रण तर तुफान माजलेले.
चारी दिशा गच्च सफेद धुराने भरून गेल्या होत्या. गनिम कोठून येतो, कोठून हल्ला करतो, काही समजत नव्हते. पण हा हल्ला नेहमीचा नव्हता. गनिमही नेहमीचा दिसत नव्हता.
lok13एरवीचा चट्टेरीपट्टेरी पैजमा, बिनबाह्याची बनियान, पिंजारलेले केस अन् झोपमोडी लाल डोळे असा तो गनिम.
रात्रीचे समयी मुदपाकखान्यातील मोरीतील भांडी स्वैपाक्याच्या ओटय़ावर पालथी पडली रे पडली, की गनिम उठायचा. दाराची खिटी सारायचा. खिडक्यांच्या फटी फडक्यांचे बोळे घालून बुजवायचा. अन् तांबारलेल्या डोळ्यांनी युद्धक्षेत्राचा मुआयना करून तो हळूच अगरबत्तीच्या हिरवट वाटोळ्या तोफेला बत्ती द्यायचा.
आधी असे नव्हते. दुश्मन लढायचा ते हातघाईने. युद्धशास्त्रात त्याला गरबा युद्ध म्हणतात म्हणे! कोण जाणे! आम्हांस मात्र ती अमित्राची आत्मघातकी लढाईच वाटे. स्वत:च्याच अंगावर पोतराजासारखा चापटय़ांचा चाबूक चालवायचा याला आत्मघातकी नाही म्हणणार तर दुसरे काय? त्यात आपले सैनिक शहीद होत नसत असे नाही. व्हायचे. चिरडून मरायचे. पण त्यात नेहमीच दमछाक व्हायची ती गनिमाची.
त्यानंतर कधीतरी त्याने या धूम्रतोफा आणल्या.
त्या धूम्रयुद्धाच्या पहिल्या दिवसाची ऐतिहासिक वर्णने आजही अंगावर शहारा आणतात.   
 
नेहमीप्रमाणे रात्र झाली होती. झीरोच्या बल्बच्या उजेडाने वातावरणात निळाई पसरली होती. आता सोलापुरी चादरीचे चिलखत आपादमस्तक लेवून वैरी पडणार. त्याबरोबर आपल्या फौजांनी चारी दिशांनी गुणगुण करीत त्याच्यावर हल्ला चढवायचा असा बेत आपले सेनापती आखतच होते. सांदीकोपऱ्यांत आपल्या तुकडय़ा इशारतीची वाट पाहत बसल्या होत्या. इतक्यात शत्रूने माचिसची काडी पेटवली. स्टीलच्या स्टँडवर वाटोळी तोफ चढवली आणि तिला बत्ती दिली. कोणाला काही कळायच्या आतच धुराची वलये उठली. आपले सैनिक धडाधड कोसळू लागले. सेनापतींनी ‘मागे फिरा’ असे आदेश देईपर्यंत किती बांगडी फुटली, किती मोती गळाले आणि किती मोहरा हरवल्या याची गणती नाही.     
गंमत म्हणजे आता त्या तोफांचे, त्या सोंडेतले केस जाळणाऱ्या उग्र दर्पाचेही काही वाटेनासे झाले आहे. आमचे काही बिलंदर जवान तर सरळ सरळ त्या पेटलेल्या तोफांवरच जाऊन बसतात. त्या वासाने कसे धुंदफुंद झाल्यासारखे वाटते म्हणतात!
यावर उपाय म्हणून मध्यंतरी गनिमाने वेगळाच डाव आखला. म्हणजे आपल्याला वाटावे की गनिमाला वेड लागलेय. रात्रीच्या वेळी अंथरूणात बॅडमिंटन खेळतोय. पण तो त्याचा गनिमी कावा होता. आपल्या चपळ डेंगीसेनेला उत्तर म्हणून त्याने हे बॅटचे अस्त्र आणले होते.
पण त्याला हे माहीत नव्हते की, काळ आपल्या बाजूला होता. संपूर्ण रात्र आपलीच होती आणि त्याच्यात रात्र जागवण्याची ताकद नव्हती. अखेर रोजची लढाई आपणच जिंकणार होतो.
त्या दिवशीचा हल्ला मात्र सर्वस्वी वेगळा होता.
संपूर्ण मैदानात धूम्रधुक्याचा दाट पडदा पसरलेला होता. डोळ्यांत बोट घातले तरी समोरचे दिसत नव्हते. डोळे चुरचुरत होते. सोंडेवर कडवट चव साठलेली होती. पोटातले रक्त डुचमळत होते.
असा काही काळ गेला. अचानक तोंडावर हिरव्या पट्टय़ा बांधलेल्या त्या खाकी रिपुने पाठीवरली नळकांडी सावरली आणि पुढच्या क्षणी चारी दिशांनी तीव्र रसायनांचे फवारे उडू लागले.
आपल्या सैन्याला पंखाची फडफड करण्यासही वेळ मिळाला नाही. जागच्या जागी सगळे मारले गेले. लहान-थोर, बाया-बापडे, एवढेच नव्हे तर अजून पंखही न फुटलेल्या निष्पाप अळ्याही तडफडून तडफडून मेल्या. शेकडोंचे शिरकाण झाले. अख्खी छावणी गारद झाली.    
हे सांगायला आम्ही उरलो ते केवळ नशिबाने.
एखाद्या मारेकऱ्याप्रमाणे चेहरा झाकून आलेल्या एका दुष्ट अरातिच्या सैल तुमानीत ऐनवेळी आम्ही सूर मारला नसता तर जगाला या कत्तलीची खबर द्यायलाही कोणी शिल्लक राहिले नसते.
विपक्षीने रासायनिक अस्त्रे वापरली. हेग कराराचा भंग केला.
तुम्हांस सांगतो, जोवर या पंखांमध्ये त्राण आहे आणि सोंडेत प्राण आहे, तोवर आम्ही लढणार.
थेट नाही तर छुपेपणाने; पण लढणार..
दुश्मनाची सारी रासायनिक अस्त्रे पचवून लढणार!
०००
असे म्हणतात की, त्यानंतर एडिस एजिप्तीच्या फौजेने आपली गुणसूत्रे बदलली. छुपे दहशतवादी युद्ध सुरू केले. बातम्या अशाही आहेत, की काही माणसेसुद्धा त्यांना फितूर झाली आहेत.
कोणी फेंगशुईच्या बांबूंमधून, कोणी फुलदाण्यांतून, कोणी घराबाहेरच्या डबक्यांतून, कोणी टेरेसवरच्या टमरेलांतून एडिस एजिप्तीच्या दहशतवाद्यांना आसरा दिला आहे.
आता हे युद्ध माणसाच्याही हाताबाहेर गेले आहे..