13 August 2020

News Flash

माझा जन्मोजन्मीचा बॉयफ्रेण्ड

नव्वदोत्तर लेखक नितीन भरत वाघ यांची ‘व्हर्जिन’ ही कादंबरी नवता बुक्स वर्ल्ड (मुंबई) तर्फे आज, ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे. या कादंबरीतील एका प्रकरणाचा

| November 30, 2014 06:23 am

नव्वदोत्तर लेखक नितीन भरत वाघ यांची ‘व्हर्जिन’ ही कादंबरी नवता बुक्स वर्ल्ड (मुंबई) तर्फे आज, ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे. या कादंबरीतील एका प्रकरणाचा संपादित अंश..
संध्याकाळी थोडय़ा उशिराच त्या पोहोचल्या. जवळपास अंधार झाल्यावर. त्यांना सोडून ड्रायव्हर आल्या पावली परतला. प्रवास आणि मानसिक थकव्यामुळे त्यांनी जेवणानंतर आराम करणंच पसंत केलं. बाई त्यांना जेवण वाढून आवरून सावरून लगेच आपल्या सव्‍‌र्हन्ट क्वार्टरकडे निघून गेली. बोलण्यावरून दोघींना ती बरी वाटली. त्यांना मिळालेल्या सूचनेनुसार तिच्याशी फार बोलायचं नव्हतं, कारण कुठल्याही परिस्थितीत शोच्या वेळेपर्यंत नाईलची आयडेन्टिटी डिसक्लोज होऊ द्यायची नव्हती. परक्यांशी बोलता बोलता नको ते तोंडातून बाहेर पडण्याचा संभव असतो म्हणून कमी वा न बोलणंच सोयीचं होतं. दोघींना एवढं थकूनही पडताच झोप आली नाही, मात्र उठवत नव्हतं; पण त्या समुद्राची गाज ऐकू शकत होत्या. तो इतका जवळ वाटत होता जणू घराच्या अंगणातच आहे. जेव्हा त्या सकाळी उठल्या तेव्हा त्यांना समजलं की, समुद्र खरंच त्यांच्या अंगणातच होता, फक्त शंभर-दोनशे पावलांवर! श्रीमंतांना समुद्रही पाळता येतो की काय? ईलाला प्रश्न पडला, जणू एखाद्या पाळीव प्राण्यासारखा त्याला आपल्या परसदारात बांधून ठेवलाय. पळतच त्या दोघी समुद्रकिनाऱ्यावर गेल्या, त्यांच्या वयाला साजेलशा तऱ्हेने! जाना थेट पाण्यातच शिरली, ईला किनाऱ्यावर वाळूत बसून तिचा आरडाओरडा ऐकत राहिली. तेवढय़ा वेळेपुरता ती सगळा शीण, ताण, विचार विसरली आणि शांतपणे वाळूत रेघोटय़ा मारत राहिली. जाना किनाऱ्याबाहेर आली तेव्हा नाईलने तिला सुचलेला विचार सांगितला, ‘‘की समुद्रालाही असं खासगी मालमत्ता म्हणून परसदाराशी बांधून ठेवता येतं का एखाद्या गाई-बलाप्रमाणे?’’ जाना त्या विचारावर हसत राहिली. नाईलने हळूच जानाला विचारलं, ‘‘जाना, तुझ्या आईबाबांना जेव्हा हे सगळं समजेल कार्यक्रम बघून, तेव्हा ते काय म्हणतील, काय वाटेल त्यांना? त्यांना आवडणार नाही?’’
‘‘काही सांगू शकत नाही.’’
‘‘पण एक निश्चित, त्यांना तुझी लाज वाटणार नाही. कदाचित तुझ्या धर्याचं कौतुकच करतील. माईलादेखील तुझा गर्वच वाटेल. तुला ती खूप चांगल्या पद्धतीने समजवते. तिला माहितीय, तू हे सगळं का केलंय.’’
ईला म्हणाली, ‘‘पण लग्नाचं काय?’’
तिचा प्रश्न ऐकून जाना म्हणाली, ‘‘एक्सक्यूज मी.’’
‘‘हा प्रश्न माई आणि काका-काकू विचारतीलच.’’
‘‘ईला, आत्ता त्याचा विचार करायची गरज नाही. आत्ता आपल्यासमोरचे प्रश्न फार वेगळे आहेत. पुढचं पुढं पाहून घेऊ.’’
