मराठीत उत्तम राजकीय कादंबऱ्या फारशा आढळत नाहीत. अरुण साधूंच्या ‘सिंहासन’ व ‘मुंबई दिनांक’ यासारख्या थोडक्या कादंबऱ्यांचा अपवाद करता त्या तोडीचं राजकीय सत्ताकारणाचं चित्रण मराठी कादंबऱ्यांमधून अभावानंच झालेलं दिसतं. यामागच्या कारणांचा सर्वागीण वेध घेणारा अरुण साधू यांचा
विवेचक लेख..
माझी ‘सिंहासन’ ही राजकीय कादंबरी आहे असं कुणी म्हणत असेल तर आनंद आहे; पण त्यापेक्षा माझी अधिक राजकीय कादंबरी ‘त्रिशंकू’ ही आहे. ‘सिंहासन’ ही थेट राजकारणाशीच संबंधित आहे; पण माझ्या प्रत्येक कादंबरीत राजकारण हे येतंच. ‘मुखवटा’ नावाची माझी एक कादंबरी आहे. तीत अनेक प्रकारचं राजकारण आहे. ‘सिंहासन’सारखीच माझी राजकारणाविषयीची ‘तडजोड’ नावाची आणखीन एक कादंबरी आहे. जिल्ह्य़ाच्या ठिकाणच्या निवडणुकीतले सर्व प्रकारचे डावपेच त्यात मी बारकाव्यांनिशी उलगडून दाखवले आहेत. त्यात ‘सिंहासन’पेक्षाही अधिक तपशीलवार राजकारण येतं. राजकारणातले सर्व पेच त्यात आहेत. पण ती उच्च प्रकारची राजकीय कादंबरी आहे असं मी म्हणणार नाही. पण तरीही ती चांगली कादंबरी आहे.
मराठीत ‘सिंहासन’ या माझ्या कादंबरीनंतर फारशा प्रभाव टाकणाऱ्या राजकीय कादंबऱ्या आल्या नाहीत, या विधानावर मी मत व्यक्त करणं फारसं बरोबर नाही. पण आपण जर मराठी कादंबरीची समीक्षा पाहिली- साठोत्तर मराठी कादंबरी, सत्तरोत्तर मराठी कादंबरी, नव्वदोत्तर मराठी कादंबरी, एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी, राजकीय कादंबरी, वगैरे- तर त्यातही ‘सिंहासन’ला फारसं महत्त्व दिलेलं आहे असं काही मला दिसलं नाही. अर्थात मराठी समीक्षेमध्ये तिचा फारसा ऊहापोह झालेला नसला, तरी मराठी वाचक ‘सिंहासन’ हा मैलाचा दगड मानतात, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यानंतर एवढा प्रभाव टाकणारी किंवा लक्षात राहणारी किंवा राजकारणाला सर्वागानं भिडणारी कादंबरी आली नाही, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मला वाटतं, केवळ राजकीय कादंबरीच नाही, तर फक्त ‘कादंबरी’ हा विषय घेतला, तरी काय दिसतं? मला एकदम गिरीश कार्नाड यांची आठवण येते. दोन-तीन वर्षांपूर्वी ते एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते, की ‘महाराष्ट्रात टिळकांच्या मृत्यूनंतर एक तऱ्हेचा पिचपिचीतपणा आला होता.’ आणि ही गोष्ट खरी आहे. टिळकांनंतर म. गांधी यांचं नेतृत्व राजकीय पटलावर पुढे आलं. मराठी सांस्कृतिक जगानं आंबेडकरांकडे तर दुर्लक्षच केलं. तत्कालीन सांस्कृतिक जगावर कशाचा प्रभाव होता? तर- टिळकांचा! पण मध्यवर्ती सांस्कृतिक महाराष्ट्रानं गांधींचा त्यावेळी स्वीकार केला नाही. त्यावेळचे वादविवाद आपण पाहिले तर असं दिसतं की, पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होतं. या सांस्कृतिक विश्वानं आणि त्याबरोबरच राजकीय विश्वानं गांधींना स्वीकारलं नाही. ‘टिळकांएवढा प्रचंड व्यासंगी विद्वान.. देशभर गाजलेला’ आणि ‘गांधी काय- बनिया!’ अशी त्यावेळी पुण्यातून टीका होत होती आणि ती महाराष्ट्रभर पोहोचत होती. थोडक्यात काय, तर देशाच्या संस्कृतीकारणामध्ये गांधी नावाचं जे एक प्रचंड वादळ आलं, ते महाराष्ट्रानं जवळजवळ दुर्लक्षितच केलं. विनोबा भावे, आचार्य जावडेकर असे गांधींना मानणारे पुष्कळ लोक महाराष्ट्रात होते. पण म. गांधी यांचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक विश्वावर ठसा उमटला का? त्यांनी निर्माण केलेलं विश्व किंवा त्यांनी निर्माण केलेल्या भारतीय राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या प्रेरणा मराठी साहित्यात कितपत आल्या? काही लोक म्हणतील की, खांडेकर वगैरेंमध्ये त्या पुष्कळ आल्या. मला हे जरा गमतीचं वाटतं.
