वडील शिक्षक. स्वभावाने नेमस्त. जन्मगाव पुणे हे तेव्हाही शहर या सदरात मोडणारं ठिकाण. अशा स्थितीत शिक्षकाच्या मुलीनं शिक्षणाऐवजी गाण्याच्या मागं लागणं, हे आश्चर्याचंच. डॉ. प्रभा अत्रे यांच्या बाबतीत हे अगदी असं घडलं. लहान वयात कुणालाही आवडेल एवढंच संगीत आवडणाऱ्या या मुलीनं पुढे आयुष्यभर संगीताच्या नादातच राहायचं ठरवलं; तेही आकस्मिक. पण नशीब असं बलवत्तर, की गुरू म्हणून साक्षात सुरेशबाबू माने यांच्यासारख्या बहुरूपी, प्रतिभावान कलावंताचं स्वरछत्र लाभलं. प्रभा अत्रे यांच्या आयुष्यात संगीत आलं आणि त्यानं त्यांचं आयुष्यच व्यापून टाकलं. कलावंताच्या सर्जनाचे म्हणून जे जे भोग असतात, त्यांना सामोरं जाताना प्रभाताईंनी मात्र आपली बुद्धी आणि प्रतिभा यांचा संगम घडवून आणला. गेली सहा दशके त्या भारतीय संगीतक्षेत्रात कलावंत म्हणून आपलं वेगळेपण सिद्ध करीत आहेत. संगीताची ही ऊर्मी आज वयाच्या ८२ व्या वर्षीसुद्धा जराही कमी झालेली नाही.
संगीत येणं ही वरवर फार सोपी गोष्ट वाटते. भारतासारख्या देशात संगीताने सारं जीवन व्यापून टाकलेलं असतानाही संगीताची- त्यातही अभिजात संगीताची कास धरणं आणि ती निभावणं हे फार कर्मकठीण. प्रभाताईंनी नेमस्तपणे या अभिजाततेला चिकटून राहायचं ठरवलं. याचं कारण त्यांनी बुद्धीनं केलेल्या विचारांना भावनेच्या वाटेनं जाऊ देण्याचा घेतलेला निर्णय. जेव्हा संगीत शिकणं ही फार अभिमानाची गोष्ट नव्हती अशा सामाजिक परिस्थितीत घरात कोणतीही संगीताची परंपरा नसताना प्रभाताईंनी हा निर्णय जाणीवपूर्वकच घेतला असणार यात शंका नाही. हेतुत: संगीत शिकायचं ठरवलं तरीही त्यात कलावंत म्हणून गती प्राप्त होईलच याची शाश्वती असणारा तो काळ नव्हता. पण प्रभाताईंनी स्वरांच्या सान्निध्यातच राहायचं ठरवलं. सुरेशबाबू माने यांच्याकडून त्यांना ज्या किराणा घराण्याची तालीम मिळाली, त्या घराण्यात स्वरांचं महत्त्व अधिक. स्वरांच्या छायेत निर्माण करता येणारी गर्द सावली कलावंताला आणि रसिकांना एकाच वेळी कमालीचा आनंद देणारी.
