News Flash

महाराष्ट्रात स्वतंत्र विचारवंतांची वानवा?

भाषांतरे व भाष्ये करण्याकडेच आपल्या विचारवंतांचा कल अधिक झुकतो.

|| प्रभाकर पाध्ये / श्री. रा. टिकेकर

महाराष्ट्रीयांत काही अपवाद करता स्वतंत्र प्रज्ञा आणि नवमताचा पुरस्कार करणारे  का आढळत नाहीत, याबद्दल गेल्या शतकात उलटसुलट चर्चा होत होती.  मराठी माणसांत उद्योजकतेचा अभाव असल्याचे आजही म्हटले जाते…  आणि विचारवंतांचाही! यासंबंधात १९३५ साली मीमांसा करणाऱ्या  लेखातील संपादित अंश… आजही विचारप्रवृत्त करणारा…

 

‘पाश्चिमात्यांचे उसने विचार’अशी नवमताची हेटाळणी जुन्या लोकांकडून होत असते. आणि तिचा विचार करीत असता ‘महाराष्ट्रात स्वतंत्र विचारांची उणीव आहे का?’ असा प्रश्न उद्भवतो. पण ‘स्वतंत्र विचार’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय? आजपर्यंत प्रदर्शित झालेले उत्तमोत्तम विचार खरोखर स्वतंत्र आहेत का? एवढा मोठा विचारप्रवर्तक कार्ल माक्र्स, पण त्याचे विचार तरी सर्वस्वी स्वतंत्र होते असे म्हणता येईल काय? माक्र्सच्या विचारांची पूर्वपीठिका जो- जो अधिक अभ्यासावी, तो- तो त्याचे ऋण अधिक व्यक्त होते. हेगेलचा विरोधविकासवाद, फॉरबॅखचा भौतिकतावाद, फ्रेंच अर्थशास्त्रज्ञांचा समाजवाद, आंग्ल साम्यवाद्यांचा मजूरवाद व रिकार्डोचे अर्थशास्त्र… इत्यादी अनेक विचारप्रवाहांचा संगम साधूनच माक्र्सने आपले तत्त्वज्ञान बनविले. पण त्यामुळे माक्र्सच्या मौलिकतेस काही बाध येतो असे नाही. माक्र्सच्या विचारसरणीचा विशेष तो हाच, की तिचे प्रत्यंतर प्रत्यक्ष जीवनात, आजूबाजूच्या परिस्थितीत सापडते. माक्र्सचे विचार आकाशातून पडले तर नव्हतेच. ठिकठिकाणांहून निरनिराळे विचारप्रवाह एकत्र आणूनच त्यांचा त्याने प्रभावी संगम साधला, परिस्थितीचे इतर कोणाहूनही अधिक सम्यक ज्ञान मिळविले व तिला वळण लावण्याचा मार्ग सुचविला. हीच त्याची खरी थोरवी. आणि म्हणूनच माक्र्सला स्वतंत्र बुद्धीचा विचारप्रवर्तक असे म्हणता येते.

कोणत्याही व्यक्तीचे विचार तिच्या काली अवगत असलेले इतिहासदत्त ज्ञान, आजूबाजूची परिस्थिती व त्या व्यक्तीची स्वत:ची विचारशक्ती या सर्वांवर अवलंबून असते. यादृष्टीनेच ‘महाराष्ट्रात स्वतंत्र विचारांचा अभाव आहे का?’ या प्रश्नाची छाननी करावयास हवी.