आजची तरुण मुलं खांडेकर वाचतात की नाही, कुणास ठाऊक. परंतु मी माझ्या तारुण्यात खांडेकर थोडेफार वाचले. फडकेही वाचण्याचा प्रयत्न केला, पण मला ते वाचता आले नाहीत. खांडेकर मला फारच निरागस आणि विसविशीत वाटले. हे मी आता सांगतोय. हे सांगणं हा खरं म्हणजे मोठा अपराध आहे. ते मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक आहेत. त्यांनी मराठी साहित्याला मोठं वळणदेखील दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी असं बोलणं चांगलं नाही. खांडेकरांनी भाषा दिली. भाषेचं एक वळण दिलं. मध्यमवर्गाला खूप घोळवलं. परंतु त्यापलीकडे ते गेले नाहीत. राजकारण केवळ मध्यमवर्गाचं असतं का? टिळकांना ही जाणीव होती, की केवळ पुण्यातल्या मध्यमवर्गाचं राजकारण करून भागणार नाही. त्यांना तेल्या-तांबोळय़ांपर्यंत राजकारण न्यायचं होतं. म्हणूनच त्यांनी शिवजयंती, गणेशोत्सव असे उपक्रम सुरू केले. त्यायोगे त्यांनी सगळय़ा समाजाला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यानंतर ही प्रेरणा इतर कुणामध्ये दिसली नाही. परिणामी ती मराठी साहित्यामध्येही दिसत नाही.
याशिवाय अजून एक समाजशास्त्रीय कारण आहे. स्वातंत्र्यापर्यंतचं महाराष्ट्राचं राजकारण हे उच्चभ्रू जातींच्या अधीन होतं. याच जाती अधिक पुढारलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम साहित्यावरदेखील होत होता. मला आठवतं, एकेकाळी जे ब्राह्मणेतर साहित्यिक लिहायचे, त्यांची भाषादेखील ब्राह्मणीच असायची. भाषा कशी? तर अशीच असली पाहिजे, असा त्यांचा समज होता. तसे ब्राह्मणेतर साहित्यिकही कमीच होते म्हणा. कारण तेव्हा शिक्षणाचा एवढा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे मराठी साहित्यावर ब्राह्मणी छाप होती. त्या काळात जे ब्राह्मण राजकारणात होते, तेदेखील मध्यम वळणाचं राजकारण करत होते. पुढे सत्यशोधक चळवळ आणि इतर चळवळींमुळे मराठा जातीसारख्या काही जाती पुढे यायल्या लागल्या. ३६ सालच्या, ४६ सालच्या निवडणुका झाल्या. त्याच्या मध्यंतरी ४२ ची चळवळ झाली. तेव्हा गांधींच्या आणि इतर अनेक प्रेरणांमुळे अन्य जातीही राजकारणात उतरल्या, शिक्षणात उतरल्या. भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, शाहूमहाराज यांच्यासारखे ब्राह्मणेतर पुढारी मोठय़ा प्रमाणावर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले. स्पर्धा सुरू झाली. १९५२ नंतर राजकारणात ब्राह्मणेतरांचं प्रभुत्व तसंच त्यांचा स्वीकार व्हायला लागला. ३६, ४६, ५२ अशा निवडणुकांच्या टप्प्यांनी ब्राह्मणेतरांचं प्रभुत्व वाढत गेलं. ६० नंतर ब्राह्मणेतर साहित्यिकांचा मोठा प्रभाव मराठी साहित्यात दिसायला लागला. आणि आज मला ते वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं.
