विनय येडेकर

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील सदाबहार अभिनेते रमेश भाटकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे निकटच्या मित्राने घडवलेले हे दर्शन..

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Harsh Chhaya on divorce with shefali shah
घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”

४ फेब्रुवारीला तो हे जग कायमचं सोडून गेला. त्याच्या या एक्झिटनं अनेकांना चटका लावला. त्याचं जाणं अनपेक्षित नव्हतं, पण दु:खदायक होतंच! माझ्यापुरतं सांगायचं, तर मोठय़ा भावाची भूमिका कैक वर्ष निभावणारा माझा सख्खा मित्र गेला. आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात. त्या प्रत्येकाचं स्वत:चं असं खास वैशिष्टय़ असतं. ते भावतं. मनाचा ठाव घेऊन राहतं. या एका मित्रानं ती पारंपरिक चौकट मोडली. मैत्रीची म्हणून जी काही वैशिष्टय़ं असतात, ती सगळी त्याच्यात होती. एकाच माणसात मैत्रीचे हे सगळेच्या सगळे गुण आढळणं हा चमत्कार होता. त्या चमत्काराचा अनुभव मीच नव्हे, तर त्याच्या बहुतेक मित्रांनी वर्षांनुवर्ष घेतला. म्हणूनच त्याच्या मैत्रीला असंख्य पदर, अनंत कंगोरे होते. आयुष्याच्या रंगमंचावर माणूस म्हणून त्यानं निभावलेली प्रत्येक भूमिका म्हणूनच तर चिरकाल स्मरणात राहणार आहे.

मी जेमतेम अठरा वर्षांचा होतो तेव्हा माझा मोठा भाऊ गेला. त्यानंतर कधीतरी विजय गोखलेनं माझी रमेशशी ओळख करून दिली. मित्र आणि रंगकर्मी विजयच्या निमित्तानं झालेली ती भेट मैत्रीत कधी बदलली, हे कळलंही नाही. अचानक एके दिवशी मला साक्षात्कार झाला, की माझ्या या मित्रानं जणू मोठय़ा भावाची जागा घेतलीय. ती पोकळी भरून काढलीय. अगदी निरलस, निर्व्याज मनानं! नंतर कायमच मी त्याच्यात मोठा भाऊ बघत गेलो. यथावकाश हे नातं एकतर्फी नाही असं जाणवायला लागलं. तोही नकळत मला धाकल्या पातीसारखं वागवायला लागला. चक्क माझे लाडसुद्धा पुरवायचा!

आमचं नातं गहिरं, गडद होऊ लागण्यात एक समान दुवा होता.. स्पोर्ट्सचा! खेळ हा दोघांच्याही जिव्हाळ्याचा विषय. मैदानावरचं आमचं प्रेम नुसतं बघ्याचं नव्हतं. दोघांच्याही अंगाला माती लागली होती. फक्त खेळ वेगळे होते, इतकंच. त्याचा खो-खो आणि माझं क्रिकेट. तो खो-खोत पारंगत असला तरी क्रिकेटवर त्याचा जीव होता. त्याच्या उमेदीच्या काळात तो विजय मांजरेकर, अजित वाडेकर, रमाकांत देसाई, मनोहर हर्डीकर यांचा खेळ डोळ्यांत प्राण साठवून बघायचा. अजित वाडेकर आणि रमाकांत देसाई ही तर जणू त्याची दैवतंच होती. तो आमच्यातला पहिला सामायिक धागा. बालमोहन शाळेत सुरू झालेलं माझं क्रिकेट पुढे रुईया कॉलेजात बहरलं. नंतर मीही प्रेक्षकांच्या स्टॅन्डमध्ये आलो. पण तिथं माझ्यासोबत तो न चुकता यायचा. सुरुवातीला कधीतरी मी त्याची सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर वगैरे दादा लोकांशी ओळख करून दिली. नंतर त्यांच्याशीही त्याचा दोस्ताना जमला. त्याची जातकुळी अस्सल क्रिकेट लव्हरची. वानखेडे स्टेडियमवरची एकही मॅच तो चुकवायचा नाही. क्वचित कधीतरी मी एखादी मॅच मिस केली असेल, पण हा पठ्ठय़ा न चुकता मॅचला हजर असायचा. संदीप पाटील, करसन घावरीपासून सुनील-दिलीपपर्यंत अनेकांच्या नजरा त्याला नकळत शोधायच्या.

