्व तर होतंच; डॉ. लागू म्हणजे सिनेमा माध्यमातलंही- मग तो मराठी चित्रपट असो की हिंदी- एक मोठं घटित ठरलं ते त्यांच्या विलक्षण लार्जर दॅन लाइफ अभिनय-विचारांमुळे!

‘कलाकारासाठी अभिनय हाच महत्त्वाचा असतो; माध्यमाचा भाग नंतर येतो..’ असं मत मांडणारे डॉ. श्रीराम लागू हे नाटय़-चित्रपटसृष्टीतले विचारवंत कृतिशील अभिनेते होते. जगण्यात जसा स्वत:चा एक विचार त्यांनी राबवला तसाच तो अभिनय आणि अभिनय-व्यवहारातही! त्यामुळे रंगभूमीवरून चित्रपटात त्यांचा प्रवेश जितका सहजसुंदर झाला, तितकाच तिथे त्यांचा स्वीकारही. या माध्यमासाठी लागणारं अभिनयाचं वेगळं तंत्र अंगी बाणायला त्यांना वेळच लागला नाही. कारण त्यांचा अभिनय-विचार सर्वंकष झालेला असणार. आजचे सेलिब्रिटीज् मालिका-फिल्म-नाटक, फिल्म-मालिका-नाटक असे वेगानं उलटेसुलटे फिरत असतात. ते धन्य होत. परंतु एक मोठा काळ असा होता की नाटकातल्या अभिनेत्याला सिनेमाचं तुकडय़ा-तुकडय़ातल्या अभिनयाचं तंत्र त्रासदायक वाटायचं. समोर दाद देणाऱ्या मायबाप प्रेक्षकांऐवजी डोळा रोखून असलेला कॅमेरा त्याला अस्वस्थ करायचा. तर सिनेमातल्या कलाकाराला स्टेजची, समोर दिसणाऱ्या प्रेक्षकांची, पाठांतराची भीती वाटायची. सिनेमात काम करताना नाटकातले कलाकार नाटकी, भडक अभिनय करायचे. नाटकातले यशस्वी कलाकार सिनेमात पूर्ण अपयशी ठरल्याची, तिथल्या पडद्यावर त्यांचं अस्तित्वच हरवून गेल्याची अनेक बडी बडी उदाहरणं होती. मराठी सिनेमातून हिंदी सिनेमात आले की अनेक बडय़ा मराठी नटांचा छोटा नट होऊन जायचा, आव्हान नसलेल्या नगण्य भूमिका वाटय़ाला यायच्या. फक्त मराठीपेक्षा पैसे अधिक मिळायचे म्हणून ते अवमूल्यन बरेचजण सहन करत राहायचे. डॉ. श्रीराम लागू यांनी हे चित्र बदलून टाकलं. नाटकातून चित्रपटात येताना आणि मराठीतून हिंदीत जाताना त्यांचे प्रवेशही दमदारच झाले आणि त्यांचं अस्तित्व कायम जाणवत राहिलं, व्हायब्रेट होत राहिलं.

१९७३ साली आलेला ‘पिंजरा’ हा चित्रपट ही एक मोठीच घटना ठरली. साक्षात व्ही. शांताराम यांनी मराठी रंगभूमीवरच्या या नटसम्राटाला आपल्या चित्रपटात नायक म्हणून उभं केलं. नैतिकतेचा कर्मठ आदर्श अशा या नायकाचं स्खलन असा मोठाच धाडसी पट कथेचा होता. त्या काळात नायक हा नैतिकतेचा, गुणांचा पुतळा असे. सर्व प्रलोभनांचा आणि संकटांचा पराभव करून तो विजयी होण्याचीच पद्धत होती. ‘पिंजरा’तल्या या धाडसी प्रयोगानिशी डॉ. श्रीराम लागू यांनी चित्रपट-प्रवेश केला. ‘पिंजरा’च्या लोकप्रियतेनं त्यावेळपर्यंत मरगळत चाललेल्या मराठी सिनेमातही चतन्य निर्माण झालं.

