पुल मागे एकदा म्हणाले होते, ‘‘पुढे होऊन वाकून पाया पडावे असे पायच हल्ली दिसत नाहीत!’’ आज पुल नाहीत. पण असते तर, पुढे होऊन वाकून पाया पडणाऱ्यांची फलटण त्यांना दिसली असती. त्यात सध्याच्या निवडणुकीच्या हंगामात तर अशा अडल्या हरींची संख्या कितीतरी!
स्मरणरंजनावरच आपलं संपूर्ण साहित्य निर्माण करणाऱ्या पुलंना नव्याचं कौतुक होतं; पण जुन्याचा गहिवर जरा जास्तच होता. त्यामुळे त्यांना वाकून नमस्कार करण्यायोग्य पाय अस्तंगत होत चालल्याचं दु:खं होणं स्वाभाविक होतं.
जगरहाटी नावाची गोष्ट ना पुलंसाठी थांबत, ना नमस्कारयोग्य पायांसाठी. ती आपले नवनवे पर्याय तयार करीत असते. तसं नसतं तर प. बंगालच्या मुख्यमंत्री आधुनिक दुर्गावतार ममता बॅनर्जी यांना १२० कोटींच्या भारतात राळेगणसिद्धी नामक ग्रामे वसतीस असलेल्या अण्णा हजारेंचे पाय दिसलेच नसते! आज प्रत्येक राजकीय पक्ष, त्यांचे पक्षप्रमुख नव्या-जुन्या भिडूच्या शोधात असताना ममतादीदीने शोधले अण्णा हजारे!
अण्णा हजारे हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. हल्ली असा एकही पुरस्कार नसेल- जो अण्णांना मिळाला नसेल. मध्यंतरी राळेगणच्या ग्रामस्थांनी अण्णांच्या उपस्थितीतच त्यांना ‘महात्मा’ पदवी द्यावी असा प्रस्ताव मांडला होता. अण्णा आता थेट महात्माच होणार म्हणून सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ वगैरे देऊन अपमान करू नये यास्तव तसा प्रस्तावच तयार केला नाही. त्यातली दुसरी अडचण अशी की, सगळे राजकारणी, पक्ष, सरकारे चोर, लुटेरे, भ्रष्टाचारी असल्याने अगदी राष्ट्रपतींच्या हस्तेही ‘भारतरत्न’ स्वीकारायला त्यांनी नकार दिला असता. मग प्रोटोकॉलप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अण्णांचं मन वळवायला गेले असते. तेव्हा मग अण्णांनी ‘‘भारतरत्न’ स्वीकारेन; पण मला मंजूर अशा लोकपालाकडून!’ अशी मागणी केली असती! एका व्यक्तीला ‘भारतरत्न’ देण्यासाठी लोकपाल नियुक्त करणं सरकारला परवडलं नसतं. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला.
असं म्हणतात- एकदा तोंडाला ‘मेकअप’ लावला, की मरेपर्यंत त्याला रंगभूमी खुणावत राहते. एकदा का त्या रंगाची चटक म्हणा, नशा म्हणा- लागली, की ती सुटता सुटत नाही. ती आतून धडका मारतच राहते. तसं हल्ली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत किंवा न्यूज चॅनेलच्या ‘बाइट’मध्ये राहण्याची चटक लागलीय. ही नशा चढली की मग आपल्यावरचा प्रकाशझोत जरा जरी दूर झाला, तरी त्यांची अस्वस्थता वाढते. आणि दुर्दैवाने अण्णांसारखा प्रस्तावित महात्माही याला अपवाद नाही!
राळेगणसिद्धी नामक गावात अण्णांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावात स्वावलंबन आणि सरकारी योजना यांचा समन्वय करून राळेगणला आदर्श गाव केले. अण्णांचा हा प्रयोग कर्णोपकर्णी झाला. अनेक सरपंच, ग्रामस्थ यांनी भेटी देऊन हा प्रयोग आपापल्या गावी केला. अण्णांच्या आधीही असे प्रयोग अनेकांनी केले. अनेक सवरेदयी, गांधीवादी कार्यकर्त्यांपासून ते नानाजी देशमुख ते प्रयोग परिवारचे दाभोळकर ते अगदी अलीकडचे हिवरे बाजारचे पोपटराव पवार, तिकडे गडचिरोली, चंद्रपुरात ‘आमच्या गावात आमचे सरकार’ अशी आंदोलनेही यशस्वी झालीत. थोडक्यात, ‘राळेगण’ हे आदर्श गाव असलं तरी ते ‘एकमेव’ नाही. अण्णांसारखे त्या- त्या ठिकाणी नेतृत्वही आहे, पण त्यांना प्रसिद्धीचा वारा लागलेला नाही, किंवा त्यांनी तो लावून घेतला नाही.
