25 January 2021

News Flash

‘मारू नका, मला शाळेत येऊ द्या..’

मी खेडय़ातून आलेलो. सहा किलोमीटर डोंगर चढून शाळेला जावं लागायचं. तिथं मी माझं पहिलं गाणं लिहिलं. मला डोंगर चढून शाळेत जायला उशीर व्हायचा. आणि उशीर

| June 16, 2013 12:42 pm

मी खेडय़ातून आलेलो. सहा किलोमीटर डोंगर चढून शाळेला जावं लागायचं. तिथं मी माझं पहिलं गाणं लिहिलं. मला डोंगर चढून शाळेत जायला उशीर व्हायचा. आणि उशीर झाला म्हणून मास्तर चोप द्यायचे. तेव्हा त्या मास्तरच्या विरोधात मी गाणं लिहिलं की-
‘शिस्तीचं सर, जरा बाजूला राहू द्या;
मारू नका, मला शाळेत येऊ द्या..’  
उद्यापासून शाळा सुरू होत आहेत.. ‘शाळेचे दिवस’ हा तसा आपणा सर्वाचाच अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आतडय़ाचा विषय. हृदयात वसलेले हे दोन उत्कट शाळानुभव..
माझं प्राथमिक शिक्षण दोन ठिकाणी झालं. सहावीपर्यंत माझ्या गावी.. महूमध्ये. तिथे सकाळी एक एस. टी. यायची आणि संध्याकाळी एक. गावात गाडी दिसणं ही खूप मोठी गोष्ट होती. आम्ही डोंगरात गुरं चारायला जायचो तेव्हा आम्हाला एस. टी. दिसली की खूप अप्रूप वाटायचं. आम्ही सगळ्या सवंगडय़ांना ती दाखवायचो की- ‘बबब, आली आली!’ असं माझं सह्याद्रीच्या कुशीतलं गाव. शाळा जिल्हा परिषदेची. शाळेला दोनच खोल्या होत्या. दोन खोल्या आणि सहा वर्ग. कधी मारुतीच्या देवळात शाळा भरायची. कधी झाडाखाली. तर कधी खोलीत. शाळेत कधी कधी गावातली गुरंही बांधली जात. घेवडय़ाचा हंगाम आला की गावातले शेतकरी तो कापून शाळेत ठेवायचे. अशी आमची शाळा बहुपयोगी होती. त्यामुळे बहुतेक वेळा शाळा मारुतीच्या देवळातच भरायची. देवळाच्या आतल्या चौकात दलित मुलांना बसू दिलं जायचं नाही. त्यामुळे आम्ही दलित मुलं त्या चौकाच्या बाहेर बसायचो. आमच्यासाठी शाळेत वेगळी पाण्याची व्यवस्था होती.
शाळेत जायचं म्हटलं की, आमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न असायचा तो कपडय़ांचा! इतर वेळी असले काय अन् नसले काय! पण शाळेत जायचं तर कपडे हवेत! कधीमधी पाटलाच्या पोराचे टाकून दिलेले कपडे आम्हाला मिळायचे. तेच आम्ही घालायचो. वह्या-पुस्तकं तर नसायचीच. फुटलेल्या पाटय़ांचे तुकडे आमच्याकडे असायचे. चौथीपर्यंत असा प्रकार होता, की एक मोठा शर्ट घातला की बाकी काही घालायची गरज नसायची. आणि हे काही माझ्या एकटय़ाच्याच बाबतीत नव्हतं;  सगळ्या दलित पोरांच्या बाबतीत हेच होतं.
पूर्ण वेळ शाळा अशी कधी नसायचीच. अर्धा वेळ शेतात, अर्धा वेळ गुरांकडे. त्यातून वेळ मिळाला तर मग शाळेत. त्यामुळे मी पूर्ण शाळा शिकलोय, असं मी कधी कुणाला सांगत नाही. आणि बहुधा त्यामुळेच मी चांगला झालोय. बंद शाळेत शिकलो असतो तर मी वेगळाच माणूस झालो असतो!
