News Flash

अरतें ना परतें… : आतल्या आवाजांचा गलबला

तो एक क्षण संपला की आपण पुन्हा नवे आणि आधीच्यापेक्षा वेगळे होतो.

|| प्रवीण दशरथ बांदेकर

आपला ‘आतला आवाज’ म्हणजे नक्की काय असतं? काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका कविमित्राने विचारणा केली होती. त्याला अचानक असं हे का विचारावंसं वाटलं, माहीत नाही. तसंही समाज माध्यमांवर कुणी, कधी, काय विचारणा करावी याविषयी काही ठरलेले संकेत नाहीत. खुला चव्हाटाच असतात ही माध्यमं. त्यामुळे ज्याला त्याला जशी सवड नि आवड असेल तसा जो- तो व्यक्त होत असतो. तसंच हे झालं असावं. ते काहीही असो, पण यानिमित्ताने अनेकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. कुणी कुणी आपले काहीबाही अनुभवही यानिमित्ताने सांगितले होते. काहींना महात्म्यांच्या आतल्या आवाजाची आठवण झाली होती. महात्मा गांधीही अनेकदा बोलताना आपल्या ‘आतल्या आवाजा’चा हवाला देत असत. गांधींना अभिप्रेत असलेला त्यांच्या लेखी या संकल्पनेचा अर्थ म्हणजे कदाचित त्यांच्या अंतरंगाचा आवाज हा त्यांच्या आत्म्याचा आवाज असू शकत होता. त्यामुळेच तो त्यांच्या नैतिक विवेकाचाही आवाज म्हणता आला असता. भवतालाच्या कोलाहलात आपण अनेकदा गोंधळून गेलेलो असतो. काय बरोबर, काय चुकीचं हे ठरवता येणं कठीण बनलेलं असतं. कोणत्या दिशेनं जावं, कुणाचं ऐकावं, काय केलं म्हणजे पुढचा स्वच्छ प्रकाश दिसेल… काहीच कळत नसतं. पण नुसतंच हातावर हात घेऊन निमूट राहणंही शक्य नसतं. काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार असतो. काहीतरी कृती करणं भाग असतं. अशावेळी आपण काय करतो? कुणाचं ऐकतो? कुणावर विसंबून पुढचं पाऊल टाकतो? कदाचित त्या निर्णायक क्षणी आपण ज्याचं ऐकतो नि अंधारात उडी घेतो, तोच तर आपला आतला आवाज नसावा ना?

हा आतला आवाज एक असतो की अनेक असतात? एकच आतला आवाज प्रत्येक वेळी आपल्यासाठी धावून येत असावा, की त्या- त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे आतले आवाज बदलत असावेत? प्रत्येक प्रसंगात आपण आधीच्या वेळचेच असतो असं म्हणता येत नाही. तसंच हे आतल्या आवाजाचंही असावं का? तो एक क्षण संपला की आपण पुन्हा नवे आणि आधीच्यापेक्षा वेगळे होतो. अधिक परिपक्व, अधिक समृद्ध आणि टक्केटोणपे खाल्ल्याने अधिक समंजस झालेले. आपल्यासोबत आपला आतला आवाजही असाच बदलत गेलेला, अधिक शहाणा, जाणता झालेला असू शकतो का? यातल्या कशाविषयीच आपल्याला काही ठामपणे सांगता यायचं नाही. पण एक खरं आहे, यानिमित्तानं आपण आपल्या या आतल्या आवाजाचा शोध तरी नक्कीच घेऊ शकतो. आपण कधी ऐकलाय आपला आतला आवाज, हे आपलंच उत्खनन करत धुंडाळू शकतो. अशा एखाद्या ‘कर नाही तर मर’च्या निर्णायक क्षणी आपण जी काही कृती केली होती, जे वागलो होतो, ते अर्थात चूक होतं की बरोबर, हा प्रश्न अलाहिदा; पण तेव्हाचा तो निर्णय घेताना आपण आपल्या आतल्या कुणाशी संवाद साधला होता, हे आठवू पाहणं तरी आपण करू शकतो.