तोवर ब्राह्मणांचं जेवण जसं असतं, तसंच मराठी साहित्य होतं.
‘रणांगण’ या विश्राम बेडेकरांच्या कादंबरीला मैलाचा दगड कसा काय मानतात, याचं मला हसू येतं. त्यातील प्रेमप्रकरण, त्यातील राजकारण, जागतिक राजकारणाचे संदर्भ हे खूप विसविशीत आहेत. माझ्यावर तरी तिचा प्रभाव पडला नाही. खांडेकरांच्या कादंबऱ्यांपेक्षा ती फारशी वेगळी नाही. पण बेडेकर आणि ‘रणांगण’चा उदोउदो व्हायला लागल्यावर मी ती परत एक-दोनदा वाचून काढली. पण मला काही ती भावली नाही. तोवर खरं तर महाराष्ट्राबाहेरचं जग मराठीत काही प्रमाणात का होईना, आलेलं होतं. काकासाहेब कालेलकर, सावरकर यांसारख्या पुष्कळांनी तशा प्रकारचं लेखनही केलं होतं. पण तरीही जहाजावर एका मराठी मुलाचं एका ज्यू मुलीशी प्रेम जुळतं, त्याला दुसऱ्या महायुद्धाचे संदर्भ असतात.. हा कंगोरा ‘रणांगण’ला होता. तो एक ‘प्रयत्न’ म्हणून चांगला होता. मला साहित्यक्षेत्रात फारसा काही मोठा अधिकार नाही. मी समीक्षक नाही. मराठी साहित्याचा मोठा वाचकही नाही. पण मी मराठीतले साधारण मापदंड मानल्या जाणाऱ्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत.     
त्यामुळे मला ‘रणांगण’ ही खांडेकरी वाणाचीच कादंबरी वाटते. याचं कारण ब्राह्मणी जीवनाचा जो विसविशीतपणा मराठी साहित्यात होता, त्यात ‘रणांगण’ चपखल बसते.
दुसरं शंकर पाटील यांचं उदाहरण घेतलं तरी हेच लक्षात येईल. शंकर पाटील ग्रामीण भाषेत लिहायचे. पण त्यांचं ‘अपील’ कुठल्या वाचकांना होतं, याचा जरा विचार करून पाहा. असंच आणखीन एक उदाहरण म्हणजे बाबूराव बागुल. त्यांच्या कथाही यादृष्टीनं पाहण्यासारख्या आहेत. बागुलांनी रमाबाई आंबेडकरांच्या कथा लिहिल्या. त्या क्रमश: प्रसिद्ध होत होत्या. त्या मी तेव्हाच वाचल्या. माझ्या स्मरणाप्रमाणे, त्यातील भाषा ही ब्राह्मणी भाषाच होती. त्या कथांमध्ये आंबेडकर रमाबाईंशी ब्राह्मणी भाषेत बोलायचे. आंबेडकर जरी उत्कृष्ट मराठी बोलत असले तरी ते तेव्हा खासगी आयुष्यात आपल्या भाषेतच बोलत असत.
