21 January 2019

News Flash

ज्येष्ठ बालतारका- वासंती पटेल

रभात फिल्म कंपनीची बालतारका म्हणून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या वासंती पटेल या ज्येष्ठ अभिनेत्रीला या वर्षीचा ‘पं.

| April 5, 2015 12:20 pm

प्रभात फिल्म कंपनीची बालतारका म्हणून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या वासंती पटेल या ज्येष्ठ अभिनेत्रीला या वर्षीचा ‘पं. वामनराव सडोलीकर जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. अभिनयासह शास्त्रीय आणि सुगम गायन क्षेत्रावर स्वत:ची मोहोर उमटविणाऱ्या वासंती पटेल यांच्यावर बेतलेला लेख-
आपल्या निव्र्याज, खळखळत्या हास्यानं, मोठय़ा मोठय़ा डोळ्यांनी बोलणारी, अबोध-अल्लड बालिका साकारणारी प्रभात फिल्म कंपनीची बालतारका वासंती यांनी अलीकडे वयाची ९२ वर्षे पार करून ९३ व्या वर्षांत पदार्पण करूनही चेहऱ्यावर तितकंच निव्र्याज हास्य कायम ठेवलं आहे.
‘पं. वामनराव सडोलीकर फौंडेशन’तर्फे गेली २३ वर्षे जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पं. वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. मागील काही वर्षांत संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि गायन/वादन क्षेत्राप्रमाणेच पंडितजींचे आणखी एक यशस्वी कार्यक्षेत्र  असलेल्या नाटय़ क्षेत्रामध्ये अग्रणी असणाऱ्या कलावंतांचा, विचारवंतांचा, गुणवंतांचा सन्मान करण्यात आला आहे. या वर्षीचा ‘पं. वामनराव सडोलीकर जीवन गौरव सन्मान’ वासंती पटेल यांना प्रदान करण्यात आला.
आजच्या पिढीला ‘प्रभात फिल्म कंपनी’ माहीत असण्याचे विशेष कारण नाही. १९१७ साली बाबूराव पेंटर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सुरू केली. श्रीमंत तानीबाई कागलकर (आमच्या आजीची बहीण) यांनी आपले दागिने गहाण ठेवून त्यांना त्याकाळी १५ हजार रुपये उभे करायला मदत केली होती. आमचे आजोबा विनायकराव घोरपडे वकिली करत. त्यांचा बंगला या फिल्म कंपनीच्या सर्व कामांसाठी वापरला जात होता. घरची मंडळी आवारातल्यातच आऊट हाऊसमध्ये राहात. १ जून १९२९ रोजी विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम (शांताराम वणकुद्रे), शेख फत्तेलाल, केशवराव धायबर (आमच्या आजोबांचे मेव्हणे, आईचे आतोबा) आणि सीताराम बापू कुलकर्णी (स्लीपिंग पार्टनर) अशा पाच जणांनी त्याच जागी ‘प्रभात फिल्म कंपनी’ सुरू केली. पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ घोरपडय़ांच्या बंगल्यातच चित्रित केला गेला. दुर्गाबाई खोटे हरिश्चंद्र (गोविंदराव टेंबे) राजाची पत्नी तारामती झाल्या होत्या. या सर्व नटसंचाची तालीम, गाण्यांच्या चाली बसवणं, मेकअप, कपडेपट, फिल्म धुण्याची रसायनं, यंत्रसामग्री, सारं सारं या बंगल्यातच सामावलेलं होतं. त्यामुळे ‘प्रभात’च्या सगळ्या मंडळींशी घोरपडे कुटुंबाचे आप्तवत संबंध बनले होते. सिनेमा पूर्ण होईपर्यंत टेंबे आणि दुर्गाबाईंची गाणी सगळ्या मुलांच्या गळ्यावर आपसूकपणे चढली होती. ‘लाइट, कॅमेरा, अ‍ॅक्शन’चा मंत्र नित्याचा झाला होता. आपसात खेळताना वासंती आणि भावंडे एकमेकांना डायरेक्ट करत होती. चित्रीकरण चालू असताना विमला, लीला (माझी आई) व वासंती या बहिणी धाकटय़ा भावंडांना कडेवर, खांद्यावर घेऊन बघत उभ्या असत.
