व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘सती’ हे नाटक १९६७ साली रंगमंचान्वित झालं. वाङ्मयीन व काव्यात्म अनुभव देणारं हे नाटक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी- ज्या काळात ‘सती’ला मान्यता होती, त्या काळातल्या कुणा लक्ष्मीची ही कणखर, तेवढीच करुण कहाणी आहे. ‘एकरूप होणे’ हा जो सतीचा दुसरा अर्थ आहे, तोच इथे नाटकाला अभिप्रेत आहे. चिरकाल स्मरणात राहणारी अशी ‘सती’ क्वचितच रंगभूमीवर येते.

व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘सती’ हे नाटक १९६७ साली रंगमंचान्वित झालं. १९६८ च्या प्रारंभी ते राज्य नाटय़स्पर्धेत पुणे केंद्रातून ‘पी. डी. ए.’ या ख्यातनाम नाटय़संस्थेने सादर केलं. दिग्दर्शक होते प्रा. भालबा केळकर!

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

‘सती’ हे केवळ नाटक नाही; तो एक भावबंध आहे. तरल आणि हळुवार अशी ती एक मुग्ध प्रेमाची कविताच आहे. सती जाण्याच्या रूढीपलीकडे जाऊन एका वेगळ्या अन्वयाची उभी केलेली ही कलाकृती आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी- ज्या काळात ‘सती’ला मान्यता होती, त्या काळातल्या कुणा लक्ष्मीची ही कणखर.. तेवढीच करुण कहाणी आहे. ‘एकरूप होणे’ हा जो सतीचा दुसरा अर्थ आहे, तोच इथे नाटकाला अभिप्रेत आहे.

१८१६ मध्ये पुण्यातील मेहंदळे वाडय़ात गोरज मुहूर्तावर सून म्हणून प्रवेश केलेल्या लक्ष्मीची ही कहाणी आहे. ‘स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल’ हे डॉ. कमलाबाई देशपांडे यांचं पुस्तक वाचताना ‘सती आणि सतीबंदी’ या प्रकरणात १८१८ मधील एक हकिकत नाटककाराच्या वाचनात आली आणि या नाटकाची ठिणगी त्याच्या मनात पडली. त्याचंच सिद्ध झालेलं मूर्त स्वरूप म्हणजे हे नाटक! पुण्यातील सावकार मेहंदळे यांच्या वाडय़ात मुदगलशास्त्रींच्या मुलीचे- लक्ष्मीचे लग्न लागते. यात ‘सुटलो बुवा!’ असे उद्गार काढतात ते वधूपिता नसतात; तर ते असतात नवऱ्याचे काका! ही लक्ष्मी वेदोक्त ब्राह्मणाची मुलगी आहे. शास्त्रवचनं शिकलेली आहे. उपाध्यांशी वाद घालण्याइतकी ती सुशिक्षित आहे.

हरीकाका हे लग्न जमवून आणतात. नवरा मुलगा नारायण. त्याची आई विधवा आहे. हरीकाका म्हणतात, ‘‘वहिनी, गेल्या कित्येक वर्षांत या वाडय़ात कांकणांचा आवाज नाही झाला, की कुंकवाचा करंडा नाही उघडला. अरे, हे काय घर म्हणायचं? काही कळा आहे त्याला? कसला शाप आहे घराला ईश्वर जाणे! पुरुष तेवढे विधुर आणि बायका तेवढय़ा विधवा!’’

अशा या शापित वातावरणात सनईचे सूर वाजतात. नुकतंच लग्न झालेल्या आपल्या बायकोला घेऊन नारायण येतो. एखादं भांडं पुढय़ात आणून आपटावं तसं लक्ष्मीला बसवतो आणि म्हणतो, ‘‘काका, घरात हवी होती ना सवाष्ण? ही घ्या! सांभाळा!’’

सगळेजण चपापतात. प्रेक्षकही! या पहिल्या प्रवेशातच नाटय़ाचा चटका लागतो.

