सदा डुम्बरे

sadadumbre@gmail.com

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

सामाजिक सुधारणांची विशाल स्वप्नदृष्टी असणारे कृतिशील विचारवंत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सुहास कुलकर्णीलिखित प्रस्तुत चरित्राने महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात मोलाची भर  टाकली आहे. ‘विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना’या पुस्तकात सुहास कुलकर्णी यांनी शिंदे यांच्या चरित्रात्मक तपशिलात न जाता त्यांचे वैचारिक योगदान, प्रबोधन चळवळीतील त्यांची स्थाननिश्चिती, त्यांच्या परिदृष्टीची समकालीन प्रस्तुतता आणि त्यांच्या कार्याचे व त्याच्या परिणामांचे निरपेक्ष बुद्धीने केले आहे.

महर्षी शिंदे यांच्या गुणवैशिष्टय़ांचा, त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा साकल्याने विचार करून त्यांची थोरवी ठासून सांगणारे हे आशयघन वैचारिक चरित्र आहे. अस्पृश्यता निवारण हे ईश्वराचेच काम आहे या साक्षात्कारी भावाने, स्वत:चे जीवन अर्पण करण्याच्या तयारीने त्यांनी हे काम अंगीकारले म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांना ‘महर्षी’ या नामाभिधानाने संबोधले जाते. परंतु केवळ या संबोधनात सामावले जाईल एवढेच मर्यादित त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा सखोल व शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे ते भारतातील आद्य व श्रेष्ठ संशोधक होते. प्रचलीत राजकीय परिभाषेत प्रमाणक परिवर्तन घडवून आणणारी ‘बहुजन’ ही संकल्पना मांडून ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ वादाला त्यांनी सर्जनशील पर्याय दिला. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक राजकीय पक्षांनी बहुजनवादाची कास धरली त्याचे श्रेय महर्षी शिंदे यांचे आहे. भारतीय इतिहासाची व धर्मपरंपरेची त्यांनी नव्याने मांडणी केली, त्यातील विकृती अधोरेखित करून उदार धर्मपरंपरा हाच खरा हिंदू धर्म याचा कळकळीने पुरस्कार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या लढय़ांचे नेतृत्व केले व शेतकरी आणि कामगार यांच्या राजकीय ऐक्याचा प्रस्ताव पुढे ठेवला. स्त्री शिक्षणाचा हिरिरीने पुरस्कार केला. राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणा यातील एकात्मता साधण्यासाठी आग्रह धरला. स्वातंत्र्यलढय़ात भाग घेऊन तुरुंगवास पत्करला. अस्पृश्यता निवारणाबरोबरच जातीव्यवस्थेवर हल्ला केला.

आध्यात्मिक वृत्तीने राजकारण केले. ते उत्तम लेखक आणि वक्ते होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील अनेक अंगांना स्पर्श करून त्यांचे सम्यक आकलन मांडणारे, पारिभाषिक राजकीय वा सामाजिक संज्ञांच्या प्राध्यापैकी जंजाळात न अडकता अवघ्या पावणेदोनशे पृष्ठांत सुबोध मांडणी करणारे हे महत्त्वाचे आणि वाचनीय पुस्तक आहे.

पुस्तक सहा प्रकरणांत विभागले आहे. त्यातील लेखकाची निरीक्षणे व निष्कर्ष क्रमाने पाहिली तर त्यांनी महर्षी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, कार्याचे व विचारांचे विश्लेषण कसे केले आहे हे समजते व शेवटी समग्र शिंदे चरित्राचे सार हाती लागते.

शिंदे यांचा जन्म १८७३ मध्ये जमिखडीत झाला. त्यांचे वडील त्या संस्थानात महत्त्वाच्या पदावर नोकरीस होते. सार्वजनिक जीवनात त्यांचा सहभाग असे. जमिखडीत मुलींची पहिलीच शाळा काढण्यात त्यांचा पुढाकार होता. मराठीबरोबर कन्नड भाषाही तिथे प्रचलित होती.

‘अस्पृश्योद्धाराची पहिली प्रेरणाही त्यांना भागवत धर्माच्या व वारकरी संतांच्या समतेच्या शिकवणीतून मिळाली,’ असा निष्कर्ष लेखकाने काढला तो त्यांच्या भावी आयुष्याशी मिळताजुळता आहे.