सुरेशबाबू हे तर अवलिया कलावंत. सुरेलपणा हीच ज्यांची खरीखुरी ओळख अशा खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य स्वकर्तृत्वानं कसं झळाळून काढता येतं, याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण. स्वत: खाँसाहेबांकडून काही काळ स्वरांची दीक्षा लाभलेल्या सुरेशबाबूंनी आपल्या अल्पायुष्यात संगीतात जी भरारी मारली ती कुणालाही हेवा वाटावी अशीच. कुटुंबात हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, कमळाबाई बडोदेकर यांच्यासारख्या थोर भगिनी आणि ताराबाई माने यांच्यासारख्या काळाची पावलं ओळखणाऱ्या मातोश्री. अशा स्थितीत सुरेशबाबूंकडून विद्या हस्तगत करणं हीही एक मोठीच परीक्षा होती. अनेक वाद्यांवर प्रभुत्व असलेले सुरेशबाबू हे उत्तम कलावंत होते. पण त्या काळातील समकालीन कलावंतांमध्ये त्यांची प्रतिभा विशेषत्वाने उठून दिसत असे ती त्यांच्या कलंदर स्वभावामुळे. मराठीतून त्यांनी सादर केलेल्या ठुमरींनी जसे रसिकांना वेड लावले होते, तसेच ‘प्रभात’च्या चित्रपटांना त्यांनी दिलेल्या संगीतानंही बहार उडवून दिली होती. प्रभाताई नशीबवान अशासाठी, की त्यांना सुरेशबाबूंनी आत्मीयतेनं कला दिली. नुसते राग शिकवण्यापेक्षा रागाकडे कसं पाहायचं, हे सांगितलं. कलेच्या प्रांतात सुंदरतेची जाण निर्माण होणं फार महत्त्वाचं असतं. सुरेशबाबूंनी ती प्रभाताईंच्या ठायी व्यक्त करण्याचा अवकाश निर्माण केला. रागसंगीताच्या महासागरात स्वरांमध्ये डुंबत राहून आलापीतून सौंदर्याचा आरस्पानी महाल उभारण्याची कला त्यामुळेच त्यांना साध्य झाली.
घराणेदार संगीताशी असलेली बांधिलकी ढळू न देता प्रभाताईंनी संगीताकडे अधिक डोळसपणे पाहायचं ठरवलं, याचं कारण त्यांच्याकडे असलेलं बौद्धिक सामथ्र्य. पण कोणत्याही अवस्थेत बुद्धीनं भावनेवर स्वार होता कामा नये याची काळजी घेत प्रभाताईंनी किराणा घराण्याची शैली अधिक उठावदार केली. सुरेशबाबूंच्या गायनाची फार थोडी ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत. पण त्यातूनही त्यांचं वेगळेपण ठाशीव आणि ताशीव स्वरांमुळे लक्षात राहतं. या घराण्याच्या हिराबाईंनी तर संगीताच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली. जेव्हा स्त्रीला जाहीरपणे संगीत सादर करण्याची मुभा नव्हती अशा काळात १९३० च्या दशकात हिराबाईंनी पहिल्यांदा संगीताच्या मैफलीत मध्यभागी बसून स्वरांचं शालीन आणि अभिजात दर्शन घडवलं होतं. एका अर्थानं महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या चळवळीचा हा स्पष्ट उद्गार होता. पण त्यामुळे संगीताबरोबरच सामाजिक पातळीवरही स्त्री-कलावंतांचं महत्त्व वाढू लागलं. हिराबाईंचं गाणं पौर्णिमेच्या मध्यरात्री पाझरणाऱ्या शांत, शीतल प्रकाशासारखं होतं. सुरेशबाबूंच्या आकस्मिक निधनानंतर प्रभाताईंनी हिराबाईंनाच आपलं गुरू केलं आणि त्याच शांत, शीतल संगीताचा वारसा पुढे नेला.
संगीतात कलावंताची प्रज्ञा आणि सर्जनशीलता यांचं दर्शन कोणत्या रीतीनं होतं, याला फार महत्त्व असतं. आपल्याला काय काय येतं, हे सांगण्याची धांदल उडणारे अनेक कलावंत आपण पाहत असतो. मिळवलेली कला सादर करताना मैफलीचं जे रसायन असतं, ते जमवण्याची क्षमता साध्य करणं आवश्यक असतं. प्रभाताईंना ते सहज साध्य झालं असं म्हणता येईल. पहिल्या स्वरापासून शेवटपर्यंत संगीत प्रवाही ठेवण्यासाठी विविध अलंकारांचा कुठे आणि किती उपयोग करायचा, याचे काही ठोकताळे असत नाहीत. कलावंतागणिक ते बदलत असतात आणि त्याच्या सृजनाचंच ते एक अविभाज्य अंग असतं. प्रभाताईंच्या मैफलीत हे सारे अलंकार त्यांचं गाणं अधिक श्रीमंत करताना दिसतात. तिथं संगीताचा विचार अतिशय रसपूर्णतेनं अशा काही रीतीनं समोर येऊन उभा ठाकतो, की ऐकणाऱ्यानं अचंबित होता होता तृप्त व्हावं. मैफली गाजवणं हे कलावंताच्या कलावंतपणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आवश्यक असतं. हे खरं असलं तरीही त्यापलीकडे संगीताच्या सागरात खोलवर जाण्यासाठी बौद्धिक तयारी करत राहावं लागतं. हे काम कंटाळवाणं नसतं; संगीताच्या गाभ्यापर्यंत जाण्यासाठी अत्यंत उपकारक असतं.
