संध्याकाळचे सात वाजत आलेले असतात. ‘रुदरिवोली’चा परिसर माणसांनी गजबजलेला असतो. दुकाने आणि कॅफे गर्दीने फुलून गेलेले असतात. ‘कॅफे ला फेवरिट’मधल्या कोपऱ्यातल्या एका टेबलापाशी जॉन बसलेला असतो. कॉफी घेत, इतर लेखकांची वाट पाहत समोरील कागदांवर नजर फिरवत त्याचे वाचन सुरू असते. आत शिरताच मी त्याच्याशी हस्तांदोलन करतो आणि आमच्या गप्पा सुरू होतात. हळूहळू एक-एकजण यायला लागतो. एकमेकांशी ओळख होते. प्रत्येकाने आणलेल्या आपापल्या लेखनाचे कागद हळूहळू बाहेर निघू लागतात आणि चर्चेला सुरुवात होते. गेली अकरा वर्षे जॉन पॅरिसमध्ये एक छोटा लेखनकट्टा चालवतो आहे. तो मूळचा कॅलिफोर्नियाचा. काही वर्षांपूर्वी तो पॅरिसमध्ये स्थायिक होण्यासाठी आला. कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधील त्याचे करिअर सोडून पूर्ण वेळ लेखनाकडे वळावे यासाठी तो इथे आला. आधी या लेखनकट्टय़ामध्ये तो भाग घेत होता. नंतर तो त्याचे संयोजन करू लागला. माझ्या एका हंगेरियन मैत्रिणीमुळे माझी जॉनशी आणि या लेखनकट्टय़ाशी ओळख झाली. केवळ साहित्य न वाचता, ६१्र३्रल्लॠ ं२ ंल्ली७ी१२्र९ी कसे असेल, या उत्सुकतेतून मी या उपक्रमाचा अनुभव घेतला.
पंधरा-वीस जणांचा हा लहानसा गट आहे. दर पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून एका संध्याकाळी हे सर्व लेखक एकत्र भेटतात. यासाठी तुम्हाला कोणती मेंबरशिप घ्यावी लागत नाही, कोणते आमंत्रण असावे लागत नाही, की काही फीदेखील द्यावी लागत नाही. यातील काहीजण अनेक वर्षे येत आहेत, तर काही चेहरे नवीन असतात. प्रत्येकाने आणलेले लेखन इतरांपुढे मांडण्यासाठी एक मंच मिळावा, हा यामागचा उद्देश. इंग्लिश वा फ्रेंच- कोणत्याही भाषेतील आपण लिहिलेले छोटे लेख किंवा उतारे इतरांसमोर वाचायचे आणि त्यांनी त्याविषयीची आपली टिप्पणी नोंदवायची, त्यावर चर्चा करायची. प्रत्येकाने आपल्या लेखनापैकी जास्तीत जास्त दोन ते चार पानांचे वाचन करायचे; जेणेकरून सर्वाना आपले वाचन सादर करायची संधी मिळेल, असा नियम. या कट्टय़ाचे वैशिष्टय़ हे, की प्रत्येक वेळी लेखनातील विषय व शैलीचे वैविध्य अनुभवावयास मिळते. यातल्या प्रत्येकाची पाश्र्वभूमी निराळी. कुणाचे बरेच लेखन प्रसिद्ध झालेले, तर कुणी होतकरू लेखक! कुणी चित्रपटाचे वा नाटकांचे दिग्दर्शक, तर कुणी शाळेत शिक्षक- ज्यांना लेखनात नवीन प्रयोग करून पाहावेसे वाटतात. कधी कोणी नाटकाची संहिता आणलेली असते, तर कोणी प्रवासवर्णन. कधी लघुकथा, तर कधी स्मृतीलेखन. कधी तर अगदी मनात आलेले विचारदेखील कोणी कागदावर लिहून आणलेले असतात. ग्रीसमधील एखाद्या खेडय़ातील वर्णनापासून ते अमेरिकेतील एखाद्या सरोवराच्या परिसरातील घटना, फ्रान्सचे राष्ट्रीय ग्रंथालय ते स्वकल्पित रहस्यकथा.. इतका विषयांचा आवाका असतो. एकदा एका लेखकाने ‘अो१ॠ ढ१्रल्लूी२२’ या कवितेच्या ओळी आणि त्याआधारे गुंफलेली कथा असा लेख वाचल्याचे आठवते. कथेत अत्यंत चपखलपणे गुंफलेल्या कवितेच्या ओळी ही त्याची शैली सर्वाना विशेष भावली होती.
