विश्वनाथन आनंदला हा सामना कठीण जाणार याची सर्वाना कल्पना होतीच. पण आनंदचा इतका दारुण पराभव व्हावा, ही गोष्ट आनंदच्या मनालाही फार लागली असावी. मॅग्नसने हा सामना ६.५ – ३.५ अशा फरकाने जिंकला. यापूर्वी डॉ. इमॅन्युएल लास्कर यांचा अपवाद वगळता कोणीही जगज्जेता एक तरी डाव जिंकल्याशिवाय पराभूत झाला नव्हता. आनंद ०-३ ने हरताना बाकी ७ डाव बरोबरीत सोडवू शकला. महान खेळाडू गॅरी कास्पारोव्ह वगळता कोणीही छातीठोकपणे मॅग्नस आरामात जिंकेल असे म्हणण्याचे धाडस केले नव्हते. परंतु आनंदच्या पराभवाच्या अनेक खुणा खरे तर अगोदरच दिसू लागल्या होत्या..
गेली सात वर्षे बुद्धिबळ जगज्जेतेपदाचा मुकुट सांभाळणाऱ्या ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदला अखेर आपल्या मायदेशातच झालेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. २२ वर्षांचा, सळसळत्या रक्ताचा तरुण ग्रॅंडमास्टर मॅग्नस कार्लसन नवा जागतिक विजेता ठरला. जरी आनंदचा पराभव हा एक भारतीय म्हणून माझ्या मनाला लागला असला तरीही बुद्धिबळाचा एक अभ्यासक म्हणून मला असे वाटते की, आनंदला याहून चांगला वारसदार मिळाला नसता. जगात आत्तापर्यंत कोणीही मिळवले नाही एवढे गुणांकन (Rating) मिळवणारा ग्रॅंडमास्टर मॅग्नस कार्लसन समोर येईल ती स्पर्धा सहजगत्या जिंकत असेल तर जगज्जेतेपदासाठी त्याच्याहून दुसरा सुयोग्य वारस कोण असू शकेल?
१९७२ साली सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिशर-स्पास्की यांच्यातील लढतीनंतर तब्बल ४१ वर्षांनी जगज्जेत्यासमोर जगातील सर्वात जास्त रेटिंग मिळवणारा खेळाडू आव्हानवीर म्हणून उभा ठाकला होता. जगज्जेता विरुद्ध जगातील क्रमांक एकचा खेळाडू यांच्यातील लढत पुन्हा एकदा जगज्जेत्याच्या विरोधात गेली.
आनंदला हा सामना कठीण जाणार याची सर्वाना कल्पना होतीच. पण आनंदचा इतका दारुण पराभव व्हावा, ही गोष्ट आनंदच्या मनालाही फार लागली असावी. मॅग्नसने हा सामना ६.५ – ३.५ अशा फरकाने जिंकला. यापूर्वी वयाच्या ५२ व्या वर्षी तरुण कॅपाब्लंकाकडून ४-० अशा फरकाने हरणारे डॉ. इमॅन्युएल लास्कर यांचा अपवाद वगळता कोणीही जगज्जेता एक तरी डाव जिंकल्याशिवाय पराभूत झाला नव्हता. आनंद ०-३ ने हरताना बाकी ७ डाव बरोबरीत सोडवू शकला होता. महान खेळाडू गॅरी कास्पारोव्ह वगळता कोणीही छातीठोकपणे मॅग्नस आरामात जिंकेल असे म्हणण्याचे धाडस केले नव्हते. परंतु आनंदच्या पराभवाच्या अनेक खुणा अगोदरच दिसू लागल्या होत्या.
आनंदचे गेल्या वर्षीचे डाव बघितले तर असे दिसून येते की विश्वविजेत्याला साजेसा खेळ त्याच्याकडून होत नव्हता. विद्युत्गती बुद्धिबळाचा तर आनंद हा अनभिषिक्त सम्राट! पण त्याला मेमध्ये सॅंडेन्स (नॉर्वे) आणि जून महिन्यात मॉस्को (रशिया) येथील तीन मिनिटांच्या विद्युत्गती स्पर्धामध्येही पहिला क्रमांक पटकावता आला नव्हता. त्याआधी झुरिक (स्वित्र्झलड) येथे फेब्रुवारी महिन्यात तर कहर झाला होता. तेथे विद्युत्गती स्पध्रेत या जगज्जेत्यावर शेवटच्या क्रमांकाची नामुष्की ओढवली होती. थोडक्यात- आनंदला आपले जगज्जेतेपद धोक्यात असल्याची सूचना मिळाली होती.
काळ्या मोहऱ्यांनी डाव बरोबरीत सोडवायचा आणि पांढऱ्या मोहऱ्या घेऊन प्रतिस्पध्र्यावर हल्ले चढवायचे, ही रणनीती आनंदला आतापर्यंत साथ देत होती. ‘आनंदचा पांढऱ्या सोंगटय़ांकडून खेळ’ या विषयावर माजी जगज्जेत्या अलेक्झांदर खालिफ्मानने तब्बल १४  खंड लिहिले आहेत. इतका आनंद पांढऱ्या सोंगटय़ांचा वापर करण्यात तरबेज मानला जातो. त्यामुळे आनंद पांढऱ्या मोहऱ्यांनी मॅग्नसची दाणादाण उडवून देईल असा आनंदच्या गटाचा विश्वास होता.