सातवीला शाळेसाठी चार किलोमीटर चालत जावं लागायचं. बेलोशीला सातवीचं केंद्र होतं. त्या शाळेत रोज जायला लागायचं. पण मी मात्र कधीमधीच जायचो. तिथे रात्रशाळेलाही जायला लागायचं. सहावीपर्यंत काहीच अभ्यास केला नव्हता. पण सातवीला एकदम केंद्राची परीक्षा होती. सातवीच्या निकालावर शाळेचं भवितव्य अवलंबून. त्यामुळे सातवीला गेलं की पहिल्या दिवसापासून मास्तरजे काही भरडायचे! निरनिराळे मास्तरयायचे. साहेब यायचे. फारच त्रास. त्यात दिवसाची पण शाळा अन् रात्रीची पण. खायला-प्यायला काही नाही. त्यामुळे आमचे वांधे व्हायचे. गुरांकडे जावं की शाळेत जावं? गुरांकडे गेलं तर भाकरी मिळायची. त्यामुळे सातवीला लई उपास पडले. त्यात उपाशीपोटी मास्तर शिकवायचे. त्यामुळे सातवीचे दिवस फार त्रासात काढले. पण आमचा मास्तरचांगला होता. एकदम तरुण मुलगा होता. र.तू. दिघे त्याचं नाव.      डी. एड्.- बी. एड्. करून आला होता. त्यामुळे जरा शास्त्रीय माणूस होता. तो आमच्यावर खूप प्रेम करायचा. दलित मुलांबाबत त्याचं धोरणं चांगलं होतं. पुरोगामी असणार. जेवला का, म्हणून विचारायचा. डब्ब्यातली भाकरी द्यायचा. त्यानं आम्हाला रात्रंदिवस शिकवलं. पहिलीपासून मी काही शिकलो नव्हतो, ते सगळं त्यानं एका वर्षांत शिकवलं.. आणि मी एकदाचा सातवी पास झालो!
आठवीला मी पाचगणीला आलो. पाचगणी हे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचं केंद्र. जगातल्या अनेक देशांतली मुलं तिथं शिकायला येतात. खूप मोठमोठय़ा संस्थांच्या तिथं शाळा आहेत. शाळांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत- त्यांच्या मुलांसाठी पाचगणीला एक वेगळी शाळा आहे. त्या शाळेचं नाव- महात्मा फुले. सगळ्या दलितांची, सगळ्या शाळांमध्ये साफसफाई, भांडी घासणं, कपडे धुणं वगैरे कामं करणाऱ्या,  आजूबाजूच्या हॉटेलांमध्ये कामं करणाऱ्या आणि जवळपासच्या शेतकऱ्यांच्या मुलांची ही शाळा! आमचे आई-बाप काम करणार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये; पण तिथल्या शाळेत आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जाणार ते ‘महात्मा फुले’मध्ये!
मी खेडय़ातून आलेलो. सहा किलोमीटर डोंगर चढून शाळेला जावं लागायचं. तिथं मी माझं पहिलं गाणं लिहिलं. मला डोंगर चढून शाळेत जायला उशीर व्हायचा. आणि उशीर झाला म्हणून मास्तर चोप द्यायचे. तेव्हा त्या मास्तरच्या विरोधात मी गाणं लिहिलं की,
‘शिस्तीचं सर, जरा बाजूला राहू द्या,
मारू नका, मला शाळेत येऊ द्या..
लई अवघड ते इंग्रजी
भल्याभल्यांना पाणी पाजी..’
