01 March 2021

News Flash

वीणा दी : बंगाली-मराठी साहित्यसेतू

वीणा भालचंद्र आलासे. माहेरच्या देशपांडे. नागपूरच्या पटवर्धन हायस्कूलमधील गणिताच्या देशपांडे-सरांची ज्येष्ठ कन्या.

| June 7, 2015 12:28 pm

वीणा भालचंद्र आलासे. माहेरच्या देशपांडे. नागपूरच्या पटवर्धन हायस्कूलमधील गणिताच्या देशपांडे-सरांची ज्येष्ठ कन्या. त्यांचा धाकटा भाऊ मेजर प्रकाश देशपांडे हा माझा वर्गबंधू अन् मित्र. वीणाताई नागपूरच्या एल. ए. डी. मlr08हाविद्यालयातूून बी. ए. झाल्या. कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातून त्यांनी ‘कम्पॅरिटिव्ह स्टडी ऑफ लिटरेचर’मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व शांतिनिकेतनच्या ‘स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेजेस’मध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्या रुजू झाल्या. २५ वर्षे त्या तिथे विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका.. लोकप्रिय ‘वीणा दी’ होत्या. याच काळात त्यांचे रवींद्रनाथ टागोर यांच्याशी साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक नाते आणि गहन, गहिरे ऋणानुबंध जुळले. त्या रवींद्रनाथांच्या एकलव्यासारख्या शिष्या होत्या. स्वा. सावरकर स्वायत्त मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी हे वीणाताईंचे प्रथम वाङ्मयीन गुरू.

