14 October 2019

News Flash

तरुण संगीतकारांचे युव (स्वर) दर्शन

मुंबई दूरदर्शन केंद्रावरील एक निर्माते अरुण काकतकर यांनी कधीतरी ‘बदकांचे गुपित’चा प्रयोग पाहिला आणि त्यांनी ते संगीतक मुंबई दूरदर्शनवर सादर करायचं मनोमन ठरवलं. १९७७ च्या

| June 16, 2013 12:35 pm

मुंबई दूरदर्शन केंद्रावरील एक निर्माते अरुण काकतकर यांनी कधीतरी ‘बदकांचे गुपित’चा प्रयोग पाहिला आणि त्यांनी ते संगीतक मुंबई दूरदर्शनवर सादर करायचं मनोमन ठरवलं. १९७७ च्या जून महिन्याच्या अखेरीस कधीतरी तेव्हा मुंबई दूरदर्शन केंद्रावर ध्वनिमुद्रक म्हणून कार्यरत असलेल्या गायक रवींद्र साठेनं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये पाच-सहा मायक्रोफोन्सच्या मदतीनं, केवळ हेडफोनवर गायन आणि वाद्यवृंद यांचा सुयोग्य मेळ साधत मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या कुशल वादकांच्या सुरेल साथीनं सर्व नट मंडळींच्या गाण्यांचं अप्रतिम ध्वनिमुद्रण केलं. (या ध्वनिमुद्रणात मी स्पॅनिश गिटार आणि व्हायोलिनसह कोंगो, तबला, ढोलकी, ढोलक आणि पूरक छोटी तालवाद्ये यांचाही वापर केला.) आणि लगेचच काकतकरांनी दृक्श्राव्य चित्रीकरणही संपवलं. त्यापाठोपाठ पुणे आकाशवाणी केंद्रानंही ‘बदकांचे गुपित’चं ध्वनिमुद्रण केलं. अशा तऱ्हेनं ‘बदकांचे गुपित’ आकाशवाणी पुणे केंद्रावरून आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित झालं.
असंख्य रसिकांनी पत्रांद्वारे, फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून भरभरून दाद दिली. तोवर मी आकाशवाणीचा मान्यताप्राप्त संगीतकार नव्हतो. आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यरत ज्येष्ठ संगीतकार मधुकर गोळवलकर ‘महानिर्वाण’चा प्रयोग पाहिल्यापासून मी संगीतकाराची ऑडिशन द्यावी म्हणून पुन:पुन्हा सांगत होते. ‘बदकांचे गुपित’चे ध्वनिमुद्रण खुद्द गोळवलकरसरांनी केले आणि माझ्याकडून ऑडिशनचा फॉर्म भरून घेतला. त्याच दरम्यान माझे ‘बदकांचे गुपित’चे संगीत आवडून माझ्या प्रेमात असलेल्या मुंबई दूरदर्शन केंद्राच्या अरुण काकतकरांनी ‘मराठी युवदर्शन’ या कार्यक्रमात तरुण संगीतकारांच्या रचना सादर करताना मला माझं गाणं सादर करायची संधी दिली.
युवा संगीतकारांची नवीन गाणी सादर करणाऱ्या या कार्यक्रमाकरिता गीत निवडताना मी अनेक काव्यसंग्रह पालथे घातले आणि कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ‘रंग माझा वेगळा’ या काव्यसंग्रहातील अनेक गझला बाजूला सारून एक अतिशय वेगळं, पण आशयघन गीत मी निवडलं. ‘‘असेच हे कसेबसे कसे तरी हसायचे.. कुठे तरी कधी तरी असायचे नसायचे..’’ चाल करताना संगीतकार मदनमोहन साहेबांची शैली माझ्या मनात कुठं तरी होती ती गाण्यात तत्त्वरूपानं उतरली.. (मी नेहमी माझ्या आवडत्या संगीतकारांच्या शैलीतले अगर गाण्यातले तत्त्व अनुसरण्याचा प्रयत्न केला, पण चुकूनही चालीची चोरी कधीही केली नाही.)