दुसरा प्रवेश गर्भादान सोहळ्याचा! हा सोहळा संपतो. लक्ष्मी शुभ्रवसना आहे. नारायण येतो तोच भगवी वस्त्रं परिधान करून! ती त्याला भगवी वस्त्रं उतरायला सांगते. तो ढळत नाही. ती विनवणी करते, ‘‘तुम्हाला काय मिळवायचं ते मिळवा; पण मला दूर सारू नका. संतांच्या बायकांनी नाही का त्यांना साथ दिली? संसारात राहून, प्रपंच करून नाही का त्यांनी परमेश्वर मिळवला?’’ त्याचं उत्तर- ‘‘मी संत नाही. मला संत व्हायचं नाही. मला प्रपंच करायचा नाही.’’ लक्ष्मी म्हणते, ‘‘माझा अधिकार केवळ सेवेचा आहे. तो नका हिरावून घेऊ. दासी म्हणून तरी मला जवळ करा.’’ तो तिच्यापासून दूर जातो. तिला स्पर्शही करीत नाही.

नारायणाला काशीयात्रेला जाण्यापासून परावृत्त करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. अखेरीस लक्ष्मीही ‘‘जाऊ द्या त्यांना..’’ म्हणते. नारायण जातो. आई टाहो फोडते. अंकाचा पडदा पडतो.

दहा महिने उलटून गेले तरी मिरजेच्या पटवर्धनांच्या यात्रेबरोबर गेलेला नारायण परतत नाही. जंग जंग पछाडूनही त्याच्या ख्यालीखुशालीची बातमी कुणाकडूनही कळत नाही. जत्रेत मरीआईचा फेरा- म्हणजे कॉलराची साथ येऊन त्यात शेकडो यात्रेकरी मृत्युमुखी पडल्याची बातमी येते. ‘नारायण मरीआईच्या साथीत गेला..’ असं पत्र येतं.

लक्ष्मीला सती जाण्याविषयी सांगण्यात येतं. स्त्रीला पतीनिधनानंतर सती जाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही. यातील नाटय़मय विरोधाभास असा, की लक्ष्मीला ‘सती जा’ म्हणून सांगणारे, तिला पटवणारे, तिला सीता-द्रौपदीच्या पंक्तीला नेऊन बसवणारे, तिला ‘पुण्यवान रमाबाई’ म्हणणारे सगळे विधुर, विधवा असतात. ही सगळी मंडळी दुष्ट नव्हती किंवा खलप्रवृत्तीचीही नव्हती. पण रूढीनं, परंपरेनं ती आंधळी झाली होती. ही माणसं पाप-पुण्याच्या भ्रामक कल्पनेची, अंधश्रद्धेची आणि एकूणच समाजव्यवस्थेची बळी होती.

लक्ष्मीचा पिता.. तोच फक्त एकटा तिच्या बाजूचा. या सर्व प्रकारात लक्ष्मीची होणारी घुसमट अस्वस्थ करणारी आहे. सतीला दागिने चढवले जातात. तिच्यापुढे एक दागिना धरला जातो. लक्ष्मीला फास अडकवल्याचाच भास होतो. ती ‘नको..’ एवढंच अस्पष्टपणे उच्चारते.

संगमापर्यंत मिरवणूक जाते. लोक फुलं उधळतात. जयजयकार करतात. आणि ऐनवेळी ती चितेवर जाण्यास नकार देते. उपाध्यांशी वाद घालते- ‘‘तुम्ही मला शास्त्रवचन सांगू नका. पद्मपुराणात सांगितलंय की, ब्राह्मण स्त्रियांनी सती जाऊ नये. तिला सती जायला मदत करणाऱ्यांना ब्रह्महत्येचं पातक लागतं.’’ (‘हे ऐकून घाबरलेली भामा निघून जाते..’ ही नाटककाराची रंगसूचना बरंच काही सांगून जाते.)

नाटककारानं येथे लक्ष्मीचं वादपटुत्व, तिचं ज्ञान, तिचं पुरोगामित्व सिद्ध केलं आहे. तिच्या विद्रोहाला वाडय़ातील इतरांच्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्यालाही नाटककाराने विशेष महत्त्व दिलं आहे.

दुसऱ्या अंकाचा शेवट लक्ष्मीने सती जाण्याला नकार देऊन गंगा नदीच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देण्याच्या प्रसंगाने होतो. पहिले दोन अंक हे तिसऱ्या अंकाच्या गडद पाश्र्वभूमीसारखे नाटककाराने उभे केले आहेत. दुसऱ्या अंकाचा शेवटचा प्रवेश आहे.. कॅप्टन फोर्डच्या राहुटीच्या दृश्याचा! आणि त्या दृश्यातलं पहिलंच वाक्य आहे- ‘हुजूर, बाई शुद्धीवर आल्यात.. बोलू लागल्यात.’

