News Flash

गणेशखिंड व्हाया अहमदनगर

‘अ शी पाखरे येती’ नाटकाच्या तालमी अंदाजे सप्टेंबरमध्ये सुरू होणार होत्या, हे जून ७० मध्ये ठरलं. पण दरम्यान त्याच वर्षी मला एम. एस्सी.ला

| July 19, 2015 01:40 am

alekar‘अ शी पाखरे येती’ नाटकाच्या तालमी अंदाजे सप्टेंबरमध्ये सुरू होणार होत्या, हे जून ७० मध्ये ठरलं. पण दरम्यान त्याच वर्षी मला एम. एस्सी.ला अ‍ॅडमिशन मिळाली ती पुणे विद्यापीठात न मिळता अहमदनगर कॉलेजच्या नव्याने निघालेल्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये. त्यावेळच्या नियमाप्रमाणे मेरिटनुसार पहिले २० विद्यार्थी पुणे विद्यापीठात आणि उरलेले अहमदनगर कॉलेजमध्ये. आमचा नंबर नेमका २० नंतर लागलेला. म्हणजे आता पुणं सोडून नगरला जावं लागणार. अहमदनगर कॉलेज हे १९४७ मध्ये डॉ. बी. पी. हिवाळे यांनी स्थापन केलेलं, ‘अमेरिकन मराठी मिशन’ या १८१३ पासून मुंबईत असलेल्या ख्रिश्चन संस्थेचं भव्य कॉलेज. प्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल याच कॉलेजमध्ये आधी विद्यार्थी आणि नंतर इंग्रजीचे प्राध्यापक झाले होते. राज्य नाटय़स्पर्धेत त्यांच्या ‘काळे बेट, लाल बत्ती’ नाटकाला लाभलेल्या लोकप्रियतेनंतर त्यांनी ही प्राध्यापकी नोकरी सोडून व्यावसायिक अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता. कॉलेजचा खूप मोठा ३२ एकरांचा परिसर. त्यात नवीन निघालेलं, अद्ययावत प्रयोगशाळा असलेलं बायोकेमिस्ट्री हे डिपार्टमेंट.
तेव्हा आता मला पुणं सोडून जावं लागणार, हे नक्की झालं. म्हणजे आमचं नाटक बोंबललं. ७० च्या जूनमध्ये हा पुणं सोडण्याचा प्रसंग आला. तेव्हाच नेमका माझा धाकटा मामा पुण्यात सुट्टीवर आला होता. तो आर्मीत गुरखा रेजिमेंटमध्ये मेजर होता. त्याचं नाव रामकृष्ण; पण आम्ही त्याला ‘बाळमामा’ म्हणायचो. का कोण जाणे, पण मी होस्टेलवर जाणार, याची तयारी करण्याची सर्व जबाबदारी त्यानं स्वत:वर घेतली आणि नगरच्या चांदबीबी किल्ल्यावर शनवार पेठेतून एखादी मोहीम निघणार असं वातावरण बाळमामामुळे वाडय़ात तयार झालं. प्रथम सैनिक नेतात तशी एक जड आणि अजस्र अशी जाड पत्र्याची ट्रंक त्याने माझ्या हवाली केली आणि म्हणाला, ‘‘यात तुझे सगळे सामान बसेल. हीच घेऊन जायची.’’ त्या काळ्या ट्रंकेवर पांढऱ्या अक्षरात ‘मेजर आर. एन. गाडगीळ’ असे ठळक पेंट केलेले होते. मी बाळमामाला सांगण्याचा प्रयत्न केला, की ही ट्रंक फार जड आहे. गाडगीळ वाडय़ातून आळेकर वाडय़ापर्यंत ती कशी न्यावी, असा खरं तर प्रश्न आहे. पण  माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत एकदम ट्रंक उचलत तो म्हणाला, ‘चल..’ मी काही म्हणेपर्यंत मामा ट्रंक खांद्यावर घेऊन वेगे वेगे निघालासुद्धा! त्याच्या एका खांद्यावर ट्रंक, दुसऱ्या हातात सिगारेट- असा तो पुढे आणि मी त्याच्या मागे ‘वन टू’ करत आमचा गाडगीळ वाडा ते आळेकर वाडा प्रवास सुरूहोऊन संपलासुद्धा. याच पद्धतीने त्याने नंतर एक गादीपण अशीच आणून दिली. त्याला काही सांगण्याचा उपयोग होत नसे. या योग्य वस्तू आहेत आणि मी त्याच नेल्या पाहिजेत. विरोध केला की तो सरळ सरळ खेकसत असे. तो एक वल्लीच होता. त्याचे मित्र त्याला ‘बंब्या’ म्हणायचे. वरकरणी तो अत्यंत रागीट आणि तिरसट वाटायचा. अस्वस्थ असायचा. पण होता खूप प्रेमळ. त्याच्या डोक्यात नेहमी अचाट प्लॅन्स असायचे. गुरखा रेजिमेंटमध्ये असल्याने त्याला गुरखाली बोली उत्तम यायची. त्याचा आवाज बरा होता. लहर आली की तो गुरखाली भाषेतली गाणी मोठय़ांदा म्हणायचा. त्यांच्या अनेक लोककथा त्याला पाठ होत्या. कांचा आणि कांची यांचे गुरखाली भाषेतले सवाल-जबाब चालीत म्हणून त्याचा अर्थही तो सांगायचा. पण सगळी लहर असायची. आर्मी सुटल्यावर त्याने अनेक उद्योग केले. ‘डॉल्फिन्स’ या नावानं कोल्हापूरला धाबा चालवला. जवानांच्या करमणुकीसाठी कॉमिक्स काढली. त्यात सैनिकांच्या शौर्यकथा असायच्या. ही कॉमिक्स छापण्यासाठी ऑफसेट प्रेस काढली. नंतर हे सगळे उद्योग बंद करून ‘फॉगिंग मशिन्स’- म्हणजे कीटकनाशके फवारण्याची यंत्रे तयार करण्याचा ‘विनीत इंजिनीअर्स’ नावाने कारखाना काढला आणि त्यात मात्र तो स्थिरावला. कमालीचा यशस्वी झाला. त्याची ही मशिन्स आज देशात, देशाबाहेर सर्वत्र जातात. वारीला तो नियमित जात असे. वारीत माजी सैनिकांची दिंडी असावी असा त्याचा प्रयत्न होता. त्याचं वाचन खूप होतं. श्री. म. माटे यांच्या ‘बन्सीधरा, आता तू कोठे रे जाशील?’ अशा कथांवर दूरदर्शन मालिका काढावी असं त्याला वाटत असे. मधेच एकदा त्याने शिरूर मतदारसंघातून माजी सैनिक प्रतिनिधी म्हणून लोकसभेची निवडणूकही लढवली. सैन्यातील भ्रष्टाचाराचा त्याला खूप राग यायचा. जवानांचे राहणीमान उंचावले पाहिजे यासाठी त्याचा सतत पत्रव्यवहार चालू असे. सुदैवानं त्याच्या या अस्वस्थ व्यक्तिमत्त्वाला योग्य कोंदणात ठेवणारी बायको- आमची शुभामामी त्याला लाभली आणि सगळं निभावलं. एका घराच्या म्यानात आधीच दोन जड तलवारी! एक आमचे आजोबा काकासाहेब गाडगीळ आणि पुढच्या पिढीत मोठा मामा विठ्ठल! या दोघांच्या छायेत त्याची अस्वस्थ ऊठबस झाली आणि २००५ मध्ये तो अचानक गेलाच.     

