वैद्यकीय नियतकालिके चाळत असताना परवा एक प्रासंगिक उतारा वाचनात आला.  एक तरुण मध्यमवर्गीय जोडपे.. आय.टी. सेक्टर.. दोघेही कमावते.. एकमेकांवर नितांत प्रेम.. अजून तिसऱ्याची चाहूल नाही.. पण त्याची वाट मात्र पाहत आहेत.. त्यामुळे बाथरूमच्या कोनाडय़ातील छोटेखानी कपाटात ‘प्रेग्नन्सी किट’ पडलेली.. चाहूल लागल्यास प्राथमिक खात्री घरच्या घरी करण्यासाठी स्त्रीने युरिनचे दोन थेंब टेस्ट स्ट्रिपमध्ये टाकल्यावर दोन लाल रेषा उमटल्यास ‘गुड न्यूज’ची सुवार्ता.. आपल्या शरीरात घडणाऱ्या बदलांची पहिली बातमी त्या स्त्रीलाच देणारी.. सर्वस्वी तिच्याच कंट्रोलमध्ये असलेली अशी ही टेस्ट.. त्या दिवशी पतिराजांना ऑफ होता आणि टिंगलटवाळी करण्याचा मूड होता.. त्याने गंमत म्हणून प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिप काढली आणि आपल्या स्वत:च्या युरिनचे दोन थेंब टाकले.. आणि अहो आश्चर्यम्.. त्यांना धक्काच बसला.. टेस्ट पॉझिटिव्ह होती.. महाशयांनी सर्वप्रथम किटची व्हॅलिडिटी डेट पाहिली.. त्यातील घडय़ा घातलेला कागद पुन:पुन्हा नीट वाचला.. विस्फारलेल्या डोळ्यांनी हातातील स्ट्रिपकडे पाहिले.. त्या दोन रेषा लालबुंद.. पुन्हा पतिराजांकडेच पाहत होत्या.. पतिराजांनी प्रॉडक्ट इन्फम्रेशनमध्ये दिलेला १८००.. नंबर फिरविला. कंपनीच्या मते टेस्ट बरोबर होती.. पतिराज प्रेग्नंट होते. ते नखशिखांत हादरले.. पत्नीला न सांगता ते सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले. पडद्यावर सावल्यांची/ ठिपक्यांची रांगोळी उमटली. रिपोर्ट आला.. नॉर्मल.. त्यांना गर्भारपणाच काय, ते धारण करायला गर्भाशयही नव्हते. ते पूर्ण पुरुषच होते.. अर्धनारी नटेश्वराचा अवतार नव्हते.. डॉक्टरही बुचकळ्यात पडले. वरिष्ठ अँड्रोलॉजिस्टचा सल्ला घेतला गेला.. खातरजमा करण्यासाठी टेस्ट परत केली गेली आणि तो पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहिल्याक्षणी डॉक्टरांचे निदान पक्के झाले.. ते म्हणाले, ‘‘तरुण माणसा, तुला प्रेग्नन्सी नाही, पण वृषणाचा कर्करोग (Testicular cancer) आहे. त्या कर्करोगात शरीरात तयार होणाऱ्या HCG (Human Chorionic Gonadotropin) या संप्रेरकाची (Hormone) मात्रा वाढली आहे, ते तुझ्या युरिनमध्ये उत्सर्जति होते आहे आणि म्हणून टेस्ट पॉझिटिव्ह येते आहे.. वृषणाची बायोप्सी झाली.. निदान खरे ठरले आणि पुढच्याच आठवडय़ात कर्करोगाचा प्रादुर्भाव झालेले ते वृषण काढले गेले.. आज तो तरुण आपले पुढचे नॉर्मल आयुष्य जगत आहे.
वैद्यकीय विश्वातला हा उतारा क्वचित घडणाऱ्या प्रसंगाचे वर्णन आणि विश्लेषण करता झाला.. पण माझ्या डोक्यात मात्र विचारांची आवर्तने सुरू झाली. काय म्हणावे या प्रसंगाला? मस्करीची कुस्करी? निघालो काशीला आणि पोहोचलो सोमनाथला?.. की निकले थे चीन और पहुँच गए जापान..? Serendipity म्हणजे ज्याची ध्यानीमनी अपेक्षा नव्हती, त्याची विलक्षण कर्मधर्मसंयोगाने झालेली उपलब्धी?.. पण आयुष्यात अशा घटना घडतात.. म्हणून तर कोलंबसाला अमेरिका सापडते.. सिलोनचा शोध लागतो.. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त गवसतो.. आर्किमिडीजची युरेका ही आरोळी शम्मी कपूरच्या ‘याहू’इतकी प्रसिद्ध होते.
एखाद्या अनपेक्षित धक्का देणाऱ्या घटनेकडे आपण कसे पाहतो हे महत्त्वाचे ठरते.. मीडियासाठी ती बातमी असते.. चॅनेलसाठी ब्रेकिंग न्यूज! सर्वसामान्यांसाठी तोंडी लावून संध्याकाळपर्यंत चघळण्याची बाब. पण शास्त्रीय मन त्या घटनेच्या अंतरंगात घुसू पाहते.. त्यातील बाबींचा अन्वयार्थ लावू लागते. आणि मग न उच्चारलेले शब्द कानी पडू लागतात.. न लिहिलेला मजकूर उलगडायला लागतो.. यालाच तर Reading in between the lines म्हणतात.. हा लागलेला अर्थ एखाद्याला जीवनदान देऊन जातो.. एका नव्या खंड-उपखंडाचा शोध लावतो. आणि कधी कधी संपूर्ण समाजाला उपकृत करणाऱ्या उपलब्धींची किल्ली हाती देतो.
तात्पर्य हेच की, विश्लेषक वृत्तीची वृद्धी होणे गरजेचे. आणि हे केवळ शास्त्रज्ञांमध्येच मर्यादित नसावे. हा उतारा वैद्यकीय नियतकालिकामध्ये छापून संपादकांनी वैद्यकीय वाचकांना नवा संदेश दिला आहे. आजचे वैद्यक USG/CT/MRI/PET/Hormonal Assays/Tumor markers यांच्या जंजाळात अडकले आहे. तंत्रज्ञानाच्या भाऊगर्दीत    Clinical Acumen अर्थात मानवीय चिकित्सा कौशल्याची घुसमट होते आहे. आणि कधी कधी अनुमान आणि विश्लेषक वृत्ती यांचा गळा दाबला जातो आहे. टेस्ट आहेत, पण शेवटी त्या पथनिर्देशक आहेत.. रस्ता तुमचा तुम्हीच निवडायचा आहे.  एमआरआय/ सीटीवर फाजील विश्वास ठेवून कधी क्लिनिकल तपासणी आणि निष्कर्षांमध्ये कमी पडलो तर ३० वर्षांनंतर आजही माझी फसगत होते, हे सत्य मला येथे नमूद करावेसे वाटते. त्यामुळेच लेखांक संपवताना माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगावेसे वाटते की, Flickr आणि  Google च्या या जमान्यात विश्लेषण करणे थांबवाल तर गुगलीला बळी पडाल आणि तुमचा रुग्ण तुम्हाला विचारेल .. What’s up Doc?