या अनुरोधाने विचार करता स्वतंत्र विचारशक्तीला महाराष्ट्रात फारच थोडा वाव आहे असे दिसते. प्रतिकूल परिस्थिती हे त्याचे विशेष डोळ्यांत भरणारे कारण होय. राजकीय पारतंत्र्य आणि आर्थिक अनवस्था ही स्वतंत्र प्रज्ञेला पोषक कशी ठरतील? स्वतंत्र विचारशक्ती अथवा प्रज्ञा ही मनुष्याच्या इतर मानसिक वा शारीरिक शक्तीप्रमाणेच अनुकूल वातावरणात विकास पावते व प्रतिकूल काळात कुंठित होते. महाराष्ट्राची आजची परिस्थिती स्वतंत्र प्रज्ञेला सर्वथैव मारक नसली तरी तिला विशेष पोषक मात्र खास नाही. कर्तृत्व हे विचारांचे अधिष्ठान असते; विचारशक्ती ही प्राधान्य करून हेतुपर (purposive ) असते; कार्यप्रवणता हा तिचा स्वाभाविक विशेष होय. परंतु ज्या समाजात कर्तृत्वशक्तीला विशेषसा अवकाश नाही, त्या समाजात स्वतंत्र विचारशक्तीचा परिपोष योग्य रीतीने व्हावा कसा? महाराष्ट्र हा मूळचाच दरिद्री; निसर्गाची मुळी त्यावर प्रथमपासूनच अवकृपा. अशा स्थितीत मनुष्याने काही धडपड करून कृत्रिम साधनांनी थोडीबहुत औद्योगिक प्रगती केली तरच त्याचा निभाव लागणार. पण ही कृत्रिम साधने इकडे उपयोजून महाराष्ट्राची कार्यक्षमता व उत्पादनक्षमता वाढविण्यास सध्याची परिस्थिती कितपत अनुकूल आहे? तशा अनुकूल परिस्थितीच्या अभावी शास्त्रीय ज्ञानाचा विकास आपल्याकडे विशेष न झाला तर त्यात नवल काय?

आपले शिक्षण हे सर्वस्वी पाश्चात्य पद्धतीने चालले असल्यामुळे पाश्चात्य ज्ञानभांडाराची कोठारे आपल्यासमोर अगदी जलद व सहजासहजी उघडतात. ती नानाविध रत्नांनी इतकी गजबजलेली दिसतात की त्यांत अव्वल मराठी ज्ञानरत्नांची काही आवश्यकता आहे असे आपणास वाटत नाही.

साहजिकच महाराष्ट्रीय विद्वानांचे लक्ष ललित वाङ्मय व तत्त्वज्ञान यांसारख्या कल्पनागम्य विषयांकडे विशेष जावे यात नवल नाही. प्रतिकूल परिस्थितीमुळे कार्यप्रवणतेचा अवरोध झाला तर मानसिक शक्तीने अंतराळात भराऱ्या मारून कल्पनेची शिडे उभारणे साहजिक आहे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की औद्योगिक देशांत कल्पनागम्य विषयांना अवकाश नाही. किंबहुना, पोटापाण्याचा प्रश्न तेथे तितकासा तीव्र नसल्यामुळे कल्पनासमाधी लावण्यास विचारी पुरुषांस अधिक अनुकूलता लाभते. येथे म्हणावयाचे ते एवढेच, की कर्तृत्वशक्तीला वाव नसल्यामुळे पुष्कळसे कार्योद्युक्त व क्रियावान जीव कल्पनासाम्राज्यातील निष्क्रिय विलासात दंग राहतात. आपल्या इकडील विचारवंतांचे आध्यात्मिक ज्ञानाकडे लक्ष अधिक लागते याचे कारण हेच असावे. पण या प्रांतात तरी स्वतंत्र प्रज्ञेचा विलास कितपत  आढळतो? जवळजवळ मुळीच नाही. महाराष्ट्रीय तत्त्वज्ञांची बहुतेक सर्व विचारशक्ती उपलब्ध ग्रंथांवर व सिद्धान्तांवर भाष्य खरडण्यातच खर्च होत असते. पण इथेही इतिहासदत्त ज्ञानाची विशालता व विविधता हेच कारण असावे.

एकंदरीत स्वतंत्र प्रज्ञेचा विलास आपल्याकडे कमीच. भाषांतरे व भाष्ये करण्याकडेच आपल्या विचारवंतांचा कल अधिक झुकतो. पण जगाकडे पाहून ‘मला’ असे वाटते, जगाच्या स्वरूपाबद्दल, जगत्कारणाबद्दल वगैरे ‘माझे’ असे मत आहे असे सांगणारा स्वतंत्र विचारांचा व निर्भीड बुद्धीचा विचारवंत आपल्याकडे विरळा. पण याचा अर्थ आपल्याकडे स्वतंत्र प्रज्ञेचा अभाव आहे हाच का? त्यातली खरी गोष्ट अशी आहे की तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र वगैरेंच्या बाबतीत अगदी मुळापर्यंत जाण्याची व स्वतंत्रपणे विचार करण्याची फारशी ताकद आपणात आलेली नाही व म्हणूनच आपण दुसऱ्यांच्या ग्रंथांची भाषांतरे करून व टीका आणि सारांश लिहून आपले समाधान करून घेतो आणि लोकांचे समाधान करू पाहतो, असे प्रो. वामनराव जोशी म्हणतात, व आपल्याकडे सत्य शोधणारे, सत्य बोलणारे व सत्य ऐकणारे फार थोडे अशी पुस्ती ते जोडतात.