 लांब डोंगर चढून कसं मला शाळेत यावं लागतं, याचं वर्णन मी त्यात केलं होतं. माझ्या शाळेला डोंगर आडवा येतो, असं मी त्यात लिहिलं होतं. सकाळी उपाशीपोटी डोंगर चढायचा. दुपारी डबा नाही. बारा-साडेबाराला शाळा सुटायची. भूक लागायची. परत घरी यायला अडीच-तीन वाजायचे. घरी आलं तरी खायला असलं तर असलं, नाहीतर उपास घडायचा. मग डोंगरात फळंबिळं खा- असं करावं लागायचं. आई मला म्हणायची, ‘कशाला शाळा शिकतो तू? काय गरज आहे शाळा शिकायची?’ पण मला सातवीपर्यंत शिकल्यानंतर कळलं होतं, की शिकल्यानंतर माणूस मास्तर होतो. मला ती सगळ्यात मोठी पोस्ट वाटायची. मी मास्तर व्हायचं ठरवलं होतं. त्यासाठी मला दहावी पास होऊन बी. एड्. केलं पाहिजे असं मनानं घेतलं होतं.
पाचगणीला शिकत असताना मी एका गॅरेजमध्ये राहायचो. सकाळी शाळेत जायचो. दुपारी गॅरेजमध्ये गाडय़ांचं काम करायचो. फिरायला येणाऱ्या लोकांच्या गाडय़ा धुवायचो. बुटपॉलिशही करायचो. या काळात एका हॉटेलमध्येसुद्धा काम केलं. शाळा सुटली की हॉटेलमध्ये काम करायचो. हॉटेलचं सगळं काम मला येतं. त्यामुळे मी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांवर कधीच रागवत नाही. ते उशिरा ऑर्डर घ्यायला आले, काही सांडलवंड केली तरी त्यांना मी काही बोलत नाही.
पण तिथेही जून महिना आला की मुख्य टेन्शन असायचं ते कपडय़ांचं! शाळेत जायला कपडे तर पाहिजे ना! सेंट पीटर नावाची शाळा होती. तिचा एक धोबी होता. त्याच्याशी आमची चांगली दोस्ती होती. त्या शाळेतल्या काही श्रीमंतांच्या पोरांना दरवर्षी नवे कपडे घेतले जायचे. मग जुने कपडे ते टाकून द्यायचे. ते तसे चांगले कपडे असायचे. कधी कधी फाटकेसुद्धा असायचे. ते आम्हाला मिळायचे. त्या बदल्यात आम्ही धोब्याची हमाली करायचो. भट्टीतून काढलेले ओले कपडे हातगाडीवर टाकून घाटावर न्यावे लागत. घाट चढावर होता. पण आम्ही पोरं पोरं ती हातगाडी चढावरून घाटावर नेत असू. तिथं आमचं बळ पणाला लावत असू.
.. तर असं करत करत मी कसाबसा शिकलो!
मूलत: मला असं वाटतं की, माणसं शाळा नावाच्या चार भिंतींत शिकतात ते एक शिक्षण असतंच; पण शाळेच्या बाहेर एक शाळा असते. शाळेबाहेर राहून जी माणसं सुसंस्कृत होतात, ती काहीतरी योगदान देऊ शकतात समाजासाठी. शाळेत जाऊन माणसं सुसंस्कृत होतातच असं नाही. शाळेचं जे शिक्षण असतं त्यात काही मुलं दडपणाखाली जगतात. त्यातून काही मुलं पुढे जातातही. पण एक नदी जे काही शिकवते, ते भूगोलाचं पुस्तकं नाही शिकवत. एक आंब्याचं झाड शिकवतं, ते जीवशास्त्र नाही शिकवत. एक उपास माणसाला जे शिकवतो, ते अर्थशास्त्र नाही शिकवत. हे सगळे उपास आणि स्त्रोत मला शाळेच्या बाहेर भेटले. उपास घडले त्यावेळी खूप दु:ख झालं. जातिव्यवस्थेचे चटके खाल्ले. पण त्यामुळे पुढच्या काळात मी जातिव्यवस्थेचा जास्त गंभीरपणे विचार करू लागलो. जातीअंताच्या लढय़ाचा भाग झालो.