‘घरौंदा’नंतर एका पाक्षिकासाठी त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यावेळी ते मुंबईत वरळीला राहत होते. मुलाखतीची वेळ, घराचा पत्ता त्यांनी नीट समजावून सांगितला. ठरलेल्या वेळी सकाळी मी त्यांच्या घरी पोचले तर डॉक्टरही आवरून खुर्चीत बसून पेपर वाचत माझी वाट पाहत होते. या मुलाखतीत भूमिकेत शिरणं, भूमिका जगणं यासंदर्भात विचारताना मी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात त्यांना पक्षाघाताचा झटका येतो, त्या प्रसंगाचा उल्लेख केला. तो प्रवेश विलक्षण होता. तेव्हा अभिनेता भूमिका जगतो हे काही खरं नाही, असं त्यांनी स्पष्टच सांगून टाकलं. अभिनेत्याला आपण रंगमंचावर आहोत, आपल्या हालचाली, आपले संवाद, रंगमंचावरच्या दुसऱ्या कलावंतांच्या हालचाली, त्यांचे संवाद, त्या कलावंताला देण्याच्या आणि घेण्याच्या प्रतिक्रिया, स्पॉट लाइट्स वगैरे असंख्य गोष्टींचं भान ठेवत त्या भानातून प्रेक्षकांपुढे एक व्यक्तिरेखा उभी करायची असते. तेव्हा भान विसरून भूमिका करणं वगैरे काही खरं नाही.. या त्यांच्या उत्तरातच त्यांचा अभिनयविषयक प्रामाणिक विचार, कृती आणि शिस्त यांचा प्रत्यय आला. कॅमेऱ्यापुढच्या अभिनयाचं तंत्रदेखील भान जागं ठेवतानाच स्वाभाविक वागण्याची मागणी करतं. चित्रपटातला अभिनय तुकडय़ा-तुकडय़ांत करावा लागतो. स्विच ऑन-स्विच ऑफचं तंत्र इथे अधिक प्रमाणात अधिक कसोशीनं राबवावं लागतं. दोन शॉट्सच्या मध्ये कित्येक दिवसांचा अवधीही जाऊ शकतो आणि त्या अवधीत दुसऱ्या चित्रपटांतल्या दुसऱ्याच भूमिकांचे शॉट्स दिलेले असू शकतात, तरीही ज्या- त्या चित्रपटातल्या ज्या- त्या भूमिकेची कंटिन्युइटी राखण्याचं आव्हान असतं. डॉ. लागूंना ते सहज पेलता आलं, त्यामागे त्यांचा अभिनयविषयक तंत्रशुद्ध विचार होता व तशीच कृती होती, अभिनय तंत्रावरची हुकूमत होती, माध्यमानुसार बदलण्याची लवचिकता होती.

‘पिंजरा’मधल्या व्यक्तिरेखेसाठी शांतारामबापूंनी केलेली त्यांची निवड अत्यंत चपखल होती. श्रीधर मास्तर हा गावातला आदर्श शिक्षक. व्यक्तिमत्त्वात शिक्षण व उच्चवर्णीय संस्कारांमधून आलेलं साजुकपण. ब्रह्मचारी. अनेक वर्ष कडक ब्रह्मचर्य पाळत आलेला.. या रूपात ते चपखल बसले. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्सही  प्रकर्षांने जाणवला. तिथे सोंगाडय़ाच्या भूमिकेत होते गावरान व्यक्तिमत्त्वाचे निळू फुले. मास्तर आणि तमासगीर चंद्रकलेतला प्रमुख संघर्ष तर होताच; तमाशाच्या फडात मास्तरांचा प्रवेश झाल्यावर इथेही एक संघर्ष उभा राहिला. ‘पिंजरा’मधला हा काँट्रास्ट कथेला आणखी प्रभावी करणारा होता. नायकाच्या जगण्यातला दैवदुर्वलिास- आयरनी ऑफ फेट- आणखी गहिरा करणारा होता. इथे या दोन अभिनेत्यांच्या जुगलबंदीचीही झगमगती चुणूक प्रेक्षकांना सुखावून गेली.

लवकरच ‘सामना’मध्ये या दोघा अभिनेत्यांमधला सामना रंगला. तिथेही होती- नैतिकतेचा आग्रह धरणारे दरिद्री मास्तर आणि गावरान, धनदांडगे हिंदुराव धोंडे-पाटील यांच्यातल्या द्वंद्वाची आतिषबाजी. पण इथे हे दोघेही ‘पिंजरा’पेक्षा फार वेगळे होते. मास्तर होता दारूच्या आहारी गेलेला, पण सदसद्विवेक जागा असलेला एकेकाळचा निष्कांचन स्वातंत्र्यसैनिक. तर हिंदुराव पुरत्या शुद्धीत गावाच्या प्रगतीचं नाव घेत स्वत:च गडगंज साखरसम्राट झालेला एक विधिनिषेधशून्य राजकारणी. ही जशी लेखक-पटकथाकाराच्या.. विजय तेंडुलकरांच्या.. लेखणीची कमाल होती, तशीच ती होती या दोघांच्या अभिनयातल्या बारकाव्यांची जादू.