महाराष्ट्राचा गेले दीडशे वर्षांचा इतिहास पाहिला तर आपणात जिज्ञासाबुद्धी व स्वतंत्र प्रज्ञा पाश्चात्यांच्या मानाने बरीच कमी दृष्टीस पडते हे कबूल केलेच पाहिजे. परंतु ही दीडशे वर्षे म्हणजे महाराष्ट्राचा पडता काळच होय हे विसरून कसे चालेल? पेशवाईच्या अखेरच्या काळात केवळ भुरटे कारकून म्हणून आलेले सामान्य टोपीकर लोक किती जिज्ञासू, कार्योद्युक्त, धाडसी व विचारक्षम होते हे पाहिले, किंवा त्यावेळचा आपला समाज किती जिज्ञासाशून्य, आळशी, अविचारी आणि भेकड होता ते अवलोकिले की आंग्ल प्रकृती महाराष्ट्रीय प्रकृतीच्या मानाने स्वभावत:च वरचढ आहे असे वाटू लागते. पण त्यावेळचा मराठी समाज सरंजामशाहीच्या अवनतावस्थेत असून आंग्ल समाज भांडवलशाहीच्या उत्क्रांतावस्थेत होता, हा फरक ध्यानात आणला की दोन प्रकृतींतील या भेदाची उपपत्ती लागते. वस्तुत: स्वतंत्र प्रज्ञा पूर्वी महाराष्ट्रियांत होती व आजलाही ती दिसते, असे सहज सिद्ध करता येईल. महाराष्ट्रात स्वतंत्रता नांदत होती त्यावेळी स्वतंत्र प्रज्ञेचा किती विपुल संचय येथे होता! शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष स्वतंत्र प्रज्ञेचे उदाहरण नव्हते तर कसले?

निर्भीड स्पष्टवक्तेपणाही महाराष्ट्रात काही कमी नाही. लोकहितवादी, जोतिबा फुले, प्रिन्सिपॉल आगरकर वगैरे मंडळी स्वत:ला खरी, पण जनतेला अप्रिय वाटणारी मते किती निर्भयपणे बोलून दाखवीत! तसेच न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या स्वतंत्र बुद्धीची चमकमहाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्रीयेतरांसही किती उत्कटत्वाने दर्शविली. ही पूर्वजांची स्तुती नव्हे. आपल्या पूर्वजांची थोरवी ती त्यांची थोरवी; ते त्यांच्या कर्तृत्वाचे फळ; त्यावर आपण उड्या मारण्यात काही विशेष अर्थ नाही, हे अगदी खरे. परंतु ज्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेबद्दल आधुनिक पिढीनेही अभिमान वाहावा अशा व्यक्ती महाराष्ट्रात या शतकातही जन्मल्या व जगल्या, हेही तितकेच खरे. लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य राजवाडे, गणितज्ञ नारळीकर यांची कर्तबगारी महाराष्ट्रात स्वतंत्र प्रज्ञा अजूनही प्रस्तुतच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत आहे याची नितांतसुंदर साक्ष देत आहे. मग निरनिराळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन स्वतंत्रपणे विचार करण्याची ताकदच आपल्यात नाही अशी तक्रार करण्यात काय अर्थ आहे?