मी हे असं सगळं सहन केलं म्हणून मुलांना शाळेत पाठवू नये असं माझं मत नाही. शाळा बृहद् करावी. शाळेचा विस्तार वाढवावा. चार भिंतींच्या पलीकडे शाळा जायला हवी. ते मुलांच्या पुढच्या जगण्यासाठी खूप गरजेचं आहे. परंतु हे खूप आदर्शवादी झालं. कुठल्याही संवेदनशील माणसाला असंच वाटेल, की चार भिंतींच्या आतली शाळा काही कामाची नाही. खरंही आहे हे. पण आज ते शक्य नाही.
सुरक्षितरीत्या शिकणाऱ्या माणसांचा मध्यमवर्गात लवकर प्रवेश होतो. ती मुलं लवकर व्यवस्थेचा भाग होऊ शकतात. अर्थात सगळीच तशी होऊ शकतात असं मला म्हणायचं नाही. पण खडतर परिस्थितीत शिकणारी जी मुलं असतात, त्यांना मध्यमवर्गात जाण्याची संधी जरी असली तरी ते ज्या जगात राहिलेले असतात त्याच्याशी त्यांची इमानदारी असते. पण त्यामुळे सगळ्यांनीच दारिद्य््राातून जावं असं मला म्हणायचं नाही. मी ज्या दारिद्य््राातून आलो त्याकडे मी सकारात्मक पद्धतीनेच पाहतो. त्यामुळेच मी सकारात्मक झालो. काय नाकारायचं किंवा आपलं काय शोषणं होतं, यासाठी मला मार्क्‍स वाचावा लागला नाही. फार खोलात जाऊन मला आंबेडकर वाचावा लागला नाही. मी वाचला, पण तेव्हा मला लगेच कळलं की, हा देश नेमका काय आहे! मी चळवळीत आलो तेव्हा मला फार सांगावं लागलं नाही. क्लास घ्यावे लागले नाहीत. कारण मी तेच जगलो होतो.
मुंबईत आलो तेव्हा मी मस्जिद बंदरला एका भज्याच्या गाडय़ावर काम करत होतो. शिकायच्या ओढीने वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयात आलो. कसा? तर कपडे आणि इतर सामान एका पोत्यात भरून! तिथे पी. एम. गायकवाड होते. त्यांना भेटलो. तर ते म्हणाले, ‘बाबासाहेबांनी तुला पत्र पाठवलं होतं का इथे ये म्हणून? या पोत्यात काय आहे?’ मी सांगितलं की, ‘कपडे, पुस्तकं.’ त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मला इंग्रजी फॉर्म दिला. पण तो कसला भरता येतोय! ते पाहून ते म्हणाले, ‘तू शेडय़ुल्ड कास्ट का? मग पैसे नसतीलच!’ मग त्यांनी क्लार्कला सांगितलं, ‘या पोराचा फॉर्म भरून घ्या. सोबत स्कॉलरशिपचाही फॉर्म भरा. आणि स्कॉलरशिपच्या पैशातून अ‍ॅडमिशनचे पैसे वळते करून घ्या.’ फॉर्म वगैरे भरून झाल्यावर ते म्हणाले, ‘जेवला नसशीलच! आणि राहण्याचे काय?’ मी म्हणालो, ‘इथे राहण्याची सोय आहे म्हणून तर आलो.’ तेव्हा ते म्हणाले, ‘बाबासाहेबांनी स्वप्नात येऊन सांगितलं का तुला इथे राहण्याची सोय आहे म्हणून?’ आम्ही तीन-चारजण होतो. आमच्याकडे पाहत ते म्हणाले, ‘हॉस्टेलसाठी एक आय कार्ड लागतं. फोटो लागतो. त्याशिवाय आतमध्ये येऊ दिलं जात नाही.’ आम्ही म्हणालो, ‘आता आमच्याकडे फोटो नाहीत. पण आम्ही नंतर काढू.’ तेव्हा ते म्हणाले, ‘तीन फोटो काढायचे. एक अ‍ॅडमिशनसाठी, एक आय कार्डासाठी आणि एक हॉस्टेलच्या आय कार्डासाठी.’ मग त्यांनी कँटीनवाल्याला बोलावून सांगितलं, ‘या पोरांना जेवायला द्यायचं रोज. आणि एकेकटय़ालाच द्यायचं. ते कुणाला सोबत घेऊन आले तर त्यांना द्यायचं नाही. आणि पैसे त्यांच्या स्कॉलरशिपच्या पैशातून वळते करून घ्या.’ नंतर म्हणाले, ‘वर ग्रंथालय आहे. त्यातून पुस्तकं घ्यायची आणि अभ्यास करायचा.’