..असे त्यावेळचे बहुतेक ब्राह्मणेतर लेखकदेखील ब्राह्मणी भाषेतच लिहायचे. हळूहळू ते बदलू लागले. ५०-५५ नंतर ब्राह्मणांचंदेखील जेवण बदललं. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ त्यांच्या जेवणात यायला लागले. एकमेकांत मिसळणं वाढलं. सगळय़ा जगाचा परिचय व्हायला लागला. राजकारण सामान्य जीवनापासून वेगळं काढता येत नाही. सामान्य जीवन जसं असतं, तसंच त्या समाजाचं राजकारण असतं. महाराष्ट्राचं सामान्य जीवन वरील प्रकारचं असल्यामुळे ते साहित्यात आलं नाही. जे आलं, ते वरवरचं आलं. ग. त्र्यं. माडखोलकरांच्या कादंबऱ्यांमध्ये राजकारणाचं चांगलं चित्रण आहे. पण खोलात जाऊन राजकारणाचे जे विविध पदर समजून घेऊन लिहिणं आवश्यक आहे, ते त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसत नाही. ना. सी. फडके यांच्या काही कादंबऱ्यांमध्ये खूप राजकारण आहे. कामगारांचे मोर्चे आहेत. सुभाषचंद्र बोस यांची मोहीम आहे. पण आता ते आठवलं की हसू येतं. मराठी वाचकांनी ते कसं काय सहन केलं, कुणास ठाऊक. त्यांतलं राजकारण हास्यास्पद म्हणावं इतकं वरवरच्या पातळीवरचं आहे. मराठीतले बहुतेक समीक्षक इंग्रजी साहित्याचे वाचक आहेत. परंतु त्यांना हे कसं कळत नाही, याचंच मला आश्चर्य वाटतं. पाश्चात्त्य साहित्यात (फ्रेंच, स्पॅनिश) नुसती प्रेमकथा जरी असली, तरी तीत राजकारणाचे कितीतरी पदर येतात! टॉलस्टॉयच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’मध्ये त्यावेळचं सगळं राजकारण ढवळून निघालेलं आढळतं.
अजून एक असं आहे की, आपल्याकडे राजकारणावर लिहिणं हे कमी प्रतीचं मानलं जातं. ‘ते काय, डावे आहेत!’ असे शिक्के मारले जातात. परंतु ‘हे उजवे आहेत म्हणून हे तसंच लिहिणार..’ असं कुणी म्हणत नाही. कुणी जातीपातीच्या पलीकडे जाऊन लिहिणारा आणि त्यात समतावाद आणणारा असेल तर त्याला ‘डावा’ म्हणून मोकळं व्हायचं, हे आत्ता-आत्तापर्यंत मराठी साहित्यात होत होतं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट : तेव्हा नारायण सुर्वे यांच्याविषयी वाद झाला होता. ‘सुर्वे डावे आहेत म्हणून ते इतके गाजले,’ असं काही लोकांचं म्हणणं होतं. गंगाधर गाडगीळ यांनी असं विधान केलं होतं की, ‘माझं नाव जर ‘गंगाधर सुर्वे’ असतं तर मलाही लोकांनी उचलून धरलं असतं.’ ही वृत्ती मराठी साहित्यिकांमध्ये आहे. नामदेव ढसाळ का गाजतो? तर तो ‘ढसाळ आहे’ म्हणून! वास्तविक पाहता त्याची कविता ही जागतिक दर्जाची कविता आहे. त्याचं चांगलं भाषांतर झालेलं नाही. बऱ्याचशा दलित लेखकांची भाषांतरं झालेली आहेत; पण योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे ती झालेली नाहीत. नामदेव ढसाळच्या कवितेमध्ये पूर्ण राजकारण असतं. म्हणजे जेंडर पॉलिटिक्स, कास्ट पॉलिटिक्सपासून वरच्या स्तरावरच्या राजकारणापर्यंत!
मराठीत पुष्कळांनी राजकीय कादंबऱ्या लिहिल्या आहेत. सुरेश द्वादशीवार, रंगनाथ पठारे ही काही त्यातली प्रमुख नावं. द्वादशीवार यांना खूप माहिती आहे. पठारे यांची ‘ताम्रपट’ ही चांगली कादंबरी आहे. पण ज्यात केवळ राजकारणाची चर्चा आहे, अशा फार कादंबऱ्या मराठीमध्ये नाहीत. पण ज्यात सांस्कृतिक राजकारण, लिंगाधिष्ठित राजकारण- जेंडर पॉलिटिक्स आहे अशा बऱ्याच चांगल्या कादंबऱ्या मराठीत आहेत. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्यांमध्ये हे पुष्कळ प्रमाणात आहे. विंदा करंदीकर यांची कविता तुम्ही वाचलीत, किंवा कुणाही कवीची कविता वाचलीत, तर त्यांचं राजकारण काय आहे, हे कळतं. त्यातलं जेंडर पॉलिटिक्स काय आहे, ते स्त्रीकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात, किंवा समाजात पुढे काय व्हावं याबाबत त्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे सगळं त्या कवीच्या चार कविता वाचूनही कळतं.