दोन-चार ठळक व्यक्तींचा नामनिर्देश करून काय उपयोग? सर्वसाधारण महाराष्ट्रियांत या स्वतंत्र विचारशक्तीचा अभावच दिसत नाही का? असा प्रश्न या विवेचनावर करता येईल. पण त्याचे उत्तरही काही फारसे अवघड नाही. महाराष्ट्र बुद्धिप्रधान आहे. महाराष्ट्राची बुद्धिमत्ता इतरप्रांतीयांच्या मानाने बरीच तिखट असल्याचे वारंवार प्रत्ययास येते. पण महाराष्ट्र जसा बुद्धिप्रधान आहे तसाच तो दरिद्रीही आहे. किंबहुना, मूळचे दारिद्य्र हेच महाराष्ट्रियांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे कारण असावे. पण हेच दारिद्य्र त्या बुद्धिमत्तेचे कार्यक्षेत्र संकुचित करण्यास, तिला अनिष्ट मर्यादेत कोंडण्यास कारणीभूत झाले आहे. महाराष्ट्रातील जीवनकलहाचे स्वरूप इतके तीव्र आहे की महाराष्ट्राची बरीचशी अव्वल बुद्धिमत्ता त्या विग्रहांतच कामास येते.

महाराष्ट्रात स्वतंत्र प्रज्ञेचा प्राय: अभाव दिसतो, हा आक्षेप नवमतवाद्यांच्या नवविचारांविरुद्ध विशेष दिसतो. ‘पाश्चाात्यांच्या विचारांची ‘उसनवारी’ करून स्वत:च्या बुद्धीचा संसार ही मंडळी सजविते,’ असा पुराणमतवाद्यांचा एक ठराविक आक्षेप असतो. परंतु सांप्रतचे विचार संक्रमण ही केवळ उसनवारी नसून, एक अनिवार्य घटना आहे हे विसरून चालणार नाही. पुराणमतवाद्यांच्या मते, सांप्रतचा नवमताचा वाद पौर्वात्य आणि पाश्चात्य  या दोन संस्कृतींतील झगड्याचे निदर्शक आहे. आणि यामुळे ते स्वसंस्कृतिविघातक म्हणून नवमताचे विरोधक बनतात. पण त्यांची ही समजूत खरी नाही. आजचा नवमतवाद हा पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृतीतील विग्रहाचे द्योतक नव्हे. आपला समाज आज ‘जाति-वर्ण-आत्मक मध्ययुगीन कल्पनांचा व व्यवहारांचा’ त्याग करून स्वातंत्र्य- समतेच्या आधुनिक कल्पनांचा व आचरणाचा स्वीकार करीत आहे. या स्थित्यंतरांचेच प्रत्यंतर सध्याच्या नवमतवादात सापडते. पाश्चाात्य राष्ट्रे या स्थित्यंतरांतून अगोदरच गेली असल्याने त्यांच्या विचारसरणीचा अनुवाद येथे होणे साहजिक आहे. या अनुवादांत परतंत्र प्रज्ञेचा पुरावा शोधू पाहणाऱ्या व्यक्तींना हे समजत नाही, की महाराष्ट्राच्या सांप्रतच्या परतंत्रतेमुळे व प्रतिकूल आर्थिक वगैरे स्थितीमुळे नवमतवाद्यांना ही उसनवारी करावी लागते. परंतु ज्या अर्थी त्यांचे विचार प्राप्त परिस्थितीचे विश्लेषण करावयास समर्थ असतात (किंवा कालत: ते तसे ठरतील), त्या अर्थी त्यांचा उगम पाश्चात्य प्रदेशांत आहे एवढ्याच सबबीवर त्यांची उपेक्षा अगर अवहेलना करणे योग्य होणार नाही. प्रस्तुतची निराशाजनक परिस्थिती जेव्हा बदलेल तेव्हा महाराष्ट्रात स्वतंत्र प्रज्ञेचा प्रवाह अगदी अप्रतिहतपणे वाहील. पण ती परिस्थिती बदलण्यासच पाश्चात्यांच्या ‘उसन्या’ विचारांची मदत घ्यावी लागेल, हे उघड आहे.

(‘आजकालचा महाराष्ट्र : वैचारिक प्रगती’ या प्रभाकर पाध्ये व श्री. रा. टिकेकर यांनी लिहिलेल्या आणि भारत-गौरव ग्रंथमाला या मुंबई येथील प्रकाशन संस्थेने १९३५ साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 12:07 am

Web Title: wilderness independent thinkers maharashtra akp 94
Next Stories
1 रफ स्केचेस  : माझ्यात मी
2 मॉडेर्ना-फायझर लशींची कूळकथा
3   मोकळे आकाश… : कावळे आणि करोना
Just Now!
X