ती काही बोलणार तेवढय़ात बाईने त्यांना आवाज देऊन सांगितलं, ‘‘ताई, चहा-नाश्ता तिथंच आणू का?’’ जानाने आण सांगत, ईलाला सांगितलं, ‘‘आता कुठल्याही विषयावर बोलणं बंद, किमान या तरी.’’ ईलाने होकार भरत हातावरची वाळू झटकली. जणू तिने विचारच झटकून टाकले असावेत. बाई चहा-नाश्ता ठेवून गेली. जानाने एक कप ईलाला दिला, एक स्वत: घेतला. तेव्हा मिस्कीलपणे ईला म्हणाली, ‘‘मलापण एक विचार सुचतोय. मला किनई असं वाटतंय, हा समुद्र माझा जन्मोजन्मीचा बॉयफ्रेन्ड असावा आणि हा माझी वाट पाहत पडलाय इथं वर्षांनुर्वष. आता मी आलेय, तर हा अस्सा जिवंत होऊन उठेन आणि येऊन मला गच्च मिठी मारेन.’’ तिच्या बडबडीवर दोघी हसत राहिल्या.
पहाटे अचानक जेव्हा नाईलला जाग आली आणि तिने उठून सभोवताली पाहिलं, तेव्हा पहिला प्रश्न तिच्या मनात आला, कोण आहे मी आणि काय करतेय इथे? या जागेचा आणि माझा काय संबंध आहे? मी कधी विचार केला होता-या ठिकाणी येण्याचा? कधीच नाही. जर मी विचारच केला नव्हता तरी मी इथे कशी? कोणी ठरवलं, मी या वेळी इथे असेन असं? जर मी विचार केला नाहीये, तर कोणी? ती जे काही करतेय, जगतेय, तो आभास आहे की सत्य, भ्रम की स्वप्न, नेमकं काय आहे हे सगळं? मेस्मराइज झाल्यागत ती समुद्राच्या काठावर येऊन पोहोचली. पुसटसा प्रकाश समुद्रातून झळकत बाहेर पडत होता. काल रात्री बुडून गेलेला प्रकाशाचा तवंग आज परत पाण्यावर येत होता. का येत होता? हा प्रकाश कायमचं तोंड का काळं करीत नाही? हा समुद्र तरी काय करतोय इथे कधीपासून? कुणाची वाट बघतोय की काय? कुणाचा प्रियकर तर नाही ना हा? की माझाच? याला कंटाळा नाही येत का असंच पडून राहण्याचा? हा चोंबडा सूर्य तरी काय करतोय? स्वत:ला जाळून घेण्यात कसली मजा वाटते त्याला? वारा का माझ्या केसांना कुरवाळतोय? या म्हाताऱ्या विरक्त चांदण्यांचा काय संबंध आहे माझ्याशी? मी इटालियन वा इराणी दिग्दर्शकाच्या सिनेमातील पात्र आहे का? मी इरेंदेरा तर नाही? का मॅक्बेथ आहे मी? मी डोस्टोव्हस्कीच्या कादंबरीची नायिका तर नाही ना? की बारान आहे मी? गोयाची बोटं फिरतायत माझ्यावर? का पिरांदेल्लोची पात्रं शोधतायत मला? का मायकेल एंजेलोची बोटं आकार देतायत मला? मी पिकासोची अज्ञात कामुक प्रेयसी आहे, की मíलन मन्रो की लिओनाडरेचं कोडं मोनालिसाय? मी ऑथेल्लोची शेवटची कामातुर रात्र आहे, की क्लिओपात्राची तहान? मी समुद्रात नाहीशा झालेल्या कवीची तगमग तर नाही? की मी अतृप्त चित्रकाराच्या कानाचा आत्माय? कोण आहे मी? बिथोवनची अर्धवट राहिलेली सिम्फनी तर नाही? नाही तर व्हेनेसा माई किंवा येहूदी मेन्यूहीनच्या तुटलेल्या व्हायोलिनची मी तार आहे, जी वाजतेय, पण आवाज येत नाही? कशाने माझ्या पेशीपेशींत ही रक्तओल पसरत चाललीय? तळपायापासून मला कोणती धून भिजवतेय इतकं चिंब नखशिखान्त? हा आवाज कोणाचा आहे? कोण आवाज देतंय मला कधीपासून? या काळोखातून मला कोणी बोलावतंय का? का प्रकाश मला हाकारतोय? किती जन्मापासून या हाका मला कोणी मारतंय? कुणाचाय हा आवाज? नाईल हे नाव कुठं तरी ऐकल्यासारखं