‘प्रभात’च्या मूकपटांच्या निर्मितीत सगळ्या बच्चेकंपनीला सहभागी करून घेतलं जाई. ‘बजरबट्टू’, ‘माया मच्छिंद्र’ या मूकपटात वासंतीचा आणि अन्य भावंडांचाही सहभाग होता. १९३२ नंतर कंपनी पुण्यात स्थलांतरित झाली. कारण विस्तृत परिसर, अखंड वीजपुरवठा आणि इतर अनेक सोयी पुण्यात अधिक होत्या. बालगंधर्वाना संगीत रंगभूमीच्या डगमगत्या भविष्याची चाहूल लागली होती. जनतेचा चलचित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी चित्रपटात पदार्पण केलं. ‘धर्मात्मा’ या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी वासंतीला मिळाली. एका निम्नवर्गीय अल्लड बालिकेची ‘जाई’ ही भूमिका करण्यासाठी गोऱ्यापान वासंतीला व्ही. शांतारामांनी ‘काळी’ केली तेव्हा वासंतीनं रडून गोंधळ घातला. पण एकनाथांना आपल्या घरी जेवायला बोलावणाऱ्या जाईनं रसिकांची मनं जिंकली. त्या भूमिकेचं सोनं झालं. वासंती पहिल्याच चित्रपटानं ‘बालतारका’ पदावर विराजमान झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमिकेबद्दल वासंतीला खास शाबासकी दिली.
पाठोपाठ ‘अमर ज्योती’ (दुर्गा खोटे, चंद्रमोहन यांच्यासह), कुंकू (शांता आपटे, केशवराव दाते, राजा नेने, विमला वसिष्ठ यांच्यासह) (हिंदीत ‘दुनिया न माने’) हे चित्रपट आले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचे मानक स्थापित केले. ‘अमर ज्योती’मधील भूमिकेसाठी वासंती ‘गौहर सुवर्ण पदका’ची मानकरी झाली. ही भूमिका खास वासंतीसाठी निर्माण केली होती. वासंतीनं तिचं चीज केलं.
‘रणजित मूव्हीटोन’ या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतलं. घोरपडय़ांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता, आहे. ‘संत तुलसीदास’ हा ‘रणजित’चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात ‘मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल’ असा किताबही वासंतीला मिळाला.
त्याच सुमारास आपल्या मोठय़ा बहिणीचे यजमान पं. वामनराव सडोलीकर (जयपूर अत्रौली घराण्याचे गायक) यांच्याकडून
पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम वासंतीला मिळाली. ठुमरी, दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले.
वासंतीला प्रसिद्धी मिळाली, तरी घरी सगळ्या भावंडांना वागणूक समानच मिळत असे. पुण्याच्या भावे स्कूलची शाळा, अभ्यास हेही सुरू होतेच. प्रभातच्या गाडीतून शाळेत गेली तरी इतर शाळू सोबत्यांसाठी वासंती एक मैत्रीण होती, ‘तारका’ नव्हती. प्रभातमध्ये आणि रणजितमध्येही सहकलाकार अतिशय साधे होते. नावलौकिक बाहेरच्या जगात सोडून कामाच्या ठिकाणी शिस्त पाळण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. शांताराम बापू तर तीन तीन महिने तालमी करून मगच चित्रीकरण सुरू करत. मला आठवतेय, मी एकदा वासंती मावशीबरोबर व्ही. शांतारामना भेटायला गेले होते. त्यावेळी विषय निघाला, की चित्रीकरणाचे स्थळ जरी स्टुडिओत निर्माण केलेले असले तरी दृश्य दिवसाचे किंवा रात्रीचे असले तर प्रत्यक्ष त्या त्या उजेडात माणूस कसे दिसेल, त्याच्या त्वचेच्या रंगाशी हुबेहुब जुळेल अशी मेकअपची शेड शांताराम बापू स्टुडिओच्या बाहेर जाऊन मेकअप करून पाहत, मेकअपच्या शेड्स लिहून घेत, त्याप्रमाणे कलाकारांचा मेकअप केला जाई आणि मगच स्टुडिओमध्ये त्याप्रमाणे लाइट्स लावून सर्व चित्रीकरण केले जाई. उगाचच नाही त्यांना चित्रपटसृष्टी गुरूस्थानी मानत. शांताराम बापू म्हणाले, ‘‘वासंती, मी परफेक्शनिस्ट आहे. तू काम करत होतीस तेव्हा आणि आजही. तो माझा स्वभाव आहे, धर्म आहे, काय करणार?’’
