डॉ. आशुतोष जावडेकर

पुण्यातून विमान जसं दिल्लीला पोचलं आणि विमानतळावरून बाहेर आल्यावर जबरी थंड वारा जसा डोक्यात घुसला, तसं मी एक शिट्टी वाजवली आणि स्वत:शीच म्हटलं, ‘चला घरी आलो.’ माझे आई-बाबा जेव्हा वेगळे झाले तेव्हा माझी बंगाली आई कलकत्त्याला निघून गेली. आणि माझे मराठी बाबा काय ते- हा, भा. प्र. से.मध्ये असल्याने बढत्या घेत ल्युटेन्स दिल्लीत क्रमश: मोठी घरे मिळवत राहिले. त्यामुळे, मी जन्मलो आणि वाढलो, शिकलो ते दिल्लीतच. हिंदीतच वाढलो मी, पण आवडली मला मराठी. बाबांनी मला मराठी भाषा दिली (आणि त्यांचं देखणेपण दिलं). अबीर म्हणायचा, ‘‘तू देख, मराठी लडम्कीसेही निकाह करेगा आगे जाके.’’ आईने नंतर दुसरं लग्नही केलं. मी लहान होतो. फारसा टच तिने ठेवला नाही. मीही शाळेत असेस्तोवरच तिला मिस केलं. सातवीच्या दुसऱ्या टर्मला जसनीत माझी गर्लफ्रेंड झाली. दहावी ते बारावी भयानक अभ्यासात दिवस गेले आणि मग डी. यू.च्या कॅम्पसवर पंखुडी जैस्वाल सोबत होती. आणि मुळात अबीर! पहिलीपासून ते आत्तापर्यंत अबीर माझा जिवलग दोस्त बनून राहिला. मला सोडून गेलेल्या आईला आणि कायम व्यग्र असलेल्या वडिलांना मी मिस करावं इतकं व्हॅक्युम मला कधी आलंच नाही. किंवा माही म्हणते तसं मी ते येऊ दिलं नाही!

दोन मिनिटे विमानतळाबाहेर उभा राहिलो आणि मागून कुणी तरी खांद्यावरून हात ओवत घट्ट मिठीत घेतलं. अबीरच असणार. इतका ओळखतो मी त्याला. नुसता मागे उभा राहिला येऊन तरी गंध येईल मला! ‘‘अबे चुतीये धीरज, तू भूल गया यार मुझे!’’ वगैरे दोस्तीतले आरोप तो करत राहिला तेव्हा मी फक्त आनंदाने त्याच्याकडे बघत राहिलो. मग त्याची गाडी नेहमीसारखी मी चालवायला घेतली आणि चाणक्यपुरी येईपर्यंत त्याच्या अजून दहा शिव्या खाल्ल्या. मग मी एका सिग्नलला थांबलो असताना म्हटलं, ‘‘यार, थेट लग्न करू या असं म्हणते आहे माही!’’ तो ब-घ-त-च राहिला. माझं आणि माहीचं ऑन आहे हे त्याला माहीत होतंच. आम्ही कमिटेड आहोत हे तर फेसबुकवरही आम्ही टाकलं होतं. फार तर फार माझा तिचा साखरपुडा होईल अशी अबीरची (आणि माझीही) अपेक्षा होती. पण परवा माझ्या-माहीच्या चच्रेचा शेवट असा झालेला की, माहीला माझ्याशी थेट लग्न करायचं होतं. गाडी पहिल्या गियरला टाकत मी अपेक्षेने अबीरकडे पाहिलं. त्याने एक अजून खास शिवी त्याच्या उर्दू नजाकतीने दिली आणि म्हणाला, ‘‘रात्री बोलू, सीपीच्या आपल्या हॉटेलवर.’’ मी मान डोलावली. मी घरी जाणार नव्हतोच. माझे वडील परवा ओसाकाला गेलेत तिथून येतील तेव्हाच तिथे जाईन. आज आणि उद्या अबीरच्या घरी. ‘‘तबस्सुम काय म्हणते आहे?’’ मी त्याच्या बायकोची चौकशी करत विचारलं. ‘‘इक नज्म.. जो नहीं चाहती किसी तरन्नुम म बंध जाना.’’ अबीर उत्तरला. मी सवयीने नव्हे, तर आशय आवडला म्हणून दाद देत म्हटलं, ‘‘माशाल्ला! तू लिहिली आहेस?’’ ‘‘नाही रे, दीपक शाह म्हणून आहे कुणीतरी. फॉरवर्ड आलेली परवा कविता, पण तबस्सुमला लागू पडते. भयानक स्वतंत्र आहे ती. तू परवडलास – निदान शिव्या दिल्यावर तरी माझं ऐकतोस!’’ ‘‘अरे, बायका कुणाचं ऐकतात? मत्रीण असेपर्यंत वेगळं असतं आणि मग बायको झाली की वेगळं. आणि माही इज सेयिंग की कमिटल व्हायचं असेल तर.. सॉरी, सॉरी- हे रात्री, वाइनसोबत.’’ अबीर मिश्कील हसला आणि मग त्याच्या घरी आम्ही पोचल्यावर तबस्सुमने खास माझ्यासाठी रात्रीपासून मेहनत घेऊन बनवलेली निहारी मी ओरपली. काय मटणाला गंध येत होता तुपाचा! डाएटची ऐशी की तशी. तसंही माहीसोबत पुढे मला घासपूसच खावं लागेल. ती व्हेगन बनली नाही आणि आत्ता आहे तशी फक्त व्हेजिटेरियनच राहिली तरी खूप झालं. परवा आम्ही टेकडीवर तेही बोललो. तिने नॉन-व्हेज घरात काही बनवू नयेत (आणि खाणं तर लांबच) आणि मी बाहेर हवे ते प्राणी हवे तिथे खावेत, यावर आमची तडजोड झाली आणि तेव्हाच मला जाणवलं की, लग्न खरंच करायचं झालं तर बहुधा मी रेडी नाहीये! मग मी हे न राहवून अबीरला सांगितलं तर त्याने हात धूत म्हटलं, ‘‘गुरू, चला, बोलून टाका.’’ मग काय, बोललो आम्ही. तबस्सुम काहीशा कुतूहलाने आमची केमिस्ट्री निरखत होती. टिपिकल बायका, मित्रांवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या! माहीदेखील अबीरची चौकशी करीत असतेच मध्ये मध्ये. मग त्याच्या घराच्या टेरेसमध्ये आम्ही स्वेटर डकवून बसलो. साडेपाचच वाजले होते, पण थंडी जोरदार वाजू लागली होती. अबीरच्या हातात युवाल हरारीचं पुस्तक होतं. त्यातलं एक वाक्य वाचत तो म्हणाला, ‘‘बघ, हा हरारी काय म्हणतो आहे :  Consistency is the playground of dull minds.. मी ते ऐकताच म्हणालो, ‘‘एक्झ्ॉक्टली! माझ्या बेडरूममध्ये पोरी आलेल्या नाहीत असं नाही, पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी फार तर फार नाश्ता करून जातात! बायको दिवस-रात्र सोबत त्या पलंगावर अनेक अर्थाने शेजारी असणार आहे.’’ अबीरने पुस्तक खाली ठेवत मला विचारलं, ‘‘तुला माही खरंच खूप आवडते का? तर सगळं जमेल.’’ मी म्हणालो, ‘‘सतत नाती एक्सप्लोर करावी आणि आयुष्य अधांतरी ठेवावं असंही अबीर आता मला वाटत नाही. वाटतं, घरी यावं आणि माझं कुणी असावं. म्हणजे माही कदाचित ऑफिसमधून माझ्यानंतर येईल, पण तिची लिपस्टिक, तिची पलंगावर पडलेली एखादी हेअरक्लिप, तिने मॅरिनेट करायला टाकलेला पनीर टिक्का तरी मी पोचेन तेव्हा घरी असेल.’’ अबीर जोरदार हसला. ‘‘पापाजींना सांगितलं आहेस तुझ्या?’’ मी अबीरचा मफलर माझ्या गळ्यापाशी ओढत म्हटलं, ‘‘साखरपुडा डिसेंबरमध्ये करू,’’ असं बाबा म्हणाले. माहीच्या घरचेही तसंच म्हणाले. मला माहीचंच कळत नव्हतं. आणि मग परवा तिने बॉम्ब टाकला! ती म्हणाली, ‘‘मी विचार केला धीरज!’’ मी लगेच म्हटलं, ‘‘तुला लिव्ह इन ट्राय करायचं असेल तर मला चालेल.