हायटेक युगात अशा सतराशे साठ गोष्टींशी गाठ पडते- ज्या चमत्कारच वाटाव्यात! हे इंजिनीअरांनाच कळणार, आपल्याला सुधरणार नाही असे वाटून ‘आत काहीही का असेना; आपण कशाला त्यात पडा?’ म्हणून आपण सोडून  देतो. खरं तर ते फारसे कठीण नाही. त्यातले गणित आणि सूक्ष्म तपशील जरी lok02किचकट असले तरी मुख्य ‘आयडियाची कल्पना’ काय आहे, हे कोणालाही कळू शकते. कोणतेही उपकरण कितीही हायटेक असले तरी त्यात साधी साधी तत्त्वेच एकत्र गुंफलेली असतात. मुख्य तत्त्व एखादेच असते. तेवढे कळले तरी त्या उपकरणाविषयी रहस्याची भावना उरत नाही आणि ते हाताळताना भीती वाटत नाही. प्रत्येक आकलन हे व्यावसायिक कारणासाठीच व्हायला हवे असे काही नाही. उकल होऊ शकते आहे, उलगडा होतो आहे, मुलांनी विचारले तर थोडक्यात सांगता येते आहे, कोणीही आपल्या तोंडावर चार इंग्लिश संज्ञा फेकून आपल्याला गप्प करू शकत नाहीये, यामुळे एकुणात माणसाचा आत्मविश्वास वाढतो. एवढी सर्व प्रगती का शक्य झाली हे समजल्याने आपला माणसाविषयीचा आदर वाढतो. थोर व्यक्ती थोर आहेत एवढेच ऐकून माहीत असणे आणि त्यांची थोरवी नेमकी कशात आहे हे सांगता येणे, याने मोठा फरक पडतो.  गरज ही शोधाची जननी असते (आणि आळस हा जनक!) हे जरी काही अंशी खरे असले तरी साधी जिज्ञासादेखील एक स्वमूल्य असलेली गोष्ट आहे. कुतूहल प्रत्येक प्राणिमात्राला असतेच. पण जेव्हा जिज्ञासा उत्पन्न होते, तेव्हा माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा होतो. उलगडा होईपर्यंत अस्वस्थ राहणारी मनेच आजच्या समस्यांना भिडण्याचे धाडस करू शकतात. एखादी गोष्ट कळून काय उपयोग? असा प्रश्न विचारण्याऐवजी ती जेव्हा कळते तेव्हा त्या कळण्याच्या प्रक्रियेत जो आनंद असतो, तो आनंद घेण्याची चव चाखून पाहिलीच पाहिजे. इतर काही ईप्सित असो-नसो, अमक्याचं ‘इंगित’ काय आहे, यात रस असण्याने ‘जिज्ञासा-रस’ नावाच्या रसाचा शोध लागतो. हा शोध लागणे आणि आपण रोज वापरत असलेल्या यांत्रिक गोष्टी कशा चालतात याची कल्पना येणे, या हेतूनेच या लेखमालेचा उपद्व्याप करणार  आहोत.
या लेखमालेत आपल्याला माहीत असलेल्या रोजच्या वापरातल्या विविध यांत्रिक साधनांमागचे तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. उदाहरणार्थ ‘व्हॉल्व्ह’ वा ‘झडप’ म्हणजे काय? अगदी मिठागराचा खड्डा हीसुद्धा झडपच आहे. भरतीचे पाणी त्यात अडकते. प्रवाह एका दिशेने जाईल, पण उलट दिशेने अडवला जाईल, असे केले की प्राथमिक ‘झडप’ होते. नावेची शिडे फुलवण्याला वा मिटवण्याला जितकी शक्ती लागते, त्यापेक्षा कितीतरी मोठी शक्ती शिडात झेलली जाऊन आपल्या उपयोगाला येते. ‘अँप्लिफायर’ नावाने जी रचना ओळखली जाते ती ‘छोटय़ा ऊर्जेने मोठी ऊर्जा वळवणे’ याच तत्त्वावर चालते. भिरभिरे-पवनचक्की-टर्बाइन अशी साम्ये जर आपण बघू शकलो तर बऱ्याच तत्त्वांची उदाहरणे आपल्याला परिचित आहेत हे लक्षात येईल. तारा किंवा पाईप बनवण्याचे एक तंत्र ‘एक्स्ट्रजन’ म्हणून ओळखले जाते. चकल्या, शेव वगरे करण्याच्या सोऱ्यात जे घडते, तेच एक्स्ट्रजन असते. शाळेत असताना गोफण आणि सेन्ट्रिफ्युगल फोर्स ही उदाहरणे आपण शिकलेलो असतो. इंधन आणि स्फोटके यांत फरक काय? जेव्हा इंधनासोबत अंगचा ऑक्सिजन असतो, पण तो इंधनाला भेटू दिला जात नसतो, असे मिश्रण म्हणजे स्फोटके! अशी उदाहरणे बघत बघत आपण अनेक तंत्रांचे मर्म जाणून घेऊ शकतो.
आपण एखादे उपकरण समजावून घेतो तेव्हा त्यानिमित्ताने आपल्याला अनेक सामान्य तत्त्वेही जाणवू लागतात. कोणतेही एक उपकरण फक्त एकाच तत्त्वावर चालत नसते. तरीही त्याचे मध्यवर्ती असे तत्त्व असतेच. निरनिराळी द्रव्ये, विविध ऊर्जाप्रकार तसेच वेगवेगळे आकृतिबंध सापडत आजवरची तांत्रिक प्रगती झालेली आहे. एका क्षेत्रातले आकृतिबंध अगदी वेगळ्याच क्षेत्रात लागू करता येणे, ही मानवाची खासियत आहे. ती समजावी या दृष्टीने आज प्रचलित असणाऱ्या अनेक उपकरणांच्या व तंत्रांच्या इंगितांची ओळख या सदरात आपण करून घेणार आहोत.
 दीपक देवधर – dpdeodhar@gmail.com