लक्ष्मीला कॅप्टन फोर्डने वाचवलं आहे. तिच्या सुरक्षिततेबद्दल तो तिला खात्री देतो. ‘‘मला या जगात राहायचं नव्हतं,’’ असं ज्यावेळी ती म्हणते त्यावेळी कॅप्टन उद्गारतो, ‘‘आपल्यासारख्या तरुण स्त्रीनं आत्मघात करून नाहीसं होणं योग्य नाही. संकटं माणसाच्या आयुष्यात येतात. जगू नये असं वाटण्याची वेळ येते. पण संकटं कुणावर येत नाहीत? लढाईचा प्रसंग नसतो कुणावर? स्वत:शी, लोकांशी आणि प्राक्तनाशी लढाई ही द्यावीच लागते. पण म्हणून पाठ नाही दाखवायची. पराभव नाही पत्करायचा?’’ लक्ष्मी आपल्याला वाचवण्याचं कारण त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो, ‘‘बाई, शिपाईगिरी करून मी भाकरी मिळवतो. माणसाचा जीव घेणं हा माझा पोटाचा धंदा आहे. एक संधी मिळाली मला माणूस वाचवण्याची.. ती मी घेतली.’’ लक्ष्मी म्हणते, ‘‘आता कुणी सावली पडून घेणार नाहीत माझी अंगावर. गतधवा, परित्यक्ता जातिबाह्य़, धर्मबाह्य़ होऊन एकाकी, काळंकुट्टं जीवन जगत राहावं लागेल मला. लोक मला अंधारातून ओढून उजेडात आणतील. मला जाऊ द्या. दूर व्हा..’’ आणि लक्ष्मी मुच्र्छित होऊन कोसळते.

अवघ्या दहा मिनिटांचा दुसऱ्या अंकाचा शेवटचा प्रवेश; पण कॅप्टन फोर्डची व्यक्तिरेखा, जीवनाबद्दलचा त्याचा दृष्टिकोन, त्याची सभ्यता, त्याची संस्कृती सारं सारं सांगून जाते. त्याचबरोबर सतीपदाला नाकारणाऱ्या स्त्रीच्या दारुण, विदारक अवस्थेचं चित्रंही त्यातून डोळ्यांसमोर उभं राहतं. दुसऱ्या अंकावर पडणारा पडदा प्रेक्षकांना सुन्न करून जातो.

तिसऱ्या अंकातली राहुटी एखादं हिंदूचं घर असावं तशी सजवली आहे. तीत उदबत्त्या, समई आणि कृष्णाची मूर्तीही आहे. लक्ष्मीच्या सोबतीला असलेल्या सरू कुणबिणीची योजनाही मोठी सूचक आहे. तिला टॉमसाहेबानं विकत घेतली आहे. तिच्याशी लग्न केलं आहे. त्याच्यापासून तिला दोन मुलंही आहेत.

या प्रवेशातलं फोर्डसाहेबाचं वर्तन अत्यंत सभ्य आहे. कुठेही तो तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ‘मॅन कॅन बी डिस्ट्रॉइड, कॅन नॉट बी डिफीटेड..’ असं तो तिला सांगतो.

फौजफाटा घेऊन पेंढाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तो निघून जातो. जाताना- ‘‘मी परत येईपर्यंत तुम्ही इथं राहिलं पाहिजे. मला सांगितल्यावाचून काही निर्णय घ्यायचा नाही,’’ असं तिला बजावतो.

दुसऱ्या प्रवेशात आऊआत्याची सावली तिला भेडसावते. परत अग्नीकाष्ठ भक्षण करायला सांगते. ती त्या सावलीला निक्षून सांगते, ‘‘मी अग्नीप्रवेश करणार नाही. त्यांनी मला पत्नी मानलं नाही, मीही त्यांना पती मानणार नाही.’’ या भासचित्रात ती कुंकवाचा करंडा घेऊन स्वत:ला कुंकू लावते. फोर्डसाहेब मोहिमेवर जाण्यापूर्वी तिचा निरोप घ्यायला येतो तेव्हा ते कुंकू बघून थक्क होतो.ती म्हणते, ‘‘स्वारीवर निघालेल्या योद्धय़ाला मोकळ्या कपाळानं निरोप कसा देऊ?’’ लक्ष्मी त्याला ओवाळते. पुढे रंगसूचना आहे- ‘कपाळावर टिळा लावताना तिचा हात ‘लावू नकोस’ असा होतो..’