आपलं सामान्य माणसांचं सोडा; आपल्या रोजच्या अतिसामान्य जगण्याच्या धबडग्यात, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या असंख्य तडजोडी आणि छोट्या-मोठ्या संघर्षात असा काही विचार करत बसायला आपल्याला शक्य होईलच असं नाही. किंवा आपल्या अशा आतल्या आवाजाचं ऐकून काही निर्णय घेण्यानं फार फार तर आपल्या वैयक्तिक जगण्यात, किंवा थोडं पुढे जायचं झालं तर आपल्याशी संबंधित चार-दोन कुटुंबीयांच्या जगण्यात फरक पडू शकतो असं म्हणता येईल. त्यापेक्षा फार मोठं काही घडून येण्याची शक्यता फारच कमी असते. खरं तर आपली कुवतही नसते तेवढी, हेही मान्य करता येईल. पण आपल्या आजूबाजूच्या अनेक डोंगराएवढ्या माणसांचं काय? ती कसा विचार करत असतील? कुठल्या आवाजाचं ऐकत असतील? ही अशी माणसं असतात की त्यांच्या एखाद्याही छोट्या कृतीमुळे समाजजीवन ढवळून निघू शकतं. त्यांच्या वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या निर्णयामुळे भविष्यातील समाजरचनेमध्ये केवढी प्रचंड उलथापालथ होणार असते! जगभरच्या इतिहासातल्या अनेक व्यक्तींच्या जीवनातले काही असे निर्णायक क्षण आठवून पाहा. त्या एका क्षणाच्या पोटात भविष्यातली किती काय काय उलथापालथ सामावलेली होती, हे आता इतक्या वर्षांनंतर तर नक्कीच नीटपणे तपासून पाहता येईल. उदाहरणं द्यायचीही गरज नाही, इतके असंख्य प्रसंग आपल्याला आठवू शकतात. अमुक एका हुकूमशहाने अमुक एक निर्णय घेताना आतल्या आवाजाचा कौल घेतला असता तर काय झालं असतं? अमुक एका युद्धात अणुबॉम्ब टाकायचा निर्णय घेताना आपल्या कुठल्याच आवाजाला विचारात घ्यावंसं कुणालाच कसं वाटलं नसेल? किंवा मिठाईच्या पेटाऱ्यात बसून सुटका करून घेता येईल, हे महाराजांना त्यांच्या आतल्या आवाजानेच सुचवलं असावं का?

इतिहासाचं ओझं वागवताना काहींना काहीसं अवघडल्यासारखं वाटतं, तर ते समजून घेता येईल. पण मग अभिजात साहित्यातली उदाहरणं बघितली तरी हेच नाही का दिसून येत तिथंही? वाल्मिकीबाबाचं रामायण असो, नाहीतर व्यासांचं महाभारत- ठायी ठायी इतके रस्ता चुकून भरकटत गेलेले, हरलेले, पराभूत झालेले महापुरुष आणि महास्त्रिया भेटतात, की वाटत राहतं- यांच्यापैकी कुणीच कसं त्यांच्या आतल्या आवाजाचं ऐकलं नसेल? द्युतासाठी कौरवबंधूंना निमंत्रित करताना युधिष्ठिरासारख्या विवेकी पुरुषालाही आपल्या आतल्या आवाजाला साद घालावीशी का वाटली नसेल? पुढे घडून येणाऱ्या उत्पाताचे धूसरसेही संकेत आतल्या आवाजाकडून त्या धर्मराजाला कसे मिळाले नसावेत? किंवा त्या कुण्या धोब्याच्या कुजबुजीवरून सीतामाईंना त्यांच्या त्या अवघडल्या दिवसांत रानात सोडून येण्याचा कठोर निर्णय घेताना प्रभू रामांच्या आतल्या आवाजाने जराही आक्रोश केला नसेल का? बरं, ही पुराणातली वानगी जाऊ द्यात… थोडा अलीकडचा विचार करू. डॉ. फॉस्टस् आठवतोय? हो, तोच… शेक्सपिअरला समकालीन असलेल्या ख्रिस्तोफर मार्लोचा मानसपुत्र! काय कमी होतं त्याला? नावलौकिक, पैसा, सर्व प्रकारची सुखं… सगळं त्याने आपल्या कर्तृत्वानं, बौद्धिक कष्टानं मिळवलं होतं. लोकांनाही किती कौतुक होतं त्याचं. एका अर्थी आयडॉलच होता तो प्रत्येकासाठी. तरीसुद्धा सैतानाला आपला आत्मा विकण्याची दुर्बुद्धी त्याला का झाली असावी? भली भली माणसंही का अशी माती खात असावीत?

मार्लो म्हणतो, ‘‘सैतान हात पुढे करतो तो क्षण ओळखता यायला हवा.’’ थोडक्यात, तुमच्या मूल्यविवेकाचा आवाज ऐकता यायला हवा.

पण तेच तर कठीण असतं ना, सायबा! सदसद्विवेकाचं भान जागृत राखायला तुमचा आत्माही तितकाच स्वच्छ, पारदर्शी आणि नितळ हवा ना! कोंजुळभर स्वार्थाच्या मोहापायी गढुळल्या डोहातच डुबक्या मारायची कांक्षा बाळगणारे आम्ही. आमचे कान, नाक, डोळे, सगळीच ज्ञानेंद्रिये मतलबाच्या चिखलामातीत बरबटून गेली आहेत. आम्हाला कसा काय दिसणार तो सैतानाचा क्षण? कसा ऐकू येणार आमच्या विवेकाचा तो अलौकिक आवाज?

