29 March 2020

News Flash

नंदनवनाला पर्यटकांची प्रतीक्षा

सध्या पर्यटनासाठी वातावरण सकारात्मक होत असल्याचे काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद यांनी नमूद केले.

(संग्रहित छायाचित्र)

जेव्हा जम्मू आणि काश्मीर सरकारने गेल्या वर्षी दोन ऑगस्टला पर्यटकांना निर्देश देत लवकरात लवकर काश्मीर सोडण्यास सांगितले होते, त्यावेळी श्रीनगरमधील शोएब अहमद यांच्या हॉटेलमधील सर्व खोल्यांमध्ये पर्यटकांचे आरक्षण होते. सरकारच्या सूचनेनंतर त्यांच्या हॉटेलमधील सर्व पाहुणे खोरे सोडून परत गेले. तेव्हापासून शोएब व त्यांच्या कर्मचाऱ्यांची दुर्दशा सुरू झाली. परिस्थिती लवकरच सुधारेल असे तेव्हा त्यांना वाटले होते. मात्र, सरकारने पाच ऑगस्टला अनुच्छेद ३७० रद्द केले आणि तेव्हापासून आजपर्यंत तिथे  बंदसदृश्यच स्थिती आहे. पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसल्याचे शोएब यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना स्पष्ट केले. जेव्हा उत्पन्न नसेल तेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट्स कमी कराव्या लागल्या. माझ्या निम्म्या कर्मचारीवर्गाला मी घरी पाठवले असे त्यांनी सांगितले.

आज सहा महिन्यांनंतरही सगळ्या कर्मचाऱ्यांना शोएब यांनी श्रीनगरला बोलावलेले नाही. सध्या फारसे पर्यटक इथे येत नाहीत. मात्र, या वर्षी काश्मीरमध्ये पर्यटक येतील व परिस्थिती सुधारेल अशी आशा त्यांना आहे. काश्मीर खोऱ्यात पर्यटनाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांची शोएब यांच्याप्रमाणेच कथा-व्यथा आहे. केंद्र सरकारने पाच ऑगस्टला जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर खोऱ्यातील पर्यटनाला धक्का बसला आहे. आता या वर्षी तरी पर्यटक मोठय़ा संख्येने येतील अशी त्यांना आशा वाटते आहे. पाच ऑगस्टपूर्वी सरकारने पर्यटक तसेच अमरनाथ यात्रेकरूंना तातडीने काश्मीर खोरे सोडण्यास सांगितले होते. त्यामुळे खोऱ्यातील पर्यटनाशी संबंधित हजारो लोकांना इतर पोटापाण्याचे इतर पर्याय शोधावे लागले. आम्ही पर्यटनाशी संबंधित व्यक्तींना भेटतो आहोत. सध्या परिस्थिती पर्यटनासाठी तितकीशी अनुकूल नाही. सगळ्या बाबी अनुकूल झाल्या तर या हंगामात तीस ते पस्तीस टक्के पर्यटक येतील, असा आशावाद ट्रॅव्हल एजन्ट्स सोसायटी ऑफ काश्मीरचे अध्यक्ष मिर अन्वर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केला. या वर्षी पर्यटक काश्मीरला भेट देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र अद्यापि जशी इतर वेळी या हंगामात आरक्षणे होत असत, तशी यंदा झाली नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

काश्मीरमधील पर्यटनाचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर सरकारने पुढाकार घेऊन पावले टाकली पाहिजेत असे मत पर्यटन व्यावसायिक गुलाम नबी यांनी व्यक्त केले.  सहल आयोजक म्हणून अजून इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यांनी टू-जी मोबाइल इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली, हा खरे तर विनोदच आहे.

ही सेवा इतकी संथ आहे की त्यावर काम करणे कठीणच असल्याची भावना नबी यांनी बोलून दाखवली.

सध्या पर्यटनासाठी वातावरण सकारात्मक होत असल्याचे काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद यांनी नमूद केले. गेल्या वर्षी पर्यटनावर विपरीत परिणाम झाला. परिस्थिती सुधारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र , सध्याचे चित्र पाहता पर्यटकांकडून आगामी महिन्यांसाठी आरक्षणाबाबत विचारणा होणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या हंगामात अधिकाधिक पर्यटकांनी खोऱ्यात यावे यासाठी पर्यटन विभागाने पावले उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. नुकताच मुंबईत मी पर्यटनवृद्धी कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्याचे चांगले परिणाम दिसतील असे निसार यांनी सांगितले.

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गुलमर्ग येथे हिवाळा असो वा उन्हाळा- नेहमीच गर्दी असते. आताही पर्यटक वाढत आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिले काही महिने पर्यटकांनी गुलमर्गकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता गुलमर्गला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होते आहे. हिवाळा तसेच आगामी काही महिन्यांत आणखी पर्यटक येतील असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक जण सद्य:परिस्थितीबाबत अंदाज बांधत असल्याचे गुलमर्ग येथील हॉटेल मालक शबीर यांनी सांगितले. गेल्या वर्षी जे काही झाले त्याने पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे ते म्हणाले. सरकारचे पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे निर्देश तसेच राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली, की आम्हाला कर्मचारी कपात करावी लागली. आम्ही त्यांना पगार देऊ शकत नव्हतो. आता काय होते ते पाहू, परिस्थिती निवळली तरच पर्यटक येतील, अशी त्यांची भावना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 4:12 am

Web Title: waiting for tourists to paradise in jammu and kashmir abn 97
Next Stories
1 स्वप्नाचा कणाच मोडला..
2 सांगतो ऐका : अर्जेटिनामधील हस्तिनापूर
3 या मातीतील सूर : नाटय़संगीताचे भावपूर्ण वळण
Just Now!
X