या एका कुंकुमतिलकाने आणि टिळ्याने दोघांच्या अंतरीची भावना नाटककाराने मोठय़ा कल्पकतेनं सूचित केली आहे.

फोर्ड मोहिमेवर जाऊन तीन आठवडे उलटतात. मुद्गलशास्त्री व हरीतात्या तिला ‘घरी चल’ म्हणून सांगतात. ती उत्तरते- ‘‘झपाटय़ाने मी मृत्यूकडे जात होते तेव्हा या परस्थ माणसानं माणुसकीचा गहिवर येऊन मला वाचवलं. पाठचा भाऊ धावावा तसे ते माझ्या रक्षणासाठी धावले. समर्थ पतीप्रमाणे त्यांनी मला अभय दिलं. पित्याच्या मायेनं वागवलं. अन्न, वस्त्र दिलं. ब्राह्मण पाणक्या दिला. सेवेला कुणबीण दिली आणि पूजेला देवदेखील दिला. मला पुनर्जन्म दिला त्यांच्याशी प्रतारणा करून त्यांच्या आज्ञेवाचून मरायलासुद्धा आता मी मोकळी नाही.’’

फौज परत येते. बातमी येते- फोर्डसाहेब मोहिमेवर कामी आल्याची! त्या पुण्यवंताचा देहही लक्ष्मीला पाहायला मिळत नाही. तो रणांगणावरच भूमातेनं पोटात घेतलेला!

लक्ष्मी बाबांना म्हणते, ‘‘माझी सती जाण्याची तयारी करा. त्यांच्या शस्त्रांबरोबर मी सती जाईन. आता मी विलक्षण आनंदात आहे. सुखात आहे.’’

तांबडा-पिवळा प्रकाश सर्वत्र उजळतो. मंत्रघोष ऐकू येतात. अखेरचा पडदा पडला तरी ते कानांवर पडतच राहतात. ‘एकरूप होणे’ हा जो ‘सती’चा दुसरा अर्थ आहे- त्यालाच येथे आयुष्यापेक्षाही महान असं स्वरूप प्राप्त होतं. सतीचा हा नाटय़रूप अन्वयार्थ प्रेक्षकांना अस्वस्थ करून जातो.

साम्य, विरोधाभास आणि सूचकता ही या नाटकाची प्राणतत्त्वे आहेत. किंबहुना, त्यामुळेच हे नाटक केवळ पीरिअड प्ले न राहता एका वेगळ्याच कलात्मक उंचीला पोहोचते.

लक्ष्मीचं देवाब्राह्मणांच्या साक्षीनं ज्याच्याशी लग्न झालं, त्या नारायणाचा तिला स्पर्शही नाही. तिला मरणाच्या दारातून खेचून आणणाऱ्या कॅप्टन फोर्डचाही स्पर्श नाही. मरीआईच्या फेऱ्यात निधन झालेल्या नवऱ्याचा देह तिला बघायला मिळत नाही. कॅप्टन फोर्डचा मृतदेहही तिला बघायला मिळत नाही. नारायण तिला झिडकारतो. जवळ येऊ देत नाही. फोर्डसाहेब तिच्याशी जवळीक साधण्याचा किंचितही प्रयत्न करीत नाही. लक्ष्मी नारायणाच्या प्रेमाची आर्जवं करते. कॅप्टन फोर्ड लक्ष्मीपासून अंतर राखून आहे. संस्कारांनी हे अंतर तिच्यात आणि कॅप्टन फोर्डमध्ये कायम ठेवलं आहे. जे काही चाललंय ते तिच्या मनात. फोर्डसाहेबाच्या चारित्र्याबद्दल तिची खात्री पटलीय. पण तरीसुद्धा ती चुकूनही ‘तुम्ही मला आवडलात..’ असं म्हणत नाही.

परंपरेला बळी पडणाऱ्या आणि तिच्या विरोधात स्वकृतीने उठाव करणाऱ्या लक्ष्मीची ही कथा कुठेही ढोबळ, बटबटीत वा भडक होत नाही. तिच्या विरोधात आक्रस्ताळेपणा नाही आणि व्यथेत धायमोकलेपणाही नाही. सतीची प्रथा हे केवळ निमित्त आहे; नाटककाराला मांडायची आहे ती एका मुग्ध प्रेमाची व्यथा!