..तर ट्रंक आणि गादी. प्रत्यक्ष नगरला जाण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा माझ्या लक्षात आलं, की घरातली सगळी त्या ट्रंकेच्याच बाजूची आहेत. सामान रिक्षात बसेना. मग नारायण पेठेतून टांगा आणला. त्यात पुढे टांगेवाल्याशेजारी मी, मागे ट्रंक आणि वळकटी बांधलेली एक भव्य गादी. पुढे मोटारसायकलवर बाळमामा मला स्टँडवर पोचवायला आणि मागे आमचा टांगा. टांगेवाला मधूनच त्याच्या नकळत समोरच्या मामाच्या मोटारसायकलचा ‘नया दौर’ टाईप पाठलाग करू बघायचा आणि ट्रंक गदगदा हलायची. शेवटी धीर करून टांगेवाल्याला ‘धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी’ या उक्तीप्रमाणे सौम्य शब्दांत झापला. कारण शेवटी पुण्याचा टांगेवाला! आलं त्याच्या मनात आणि ठेवली ट्रंक खाली उतरून म्हणजे? टांगे जाऊन रिक्षा आल्या तरी आजही पुण्यात प्रवास हा रिक्षाचालकांच्या कलाकलानेच होत असतो. रिक्षावाले दाखवतील ती दिशा महत्त्वाची. त्यांना ज्या दिशेला जायचंय, त्या दिशेला आपलं काम असलं तर देव पावला म्हणायचा. एकूणच पुण्यात रिक्षाप्रवासाची मनातून खूप तयारी करावी लागते. खिशात सुटे पैसे सदैव असावे लागतात. मुख्य म्हणजे ‘मी एक हतबल प्रवासी आहे. माझ्याकडे स्वत:चे वाहन नाही. तुम्ही न्याल तीच माझी दिशा..’ अशी  भावना सतत मनात जोजवत ठेवावी लागते.
नगरच्या गाडय़ा शिवाजीनगरच्या स्टँडवरून सुटतात. गाडीच्या टपावर हे सगळं सामान चढवून नगर दिशेला प्रवास सुरू. तीन तासांच्या प्रवासानंतर नगरच्या स्टँडवर पुन्हा टांगा करून अहमदनगर कॉलेजवर दाखल. एम. ए.- एम. एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने साधेच, पण नवीन बांधलेले  होस्टेल होते. कुलकर्णी म्हणून माझा रूममेट होता. तो जरा माझ्यापेक्षा वयाने मोठा. फिजिक्समध्ये एम. एस्सी.साठी आला होता. आधी एक-दोन वर्षे तो जळगांवजवळच्या एका कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर होता. त्याला कॉलेज परिसराची उत्तम माहिती होती. त्याने सामान खोलीत ठेवायला मदत केली, तोच एक मध्यमवयीन, चष्मा लावलेले, ढगळ कपडय़ातले, सावळे, सडपातळ गृहस्थ आमच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत आले. त्यांना बघून कुलकर्णी एकदम सावरून उभा राहिला. ते गृहस्थ म्हणाले, ‘वेलकम टू अवर कॉलेज. मी थॉमस बार्नबस. कॉलेजचा प्रिन्सिपॉल. मी शेजारीच राहतो. काही लागलं तर सांगा.’ एक चक्कर टाकून ते गेले. स्वच्छतेकडे त्यांचे लक्ष होते. मग कुलकर्णीनी मला माहिती दिली की, टी. बार्नबस, त्यांचे बंधू डॉ. जॉन बार्नबस आणि जोसेफ बार्नबस हे तिघे अमेरिकन मराठी मिशनचे कॉलेज चालवतात. तिघंही परदेशात शिकून आले आहेत. जॉन बार्नबस हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बायोकेमिस्ट् आहेत. पुणे विद्यापीठाचे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोकेमिस्ट्री असे सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये चालतात, वगैरे. मी परिसर बघून आलो. पण पुण्याची आठवण जाईना. नाटकाच्या तालमीत खंड