अशा प्रकारे मी आंबेडकर महाविद्यालयात दाखल झालो.
.. सांगायचं ते हे की, गायकवाड यांच्यासारख्या संवेदनेची माणसं आता राहिलेली नाहीत. गायकवाड एकटे नव्हते; त्यांच्यासारखे बरेच लोक होते. पण गेल्या २० वर्षांच्या जागतिकीकरणाच्या काळात ही संवेदना संपली आहे. आता कोण कुणाला विचारायला तयार नाही. केवळ पैसा फेको, तमाशा देखो.
आता माझी बालभारतीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर निवड झालीय. त्या विषयाची पाठय़पुस्तकं आम्ही तयार करतो आहोत. आमची समिती अभ्यासक्रम तयार करेल; पण गरीब मुलांपर्यंत त्यातलं काय पोहोचेल? शिवाय अभ्यासक्रमही सर्वाना सारखा नाही. आमच्या पाठय़पुस्तकांच्या दायऱ्यात ज्या शाळा आहेत, त्यात शिकणारी जी गरीब मुलं आहेत, त्या शाळाच आता अस्तंगत होताहेत. त्यांचं रूपांतर खाजगी शाळांमध्ये होतंय. तिथे कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, ते मला माहीत नाही. म्हणजे माझ्यासारखी संवेदनशील माणसं हळूहळू एका ठिकाणी पोहोचतात, तेव्हा ज्यांच्यासाठी काही काम करू पाहतात, तेव्हा तेच नेमके शिल्लक राहतात की नाही, हे सांगता येत नाही. पण हरकत नाही. पाच शाळा राहिल्या तरी त्यांच्यासाठीही आम्ही प्रामाणिकपणे अभ्यासक्रम तयार करण्याचं काम करू.
दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो शिक्षकांचा. सरकारी शाळेतल्या शिक्षकांवर सध्या चहूबाजूंनी हल्ला होतोय. ज्ञानाचं आणि त्यांचं काही देणंघेणंच उरलेलं नाही. त्यात त्यांचा दोष नाही. त्यांचं ज्ञान अत्यल्प. अवांतर वाचन नाही. हे शिक्षक ज्या शाळांत शिकतात, तिथंच अत्यल्प ज्ञान असतं. म्हणून मग या शिक्षकांवर प्रशिक्षणाचा भडिमार केला जातो. त्यासंदर्भात त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. त्यामुळे नव्याचा चोथा होता. या शिक्षकांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यासाठी यंत्रणेमध्ये सर्जनशीलता वाढण्याची आवश्यकता आहे.. तरच नवा माणूस घडेल.