नाटकाच्या संवादभाषेची सारी लय.. ताल १९ व्या शतकातला प्रारंभीचा काळ उभा करतोच; त्याचबरोबर संपूर्ण नाटकावर एक कारुण्याची दाट छायाही पसरवतो.

लक्ष्मीचे अस्तित्व नाटकभर जाणवत राहील अशा तऱ्हेने दिग्दर्शक भालबा केळकर यांनी प्रयोगाची, हालचालींची विरचना केली होती. रूढीग्रस्त आऊआत्याचं खलत्व तिला एका डोळ्याने आंधळी करून आणि एका पायाने अधू करून अधोरेखित केलेलं होतं. कॅप्टन फोर्ड माणुसकीचं मूर्तिमंत प्रतीक वाटेल अशा रीतीने उभा केला होता. अन्य व्यक्तिरेखा बोलण्याच्या पद्धतीतून आणि हालचालींतून विशिष्ट काळाला व वृत्तीला प्रकट करणाऱ्या होत्या.

नाटकाच्या नेपथ्याविषयी दिग्दर्शकाने संहितेच्या सुरुवातीलाच निर्मितीबाबत जे टिपण दिले आहे त्यात सारं विस्ताराने लिहिलं आहे. वास्तवदर्शी व प्रतीकात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या मिश्रणाने रंगसज्जा उभी केली होती. मागे चौथरा व पुढची खालची बाजू असे दोन पातळ्यांवरचं नेपथ्य होतं. पेशवाई पद्धतीचा वाडा मधल्या खांबांनी व महिरपी खिडक्यांनी सूचित केलेला होता.

प्रकाशयोजनेत लक्ष्मीच्या अखेरच्या आत्मार्पणाला धगधगत्या ज्योतीचं स्वरूप दिलं होतं. अग्निवस्त्रे परिधान करून स्वर्गाच्या वाटेने ताठ मानेने जाणारी लक्ष्मी कलावतीने व दिग्दर्शकाने प्रभावी केली होती. ख्यातनाम कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या अंजली या कन्येने आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने, निरागस चेहऱ्याने आणि धीरोदात्त निर्धाराने ही भूमिका अविस्मरणीय केली. श्रीराम खरे तर वास्तव जीवनातही एक सभ्य आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व. त्यांचा गोरा वर्ण कॅप्टन फोर्ड या भूमिकेला चपखल बसला. विराम घेऊन मराठी बोलण्याच्या त्यांच्या विशिष्ट पद्धतीने कॅप्टन फोर्डमधला ‘इंग्रज’ मूर्तिमंत केला. या नाटय़प्रयोगातील अन्य कलावंत- तारामती घारपुरे, सुहास काळे, सेवा चौहान, हिरा बेलतंगडी, ज्योत्स्ना चिटणीस, श्रीपाद आडकर, दत्ता कळसकर, जयंत धर्माधिकारी, सुरेश वसाळे, रमेश मेढेकर, भालबा केळकर, रमेश टिळेकर. तंत्रज्ञ- श्रीधर राजगुरू (नेपथ्य), जब्बार पटेल (प्रकाशयोजना), पाश्र्वसंगीत योजना- शशिकांत कुलकर्णी, वसंत नूलकर.

१९६८ च्या राज्य नाटय़स्पर्धेत वाङ्मयीन व काव्यात्म अनुभव देणारं हे नाटक. अंतिम स्पर्धेतील परीक्षकांना या मेहंदळ्यांच्या वाडय़ापेक्षा ‘संभूसाची चाळ’च बरी वाटली. केव्हा केव्हा काही नाटकं परीक्षकांचीच परीक्षा घेतात, ती अशी! चिरकाल स्मरणात राहणारी अशी ‘सती’ क्वचितच रंगभूमीवर येते.

विंगेतून : ‘बाईची फरफटयात्रा’ या लेखात (१५ सप्टेंबर २०१३) राहून गेलेला उल्लेख- ‘पोहा चालला महादेवा’ या नाटकाचे दिग्दर्शक मदन गडकरी होते. १९८१ च्या राज्य नाटय़स्पर्धेत या नाटकाला आणि दिग्दर्शनाला अंतिम स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले होते. (पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक कुणालाच देण्यात आले नव्हते.) नागपूरमधील अविरत नाटय़कार्याबद्दल मदन गडकरी यांचा नुकताच अ. भा. मराठी नाटय़ परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.