भारतीय चित्रपटसृष्टीला आता शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई ही तर चित्रपटउद्योगाची जननी! स्वातंत्र्यपूर्वकाळात मुंबईत अनेक आलिशान चित्रपटगृहे उभी राहिली. त्यातली रिगल, मेट्रो, इॅरॉस, लिबर्टी, नाझ ही उच्चभ्रू मुंबईकरांची अत्यंत लाडकी. त्याआधीही मुंबईत दुय्यम दर्जाची अनेक थिएटर्स होती. रसिकांना परवडणाऱ्या दरांत येथे फी-१४ल्ल या संज्ञेने ओळखले जाणारे काहीसे शिळे चित्रपट झळकायचे. त्याकाळी आम्हा विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्यासाठी वेगळे पैसे मिळत नसत. त्यामुळे गाजलेल्या चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी पॉकेटमनीतील मोजके पैसे वाचवून आम्ही तेव्हा चित्रपट पाहायचो, ते या दुय्यम दर्जाच्या चित्रपटगृहांतूनच! या चित्रपटगृहांचे दर अल्प असल्याने आमच्या खिशाला परवडणारे होते.
त्याकाळी फारशा जुन्या न झालेल्या फिल्मस्चा आस्वाद घेण्यासाठीचे प्रमुख थिएटर होते ‘डायना’ टॉकीज! ताडदेवच्या नाक्यावर एका पुलाखाली असलेल्या या थिएटरला आमच्यासारख्या मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असे. हे चित्रपटगृह होते एका पारशी धनिकाचे. या गृहस्थाने अश्वशर्यतीवर अफाट पैसा कमावला आणि तो चित्रपट वितरणात ओतला. स्वत:च्या मालकीची चित्रपटगृहे उभारली आणि त्यांना रेसशी संबंधित डायना, डर्बी, स्टार अशी नावे दिली. ही चित्रपटगृहे अत्यंत साध्या बांधणीची आणि कसलाही डामडौल नसलेली अशी होती. तीही मध्यमवर्गीयांच्या वस्तीत! ताडदेवचे ‘डायना’ टॉकिज हे माझ्या घरापासून पंधरा मिनिटांवर असल्याने मी मित्रांसोबत तेथे अनेक गाजलेले चित्रपट माफक दरांत पाहिले. आजच्या चित्रपटांच्या दरांशी त्यांची तुलना केली तर ते हास्यास्पदच वाटतील. थर्ड क्लास- चार आणे (रुपयाचा चतुर्थाश भाग), सेकंड क्लास- पाच आणे, फर्स्ट क्लास-  दहा आणे आणि बाल्कनी- रुपया असे होते प्रवेशदर! पुढचा चार आण्याचा क्लास पडद्याला अगदीच लगटून आणि भंगार वाटावा असा. तिथे लांबच्या लांब सलग बाकडी होती. प्रेक्षकांची गर्दी किती आहे हे बघून त्यांची तिकिटे दिली जात आणि मग त्या बाकांवर खच्चून आसनस्थ व्हावे लागे. प्रेमिकांना एकमेकांच्या बाहुपाशात बसण्याची ही एक प्रकारे सुवर्णसंधीच होती. कारण प्रत्येक आसन वेगवेगळे असे नसेच. तरीही हा क्लास तुडुंब भरत असे.
आमच्यासारखे मध्यमवर्गीय मात्र हा क्लास टाळून पाच आणे दर असलेल्या सेकंड क्लासमध्येच जात असू. पहिल्या बाकडय़ांच्या पाच रांगा सोडल्या की प्लायवुडच्या फोिल्डग खुच्र्या असलेला हा भाग लांबवर पसरलेला होता. त्यामागील भागात कॉपरच्या गाद्या असलेल्या आसनांचा फर्स्ट क्लास. तरीही त्या भागात वरच्या बाल्कनीला सावरणारे खांब (पिलर्स) सिनेमा पाहण्याच्या आड येत असत. या तिन्ही वर्गात कोठलीही आसने राखीव मात्र नसत. एक रुपयेवाल्या बाल्कनीत कुटुंबवत्सल मंडळीच जात. खालच्या भागात जागा पकडण्यासाठी सिनेमागृहाच्या प्रवेशद्वारी रेटारेटी करीत प्रेक्षक प्रतीक्षेत असत. शोची वेळ जवळ आली की डोअरकीपर जाळीचा फोिल्डग दरवाजा खडाखडा वाजवीत उघडत असे. उद्देश हा, की लगटून उभ्या असलेल्या माणसाचा त्यावर रोवलेला हात बाजूला काढावा. दरवाजा उघडला की गर्दीचे लोटच्या लोट पुढे मुसंडी मारत असत. त्यात कुणाला जखम झाली किंवा कुणी पायदळी तुडवले गेले तरी कुणाला त्याची फिकीर नसे.
मिंट रोडवरचे डर्बी आणि माझगावचे स्टार थिएटर्स म्हणजे डायनाची झेरॉक्स कॉपीच! डर्बीमध्ये ऑफिसला दांडी मारून आलेले, पण घरी जाण्याची घाई नसलेले सिनेरसिक गर्दी करीत. मुंबईतील त्यावेळच्या एका विख्यात दैनिकाच्या मुखपृष्ठावर शीर्षकाच्या दोन्हा बाजूंना डायना आणि डर्बीची जाहिरात दर बुधवार आणि शुक्रवारी ठरलेली! या जाहिरातीशिवाय ही थिएटर्स अन्य कसलीही वेगळी जाहिरात करीत नसत. असं असूनही त्यांना प्रेक्षकांची कधीही कमतरता नव्हती. ही दोन्ही चित्रपटगृहे आता बंद पडली आहेत. तरीही त्यांच्या टुमदार इमारती भग्नावस्थेत जुन्या स्मृती जागवतात.