आजची जी विद्यार्थीकेंद्री शिक्षणाची संकल्पना आहे, ती चांगली आहे. ती तळागाळापर्यंत मोठय़ा प्रमाणावर जाण्यासाठी शिक्षकांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. आजचे शिक्षक निर्बुद्ध आहेत असं मला म्हणायचं नाही. पण गेल्या २० वर्षांतल्या बदलांचा वेग पाहता, विद्यार्थ्यांचा वेग पाहता ते शाळाबाह्य शिक्षणाच्या साधनांद्वारेच साधलं जाऊ शकतं. पूर्वी शिक्षक एकच होता. आता मुलांसाठी टीव्ही, नेट, मोबाइल अशा अनेक गोष्टी आहेत. हल्लीचे आई-बाप मुलांशी चांगलं बोलतात, वागतात. ते सजग झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीतलं शिक्षकाचं स्थान ‘वन ऑफ देम’ असं झालेलं आहे. या शाळाबाह्य शिक्षणाच्या साधनांनी काही प्रश्नही निर्माण केलेले आहेत. त्यातल्या माहितीचा ओघ प्रचंड वेगवान आहे. पण ते ज्ञान नाही. शिवाय ती काही प्रमाणात चुकीचीही माहिती आहे. त्यामुळे ते एक प्रकारचं अज्ञानच वाटतं. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो आहे. शाळाबाह्य शिक्षणाची जी साधनं उपलब्ध आहेत, ती सजग करायला हवीत. टीव्ही, इंटरनेट यांचा नीट वापर केला तर त्यातूनसुद्धा संवेदनशील माणूस घडेल. खेडेगावातल्या एकशिक्षकी शाळांकडे, वस्तीशाळांकडे अत्यंत जबाबदारीने पाहण्याची, त्यांना मदत देण्याची नितांत गरज आहे.
दुसरं असं की, एक गडचिरोलीचा विद्यार्थी, एक रत्नागिरीचा, एक पुण्या-मुंबईचा.. या सर्वाना एकाच प्रकारचा अभ्यासक्रम आहे. आणि हेच आजच्या शिक्षकांपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. हिंदू कॉलनी, पेडर रोड इथल्या शाळा वेगळ्या आणि धारावी, गडचिरोली इथल्या शाळा वेगळ्या. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना शिक्षण विकत घेता येतं. पण धारावी, वडगाव, पिंपळगाव इथल्या मुलांनी काय करावं? प्रश्न केवळ धारावीतल्या वा गडचिरोलीतल्या मुलांचा नाही, तर प्रवाहाच्या बाहेरच्या मुलांचा आहे. मी शाळेत जात होतो तेव्हाही खाजगी शाळा होत्या. त्या आज मोठय़ा प्रमाणावर झाल्या आहेत, एवढाच काय तो फरक. पण तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांला आपल्या घासातला घास देत.
गरिबांना आपल्या जगण्यासाठी जो अनेक पातळ्यांवर लढा द्यावा लागत आहे, त्यात शिक्षणाच्या क्षेत्रात घुसलेले दलाल, सम्राट यांच्याविरुद्धचा लढा हा सर्वात महत्त्वाचा आहे. या दलाल व सम्राटांना शिक्षण आणि विद्यार्थ्यांशी देणं-घेणं नाही. त्यांना फक्त पैशाशी देणंघेणं आहे. त्यामुळे हा लढा केवळ शिक्षकांनी उभारून चालणार नाही, तर तो आम जनतेचा लढा असायला हवा. याची जबाबदारी केवळ सरकारवर टाकून चालणार नाही. खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवायला पाठवणारे पालकही तिथे आपल्या मुलाचं काय होणार, याविषयी अनभिज्ञ असतात. यातून ते केवळ आपली जबाबदारी इतरांवर सोपवतात असं मला वाटतं. त्यामुळे शिक्षणातले प्रश्न केवळ शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाहीत, ते आम जनतेचे आहेत. जसा पाण्याचा प्रश्न आहे, तसाच शिक्षणाचाही प्रश्न आहे. तितकाच निकडीचा आणि अनिवार्य. त्यामुळे शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरुद्ध लढा उभारायलाच हवा. फुले- शाहू- आंबेडकरांचं नाव घेऊन या युगात व्यापारच होत असेल तर दुसरं काय करायचं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2013 12:42 pm

Web Title: writer poet and shahir sambhaji bhagats school memories
Next Stories
1 झाली घंटा.. आता शाळा सुरू!!
2 आत्महत्या : असंवेदनशीलतेची परिणती
3 दक्षिणेतील नवग्रह मंदिरे
Just Now!
X