कधी वाटतं, हे तरी खरं असावं कशावरून? आपला तो आतला आवाज ऐकू न येण्यामागे आपलंच बहिरेपण असेल कशावरून म्हणायचं? परवाचंच बघा ना. आमच्या कवीकुळाला बोलू लागू नये म्हणून जपणारा, सतत शेवटच्या माणसाची बाजू घेऊन व्यवस्थेशी टकराव घेणारा, सत्ताधीशांच्या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून राष्ट्रीय पातळीवरच्या मानसन्मानाच्या झुली परत करणारा आमचा एक ज्येष्ठ कविमित्र अचानक त्याच मुर्दाड व्यवस्थेशी हातमिळवणी करण्याची कृती करतो, त्यांच्या राजकीय कावेबाजपणाला उघड उघड पाठिंबा देत त्यांच्या नावाची पावती फाडतो, ती सहेतुकपणे समाजमाध्यमांवर मिरवतो, आपल्या कृतीचे समर्थन करतो, तेव्हा अकस्मात प्रचंड धक्का बसतो. जगातल्या सगळ्याच भलेपणावरचा विश्वास उडाल्यासारखा वाटू लागतो. कुठे गेली स्वत:ला कवी-लेखक म्हणवणाऱ्या आमची वैचारिक भूमिका नि शेवटच्या माणसाविषयीची संवेदना? कसली मूल्ये नि कसली नैतिकता? कुठला विवेक नि कुठले आवाज? हा सगळा आपणच आपल्या खोट्या समाधानासाठी रचलेला रोमॅन्टिक खेळ वाटू लागतो. हे असं अलीकडे अनेकदा घडू लागलंय आसपास. आयुष्यभर आपण ज्यांची पावलं आदरानं मस्तकी वाहत आलो, तीच पावलं अचानक मातीची असल्याचं दिसून येतात. ज्यांच्यापाशी विश्वासानं जावं, ज्यांच्या खांद्यावर आधारासाठी डोकं टेकावं, तेच सैतानाला आत्मा विकून तुम्हालाही आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी जाळं टाकून बसलेले दिसू लागलेयत. भले भले लेखक, कवी, कलावंत, पत्रकार कवडीमोलाच्या मानसन्मानासाठी, सत्तेचा छटाकभर तुकडा चघळण्यासाठी आयुष्यभर जोपासलेली वैचारिक निष्ठा अगदी पूर्णपणे विरोधी विचारांच्या व्यवस्थेच्या पायी वाहून तडजोडी करतात. राजकीय नेते कोलांटउड्या मारत पक्षांतर करतात. विचारवंत उदासीनतेची जपमाळ ओढत मौनात जातात. बाकी तुम्ही- आम्ही सामान्य लोक नुसतेच आपले हतबलतेच्या बैलाला चिखलातून उठवण्याचा खेळ आयुष्यभर खेळत राहिलेलो असतो. आपण फक्त पाहत राहतो. समज आल्यापासून ज्याच्या पुस्तकांची पारायणं केली तो लेखक कसा अलगद उडी मारून सर्वोच्च सरकारी सन्मानाच्या उंच झाडावर चढून बसलाय… ज्याच्यासाठी उन्हातान्हात वणवणत फिरलो तो लोकप्रतिनिधी कसा विरोधकांच्याच ग्लासांना ग्लास भिडवू लागला आहे… रात्र रात्र जागरणं करून, डोळ्यांच्या खाचा करून ज्याचा बारीकसारीक हुंकारही मनात साठवण्यासाठी धडपडलो तो कलावंत कसा सत्ताधीशांसमोर लोटांगणं घालत आहे… हे असं कितीही लांबवता येईल. पण विचार, विवेक, संयम, निष्ठा यांच्याकडे पाठ फिरवून बाजारू आवाजांच्या कोलाहलात आपला आतला आवाज हरवून बसलेल्या अशा कित्येकांचं हे वागणं हाच या काळाचा धर्म समजायचा का? हीच आमच्या जगण्यातील तथाकथित आधुनिकता म्हणायची का? या अशा प्रश्नांच्या मेंदूला डसणाऱ्या इंगळ्या मात्र विसरता येत नाहीत.

पण मग ‘तुका ह्मणे असे उपाय सकळां। न चले या खळा प्रेत्न कांहीं।। ह्मणऊनि संग न करितां भला। धरितां अबोला सर्व हित।। ’ असं सांगणारे तुकोबा आठवतात. वाटतं, बाकी दुनिया काहीही म्हणो, कुठंही वाहत जावो; तुकोबांची ही वाणी जोवर आपल्या आत घुमत आहे, तोवर बाहेरच्या कुठल्याही गलबल्यात आपला आवाज नक्कीच शाबूत राहील. हा ‘आतला आवाज’ मला कधीच दगा देणार नाही याची पक्की खात्री आहे.

samwadpravin@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:06 am

Web Title: your inner voice facebook social media akp 94
Next Stories
1 मोकळे आकाश… : लॉकडाऊन आणि बरंच काही…
2 अंतर्नाद : पैस… धर्मसंगीताच्या आविष्काराचा!
3 कापड दुकान : वय वर्षे दोनशे!
Just Now!
X