बघता बघता आमचा वानखेडेवर फड जमला. तो, मी, सुधीर जोशी, लक्ष्या बेर्डे, अविनाश खर्शीकर अशी आमची गँग मॅचला एकत्र असायची. एकदा प्रशांत दामलेही आला होता. असो. मुद्दा इतकाच, की त्या एका धाग्यातून पुढे मैत्रीचं तलम गर्भरेशमी वस्त्र विणलं गेलं. प्रकाश पुराणिक, गुरू गुप्ते आणि दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबर त्याचा चांगलाच दोस्ताना झाला. त्याच्यासोबत या मोठय़ा क्रिकेटर्सना भेटताना मला एक साक्षात्कार झाला. कलावंतांना जसं क्रिकेटपटूंचं आकर्षण असतं, त्यांच्याविषयी कुतूहल असतं, तसं या क्रिकेटर्सनाही कलावंतांविषयी तसंच काहीसं वाटत असतं. एकदा तर सुनीलनं ‘‘हे एवढे डायलॉग तुम्हाला कसे काय पाठ होतात?’’ असा प्रश्न त्याला मोठय़ा अप्रुपानं विचारला होता! वास्तव इतकंच, की सुनीलसाठी स्ट्रेट ड्राइव्ह जितका सहज आणि नैसर्गिक, तितकाच रमेशसाठी संवाद नैसर्गिक होता!

तसा तो जगन्मित्र. कोणातही मिसळून जाणाऱ्या आणि तरीही आपल्या दर्जेदार वेगळेपणाची छाप सोडणाऱ्या केशरासारखा होता तो! त्याच्या स्वभावातला एक पैलू फारच विलक्षण होता. तो निर्हेतुक कौतुक करायचा. मनापासून आणि भरभरून. नवख्यांचंही तो असं दिलखुलास कौतुक करायचा. हा गुण आताशा दुर्मीळ होऊ लागलाय. पाठीवर कौतुकाची थाप मारून तो थांबायचा नाही. अवचित कधीतरी कारण नसताना भेटवस्तूही द्यायचा. त्याचा स्वभाव कधीच बदलला नाही. बरं, आपण कधीतरी त्याला दिलं, तर अगदी वर्षभरानंसुद्धा- ‘‘अरे, आज मी तू दिलेला शर्ट घातला होता. सगळे म्हणत होते, काय मस्त आहे!’’ अशी आठवण करून द्यायचा. असं काहीतरी सांगताना त्याच्या मनात आणि चेहऱ्यावर बालसुलभ भाव असायचे. तसं पाहिलं तर त्याच्या मनात कायमच एक निरागस, अवखळ मूल दडलेलं होतं. त्याच्या खूप जवळ गेलेल्यांना तो नीट समजला. त्याच्यातल्या उत्स्फूर्त, अवखळ खळखळाटाला वयाचा आकडा कधी वेसण घालू शकला नाही. ज्यांना तो कधी नीट समजलाच नाही त्यांनी प्रवादाचे डाग लावले. त्याची लोकप्रियता आणि त्या वलयांकित जीवनातलं त्याचं माणूस म्हणून राहणं मला जवळून बघता आलं. ‘कमांडर’ लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही त्याचे पाय जमिनीवर होते. तेव्हा तर मुलीबाळी त्याच्यावर जीव ओवाळून टाकत. तो मात्र त्याच्या चालीनं जगत राहिला. प्रवादांना त्यानं कधी फालतू भीक घातली नाही. पडद्यावरचा हा कमांडर एरव्हीच्या जगण्यातही फायटर होता.