याशिवाय आपण आपल्या कुटुंबाविषयी विचार करतो. माझं कुटुंब उद्या कुठं जाणार आहे? उद्या माझ्या मुलाला कुठल्या कुठल्या संधी मिळणार आहेत? माझा मुलगा १२ वीला आहे, त्याचं भवितव्य काय? आपला मुलगा वा मुलगी आयआयटीत जावा म्हणून पालक आजकाल सातवीपासूनच त्याला टय़ुशन्स लावतात, हेही राजकारणच आहे. मार्क्‍स म्हणतो ते काही खोटं नाही. पती-पत्नीच्या संबंधांमध्येदेखील राजकारण असतं. ‘आहे मनोहर तरी’ या सुनीता देशपांडे यांच्या आत्मचरित्रावरून कळतं, की सुनीताबाई होत्या म्हणून पु. ल. पुढे येऊ शकले. त्या केवळ डॉमिनेटिंग होत्या म्हणून नाही. घरामध्ये खरा नेता कोण? तो बायको, मुलगा वा सून असं कुणीही असू शकतं. हेही राजकारणच असतं. शेवटी नेतृत्व कुणी करायचं, हे तुमच्या गुणांवर ठरत असतं. सतीश आळेकर यांच्या ‘शनिवार-रविवार’ या नाटकात नवरा आपल्या बायकोला म्हणतो की, ‘तू फार राजकारणी आहेस.’
मराठी साहित्यातला पिचपिचीतपणा अजून पुरेसा गेलेला नाही. अलीकडचे नवनवे लेखक लिहू लागले आहेत. खेडय़ापाडय़ातल्या शेतकऱ्यांची मुलं लिहायला लागली आहेत. याही पलीकडे जाऊन पारधी, वडारी या जातींतील मुलंही कादंबरी लिहू लागली आहेत. त्यांत फार चांगल्या प्रकारचं राजकारण आहे. उदा. अशोक पवार. फारच चांगल्या कादंबऱ्या आहेत त्याच्या. त्याच्या कादंबऱ्या राजकीय कादंबऱ्या नाहीत? जो आरोप गिरीश कार्नाडांनी केला होता, तो अशोक पवारांनी खोडून काढला आहे. त्याची भाषा नसेल चांगली; पण त्या अस्सल राजकारणाचं दर्शन घडवणाऱ्या अस्सल कादंबऱ्या आहेत.
त्यामुळे केवळ ‘निवडणुकांतलं राजकारण वा सत्ताकारण’ असं वेगळं न काढता जीवनातलं राजकारण कोण ठसठशीतपणे, समजूतदारपणे मांडतं, हे आपण बघायला पाहिजे.
टिळकांनंतर महाराष्ट्रात एवढी मोठी पोकळी निर्माण झाली! त्यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकेल असं एकही नेतृत्व आपण निर्माण करू शकलेलो नाही. ज्याला राष्ट्रीय वर्तुळात ‘इंटलेक्च्युअल एलिट’ म्हणतात, त्यात कोण आहे महाराष्ट्रातलं? टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, स्टेट्समन या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मध्यवर्ती वा विश्लेषणात्मक लेख लिहिणाऱ्यांमध्ये बंगाली, दक्षिण भारतीय, गुजराती, बिहारी लेखक मंडळी बरीच दिसतात. पण महाराष्ट्रीय लेखक कुठे दिसतात? त्यामुळे ‘इंटलेक्च्युअल शिस्त’ म्हणतात ती महाराष्ट्रात नाहीच की काय, असं वाटतं! टिळकांनंतर निर्माण झालेली पोकळी अद्यापि भरून निघालेली नसल्याने त्याचंच प्रतिबिंब आजही मराठी साहित्यात, मराठी कादंबऱ्यांमध्ये आढळतं.
शब्दांकन : राम जगताप

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..