वाटतंय, कुणाचंय? किती काळापासून वाहतेय मी अशी बेधुंद? मी वाहते तरीयेका? का नुसतीच थबकून आहे? मी चालतेय का थांबलीय? किती काळ चालतेय मी? काय काय ओलांडलंय मी? ही शतकांच्या पाठीवरची कुबडं आहेत, की मी लिहिलेल्या अदृश्य विलापिका आहेत? मी कुंतीय का, कुणाला सोडून देतेय मी पाण्यात? माझ्या भूतकाळाला, की माझ्या भविष्यकाळाला? माझ्या डोळ्यांवर ही अंधाराची गांधारी पट्टी किती जन्मांपासून आहे? कोणतं युग अख्खं चालून येतंय माझ्यावर? कोणता मृत समुद्र वेढून घेतोय मला, मी तरंगतेय अशी पाण्यावर? हा समुद्र का घनगंभीर आवाजात मला ऐकवतोय भक्तिसूत्रातील सूत्र? ऋग्वेदाच्या कितव्या मंडलातील मी ऋचा आहे? काहीही असू देत, पण पुरुषसूक्त नावाची ओकारी नाही व्हायचंय मला या जन्मात तरी. माझ्या विटाळाच्या पाण्याने लिहिलेली मनुस्मृती साखळदंडात जखडतेय मला, की या समुद्रात घेऊन चाललीय कायमची नाहीशी करायला.. हे एवढं पाणी कशामुळे पसरलंय? पाणीच पाणी, हे पाण्यावर काय तरंगतंय? जिवंतय, का मढं कुणाचं? परंपरेचं का संस्कृतीचं का इतिहासाचं मढं आहे हे, जे मला बुडवतंय? मी बुडतेय, मी बुडत चाल्लीय का? मी खरंच बुडतेय का?..
..जानाने ईलाचा हात पकडला आणि सरक्न मागे ओढलं. तशी ईला भानावर आली. तिला फक्त जानाचे ओठ हलताना दिसत होते. ती काय बोलतेय हे मात्र तिला समजत नव्हतं. जेव्हा ती पूर्ण भानावर आली तेव्हा तिने आजूबाजूला पाहिलं, तर पाणीच पाणी होतं आणि ती छातीभर पाण्यात, समुद्रात उभी होती.
‘‘काय करतेस ईला? तुला वेडबीड लागलंय का? लक्ष कुठंय तुझं? पाण्यात काय करायला गेली होतीस?’’
पुढचं बोलणं ऐकू यायच्या आत ईला चक्कर येऊन खाली पडली. बाईला बोलावणं जानाला योग्य वाटलं नाही. नसते प्रश्न उभे राहण्याची शक्यता होती. सुदैवाने ती अजून क्वार्टरबाहेर आली नव्हती. जाना तिला कसंबसं उचलून घरात घेऊन आली, कपडे बदलून पलंगावर झोपवलं. गरम पाणी करून आणलं, तिला चांगलं पुसलं, टेम्परेचर चेक केलं. सुदैवाने तिला ताप वगरे काही नव्हता. जाना काय करावं, या विचारात होती. डॉक्टरला बोलवावं; पण कसं, हे सुचत नव्हतं. कारण ना फोन होता, ना मोबाइल, बाई येईस्तो तिची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. जानाने चहा करायला घेतला. ती चहा कपात ओतत असतानाच ईलाला जाग आली. जाना चहा घेऊन आली आणि बसत म्हणाली, ‘‘कसं वाटतंय आता?’’ ईला फक्त ओशाळत हसली. पाणी पीत चहाचा कप हातात घेत ती नीट सावरून बसली.
‘‘मला नाही आठवत मी पाण्यात कशी गेले. काहीतरी अज्ञात ओढत मला त्या पाण्यात घेऊन गेलं. कदाचित पाण्यानेच ओढलं असेल. माझ्या नकळतच.. मी पाण्यात शिरले. मला पाणी- देखील जाणवलं नाही. विश्वास ठेव माझ्यावर. अ‍ॅण्ड आय अ‍ॅम सॉरी.’’    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2014 6:23 am

Web Title: virgin by nitin bharat wagh
Next Stories
1 माझी हक्काची माणसं माझ्यासोबत..
2 ओळख.. ‘साजिऱ्या’ शब्दांशी !
3 ती आत्ता असायला हवी होती..
Just Now!
X