नट म्हणाल तर मोठा शिस्तीचा. देखणा, राजबिंडा, भारदस्त आवाजाची देणगी लाभलेला. त्यानं तालीम कधीही चुकवली नाही. वेळ कधी मोडली नाही. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी ‘अश्रूंची झाली फुले’ सोडल्यावर लाल्याची भूमिका रमेश करायचा. त्या सुमाराला बालगंधर्व थिएटरमध्ये दुसऱ्या एका नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी डॉ. घाणेकर त्याला भेटले. त्यांनी विचारलं, ‘‘काय रे, आता लाल्या तू करतोस ना?’’ त्यानं ‘हो’ म्हणताच ते म्हणाले, ‘‘अमूक संवाद म्हणून दाखव.’’ त्यांच्या आग्रहास्तव रमेशनं म्हणून दाखवल्यावर डॉ. घाणेकरांनी ‘लाल्या’च्या डायलॉग डिलिव्हरीचं अपूर्व प्रात्यक्षिक तिथंच देऊन टाकलं. आमच्या या मित्राचा मोठेपणा असा की, ‘‘डॉ. घाणेकरांच्या त्या भेटीनंतर मी लाल्या अधिक चांगला वठवू शकलो,’’ असं तो नि:संकोच सांगायचा.

रंगभूमीवरच्या त्याच्या भूमिका, त्यानं गाजवलेला टीव्हीचा छोटा पडदा असे तपशील सर्वज्ञात आहेत. इथं त्यात शिरणं अस्थानी ठरेल. पण एक रंगकर्मी म्हणून त्याच्या बाबतीत मी छातीठोकपणे दोन गोष्टी नक्की सांगू शकतो. एक तर तो जीव ओतून काम करायचा. दुसरं म्हणजे त्यानं कधी कोणाशी स्पर्धा केली नाही. व्यावसायिकतेच्या जीवघेण्या स्पर्धेत तो कधी उरीपोटी धावला नाही. त्याला दूरदर्शनवर पहिला ब्रेक याकूब सईदनी दिला. ते याकूब सईद त्याच्या अंत्यदर्शनाला आवर्जून आले होते. त्याची कमाई ही अशा परिमाणांनी मोजायला हवी. रंगभूमीवर त्याचा विलक्षण जीव होता. रंगमंचाइतकाच तो कॅमेऱ्यासमोरही सहज वावरायचा. पुरस्कार किती मिळाले, यांसारख्या सरधोपट मोजपट्टीनं त्याचं मूल्यमापन करणं अन्यायाचं होईल. नाटकावरच्या त्याच्या प्रेमाची प्रचीती त्यानं अखेपर्यंत दिली. कॅन्सर झाल्यानंतर किमोथेरपीच्या सायकल सुरू असतानाही त्यानं ‘अपराध मीच केला’चे प्रयोग केले. लौकिक, मानमरातब त्याच्यासाठी फार काही नव्हते. त्यानं जोडलेला एकेक माणूस हा त्याच्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. माणुसकीच्या आणि मैत्रीच्या बाबतीत मापदंड थिटे पडावेत इतका तो उत्तुंग होता. आई शिक्षिका, वडील स्नेहल भाटकर हे संगीतकार अशा कौटुंबिक पार्श्वभूमीचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होता.

चांगला कान आणि गाता गळा रमेशला लाभला होता. त्यामुळं त्यानं गावं, संगीताच्या प्रांतात यावं असं वडलांना खूप वाटायचं. पण त्यानं स्वत:च अभिनयाचा मार्ग स्वीकारला. कीर्ती कॉलेजात शिकत असल्यापासून लागलेलं नाटकाचं, अभिनयाचं वेड घेऊन तो उभी हयात जगला. अर्थात त्याच्या संगीतविषयक जाणिवाही समृद्ध होत्या. तो चांगलं गायचा. चांगलं ऐकायचा. घरात दोस्तांबरोबर मैफिली जमवायचा. असंख्य गाणी त्याला तोंडपाठ होती. स्नेहल भाटकरांच्या गाण्याचा, संगीताचा त्याच्यावर झालेला संस्कार मोठा होता. त्यांच्या छोटेखानी घरात एकेकाळी अभिनेत्री नूतन गाणं शिकायला यायची. वडिलांच्या- म्हणजे अण्णांच्या सांगीतिक कर्तृत्वाविषयी त्याला रास्त अभिमान होता. त्याचं भाग्य असं की, त्याची भूमिका असलेल्या एका चित्रपटाला अण्णांनी संगीत दिलं होतं. यंदाचं वर्ष हे ग. दि. माडगूळकर आणि बाबूजींचं (सुधीर फडके) जन्मशताब्दी वर्ष. तेच अण्णांच्याही जन्मशताब्दीचं वर्ष आहे, हे विस्मृतीत जाता कामा नयेत असं रमेशला तीव्रतेनं वाटायचं. त्याच्या त्या इच्छेतून अशोक हांडेनं एक सुरेख कार्यक्रम बसवला. १६ जानेवारीला पाल्र्याच्या ‘दीनानाथ’मध्ये त्याचा प्रयोग झाला. नेमकं त्याच्या दोन दिवस आधी रमेश इस्पितळात दाखल झाला. अर्थात प्रत्यक्ष प्रयोगापूर्वीचा एक झीरो शो त्याला दाखवला होता.