अण्णांचा प्रसिद्धीशी संबंध आला तो सरकारी योजनांतून पैसा मिळवताना त्यांच्या लक्षात आलेल्या त्या- त्या खात्यातील भ्रष्टाचारामुळे. या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि अण्णा रातोरात महाराष्ट्रभर पोहोचले. त्यानंतर अण्णांचे ग्रामविकासाचे ध्यासपर्व संपले आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन, उपोषण करून संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेणे- याचे प्रसिद्धीपर्व सुरू झाले. यात प्रथम ‘युती’ सरकारचे काही मंत्री गेले, नंतर ‘आघाडी’ सरकारमधले काही मंत्री गेले.
भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला आव्हान देणारा कुणीतरी सच्छिल गांधीवादी पुढे आला म्हणून अण्णांना सर्व महाराष्ट्रातून पािठबा मिळू लागला. बाबा आढाव, कुमार सप्तर्षि, अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा, अविनाश धर्माधिकारी, विजय कुवळेकरांसारखे पत्रकार.. यादी मोठी होती. सडलेल्या राजकीय व्यवस्थेला जनआंदोलनाने ताळय़ावर आणता येईल, या उद्देशाने या सर्व मंडळींनी आपली पत, अनुभव, पक्ष, संघटना बाजूला ठेवून अण्णांचे नेतृत्व स्वीकारले. खरे तर यापैकी अनेकांचा जनआंदोलनांतला अनुभव, वकूब आणि समस्यांची समज, अभ्यास अण्णांपेक्षा अधिक होता. तरीही अण्णांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले होते. पण अण्णांना हा भार पेलला नाही. अण्णांना समजावणे कठीण होऊ लागले. समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी ‘कर आरोप, माग राजीनामा’ हे सत्र सुरू झाले. परिणामत: विचारपूर्वक आंदोलन चालवण्याचा आग्रह धरणारे हळूहळू या आंदोलनापासून दूर झाले. आणि अण्णांचे ‘एकला चलो रे’ हे वेगळय़ा अर्थाने चालू राहिले. परवाच्या लोकपाल आंदोलनापर्यंत ते ‘हम करे सो कायदा’ या प्रवृत्तीपर्यंत बदलत गेले.
हळूहळू अण्णांनी आरोप करायचे, वर्तमानपत्रांचे मथळे व्यापायचे, वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढवायचा, विरोधी पक्षांनी सरकारला घेरायचे, सरकारने प्रतिनिधी पाठवायचा, तहाची कलमे तयार केली जायची, आणि मग ल्िंाबू सरबताच्या फोटोने सगळय़ाची इतिश्री.. हा घटनाक्रम सगळय़ांनाच पाठ झाला. प्रत्येक वेळी अण्णा ‘आमरण’ उपोषण करायचे. मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध व्हायचे. पण गोष्टी पुढे जाण्याआधीच लिंबू सरबताची व्यवस्था व्हायची. अण्णांच्या ‘आमरण उपोषणा’च्या घोषणेला ऐकून पुढे पुढे लिंबू सरबतही मनातल्या मनात म्हणत असावे- ‘एक बुंद निंबू की ताकद तुम क्या जानो अन्नाजी!’
पुढे तर असे ऐकू येऊ लागले, की अंतर्गत राजकीय कुरघोडीसाठी राजकीय नेतेच एकमेकांच्या फायली अण्णांकडे पाठवू लागलेत. आणि मग अण्णाही आली फाइल, की घे पत्रकार परिषद, कर आरोप आणि बसा उपोषणाला.. अशा सिलॅबसप्रमाणे आंदोलन करू लागले. या उतावळेपणातून बबनराव घोलपांसारख्या नेत्याने अण्णांना अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली कोर्टात खेचून थेट ‘जेल’चा रस्ता दाखवला. तर सुरेश जैन यांच्या विरोधात अण्णांनी तक्रार केल्यावर जैन यांनी अण्णांच्याच संस्थांतील गैरकारभार पुराव्यानिशी बाहेर काढला. अण्णांनी ते थोडे कार्यकर्त्यांवर, तर थोडे ‘अनियमितता’ असे म्हणून आपले अंग काढून घेतले. त्यातून एक समीकरण तयार झाले : अण्णांकडून काही गफलत झाली तर ती ‘अनियमितता’, पण राजकारण्यांकडून झाली तर ‘भ्रष्टाचार’!