क्रीडाक्षेत्राचा हा पहिला नियम आहे की, छोटय़ा छोटय़ा संधींचाही जो फायदा उठवू शकतो तोच संघ किंवा तोच खेळाडू पुढे जातो. पहिल्या आणि तिसऱ्या डावात आनंदकडे काळ्या सोंगटय़ा होत्या आणि तरीही आनंदला अशी परिस्थिती मिळाली, की त्याने विजयासाठी प्रयत्न करायला हरकत नव्हती. त्याने काळ्या   आपण त्याच्याशी शेवटचा मोहरा पटावर असेपर्यंत झुंजणार, हे जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असलेला मॅग्नस आनंदला दाखवून देत होता! आनंदने कोणत्या प्रकारे मॅग्नसविरुद्ध तयारी केली होती, हे तो आणि त्याचा संघ जाणे! पण मला यासंदर्भात अनेक वेळा गमावलेली विश्वविजेतेपदे पुन्हा खेचून आणणाऱ्या मिखाईल बॉटविनिक या महान जगज्जेत्याची एक गोष्ट आठवते! धूम्रपानाला बंदी नसण्याचा काळ होता तो. बॉटविनिक शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्येक स्पध्रेची, डावाची तयारी करण्यासाठी प्रसिद्ध होता. एका स्पध्रेआधी त्याला लक्षात आले की एक खेळाडू घाणेरडय़ा वासाचा सिगार ओढतो. बॉटविनिकने त्या स्पध्रेची तयारी करत असताना एका माणसाला त्याच प्रकारचे सिगार ओढून सतत त्याचा धूर आपल्या तोंडावर सोडायला सांगितले. बॉटविनिक ती स्पर्धा आरामात जिंकला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!
‘िनदकाचे घर असावे शेजारी’ या म्हणीचा आनंदने आदर करायला हवा होता. मॅग्नसने एका वार्तालापात स्पध्रेपूर्वी सांगितले होते की, ‘आनंद फार आळशी आहे. आणि त्याला खाण्यापिण्याची खूप आवड आहे.’ थोडक्यात- आनंदचा फिटनेस कमी पडतो. आनंदने स्पध्रेआधी सहा किलो वजन कमी केले होते. तरीही त्याची पाचव्या आणि सहाव्या तासात दमछाक होत असे. मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूला रोज काही ४२ किलोमीटर धावण्याची गरज नसते. पण त्याने त्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि कस बघण्यासाठी अधूनमधून ते अंतर धावायचे असते. आनंद त्याचे सहाय्यक अथवा संगणक यांच्याशी सहा तासाचे किती डाव खेळला, ही गोष्ट आपल्याला कळणे कठीण आहे. पण अफाट मानसिक आणि शारीरिक क्षमतेच्या मॅग्नसविरुद्ध आपण पाचव्या आणि सहाव्या तासात कमी पडू शकू याची कल्पना आनंदला यायला हवी होती.
आपण भारतीय व्यक्तिपूजेत सगळ्यात पुढे असतो. मला शंका आहे की, आनंदच्या संघात त्याला त्याच्या खेळातील कमतरता ठणकावून सांगणारे कोणी असतील की नाही! याबाबतीत मला गॅरी कास्पारोव्हची आठवण होते. युरी साखारोव्ह हा काही फार मोठा खेळाडू नव्हता. सुरुवातीला युरीने तरुण गॅरीला प्रशिक्षण दिले होते. पण जसजसा गॅरी पुढे जाऊ लागला तसतसे युरी साखारोव्हने प्रशिक्षणातून अंग काढून घेतले आणि गॅरी कास्पारोव्हसाठी चांगले सहाय्यक निवडायला सुरुवात केली. तुझे हे चुकते आहे, हे गॅरीला ठणकावून सांगायला तो कचरत नसे आणि म्हणूनच तोंडपुज्या मंडळींपेक्षा गॅरी कास्पारोव्हने त्यालाच सतत जवळ ठेवले. आपली मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही अशी मनोवृत्ती असते.
आनंद नेहमीच पराभवातून शिकतो. १९९५ साली न्यूयॉर्क येथील जागतिक अजिंक्यपदाच्या स्पध्रेत गॅरी कास्पारोव्हने त्याची पार दाणादाण उडवून दिली होती. आणि तीही आनंदने आघाडी घेतल्यानंतर! ‘आता आनंद संपला!’ असे मानणाऱ्यांना गॅरीच्या निवृत्तीनंतर आनंदने पाच वेळा जगज्जेतेपद मिळवून चोख उत्तर दिले होते. पण गॅरीविरुद्ध त्याने कायम नांगीच टाकली. आनंद नक्कीच परत येईल. पण तो जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध उमेदीने खेळेल का? याचे उत्तर आपल्याला आनंदच्या वाढदिवशी (११ डिसेंबर) लंडनला मिळेल.