‘सिंहासन’मधला त्यांचा मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेला खानदानी शहाण्णव कुळी अर्थमंत्री दाभाडेदेखील तेवढाच विश्वसनीय ठरला. खानदानी राजकीय परंपरेतून आलेला दर्पयुक्त आत्मविश्वास, खेळी करण्याचा कुशाग्र धूर्तपणा डॉक्टरांच्या धारदार व्यक्तिमत्त्वानं मूर्तिमंत उभा केला. अर्थात कास्टिंगला सलामच. पण पुढचं कर्तृत्व अभिनेत्याचं.

रंगमंचावरचं डॉक्टरांचं कर्तृत्व, त्यांची लोकप्रियता आणि ‘पिंजरा’मधलं यश यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं लक्ष वेधलं गेलं नसतं तरच नवल. त्यातून त्यांची रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट अशी तिहेरी कारकीर्द सुरू झाली. भीमसेन यांच्या ‘घरौंदा’मध्ये त्यांना पुन्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, वयाला शोभावी अशी महत्त्वाची, किंबहुना नायकाच्या बरोबरीचीच भूमिका मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना जरी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं फिल्मफेयर पारितोषिक मिळालं असलं तरी खरं तर या कथेचे नायक दोन आहेत. तरुण नायकाच्या प्रेयसीला हिरावून घेतलं म्हणून लागूंचा वयस्कर नायक खलनायक ठरत नाही, कारण मुळात दोन्ही नायकांच्या व्यक्तिरेखा या हिंदी चित्रपटाच्या नेहमीच्या पठडीशी फटकून आहेत, गुंतागुंतीच्या आहेत. आणि त्यामुळेच त्या अधिक मानवी आहेत. या दोन व्यक्तिरेखांच्या द्वंद्वाच्या आगीतून या कथेतल्या नायिकेचं निखळपण तावूनसुलाखून निघतं- हीच तर कथा आहे.

‘अनकही’मधली त्यांची ज्योतिर्भास्कर पं. सत्यनारायण चतुर्वेदी ही भूमिकाही अशीच नायकाला टक्कर देणारी होती. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं तिला उठाव दिला होता. ‘गहराई’मधली चन्नबसप्पा ही भूमिका बुद्धिवादी, व्यवहारी आणि घरी-दप्तरी वर्चस्व गाजवणारी, कुटुंबप्रमुखाची भूमिका. अंधविश्वास नाकारणाऱ्या त्यांच्याच मुलीपायी या अंधविश्वासाचं साम्राज्य त्यांच्या घरात घुसतं आणि त्यांच्याच भूतकाळातल्या त्यांच्या कृत्यांची भुतं त्यांच्यापुढे नाचू लागतात. मनोग्रंथींचं हे गुंतागुंतीचं नाटय़ हे त्यांच्या भूमिकेतलं आव्हान होतं.