अशीच तीन टुकार थिएटर्स होती फोरास रोडवर. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट आणि सहकाऱ्यांनी पहिले नाटय़गृह उभे केले, ते या भागात. प्रथम ‘ग्रँटरोड थिएटर’ असलेले पुढे झाले बालीवाला थिएटर. आणि मग रंगभूमी ओस पडल्यानंतर तेथे तमाशाचे फड रंगू लागले. पुढे तेही लालबागला स्थलांतरीत झाले आणि त्याचे रूपांतर चित्रपटगृहात झाले. नामांतर झाले- ‘दौलत टॉकीज.’ त्याला लगटूनच आल्फ्रेड आणि निशात ही चित्रपटगृहे होती. या चित्रपटगृहांच्या गुच्छामुळे या भागाला ‘प्ले हाऊस’ असे नाव देण्यात आले. पुढे त्यांचा अपभ्रंश झाला- ‘पिला हाऊस.’ सभोवती रेडलाइट एरिया असल्यामुळे अत्यंत स्वस्त दर असूनसुद्धा कुटुंबवत्सल लोक तिथे जाण्यास कचरत असत. शेजारी नॅशनल टॉकीज नावाचे याच दर्जाचे एक चित्रपटगृह होते. पांढरपेशांना अज्ञात असलेले हे थिएटर मराठी प्रेक्षकांनी गजबजले ते धर्माधिकारांचा ‘बाळा जो-जो रे’ हा चित्रपट तिथे लागला तेव्हा!
मैलभर पुढे सरकले की नागपाडय़ाला ‘अलेक्झांडर’ नावाचे आणखीन एक टुकार टॉकीज लागे. तिथे हॉलीवुडचे गाजलेले इंग्रजी चित्रपट झळकत. या थिएटरबाहेरील फलकांवरची चित्रपटातील उत्तान दृश्ये आंबटशौकिनांना खेचून घेत. ईरॉस वा मेट्रोत असा चित्रपट बघण्यास परवडत नसल्यामुळे अनेक कॉलेजकुमार इथे हमखास हजेरी लावत.
जुना लॅमिंग्टन रोड हा तर चित्रपटांचा एकेकाळी फुललेला गुच्छ! तरीही तिथे आलिशान नाझच्या शेजारी एखाद्या तालुक्याच्या गावात शोभावे असे पडिक थिएटर होते- ‘इम्पीरिअल’! अगदी झकपक नाझच्या बगलेतच! भगवानदादांनी आपल्या दुय्यम भूमिकांतून बाहेर येऊन काढलेला ‘अलबेला’  काहीसा बिचकतच इथे लावला आणि तो अनपेक्षितपणे धो-धो चालला. त्यातील भन्नाट गाण्यांच्या तालावर मधे येऊन नाचणे आणि शिट्टय़ा फुंकत पडद्यावर दौलतजादा करणे, हे या थिएटरचं वैशिष्टय़. ते थिएटर संस्कृतीची शान राखून होतं. मात्र, ‘अलबेला’पासून ‘ठेक्यांच्या संगीताच्या चित्रपटाला लकी’ असा शिक्का त्याच्यावर बसला आणि वर्षभरातच त्याचा दर्जा मूळ पदावर आला. आता तर तो हॉट चित्रपट दाखविण्यापर्यंत घसरला आहे.
या टुकार थिएटर्समध्ये उजवे वाटणारे, तरीही शिळे चित्रपट दाखवणारे ‘एडवर्ड’ हे थिएटर मेट्रोच्या सावलीतही तगून आहे. जुन्या मुंबईची शान राखणारा व्यापारी परिसर आणि त्याला शोभावी अशी पारंपरिक बांधणी. हे थिएटर हेरिटेज वास्तुंमध्ये समाविष्ट होणार असे घाटत असतानाच काही काळ त्याने आपले शटर खाली खेचले आणि सेकंड इनिंगमध्ये नवीन, ताजे चित्रपट दाखविण्यास त्यानं सुरुवात केली.
दक्षिण मुंबईतील या चित्रपटगृहांव्यतिरिक्त वरळीचे गीता, प्रभादेवीचे किस्मत, सातरस्त्याचे ‘शिरीन’, माहीमचे ‘श्री’, वांद्रय़ाचे ‘नेपच्युन’ हीसुद्धा अशीच दुय्यम दर्जाची चित्रपटगृहे. एकेकाळी ही सगळी भरभरून प्रेक्षक खेचत होती. पुढे दूरदर्शनचा पसारा फोफावला. काही आठवडय़ांतच कोरे करकरीत चित्रपट त्यावर दिसू लागले. आणि जुने चित्रपट थिएटरात जाऊन बघायचे तर मग घरीच का बघू नये? अशी लोकांची मानसिकता  झाल्यावर यातली बरीच आता बंद पडली आहेत. जुन्या मुंबईकरांना त्या परिसरातून जाताना खंडहरासारख्या त्यांच्या खाणाखुणांची जाणीव होते. पण एकेकाळी भारतीय चित्रपट लोकप्रिय करण्यात त्यांचाही मोलाचा वाटा होता. मग तो खारीचा का असेना!