पुढे वीणाताईंचा विवाह कोलकात्याच्या भालचंद्र आलासे यांच्याशी झाला. द. भि. सांगतात, ‘नागपूर विद्यापीठ आणि कोलकाता विद्यापीठ यांचे प्रारंभापासून जवळिकीचे संबंध होते. कवी अनिलांपासून चित्रकार चंद्रकांत चन्न्ो यांच्यापर्यंत अनेकांनी शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेतले आहे. कवी अनिल चांगले चित्रकारही होते. कोलकाता, बनारस व नागपूर विद्यापीठांचा आकृतिबंध एकच आहे. वीणाताई तेथे सहज रमल्या. यशस्वी झाल्या. वीणाताई विदर्भ आणि वंग प्रदेश यांच्यातील जिवंत सेतू होत्या. त्यांनी बंगाली साहित्य मराठीत आणि मराठी साहित्य बंगालीत असा दुतर्फा साहित्यप्रवाह वृद्धिंगत केला. १९१३ साली नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’त गूढवाद आहे. विदर्भाची वाङ्मयीन प्रकृतीही गूढवादी होती व आहे. खापर्डे, अनिल, गु. ह. देशपांडे, क्रांतदर्शी बुधे, म. म. देशपांडे व कवी ग्रेस ही त्याची काही उदाहरणं. ग्रेस यांच्या वाङ्मयीन घडणीत- विशेषत: त्यांच्या काव्यातील गूढवादात टागोरांचा वीणाताईंच्या मार्फत मोलाचा वाटा आहे.’
पश्चिम बंगाल व नागपूर- विदर्भाचे संबंध बेंगाल-नागपूर रेल्वेमुळे अधिक दृढ होत गेले. नागपुरात कित्येक दशके गणेशोत्सवाइतक्याच उत्साहाने दुर्गापूजेचा उत्सवही होतो. येथील शं. बा. शास्त्री, डॉ. राम म्हैसाळकर, मृणालिनी केळकर, ह. भी. चिकेरूर यांनी बांगला-मराठी अनुवादाचे कार्य समर्थपणे केलेले दिसते. आणि अनुवादकार्यात त्यांनी उच्चतम परिमाणे प्रस्थापित केली आहेत. शांतिनिकेतनच्या वझलवारांच्या कन्या अरुंधती देशमुख यांनी ‘रवींद्र संगीता’त प्रावीण्य प्राप्त करून मानाचे स्थान प्राप्त केले आहे. याच रत्नहारातील एक अनमोल रत्न होत्या- वीणा आलासे.
वीणाताईंची दोन उत्तम पुस्तके पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. ‘तीन आत्मकथा’ आणि दुसरे ‘महाश्वेतादेवी यांच्या कथा’! ‘तीन आत्मकथा’मध्ये गृहिणी, नटी व स्वातंत्र्यलढय़ातील वीरांगणा अशा तिघींच्या आत्मकथा आहेत. या ग्रंथाला बंगाली-मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्याआधी महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथाच्या मराठी-बंगाली अनुवादासाठीही त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.
वीणाताईंचे लग्न १९६२ मध्ये झाले. वंदना व अतुल ही त्यांची अपत्ये कोलकात्यातच वाढल्याने वंदनाचा विवाह ‘हाजरा’ या प्रतिष्ठित बंगाली कुटुंबात झाला. तिची लेक व वीणाताईंची नात प्रार्थना हीसुद्धा आई-आजीसारखीच उत्तम कलाकार आहे. धाकटा अतुल चेन्नईला असतो. वीणाताईंना लेखन, समीक्षा आणि अनुवादासह पाककौशल्याचीही
सिद्धी प्राप्त होती.
 वीणाताईंच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित दुर्घटना घडल्या. ९६ साली यजमान गेले. मेजर प्रकाश देशपांडे या धाकटय़ा भावाने सेना सोडली आणि नंतर एका विचित्र अपघातात त्याचा मृत्यू झाला. सर्वात धाकटा अभय दुर्दैवी आयुष्य जगला व त्यातच त्याचा अंत झाला. आई-वडील गेल्यानंतर वीणाताईंची भूमिका कुटुंबप्रमुखाची होती. एकामागोमाग एक झालेल्या या दु:खद आघातांमुळे त्यांना अतीव वेदना होणे स्वाभाविक होते. पण त्या खचल्या नाहीत. टागोरांचा अदम्य आशावाद आत्मसात केलेल्या त्या साहित्यिक, समीक्षक आणि रूपांतरकार असल्याने हे धक्के पचवून त्या धीरोदात्तपणे आयुष्यात पुन्हा ठाम उभ्या राहिल्या. कोणताही अतिरेक त्यांच्या स्वभावातच नव्हता. त्यांचे सौम्य, शीतल व्यक्तिमत्त्व, दर्जेदार लेखन, प्रभावी वक्तृत्व, सहज संवाद साधण्याची वृत्ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती.   
त्यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’तील समीक्षालेखाने झाली. त्यांचे शेवटचे पुस्तक-शेवटचा लघुग्रंथ म्हणणे जास्त योग्य होईल- ‘रवींद्रदीक्षा: सप्तपर्णी’ हे विसा-बुक्सतर्फे प्रकाशित झाला. त्याचे मुखपृष्ठ वीणाताईंच्या नातीनेच केले आहे. विदर्भ साहित्य संघात या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला. वीणाताईंच्या आयुष्यातील हा एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. रवींद्रनाथांची दीडशेवी जयंती होती. त्यांना ‘गीतांजली’साठी नोबेल पुरस्कार मिळाल्याची शताब्दी नुकतीच साजरी झाली होती. गुरुऋण अंशत: का होईना, फेडण्याचा त्यांचा हा कृतज्ञ प्रयास होता. ‘रवींद्रदीक्षा: सप्तपर्णी’ हा लघुग्रंथ रवींद्रनाथांच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, भावनिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो. त्याच्या  प्रस्तावनेत वीणाताई म्हणतात, ‘रवींद्रनाथ ठाकूर या व्यक्तीची प्रतिभा, भाषाप्रभुत्व, कर्मनिष्ठा, अफाट लेखन-मनन-वाचन-चिंतन, दृढसंकल्प, चिकाटी, अभिरुची आणि भारतीय व बौद्ध आध्यात्मिक ज्ञानाचे आकलन विशाल व व्यापक आहे. त्यांनी भारतीय समाजाला अमूल्य दान उदारपणे दिलेले आहे. ती खरोखरच ‘रवींद्रदीक्षा’ ठरते. शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या स्नातकांना ‘छातिम’ वृक्षाचे सप्तपर्णी पान दिले जाते- पदवीसोबत.’
बांगला आणि मराठी साहित्यसंस्कृतीत मुरलेल्या बंगाली आणि मराठी दोन्ही जीवनपद्धतींचा आत्मिक अनुबंध आत्मसात केलेल्या वीणाताईंचे अनुवाद केवळ अनुवाद नसत, ती एका भाषेच्या साहित्यकृतीची दुसऱ्या भाषेत केलेली अनुनिर्मिती..पुननिर्मिती असे. विशेषत: कवितांच्या रूपांतरात त्या मूळ छंद, नाद, लय सांभाळण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असत. सध्या वीणाताईंनी विजय तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’चे केलेले बंगाली रूपांतर कोलकात्याच्या रंगभूमीवर गाजते आहे. जीवनातले परस्परविरोधी ताणतणाव व किल्मिष उगाळत बसू नये. कारण निर्मितीच्या निर्मळ मुहूर्ताला रूपदान करण्यासाठी मन नेहमी धुऊन-पुसून स्वच्छ ठेवावे लागते. आणि निर्मिती म्हणजे काव्य, कला, कथा, संगीतच नव्हे, तर साधं माणूस म्हणून सहृदयतेनं जगणं आणि आपल्या अवतीभोवतीचं वातावरण व परिसर सुंदर व स्वच्छ ठेवणं, हीदेखील एक महत्त्वाची निर्मितीच आहे, असे वीणाताईंचे मत होते. रवींद्रनाथ अजरामर आहेतच; वीणाताईदेखील अपरिहार्यपणे अनंतात विलीन झाल्या असल्या तरी अस्तंगत कधीच होणार नाहीत.                             

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 12:28 pm

Web Title: vina bhalchandra alase
Next Stories
1 ‘आई रिटायर होतेय’च्या गोड वेणा
2 ‘रफाल’च्या निमित्तानं..
3 ‘शेती हटाव’ अभियान
Just Now!
X