संगीतातील स्वत:चा वेगळा विचार परंपरेच्या मधात घोळवून मांडणं हे प्रभाताईंचं वेगळेपण. प्रत्येक गोष्ट आपण का करतो, याचं स्पष्टीकरण कोणताच रसिक मागत नसतो. पण आपल्यापाशी त्याचं समाधानकारक उत्तर असणं आवश्यक असतं. त्यामुळे आपल्या स्वरविचारांना बळकटी येते आणि आपलं म्हणणं अधिक उजळून निघतं. रागाची मांडणी करताना स्वरांची बढत करण्यासाठी आलापी, तान, बोलतान यांच्या बरोबरीनं सरगमचा उपयोग किती कलात्मक होऊ शकतो, याचा वस्तुपाठ प्रभाताईंनी घालून दिला. सरगम हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय. पीएच. डी.साठी त्यांनी सादर केलेला प्रबंधही याच विषयावरचा. पुस्तकी पद्धतीनं सरगम समजावून सांगणं आणि मैफलीत त्याचा सौंदर्यपूर्ण उपयोग करणं, या दोन्हीतील अंतर प्रभाताईंनी कमी करून दाखवलं. विज्ञान आणि विधी शाखेची पदवी असतानाही संगीताच्या वाटेला गेलेल्या प्रभाताईंनी लंडनच्या ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक’मध्येही अध्ययन केलं. हे केवळ ज्ञान संपादन करण्यासाठी मुळीच नसावं. कारण त्याचा जगण्याशी आणि कलेशी थेट संबंध जोडता येईल का, हे पाहणं त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं.
‘स्वरमयी’, ‘स्वराली’, ‘स्वरांगिनी’ आणि ‘स्वरंजनी’ ही त्यांची ग्रंथसंपदा त्यांच्या संगीतविचारांचे दर्शन घडवते. परंपरेनं चालत आलेल्या बंदिशींमधून व्यक्त करायचं काही राहून गेलं असावं, अशा हुरहुरीतून त्यांनी बंदिशी रचल्या. त्यामध्ये जसं सांगीतिक विचारांचं अधिष्ठान आहे, तसंच सौंदर्याची अनोखी जाणीवही आहे. केवळ शब्द बदलून नवी बंदिश तयार होत नाही. त्यासाठी रागाकडे पाहण्याची वेगळी नजर तयार व्हावी लागते. मजा म्हणून बंदिश रचणे हा छंद होऊ शकतो. परंतु बंदिश हा स्वरविचार असतो, हे लक्षात घेऊन आपलं वेगळं सांगणं कथन करण्यासाठी नवी बंदिश तयार करणं आवश्यक वाटल्याशिवाय ती परिपूर्ण होत नाही. प्रभाताईंना हे सारं शक्य झालं, कारण त्यांनी आयुष्यभर संगीताचाच विचार केला. एक उत्तम अध्यापक म्हणून विद्यापीठीय स्तरावर त्यांचा लौकिक झाला. त्या लौकिकाला प्रत्यक्ष मैफली संगीताने पारलौकिकाचा स्पर्श केला आणि त्यातून एका नव्या संगीतविचाराला चालना मिळाली. ‘स्वरमयी गुरुकुल’ ही त्यांची संकल्पना संगीत समजावून घेण्यासाठी उत्सुक नवोन्मेषी रसिक व कलावंतांसाठी पाठबळ देणारी ठरली आहे.
पुरस्काराने सन्मानित होणारे कलावंत वेगळे आणि पुरस्काराचीच उंची वाढवणारे कलावंत निराळे. प्रभाताई या दुसऱ्या गटातील आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा जीवनगौरव करण्यासाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देण्याने त्यांच्या कलेची उंची आणखी वाढली आहे यात शंका नाही.