पडणार. प्रथमच रात्री मेसमध्ये जेवण झालं. आता इथून पुढे हीच चव असणार. अस्वस्थपणे रात्री खोलीत नखं खात बसलो. कुलकर्णी म्हणाला, की चल, जरा पाय मोकळे करून येऊ. तो मग मला जवळच असलेल्या ‘सरोष’ या पारशी बेकरीत घेऊन गेला. तिथली कोल्ड कॉफी फेमस होती. ‘सरोष’ हा एकंदरीत मस्त अड्डा होता. परत आलो तो होस्टेलचा रखवालदार आमची वाटच बघत होता. तो म्हणाला की, आळेकर कोण? प्रिन्सिपॉल सरांनी बंगल्यावर बोलावलंय. रात्रीचे दहा वाजून गेले होते. उद्या सकाळी नऊपासून कॉलेजचे तास. रात्री कशाला बोलावलं असावं? गेलो तर बार्नबस सर वाटच बघत होते. मला पाहताच ते फोनपाशी गेले आणि ऑपरेटरला पुण्याहून आलेला कॉल लावून द्यायला सांगितलं. त्यावेळी पीपी ट्रंककॉल करावा लागे. म्हणजे ज्याच्या नावे फोन केला तो असेल आणि तो फोनवर बोलला तरच चार्ज लागायचा. म्हणजे मला पुण्याहून र्अजट फोन आला होता म्हणून बोलावलं होतं. कोणाचा असावा फोन म्हणून ऐकतो तर पुण्याहून आमचा अण्णा- श्रीधर राजगुरू. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. बार्नबस सरांना वाटलं असणार, की रात्रीच्या वेळी पुण्याहून फोन आला म्हणजे कुणीतरी आजारी वगैरे असणार. अण्णा सांगत होता, की दोन-तीन दिवस दांडी मारून तालमींना पुण्याला ये. समोर कॉलेजचे प्रिन्सिपॉल. त्यात आजचा नगरमधला पहिलाच दिवस. कॉलेजचे नवं वर्ष उद्यापासून. आणि हा मला सांगतोय की, कॉलेजला दांडी मार. मी आपला नुसताच ‘हुं..हुं’ करत होतो. तिकडून अण्णा सांगत होता, की जब्बार तेंडुलकरांची ‘भेकड’ ही एकांकिका पीडीएमध्ये बसवतो आहे. जोडीला ‘पाच दिवस’ पण करायची आहे. त्यात मी काम करायचंय. मी विचारलं, ‘कोणतं काम?’ त्यावर अण्णा म्हणाला की, मुख्य काम पूर्वीचेच कलाकार करणार आहेत. मी आणि समर नखातेनं मधल्या दोन सैनिकांचं काम करायचं आहे. मी वैतागून फोनवर मोठय़ाने म्हणालो, ‘ते काय काम? नुसती बंदूक घेऊन जायचं!’ हे वाक्य मी म्हणालो नि लक्षात आलं, की घोटाळा झाला. बार्नबस सर इतका वेळ नुसतंच माझं ‘हुं..हुं’ ऐकत होते, पण आता त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये आजच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पुण्यावरून आलेल्या मुलाच्या तोंडी रात्री दहानंतर आलेल्या ट्रंककॉलवर ‘ते काय काम? नुसतंच बंदूक घेऊन जायचं!’ असं ऐकलं. मला वाटलं, आता गेलीच माझी अ‍ॅडमिशन. मला काय करावं कळेना. तिकडे फोनवर श्रीधर राजगुरूचं प्रेमळ आवाजात चालू होतं, ‘हॅलो, अरे बोल ना? गप्प का? घरची आठवण येतीय का? शनिवारी ये ना पुण्याला..’ मी फोन ठेवूनच दिला. मग दीर्घकाळ स्तब्धता. बार्नबस सर म्हणाले, ‘यू मे एक्स्प्लेन. बंदुका घेऊन कुठे जायचंय?’ परत स्तब्धता! मग मी धीर करून म्हणालो की, ‘कुठे नाही सर. एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जायचंय!’ ते मितभाषी; पण यावर ते खो-खो करून हसत होते. इतक्या मोठय़ानी ते हसले, की घरातले सगळे बाहेर बघायला आले. म्हणाले, ‘सो यू आर अ थिएटर पर्सन. पण आमच्याकडचा नाटकवाला नुकताच कॉलेज सोडून मुंबईला गेलाय.’