या सर्व प्रवासामुळे अण्णांची धार कमी झाली. ते पहिल्या पानावरून आतल्या पानावर गेले. पण अण्णांचा हा प्रसिद्धी वनवास फार काळ लांबला नाही. कोणी एक केजरीवाल किरण बेदी वगैरेंसह अण्णांकडे आले. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर सशक्त लोकपाल हवा, त्यासाठी जनआंदोलन हवे. पण ते यादवबाबा मंदिरात नाही, तर दिल्लीत जंतरमंतरवर. महाराष्ट्राऐवजी भारत भ्रष्टाचारमुक्त- तेही लोकपालने. आणि तो लोकपाल आणायला लावायचा आपण! या नव्या मुलांमुळे अण्णा उत्साहात आले. पुढचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. त्या काळात अण्णा म्हणजे महात्मा गांधी, केजरीवाल म्हणजे महादेवभाई व किरण बेदी म्हणजे मीराबेन असेच चित्र उभे राहिले होते. राजकारण्यांना शेलक्या शब्दांत हिणवले जात होते. राजकारण, राजकीय पक्ष यांना क्रूर खलनायक ठरवून त्यांचा खातमा करायचाच, असा आवेश होता. अण्णांचे उपोषण व इतर नेते व कार्यकर्त्यांसाठी अखंड ‘रसोई’- असे हे अभूतपूर्व आंदोलन होते. पुढे केजरीवालांनी सरकारला भरायचे राहिलेले पैसे भरून स्वत:ची ‘अनियमितता’ दूर केली. तर किरण बेदींनी हवाई भाडे घेऊन रेल्वेप्रवास केल्याच्या दु:खद प्रवासवर्णनांचा खुलासाही केला.
पुढे अण्णांना मुंबई फ्लॉप शो मार्गे राळेगणला पाठवून केजरीवाल आम आदमी पार्टी स्थापून भारतीय राजकारणातले डावीकडून तिसरे झाले. किरण बेदी केजरीवालांना सोडून अण्णांना धरून होत्या. शेवटी त्यांचाही धीर सुटून त्या मोदीप्रणीत भाजपात सामील होण्याचे संकेत देत आहेत. अशा पद्धतीने हे ‘पोस्ट मॉडर्न गांधीपर्व’ संपले.
पण असे म्हणतात, गांधींना कितीही मारा, ते मरत नाहीत. तसं झालं, आणि ममता बॅॅनर्जीनी अण्णांच्या अठरा कलमांना मान्यता दिली. ममता या केजरीवालांच्या स्त्री-अवतार आहेत. फक्त त्या केजरीवालांसारखं डोईवरून मफलर घेत खोकत बोलत नाहीत. पण मुख्यमंत्री असताना पोलीस स्टेशनात जाणे, कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात मारून पुन्हा त्याला जवळ घेणे, भाववाढ केली म्हणून केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणे, टाटांना पिटाळून लावणे, तृणमूल कार्यकर्त्यांची दहशत पसरवणे, बंगला- गाडी न वापरणे- असे अनेक ‘केजरीवाल डीएनए’ त्यांच्यात त्या काँग्रेसमध्ये होत्या तेव्हापासून आहेत.
अण्णांच्या लक्षात आले, ममता तर केजरीवाल पर्वाची जननी आहे. पुन्हा ती साधी, सरळ, निरलस आणि मुख्य म्हणजे पंतप्रधानपदाला योग्य उमेदवार आहे! तिबेटमध्ये ‘लामा’ची निवड करायचे संकेत मिळतात, मग त्या संकेतानुसार त्या मुलाचा शोध घेतला जातो व पुढे त्याला विधीवत ‘लामा’ केले जाते. हे तिबेटी संकेतज्ञान यादवबाबा मंदिरात अण्णांना प्राप्त झाले असावे. आणि देशाचा पंतप्रधान शोधत ते थेट प. बंगालमध्ये पोहोचले! ममताजींनी पण कोलकाताऐवजी भर दिल्लीच्या रस्त्यात अण्णांचे पाय धरले, आशीर्वाद घेतला. ‘जो आपल्या पायाशी, त्याला घे डोक्याशी’ या अण्णा-वचनाचा लगेच प्रत्यय आला आणि मोदी वि. राहुल गांधी यांच्यामध्ये ‘अण्णा सर्टिफाय’ ममता दाखल झाल्या! ममतांनी वेळ साधून अण्णांवर गवताची कांडी फिरवली! आता ममतांचे उत्तर भारत व पश्चिम भारतातील उमेदवार अण्णाच निवडणार. त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या कुणीही ‘अण्णा-स्नाना’त सहभागी व्हावे, उमेदवारी मिळवावी, निवडणूक लढवावी. काय माहीत, तुम्ही पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी असाल; पण अण्णांच्या आशीर्वादाने वाल्मीकी व्हाल. त्यामुळे ‘दागी’ लोकांनो, चिंता नको. व्हा पुढे, अन्ना है ना!
शेवटची सरळ रेघ : पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना खासदार व्हायचंय. त्यासाठी कुठलाही पक्ष ते अपक्ष अशी त्यांची तयारी आहे. खासदार का व्हायचंय, याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे- त्यांना घरांच्या किमती कमी करायच्यात! याच तत्त्वाला धरून उद्या एखादा मिठाईवाला म्हणाला की, मला मिठाईचे दर कमी करण्यासाठी साखर कारखाना काढायचाय, तर तेही आपण ‘गोड’ मानून घ्यायला हवे!