‘धर्मात्मा’च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फट्कन चपराक दिली. आश्चर्य आणि दु:खाने रडणारी ‘जाई’ कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.
‘अमरज्योती’ या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही ‘प्रभात’ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.
धर्मात्मा, अमरज्योती, कुंकू (दुनिया न माने- हिंदी), आपकी मर्जी, संत तुलसीदास, अछूत, दीवाली, मुसाफिर, दु:ख-सुख, कुर्बानी, भक्तराज, भाग्यलक्ष्मी अशा चित्रपटांनंतर देवानंद यांच्या बरोबरही एक चित्रपट झाला, ‘मीना.’ पण तो काही कारणांनी प्रकाशित झालाच नाही. त्यावेळी देवानंदचे केस खांद्यावर रूळत असत. देवानंदचा तो पहिला चित्रपट होता.
चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाटय़ महोत्सवात ‘संगीत शारदा’ हे नाटक करायचे ठरले. शारदा- अर्थातच वासंती, कोदंड-गंगाधर पंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपन्त गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका माझे वडील पं. वामनराव सडोलीकर (भाऊ) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदं आणि संवाद-अभिनय शिकवताना भाऊ अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले.
प्रत्यक्ष प्रयोगावेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! ‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. ‘‘पोरी, तू रडवलंस आम्हाला’’ असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली. मामा वरेरकरांनी विचारले, ‘‘काय गं मुली, गुडघ्यात न वाकता करतात तो ब्राह्मणी नमस्कार तुला कोणी शिकवला?’’ वासंती म्हणाली, ‘‘गुरुजींनी (भाऊंनी).’’ मामा हसून म्हणाले, ‘तरीच.’ त्या दिवशी ‘‘इतकी अनुरूप शारदा रंगभूमीवर पुन्हा होणे नाही,’’ असं म्हणत रसिक प्रेक्षक घरी परतले. त्या एकाच नाटकात वासंतीने काम केले आणि उत्कृष्ट अभिनयाचं सुवर्ण पदक घेतले.
अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. दत्ता डावजेकर, मास्टर कृष्णराव, खेमचंद प्रकाश, सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमारे २०० गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात दुर्गा खोटे, शांता आपटे, विष्णुपंत पागनीस, खुर्शीद, कांतिलाल, सी. रामचंद्र हे सहगायक कलाकार होते. के. एल. सैगल, बेगम अख्तर यांनी वासंतीला गाण्याचे मनापासून कौतुक केलें.
१९४४ च्या मध्ये प्रकाशित झालेला ‘भाग्यलक्ष्मी’ हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर इंदुभाई पटेल यांच्याशी विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या. ही भूमिका अतिशय समरसतेनं जगून आजी-पणजी या भूमिकातून मिळणारा आनंद आज वासंतीच्या जीवनाचे सार-सर्वस्व आहे. साधी जीवनशैली, नियमित दिनचर्या, मिताहार आणि आपली कामे आपणच करायची हा आग्रह यामुळे जीवन स्वयंपूर्ण आणि समृद्ध बनले आहे.
नवीन पिढीबद्दल वासंती आशावादी आहेत. आजच्या हुशार पिढीला प्रगतीच्या खूप वाटा उपलब्ध आहेत, साधने आहेत आणि ती वापरण्याची बुद्धीही आहे. तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून कला आणि समाज या दोन्हींसाठी काम करावे ही त्यांची सदिच्छा आहे. आजही बालपणीचे निरागस हास्य आणि ऋजु स्वभाव असलेल्या वासंती यांना ‘जीवेत् शरद: शतम्’ अशा शुभेच्छा!!    

First Published on April 5, 2015 12:20 pm

Web Title: well known child actor vasanti patel