मग त्यांच्या बोलण्यावरून मला हळूहळू समजत गेलं की, अहमदनगर कॉलेजमधले इंग्रजीचे प्राध्यापक मधुकर तोरडमल ६८ मध्ये त्यांच्या ‘काळे बेट, लाल बत्ती’ या नाटकाच्या राज्य नाटय़स्पर्धेतील अभूतपूर्व यशानंतर नोकरी सोडून व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. नगरच्या कॉलेजचेच ते विद्यार्थी. नगरला असताना त्यांनी स्पर्धेत केलेली ‘सैनिक नावाचा माणूस’, ‘भोवरा’ ही नाटकं खूप गाजली होती. सरिता पदकी यांचं अनुवादित ‘खून पहावा करून’ या नाटकाचेदेखील त्यांनी नगरला १५-२० प्रयोग केलेले होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असा मधुकर तोरडमलांचा लौकिक होता. मन:पूर्वक ते शिकवीत असत. त्यांनी नगरला नाटकाचं वातावरण निर्माण केलं. स्वत:चा असा प्रेक्षक तयार केला. नगरच्या आसपास असणाऱ्या साखर कारखान्यांच्या परिसरात अहमदनगर कॉलेजच्या सहकार्याने काढलेल्या थिएटर ग्रुपतर्फे ‘सैनिक नावाचा माणूस’, ‘भोवरा’, ‘काळं बेट, लाल बत्ती’सारख्या नाटकांचे प्रयोग करून नागरी नाटकांसाठी एक नवा ग्रामीण नागरी प्रेक्षकवर्ग ६३ ते ६८ च्या दरम्यान त्यांनी तयार केला, वगैरे. मग माझ्या लक्षात आलं की, या सगळ्यामागे बार्नबस सर खंबीरपणे उत्तेजन देत उभे राहिले म्हणूनच मधुकर तोरडमलांसारख्या एका अभिजात नटाची व्यावसायिक कारकीर्द उभी राहू शकली. तोरडमलांनी त्यांच्या ‘तिसरी घंटा’(१९८५) या आत्मपर पुस्तकात त्याविषयी सविस्तर नमूद केलेलं आहेच.
त्या फोननंतर मी दर शनिवारी पुण्याला जायचो आणि रविवारी रात्री उशिराने परत नगरला येत असे. ‘पाच दिवस’ आणि ‘भेकड’ अशा दोन एकांकिकांचे प्रयोग आम्ही पीडीएच्या समीप नाटय़योजनेखाली लोकांच्या घरात जाऊन करायचो. उत्तम प्रतिसाद मिळत असे. लोकं भरपूर कौतुक करत असत. मुख्य म्हणजे त्या एकांकिका एकदम बंदिस्त लिहिल्या होत्या. ‘भेकड’मध्ये सैन्यातला एक अधिकारी आपल्या भूतपूर्व प्रेयसीच्या घरी उत्तररात्री अचानक येतो. तिचा नवरा आत झोपला आहे, अशी कल्पना. जब्बार त्या अधिकाऱ्याचं काम उत्तम करत असे. पण मी आणि समर नखाते अद्याप ‘स्ट्रगलर’ या गटात असल्याने आमच्या वाटेला ‘पाच दिवस’मध्ये बंदूक घेऊन या विंगेतून त्या विंगेत जाणं आलेलं. जोडीला दोघांना प्रत्येकी एकेक वाक्य. पूर्वार्धात मी म्हणायचो, ‘जोरात चाललीय लढाई.’ आणि शेवटी समर म्हणायचा, ‘सगळं संपलंय कॅप्टन.’ बस्स. एवढय़ा एका वाक्यासाठी मी नगरहून पुण्याला यायचं, सैनिकाचा ड्रेस घालून बसायचं, आणि प्रयोगानंतर उत्तररात्री नगरला परत! बाकीचे काम करणारे तर मेडिकलचे विद्यार्थी. ते त्यांची इमर्जन्सी डय़ुटी करून तरी यायचे, नाहीतर प्रयोग संपल्यावर ससूनला नाइट डय़ुटीवर जायचे. तर नाटकाची अशी नशा किंवा खाजच असावी लागते.