संगीतकार चंदावरकरांच्या ‘नक्षत्रांचे देणे’मध्ये आपल्या सुरेल आणि कोवळय़ा सुरात सुंदर गाणाऱ्या रंजना पेठेकडून ते गाणं गाऊन घ्यायचं मी ठरवलं. गाण्याच्या ध्रुवपद आणि पहिल्या अंतऱ्याची चाल करून मी रंजनाच्या घरी तिला शिकवायला गेलो. त्यानंतर पुढल्या तीन रिहर्सल्समध्ये पुढल्या दोन्ही अंतऱ्यांच्या चाली स्वरबद्ध करून ते गाणं रंजनाच्या मनावर आणि गळय़ावर चढवलं आणि तिनंही ते गाणं त्यातल्या उत्कट भावांसह आणि चालीतल्या मुश्कील अंदाजांसह आत्मसात केलं. आता माझा या गाण्याच्या वाद्यवृंद संकल्पनेचा विचार सुरू झाला. व्हायोलिन, संतूर, सतार, तबला, स्पॅनिश गिटार, व्हायोब्रोफोन ही वाद्यं वाजवणाऱ्या मुंबईच्या सिनेसृष्टीतल्या वादकांबरोबर मुंबई दूरदर्शन केंद्रावर वादक म्हणून कार्यरत असलेल्या इक्बाल अहमद (सारंगी) आणि शामू परसतवार (विविध तालवाद्ये) या वाद्यमेळाचा विचार डोक्यात ठेवून मी गाण्याच्या आरंभीचा संगीतखंड आणि प्रत्येक अंतऱ्यापूर्वीचा संगीतखंड याचं स्वरलेखन केलं. गाण्याच्या पहिल्या मात्रेपासून शेवटापर्यंतच्या संगीतसंहितेचा तक्ता तयार केला. कार्यक्रमातल्या सहभागी संगीतकार अस्मादिक, श्रीधर फडके, जयंत ओक आणि विवेक लागू यांची गाणी आधी ध्वनिमुद्रित करून मग त्याचं चित्रीकरण करायचं निर्माते अरुण काकतकरांनी योजलं होतं.
ध्वनिमुद्रण मुंबई दूरदर्शन केंद्राच्या छोटय़ाशा हॉलवजा स्टुडिओत होणार होतं. ध्वनिमुद्रणाच्या दिवशी मी मुंबई दूरदर्शन केंद्रावर पोहोचलो.
..हळूहळू वादक मंडळी येऊ लागली. बाबा पानसे हा अतिशय तरुण उमदा वादक तबल्यावर होता. संतूर वाजवायला सुरेंद्र शर्माजी होते. सतारीवर कोण होतं स्मरत नाही, पण बासरीवर सुधीर खांडेकर, स्पॅनिश गिटारवर श्यामकांत परांजपे, व्हायब्रोफोनवर फारूखभाई होते. मुंबई दूरदर्शन केंद्राचे इक्बाल अहमद सारंगीवर, तर शामूजी परसतवार साइड ऱ्हिदमवर, अशी योजना झालेली.
वादकांबरोबर गाण्याच्या सुरुवातीचा आणि तीन अंतऱ्यांपूर्वीचे संगीतखंड यांचं स्वरलेखन देऊन तालमी घेऊ लागलो. बाकी कुणाला अडचण नव्हती, पण एकल व्हायोलिनकरिता काढलेल्या पहिल्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडातली स्वरावली मला अभिप्रेत असलेल्या लयीच्या अंदाजानं वाजवणं त्या वादकाला झेपेना. शेवटी मला त्याला ती स्वरावली सोपी करून द्यावी लागली. तीच अवस्था ध्रुवपदगायनाच्या सुरावटींबरोबर समांतरपणे वाजवल्या जाणाऱ्या संवादी सुरावटींची- ज्याला आम्ही अडचणींवर मात करण्याचा अनुभव तर माझ्या पहिल्यावहिल्या व्यावसायिक वाद्यवृंद संयोजनात मला खूप काही शिकवून गेला, पण त्याहून शिकवून गेला ते उपलब्ध वादकांची कुवत लक्षात घेऊन वाद्यवृंदाचं संकल्पन करणं आणि त्यातूनच सर्वोत्तम परिणाम साधणं. गायिका रंजना पेठेसह सर्व वादकांच्या २-३ तालमीनंतर अखेर ध्वनिमुद्रण सुरू झालं. सुरुवातीची अर्धी ओळ रंजना तालाशिवाय व्हायब्रोफोनच्या साथीत मुक्तपणे गायली. पाठोपाठ एकल व्हायोलिनची सुरावली. त्यानंतर तीन व्हायोलिन्सची सुरावट आणि संतूरबरोबर त्यांची गुंफण. रंजना ध्रुवपद अतिशय समरसून गाऊ लागली. पहिल्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडाच्या अखेरी वाजणाऱ्या संतूरच्या छोटय़ाशा तीन मात्रांच्या लकेरीनंतर रंजनानं ‘‘अशीच येथली दया..’’ अशी अंतऱ्याची सुरुवात करणं अपेक्षित होतं, पण रंजना सुरू करत नाहीसे पाहून तबलावादक बाबा पानसेनं तबल्यावर एक सुंदर उठाण घेताना मी रंजनाला हातानं इशारा केला. रंजनानं अंतरा सुरू केला आणि रंजना गात गेली.. अप्रतिम गायली. गाणं संपल्यावर ध्वनिमुद्रक रवींद्र साठेनं केवळ हेडफोनवर ऐकत रंजनाचा आवाज आणि सर्व वादकांच्या स्वर-ताल मेळाचं अतिशय सुंदर केलेलं ध्वनिमुद्रण दूरदर्शन केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षातल्या मोठाल्या स्पीकर्सवर ऐकताना सर्व वादक मंडळी परस्परांना आणि विशेष म्हणजे बाबा पानसेच्या आयत्या वेळी वाजवलेल्या सुंदर तुकडय़ाला दाद देत राहिलीच, पण माझ्या सुंदर चालीची, रंजनाच्या सुरेल भावपूर्ण गाण्याची आणि रवींद्र साठेच्या ध्वनिमुद्रणकौशल्याचीही तारीफ करत राहिली. माझ्यानंतर जयंत ओकच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण होतं. मी मात्र विवेक लागूबरोबर त्याच्या मुक्कामी रवाना झालो, कारण पुढच्या दिवशी होणाऱ्या त्याच्या गाण्याचं वाद्यवृंद संयोजनही मलाच करायचं होतं. विवेकचं गाणं तेव्हाचा उदयोन्मुख आणि आजचा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक सुरेश वाडकर गाणार होता. मी माझ्या अनुभवावरून बोध घेत सारंगी, बासरी, सतार आणि संतूर यांचा संगीतखंडांत प्रामुख्यानं वापर केला आणि व्हायोलिन्सवर ध ऽऽ नि ऽ सा ऽ आणि ग ऽऽ म ऽ प ऽ अशा दोनच स्वरावली गाणंभर पेरल्या. गीतातला भाव मुख्यत्वेकरून बासरीच्या खर्ज आणि मध्य सप्तकातल्या स्वरावलीतून मांडला. सारंगी संपूर्ण गाण्याला संवादी सुरातून वेढून राहिली. तर संतूर आणि सतारीवर काही आघातयुक्त स्वरावली अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात गुंफल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम विवेकच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण योजल्यानुसार सुरू झालं. वादकांना स्वरलेखन देऊन रिहर्सल सुरू केली. गाण्याच्या सुरुवातीची बासरीवर खर्ज सुरातली भावगर्भ सुरावट सुधीर खांडेकर अत्यंत उत्कटतेनं वाजवत असताना माझ्याबरोबर वाद्यवृंद संचालन करणारा विवेक आतून कुठेतरी हलला होता आणि मूकपणे माझा हात हातात घेऊन स्पर्शातून ते मला सांगू पाहात होता. सुरेशच्या सुरेल आणि भिजलेल्या स्वरांनी गाण्यात प्राण फुंकले आणि एक सुंदर गाणं साकारलं. माझं आणि विवेकचं, अशा दोन गाण्यांचं वाद्यवृंद संयोजन मी केलं होतं. तर श्रीधर फडकेंच्या गाण्याच्या वाद्यवृंद संयोजनासाठी खुद्द ज्येष्ठ/ श्रेष्ठ वाद्यवृंद संयोजक आदरणीय श्यामरावजी कांबळे जातीनं उपस्थित होते. या सर्व गाण्याचं ध्वनिमुद्रण रवींद्र साठेनं ५-७ मायक्रोफोन्सच्या मदतीनं केवळ कानावरल्या हेडफोनवर ऐकत केलं. त्यानं संपूर्ण वाद्यवृंद आणि गायकाचा स्वर यांचा असा काही सुंदर मेळ घातला की त्या ध्वनिमुद्रणाचा दर्जा कुठल्याही व्यावसायिक स्टुडिओच्या तोडीस तोड झाला आणि हे माझंच नव्हे, तर नामांकित ध्वनिमुद्रकांचं मत होतं.
.. आणि स्वत: गायक असलेल्या ध्वनिमुद्रक रवींद्र साठेनं मोठय़ा उमद्या मनानं सुरेश वाडकरच्या गाण्याचं केलेलं अप्रतिम ध्वनिमुद्रण ऐकल्यावर सुरेशनं रविला मिठी मारून जी दाद दिली, तो क्षण फार सुंदर होता.

First Published on June 16, 2013 12:35 pm

Web Title: young musicians