काही गोष्टी माणसाला भाग्यानं मिळतात. रमेशच्या बाबतीत ते अक्षरश: खरं होतं. जन्मासाठी मिळालेलं घर, लग्नासाठी मिळालेली वधू आणि पित्याचं कर्तव्य निभावण्यासाठी मिळालेला मुलगा हे सारं त्याच्या भाग्यरेषा ठळकपणे दाखवतात. मृदुला बेहरे ही त्याची कॉलेज जीवनातली मैत्रीण. त्यानं दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेत काम केलेली बुद्धिमान आणि गुणी मुलगी. ती प्रेमात पडली आणि हा चतुर्भुज झाला. पुढे ती स्वकर्तृत्वावर मुंबई उच्च न्यायालयात न्यायासनावर बसली. तिच्या न्यायमूर्ती असण्याचा आब तो कसोशीनं राखायचा. न्याय हा निष्ठुर नसतो, यावर त्याची श्रद्धा जडली ती बहुधा या सहचारिणीमुळेच. मला आठवतंय, काही प्रवादांच्या बाबतीत रमेश म्हणायचा- ‘‘मला जगाची पर्वा नाही. मृदुला माझी न्यायदेवता आहे. तिला सत्य ठाऊक आहे!’’ त्यांच्या या संसारवेलीवर हर्षवर्धन नावाचं फूल उमललं. हर्षवर्धन अनेक वर्ष अमेरिकेत होता. अलीकडेच तो भारतात परतला. त्याच्या इथल्या वास्तव्यानं आमचा मित्र भलताच खूश होता. कॅन्सरशी लढायला त्याला जणू नवं बळ मिळालं होतं.

रमेशचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो उत्तम खवय्या होता. चांगला बल्लवही. त्याचे हात देणाऱ्याचे होते. त्यामुळे खाणं, गाणं आणि बोलणं याचा त्याच्या घरी जमणारा फड संस्मरणीय असायचा. दरवर्षी ३ ऑगस्टला रमेशच्या घरी त्याच्या वाढदिवसाची जी मैफल जमायची त्याला तोड नाही! दोस्तांच्या या फडात रीमा लागू, अनिल कालेलकर, विजय गोखले, जुईली देऊसकर, गिरीश आरेकर, अशोक शिंदे, वैभव मांगले, बाबा गुर्टू असा अफलातून पट असायचा. टोनी नावाचा त्याचा एक मित्रही असायचा. तोही मध्यंतरी कॅन्सरनं गेला. रीमा गेली. आणि आता आमचा हा होस्टही गेला! त्याच्या वाढदिवशी शक्यतो मीच स्वयंपाक करायचो. त्यात एक आनंद होता. आता येत्या ३ ऑगस्टला मी कुणासाठी स्वयंपाक करू, या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नाही.

तो जवळच्यांचा किती विचार करायचा, हे मला त्याच्या मृत्यूच्या दिवशी आणखी जाणवलं. ५ फेब्रुवारी हा माझा जन्मदिन. मला त्यातल्या त्यात कमी चटका लागावा म्हणून त्यानं मृत्यूसाठी तो दिवस टाळला आणि २४ तास आधी गेला! त्यानं जातानाही माझी काळजी वाहिली. त्याचा विचार करत असताना माझ्या मोबाइलच्या कॉलर टय़ूनमधली एक ओळ सारखी आठवत राहते..

‘बहती हवा सा था वो

कहाँ गया उसे ढूंढू?’

vinayedekar@gmail.com