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘डोंबल. मी लग्न करायचं, थेट असं म्हणते आहे. आता काय ट्रायल घ्यायच्या राहिल्या आहेत आपण एकमेकांच्या! रोज ऑफिसमध्ये एकत्र असतो. आपले पगार आणि टॅक्स आपल्याला माहीत आहेत. आपले आधीचे प्रियकर-प्रेयसीदेखील. आपले हक्काचे दोस्त कोण आणि कसे, आपलं कुठे जमतं आणि कुठे वाजतं हेही कळलं आहे रे. मी नीट, शांतपणे विचार केला आहे. साखरपुडा अनोळखी लोकांचा होतो रे.. आणि तशीही नवरा-बायको म्हणून जी ओळख होणार आहे ती केवळ लग्न झाल्यावरच होणार आहे.’’ अबीर बहुधा त्याचे आणि तबस्सुमचे लग्न झाल्यावरचे गेले काही महिने आठवत म्हणाला, ‘‘ये बात तो कामिल है!’’ तेवढय़ात तबस्सुम टेरेसमध्ये येत चच्रेचा अंदाज घेऊन म्हणाली, ‘‘मे बी द गर्ल इज इन्सिक्युर. म्हणून तिला लग्न करायचं असेल पटकन.’’ माझ्याही मनात हे आलेलं आणि मी माहीला सरळ म्हणालेलो तर ती म्हणालेली, ‘‘अरे तू काय, मीही सोडून जाईन अशी भीती वाटते मला! अनोळखी येतात, आपण त्यांच्या आवर्तात वाहत जातो आणि मग तेव्हा आपले खरे सोबती निघून गेलेले असतात. लग्नच करू थेट.’’ मग तबस्सुमला एकीकडे दाटत अबीरने माझ्या कमिटल स्वभावाचे जरा जास्तच गोडवे गायले! मग आम्ही साऊथ ब्लॉकमधल्या सध्याच्या राजकारणावर काहीबाही बोलत बसलो. मध्ये अयोध्या निकालाचा विषय निघाला. तबस्सुमने म्हटलं, ‘‘तुमच्या दोघांचे धर्म कधी मत्रीआड आले नाहीत का? म्हणजे तुमच्या नव्हे, दुसऱ्यांच्या नजरेत?’’ आम्ही फक्त मोठय़ाने हसलो. अबीरने पुन्हा व्हाट्सअप काढत कुणा आमिर शेखची ओळ पेश केली, ‘‘कौन कहता है के वह पनघट सिर्फ तुम्हारा है.. हमने भी नमाजे अदा की है, गंगा मैं वझू करके.’’ मी ‘इन्शाल्ला’ म्हणालो आणि मनात मागे अबीरसोबत वेगवेगळ्या मशिदीत पाहिलेल्या वझूच्या विभागांची आठवण येऊ लागली. मग आम्ही बाहेर पडलो. सीपीपर्यंत सरळ चालत गेलो (कॅनॉट प्लेसला फक्त दिल्लीबाहेरचे लोक पूर्ण नावाने हाक मारतात). आमच्या फेव्हरिट हॉटेलच्या गच्चीत जाऊन बसलो. अबीर म्हणाला, ‘‘आय मिस यू.’’ मी म्हटलं, ‘‘साले, म तो रोज मिस करता हूं तुझे!’’ नंतर त्याने विचारलं, ‘‘मग, करणार लग्न?’’ मी दीर्घ श्वास घेत म्हटलं, ‘‘झालो यार तिशीचे! विश्वास बसत नाही, पण झालो खरे. असं वाटतं की, आत्ताच चांदनी चौकात सायकलवरून जात पराठे खात होतो. पण तेव्हा शाळेत होतो आणि आता केवढी यात्रा झालीय! आता थांबू या. एखाद्या गंगेपाशी थांबू या. आणि माही आहे अरे तेवढी निर्मळ. आय लव्ह हर यार! जाऊ दे, करतो थेट लग्न.’’ अबीर आनंदाने म्हणाला, ‘‘तुझे डोळे बघ! काय चमकत आहेत. तुला खूप आवडते रे ती. लग्न कर. तुझ्या पालकांचं लग्न टिकलं नाही, हे मनात आहे तुझ्या. तेही भय विसर्जित कर एकदा गंगेत.’’ माझ्या डोळ्यात पटकन पाणी येत नाही, पण तेव्हा आलं- माहीच्या आठवणीने.. अबीरच्या प्रेमाने.. ते अश्रू बघत अबीर हलक्या आवाजात उद्गारला, ‘‘ये जो दे रहा चुपचाप इंद्रधनुषी रंग.. इस बुंद को, वह तेरा इश्क है!’’ आणि मी मानेने म्हटलं, ‘‘इन्शाल्ला.. इन्शाल्ला..’’

ashudentist@gmail.com