वाचनाअंती येणाऱ्या इतरांच्या टीकाटिप्पण्याही अतिशय महत्त्वाच्या ठरतात. कधी कोणी लिहिलेले एखादे अत्यंत क्लिष्ट वाक्य सोपे, सहज समजेल असे करण्यासाठी बदल सुचवले जातात, तर कधी अतिशय साधी ओळ प्रभावीरीत्या कशी लिहिता येईल याचेही मार्गदर्शन मिळते. लेखक ज्याविषयी लिहू पाहत आहे त्याचा आशय वाचकांपर्यंत नेमकेपणाने पोचतोय का, याची खात्री या चर्चेमुळे लेखकाला मिळते. व्याकरण आणि योग्य शब्दांचा वापर याकडेही लक्ष देऊन त्याबद्दल सूचना केल्या जातात. सौम्य शब्दांत टीका वा सूचना केल्यास लेखकाला त्याचे काय चुकतेय, हे कळतेच; शिवाय त्याचे मनोबल न खचता अधिक चांगले लिहिण्यासाठी त्याला मदत होते. आपण आपले लेखन वाचून दाखवल्यामुळे उत्तम वाचावे कसे, याचीही सवय होते. वेगळ्या पुस्तकांविषयी आणि इतर लेखकांच्या साहित्याविषयीही मग ओघानेच चर्चा होते आणि आपल्या माहितीत भर पडते.
साहित्यिक व कलाकारांनी असे एकत्र येऊन कलेसाठी व्यासपीठ निर्माण करणे युरोपात काही नवीन नाही. अगदी फ्रान्समधलेच सोळाव्या शतकातल्या ‘प्लेइआद’ नावाच्या कवींच्या गटाचे उदाहरण देता येईल. रेनेसांस काळात फ्रेंचचा कलेच्या प्रांतातील प्रचार व कवितेचे नवे प्रकार प्रचलित करण्याच्या उद्देशाने सात फ्रेंच कवींनी मिळून हा गट स्थापन केला होता. त्यानंतरदेखील असे फ्रेंच साहित्यिकांचे चर्चागट निर्माण होत राहिले. नंतरच्या काळात इतर देशांतून- मुख्यत्वे अमेरिकेतून अनेक लेखक आणि कलाकार युरोपमध्ये येऊन वसले. कला, साहित्याचे जागतिक माहेरघर असलेले पॅरिस हे त्यांचे विशेष आवडीचे ठिकाण राहिले आहे.
गेत्रुड स्टेईन, एझरा पाउंड, स्कॉट फित्झेराल्ड, अर्नेस्ट हेमिंग्वे यांसारख्या अनेक लेखकांची कारकीर्द पॅरिसने पाहिली. त्याकाळी ‘शेक्सपिअर अँड को.’ या पॅरिसमधील अतिशय जुन्या आणि प्रसिद्ध अशा पुस्तकांच्या दुकानात या लेखकांचे मेळावे भरत. केवळ फ्रेंच साहित्याचाच तिथे प्रभाव असतानाही हे एकमेव असे दुकान होते, जिथे इंग्लिश पुस्तके मिळत आणि लेखक गट जमत असत. तिथे घडणाऱ्या चर्चा आणि प्रसंग या साऱ्याची वर्णने आपल्याला हेमिंग्वेच्या ‘अ मूव्हेबल फिस्ट’मध्ये वाचायला मिळतात. तेव्हापासून आजतागायत साहित्याची युरोप-अमेरिकेतील देवाणघेवाण सुरू आहे. आजही जॉनसारखे अनेक नवोदित वा प्रसिद्धी पावलेले लेखक युरोपात येताना दिसतात. इथे येऊन त्यांना लेखक गट जमवावेसे वाटतात. लेखनासाठी आवश्यक पोषक वातावरण व इतर लेखकांशी होणाऱ्या विचारांच्या देवाणघेवाणीमुळे येणारी वैचारिक समृद्धी या लेखकांना युरोपात लाभते. त्यामुळेच आजदेखील ते युरोपात येऊन स्थायिक होणे पसंत करतात. युरोपातील राहणीमान, कलेला मिळणारे महत्त्व आणि साहित्यिकांना लाभणारी प्रतिष्ठा हेही यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
सर्व कलांमध्ये साहित्य ही कला अन्य कलांपेक्षा श्रेष्ठ आहे असे काही तत्त्वज्ञ मानतात. याचे कारण साहित्यातून एकाच वेळी आपण इतिहासात, भविष्यात, वर्तमानात, विश्वाच्या कोणत्याही जागी आणि मानवी मनाच्या अंतरंगातही मुक्त संचार करू शकतो. पॅरिसमधील लेखक गटातून मी याचा अनुभव घेऊ शकले. अप्रत्यक्षपणे आपण लेखकाचा अनुभव जगू शकतो, हे जाणवले. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून या उपक्रमात सामील झाल्यावर मी अनुभवांच्या नव्या दालनात पोहोचते आणि साहजिकच त्यातून मला लिहिण्यासाठीही नवी ऊर्जा मिळते.
priyankardevi@gmail.com