त्यांनी असंख्य हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या. मोठय़ा आणि छोटय़ा. ज्या ज्या वेळी अशा व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या, तेव्हा त्यांचं वैशिष्टय़ ठळकपणे समोर आलं. आणि ज्या तशा नगण्यच भूमिका होत्या, त्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि ख्यातीचा एक विशाल बॅकड्रॉप कायम मिळत राहिला. ९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून पुढे आता जो हिंदी सिनेमा बनतो आहे, त्यात डॉक्टर लागूंसारख्या अभिनेत्याचं, आव्हानं पेलण्याच्या त्यांच्या क्षमतेचं  खरं चीज झालं असतं असं राहून राहून वाटतं. १९८० च्या काळात लोकप्रिय हिंदी सिनेमा मोठय़ा प्रमाणावर ठरावीक साच्यातूनच घडत होता. त्या साच्यात तथाकथित चरित्र अभिनेत्यांची स्थिती केविलवाणीच असायची. असे असंख्य चरित्र अभिनेते नायक-नायिकेच्या चिरंतन माता-पितरांच्या रूपात पडद्यावर जगत आले. डॉ. लागूंसारख्या लार्जर दॅन लाइफ प्रतिमेनं हे प्राक्तन का स्वीकारावं हे कोडंही कधी कधी पडायचं. पण आपला आब राखून ते प्राक्तन स्वीकारण्यामागचा त्यांचा विचार आणि त्यांची कृती यांनी त्या केविलवाणेपणाला छेद दिला होता, हेही मग लक्षात यायचं. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीची भौतिक, आर्थिक अवस्था काही हेवा वाटण्यासारखी नव्हती. रंगभूमीवरची करिअरही खिशाला खार लावूनच केली जात होती. डॉक्टर व्यावसायिक तसंच प्रायोगिक अशा दोन्ही रंगभूमींवर सक्रिय होते. केवळ अभिनयाद्वारेच नव्हे, तर बॅकस्टेज आर्टस्ट्सिना मदत पुरवणं, प्रसंगी नाटकांनाही आर्थिक मदत पुरवणं हे ते करीत आल्याचा उल्लेख सतीश आळेकरांनी केलाय. कारण ही गोष्ट बहुतेकांना माहीत नाही आणि डॉक्टरांनीही कधी तिचे ढोल पिटले नाहीत. एकेकाळी पृथ्वी थिएटर्स ही आपली नाटक कंपनी घेऊन सामाजिक आशयाची दर्जेदार नाटकं करीत गावोगाव फिरणारे पृथ्वीराज कपूर यांनीही हेच केलं होतं. हिंदी चित्रपटांतल्या भूमिकांतून मिळणारं धन ते रंगभूमीसाठी खर्च करत होते. किंबहुना त्यासाठीच ते चित्रपटांतून भूमिका करायचे. हिंदी चित्रपटांतली कामं पसा देणारी होती. डॉक्टरांनी अभिनयाचं क्षेत्र निवडलं होतं. जगण्याचं आणि करिअरचंही त्यांचं गणित पक्कं होतं. व्यवहार चोख होता. तिथे उगीच ‘चूजी’ होण्याचा आव त्यांनी कधी आणला नाही. भूमिका पटो- न पटो, अभिनेत्याचं कर्तव्य ते चोख पार पाडीत. म्हणूनच हिंदी चित्रपटाच्या सेटवर शॉटसाठी बोलावण्याची वाट पाहण्यात आपला वेळ वाया जातो आहे असं त्यांना कधी वाटलं नाही. आपण निर्मात्याला आपला अमुक इतका वेळ विकलाय, तेव्हा तो वेळ वाया गेला अशी तक्रार करणं चुकीचं आहे असा त्यांचा सरळ विचार. दोन शॉट्सच्या मधल्या वेळात मेकअप रूममध्ये निघून जायचं, पुढच्या शॉटसाठी बोलावणं घेऊन असिस्टंट डायरेक्टर आला की मग पुन्हा मेकअप रूम ते शूटिंग फ्लोअर जायचं, शॉट झाला की परत मेकअप रूम गाठायची असंही त्यांनी कधी केलेलं दिसलं नाही. पुढच्या शॉटची तयारी, त्या तयारीची गडबड भोवताली चालू असताना जवळच खुर्चीत बसून पुस्तक वाचण्यात गढलेले लागू दिसायचे. आपल्या वाचनासाठी या वेळेचा ते असा उपयोग करून घेत. शूटिंगच्या शिफ्टला ठरलेल्या वेळी स्टुडिओत हजर राहणं, मग भले इतर कलावंत कितीही उशिरा का येईनात- हा आणखी एक दंडक. स्टार जेवढा जास्त उशिरा येईल तेवढा तो मोठा असं समजण्याचा काळ होता तो. राजेश खन्ना हा या स्टार बटालियनचा म्होरक्या. त्याचं आगमन झाल्याशिवाय डॉक्टरांचा त्याच्याबरोबर असलेला शॉट कसा होणार? पण डॉक्टरांच्या शिस्तीवर याचा काही परिणाम झालेला दिसत नसे. ठरलेल्या वेळी येणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी करतो. मग त्यातून कुणी सुधारलं तर सुधारेल असाही आशावाद एकदा त्यांनी बोलून दाखवला होता. अर्थात सुधारणा होईल, ही वेडी आशा होती म्हणून नव्हे. वास्तव ते जाणून होते.

डॉ. श्रीराम लागू हे मराठी रंगभूमीवरचं एक अनोखं पर्व तर होतंच; डॉक्टर म्हणजे सिनेमा माध्यमातलंही- मग तो मराठी चित्रपट असो की हिंदी- एक मोठं घटित ठरलं, ते याच विलक्षण लार्जर दॅन लाइफ अभिनय-विचारांमुळे!

deshrekha@yahoo.com