अशा रीतीने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे तीन महिने गेले. एम. एस्सी.ला सेमिस्टर पद्धती होती. दर सहा महिन्यांनी विद्यापीठाची परीक्षा असे. आमच्या नगरच्या कॉलेजची प्रात्यक्षिकांची परीक्षा मात्र त्यावेळी पुणे विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री विभागातच होत असे. त्या परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या वेळी मला बार्नबस सरांचा निरोप आला म्हणून गेलो तर ते म्हणाले, ‘तू पुणे विद्यापीठात ट्रान्स्फर का नाही घेत?’ मला काहीच कळेना. त्यांनी मला पुणे विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या नावे पत्र दिले. त्याची एक प्रत केमिस्ट्री विभागाचे हेड डॉ. एच. जे. अर्णीकर यांच्या नावे दिली. कारण बायोकेमिस्ट्री हा विभाग केमिस्ट्रीच्या अंतर्गत होता. मी पत्र घेऊन विद्यापीठात रजिस्ट्रार प्रा. व. ह. गोळे यांना नेऊन दिलं. त्यांनी त्यावर काहीतरी लिहून मला डॉ. अर्णीकरांना भेटायला सांगितलं. डॉ. हरी जीवन (एच. जे.) अर्णीकर (१९१२- २०००) हे केमिस्ट्रीमधलं मोठं आंतरराष्ट्रीय प्रस्थ. त्यांचा प्रचंड दबदबा. त्यांनी न्युक्लियर केमिस्ट्री ही नवी शाखा भारतात प्रथमच पुणे विद्यापीठात भाभा अणुशक्ती केंद्राच्या सहकार्याने नुकतीच सुरू केली होती. ते मूळचे आंध्रचे. त्यांची डी. एस्सी. ही पदवी पॅरिसचे प्रसिद्ध नोबेलविजेते फ्रेडेरिक क्युरी आणि इरेन क्युरी यांच्या हाताखाली काम करून मिळवलेली. त्यांनी लिहिलेले ‘इसेन्शियल्स ऑफ न्युक्लियर केमिस्ट्री’ हे  आजही चालू असलेलं पाठय़पुस्तक सर्व जगात भाषांतरीत झालेलं. तर अशी माणसं तेव्हा विद्यापीठात सर्वत्र होती. त्यांना भीत भीत मी पत्र दिलं. त्यांनी निर्विकार चेहऱ्यानं माझ्याकडे एकदा निरखून पाहत सही केली आणि म्हणाले, ‘यू मे जॉइन द क्लासेस.’
अशा रीतीने आम्ही तीन महिन्यांत अहमदनगर मार्गे गणेशखिंडीत दाखल! आता पहिल्या सेमिस्टरचे वेध लागले होते. तिकडे जब्बार ‘अशी पाखरे येती’च्या तालमी राज्य नाटय़स्पर्धेसाठी सुरू करण्याच्या बेतात. तेव्हढय़ात बातमी आली की, १९६९-७० अशी दोन वर्षे बंद पडलेली पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा ७१ मध्ये गणपतीनंतर फग्र्युसनच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये परत सुरू होणार! माझ्याकडे ‘सत्यकथे’कडून अनेक सूचनांसह साभार परत आलेली ‘एक झुलता पूल’ची संहिता तयार होतीच. घरी मौज प्रकाशनगृहाच्या राम पटवर्धनांचे कार्ड येऊन पडले होते, की संहिता घेऊन पुण्याला सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयात चर्चेला या. पुण्यात तेव्हा वि. स. खांडेकरांची तीन व्याख्याने बालगंधर्वमध्ये त्यांचे प्रकाशक देशमुख आणि कंपनीतर्फे आयोजित केलेली होती. त्यासाठी महाराष्ट्रातून येणारे सर्व साहित्यिक जिमखान्यावरच्या सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयात उतरणार होते.
satish.alekar@gmail.com

तळटीप : प्राचार्य डॉ. टी. बार्नबस (वय ९५) यांचे नुकतेच १४ जुलै रोजी अमेरिकेत त्यांच्या मुलाकडे वृद्धापकाळाने निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:40 am

Web Title: weekly column by satish alekar in loksatta lokrang
टॅग : Drama
Next Stories
1 संहिता ते प्रयोग
2 सीडलेस थॉम्पसन
3 फर्ग्युसनचे दिवस (भाग १)
Just Now!
X