१८९१ मध्ये शिदे जमिखडीतून पहिल्या क्रमांकाने मॅट्रिक झाले. मधल्या काळात काही कारणाने संस्थानशी न पटल्याने वडिलांनी नोकरी सोडली, आर्थिक परिस्थिती खालावली, स्वत:चा राहता वाडाही विकावा लागला. बिकट परिस्थितीत शिंदे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आले व फग्र्युसन कॉलेजात दाखल झाले. आगरकर तेव्हा प्राचार्य होते. आगरकरांच्या विचारांनी शिंदे प्रभावीत झाले. मिल, मेकॉले व स्पेन्सर वाचून अज्ञेयवादी झाले. नास्तिक झाले. १८९५ मध्ये पुण्यात भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात शिंदे स्वयंसेवक होते. तिथे अधिवेशनाला जोडून भरलेल्या सामाजिक परिषदेत अमेरिकन मिशनरी डॉ. संडरलँड यांचे भाषण ऐकल्यावर युनिटेरियन धर्मपंथाच्या एकेश्वरवादाच्या कल्पनेने ते भारावून गेले. याच अवस्थेत न्या. रानडे व रा. गो. भांडारकरांच्या प्रभुत्वाखाली विकसित होत असलेल्या प्रार्थना समाजाशी त्यांचे नाते जडले. मानवी जीवनातील श्रद्धेचे स्थान त्यांना जाणवले. एक दिवस त्यांनी रीतसर प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. उन्नत व शुद्ध धर्मकार्य करण्यासाठी प्रार्थना समाजाच्या कामाला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तिथे असताना धर्मशिक्षणासाठी दोन वर्षे ऑक्स्फर्डला जाण्याची संधी त्यांना मिळाली. १९०१ ते १९०३ अशी दोन वर्षे शिंदे ऑक्स्फर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात होते. जगातील सर्व धर्माच्या इतिहासाचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास तर त्यांनी केलाच; परंतु इंग्लंड व युरोपमधील अनेक देशांत प्रवास करून, व्यक्तींना व संस्थांना भेटी देऊन, लेख लिहून, भाषणे देऊन, महत्त्वाचे ग्रंथ वाचून त्यांचे विचार व अनुभवविश्व अनेक अंगांनी विकसित झाले. त्याची सविस्तर हकिगत वाचली की स्तिमित व्हायला होते.

ऑक्टोबर १९०३ मध्ये ते भारतात परतले तेव्हा त्यांच्या ईश्वरविषयक व धर्मविषयक जाणिवा प्रगल्भ झाल्या होत्या. शुद्ध, उदार, प्रागतिक व नैतिक धर्माच्या तत्त्वविचारांचा त्यांचा शोध योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास त्यांना मिळाला होता. मानवसेवा हेच ईश्वरोपासनेचे खरे स्वरूप आहे आणि धर्माचा आशय सामाजिक कृतींमधून सिद्ध होतो, या विचाराशी ते तादात्म्य पावले. रानडे-भांडारकरांच्या प्रार्थना समाजाच्या विचाराशी हे जरा अंतर ठेवून होते.

१९०३ ते १९१० पर्यंत शिंदे यांच्या कामाच्या धडाक्याने प्रार्थना समाजाचा मुंबई-पुण्याबाहेर मोठा विस्तार झाला, लोकसहभाग वाढला, समावेशकता वाढली तरी अस्पृश्यता निवारणाचे काम समाजाने अंगावर घ्यावे या शिंदे यांच्या आग्रहामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे केवळ अस्पृश्यवर्गाच्या उन्नती व सेवेसाठी त्यांना ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करून पर्याय निर्माण करावा लागला. मतभेद विकोपाला गेल्यानंतर ज्या उन्नत, सात्त्विक व उदार धर्माच्या प्रसारासाठी आपले आयुष्य अर्पण करण्याचा निर्धार शिंदे यांनी केला होता, त्या प्रार्थना समाजातूनच त्यांना बाहेर पडणे भाग पडले. या दुहीने त्यांच्या मनाला अतोनात यातना झाल्या. अस्पृश्यांच्या प्रश्नावर काम करण्याच्या त्यांच्या ध्येयासाठी मातृसंस्था सोडण्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. संस्था सोडली तरी प्रार्थना किंवा ब्राह्म समाजाच्या मूळ तत्त्वांशी त्यांची बांधिलकी आयुष्यभर कायम राहिली.

‘मिशन’च्या कामासाठी स्वत: शिंदे, त्यांचे आईवडील व बहीण जनाक्का अस्पृश्य वस्तीत जाऊन राहिले. जनाक्का पनवेलच्या एका शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्या आपली नोकरी सोडून मिशनच्या कामासाठी मुंबईत आल्या. मिशनचे काम अनेक अर्थानी पथदर्शक होते.

आधुनिक भारताच्या इतिहासात अशा प्रकारचे हे पहिलेच काम होते. अनेक ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी मोफत शाळा, नोकरी करणाऱ्यांसाठी रात्रशाळा, धर्मार्थ दवाखाना, वाचनालय, ग्रंथालय, मुलांसाठी तालीम, महिलांसाठी शिवण वर्ग, धर्मशिक्षण व नीतिशिक्षण देणाऱ्या रविवारच्या शाळा, आजाऱ्यांची शुश्रूषा, बाळंतपणात मदत, व्यावसायिक शिक्षण अशा अनेक प्रकारांनी संस्थेचा व्याप वाढता राहिला. त्यासाठी शिंदे यांनी मदत मिळवण्याचे अनेक अभिनव उपक्रम व कल्पना राबवल्या. सयाजीरावांपासून मुंबईचे गव्हर्नर ते व्हाईसरॉयपर्यंत अनेकांपुढे त्यांनी झोळी पसरली.

अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा शास्त्रीय निकषांवर अभ्यास करणारे शिंदे हे पहिले संशोधक. याच सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व उभे राहत होते. अस्पृश्यांचा प्रश्न कसा सोडवायचा याबाबत दोघांच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक होता. शिंदे रानडे परंपरेतले म्हणजे उत्क्रांतीवादी होते, उलट आंबेडकरांना धार्मिक-सामाजिक क्रांतीशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असे ठामपणे वाटत होते. शिंदे अस्पृश्य समाजाच्या ‘बाहेर’चे होते, आंबेडकर ‘त्यांचे’ नेते होते. मतभिन्नता, प्रकृतिभिन्नता व सामाजिक स्थान यामुळे दोघांचे लढय़ाचे मार्ग भिन्न होत जाणार, हे अपरिहार्यच होते. स्वत:च स्थापन केलेल्या ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’चा १९२३ मध्ये शिंदे यांना त्याग करावा लागला. त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारा हा दुसरा टप्पा. यातनादायक शोकांतिकाच. मराठय़ांनी त्यांना ‘अस्पृश्य’मानले आणि आता अस्पृश्यांनीच त्यांना बहिष्कृत केले. वास्तविक केवळ शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर मुख्य प्रवाहात आला. डॉ. आंबेडकरांच्या जातिनिर्मूलनाच्या लढाईसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले, पण त्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही. समकालीन प्रस्थापित विचारव्यवस्थेने महात्मा फुले यांना जसे स्वीकारले नाही, तसेच महर्षी शिंदे यांनाही नाही. महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून शिंदे यांचे स्थान कळीचे आहे.

प्रार्थना समाजात असताना किंवा मिशन स्थापन केल्यानंतरही शिंदे राजकारण आणि राजकीय विचारांपासून कधी फटकून राहिले नाहीत. जहाल आणि मवाळांच्या भूमिकेत समन्वय साधीत राजकीय आणि सामाजिक या दोन्ही आघाडय़ांवर त्यांनी प्रागतिक भूमिका घेतली हे त्यांचे ठळक वैशिष्टय़. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ कमकुवत होते आहे असे दिसल्याने आणि त्यातून जातीय विद्वेष वाढीला लागल्याचे पाहून शिंदे यांनी जातीय व वर्गीय ऐक्याचे सूत्र मनाशी ठेवून ‘बहुजन’ही संकल्पना समाजमनात रुजवली. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात व इतर अनेक राज्यात याच भूमिकेवर आधारित ऐक्याचे राजकारण पुढे आले व जातीय राजकारणाला काही अंशी लगाम बसला. त्याचे प्रवर्तक शिंदे होते हे मात्र विस्मरणात गेले. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांना मोठय़ा प्रमाणात काँग्रेसमध्ये आणि पर्यायाने स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे श्रेयदेखील शिंदे यांचेच आहे. आर्थिक प्रश्नांवर शेतकऱ्यांचे लढे संघटित करून त्यांनाही मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कर्तृत्वही शिंदे यांचेच.

लेखन, वाचन, अभ्यास, संशोधन, व्याख्याने, प्रवास हे शिंदे यांचे समकालीनांपेक्षा ठोस वेगळेपण. देशात महाराष्ट्रात त्यांनी विस्तृत दौरे केले. अस्पृश्यता निवारणाच्या त्यांच्या कामाचा पाया म्हणजे १९०८ मध्ये त्यांनी लिहिलेला ‘बहिष्कृत भारत’ हा दीर्घ निबंध. पुढे तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. दलितांचे नेतृत्व १९२० नंतर डॉ. आंबेडकरांकडे गेल्यानंतरही शिंदे यांचा या विषयावरील अभ्यास सुरूच होता. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा या विषयावरील भारतातील पहिलाच संशोधनपर प्रबंध. शिंदे यांचे समग्र लेखन आता साहित्य संस्कृती मंडळाकडून संग्रहीत होत असून पहिले दोन खंड प्रकाशित झाले आहेत.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचा हा सारांश. त्यांच्या कार्याच्या प्रेरणा, त्याचे स्वरूप, त्याचे फलित, त्यातील संघर्ष याचे अवलोकन केले की त्यांना महर्षी किंवा कर्मवीर हे नामाभिधान का प्राप्त झाले असेल याची कल्पना करता येते. सुहास कुलकर्णी यांनी या पुस्तकात त्याचा फार साक्षेपाने वेध घेतला आहे. तत्कालीन राजकीय व सामाजिक प्रवाहांचे विश्लेषण केले आहे. शिंदे यांनी आपल्या परीने त्यात सकारात्मक बदल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. शिंदे यांना त्यांनी अंगीकारलेल्या कार्यात किती यश मिळाले किंवा टीकेचे धनी व्हावे लागले याचा तटस्थपणे उहापोह केला आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील शिंदे यांचे योगदान व त्यांची स्थाननिश्चिती करण्याच्या विद्वज्जनांच्या समकालीन चर्चाविश्वात या पुस्तकाने नवी ऊर्जा निर्माण होईल असे वाटते.

‘विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना’

– सुहास कुलकर्णी, समकालीन प्रकाशन

पृष्ठे- १७६, मूल्य- २०० रुपये