11 August 2020

News Flash

जगणे.. जपणे.. : सामाजिक लढय़ातील युवाशक्ती!

जामिया मिलियातील सांप्रदायिकतेसंबंधीचे, जनआंदोलनाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारे वक्तव्य आजच्या प्रसंगी आठवते.

(संग्रहित छायाचित्र)

मेधा पाटकर

आज जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलिसी हल्ल्यानंतर, देशभर आक्रोशित समुदाय रस्त्यावर उतरून आपापला निषेध व्यक्त करीत आहेत. नागरिकत्वाविषयी आलेल्या नवीन कायद्यावर व प्रत्येक नागरिकाला रांगेत उभे करून तपासणी व पुरावे मागत रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेवर तीव्र असंतोष पसरला आहे. आपापल्या स्थानिक समस्यांवर लढण्यासाठी सरसावलेले समुदायही जेव्हा राष्ट्रीय समस्यांवर, उद्वेलित वा प्रेरित होऊन पुढे येतात तेव्हा ‘निकलो बाहर मकानोंसे.. जंग लडो बेइमानोंसे कि हमलाखोरोंसे अथवा सत्ताधीशोंसे..’ अशा घोषणांना अर्थ प्राप्त होतो. एकेका नागरिकाला देशभक्तीची आस आणि आच लागली तर खऱ्या अर्थाने लोकशाहीची वाटचाल सुरू होईल, अशी आशा आणि विश्वास मनात उमटतो. यात विद्यार्थी आणि अन्य शहरी, ग्रामीण युवकांचा सहभाग हा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. इतिहासाला साक्षी ठेवून युवाशक्तीनेच परिवर्तनाची वाट दाखवण्याचे क्रांतिकारी दिवास्वप्न युवावस्थेतून आम्हा वृद्धावस्थाकडे झेपावणाऱ्यांनाही दिसू लागते. त्या स्वप्नाच्या उभारीने आम्हीही भारावून जातो. असे प्रसंग अनेक आले आणि गेलेही.. युवांच्या अनेक कला दाखवत आणि कधी बळ तर कधी कळही उमटवत!

देशभरच्या विश्वविद्यालयात पोहोचण्याचे प्रसंग विभिन्न प्रकारचे असतात. अलीकडे  टेक-फेस्टमधून लाखो विद्यार्थाना, आपापल्या कँपसपलीकडून हाक देत, की आकर्षित करत गाजवल्या जाणाऱ्या महोत्सवांमध्ये सामील होताना युवांची नवी स्पंदने जाणवतात. आपल्या हाती अनेक तांत्रिक आयुधे घेऊन सज्ज असलेली त्यांची फौज ही ज्या प्रकारे कार्यक्रम सजवताना दिसते ते पाहून कौतुक वाटतेच. सोशल मीडियातून त्यांनी उठवलेले प्रश्न या निमित्ताने हाताळण्याची संधी आणि धरातल माध्यमांतून आम्ही लढवत असलेल्या सीमांत समुदायांची प्रातिनिधिक ओळख याची सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतात ते माझ्यासारखे कार्यकर्ते. महोत्सवी वातावरणातही आवर्जून राखलेल्या एगाद्या तासात वैश्विकरणावर वा विषमतेनेवर, विकासाच्या विभिषिकेवर मांडणी करताना समोर भरगच्च हॉलमधील आयआयटी वा आयआयएमचा विद्यार्थी हा खरोखर अशा संकल्पनाच काय, आवाहनालाही प्रतिसाद देईल का, अशी धाकधूक घेऊनच मी मंचावर चढत असते. अतिथी म्हणून वा मीडियामधून झालेली ओळख आणि मैत्री म्हणून आयोजनाच्या निमित्ताने नेतृत्व करणारे युवा हे निश्चितच वातावरण निर्माण करतात.

जामिया मिलियातील सांप्रदायिकतेसंबंधीचे, जनआंदोलनाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारे वक्तव्य आजच्या प्रसंगी आठवते. अनेक मुस्लीम विद्यार्थी असलेल्या या विश्वविद्यालयात उपकुलगुरूचेही नियमित वक्तव्य ऐकायला येतात, पण प्राध्यापकही विद्यार्थ्यांच्या बरोबरीने हजरच नव्हे तर चर्चेतही असतात. दुसरी शैक्षणिक संस्था म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, कानपूर आणि मुंबईचे आयआयटी हे कमी-अधिक याच परंपरेतले. आज मुस्लीम बांधवांवर वाढतच चाललेल्या आक्रमणामुळे हिंदुत्वालाच शरमेने झुकावे लागत असतानाही, मॉब लिंचिंग- म्हणजे ठेचून ठेचून मारणाऱ्या व्यक्तीस सजासुद्धा अमान्य असण्याचा आपला विचार पटवणे कठीणच असे वाटत असतानाच मी अनुभवली ती सुखद प्रतिक्रिया- तरुण मुलामुलींनी याच नव्हे तर अनेक मुद्दय़ांवर कँपसमधून निघेपर्यंत घेरून दिलेली. त्यांचे म्हणणे होते की, मुस्लिमांना आतंकवादी म्हणून हिणवणारे आम्हीच. खुदाई खिदमतगार संघटनेतला भेदभाव मिटवण्यासाठी सतत धडपडणारा तरुण इनामुल हा त्यांच्या या बांधिलकीचा पाठपुरावा करत राहिला तर फैझल खान ‘सबका घर’ स्थापन करून प्रताडित विद्यार्थ्यांना आजपर्यंत आसरा आणि कायदेशीर आधारही देत राहिला. अनेकांना तिथल्या नाजूक मुलींवर लाठी उचलणाऱ्या साध्या कपडय़ातल्या पोलिसांचे (की गुंडांचे?) चित्र पाहून अगदी धर्माध वृत्तीधारकांनाही कळवळून येत असणार, परंतु तितकीच संवेदना अशा शिक्षणपीठालाच बहिष्कृत मानण्याचे अघोरीपण सतत अनुभवत समाजाला जागवत नसेल तर यातून बुद्धिजीवींचे अज्ञानच पुढे येते. प्रत्येक अन्यायाला वाचा फोडणाऱ्या जामिया मिलियातील युवांचे विश्वच अशा प्रसंगी उजळून येते. जेव्हा गरीब मातेच्या पोटी जन्मलेल्या युवकालाच निवडून देतात

तेव्हा त्याच्या कंपूतल्या प्रत्येकावरच आरोप काय- राष्ट्रद्रोहाच्या केसेस अथवा सेक्सिस्ट- म्हणजे अश्लील वर्तनाविषयी अभद्र चिखलफेक होऊनही, पुन्हा तेच म्हणजे त्याच विचारधारणेची पाशवी वृत्तीची हार होताना स्पष्ट दिसते. याच युनिव्हर्सिटीत दर सहा ते नऊ महिन्यांतून एकदा मध्यरात्रीपलीकडे, चर्चाच नव्हे तर विवाद प्रसंगांचीही आठवण होऊन उर भरून येतो. केवळ वामपंथी नव्हे तर न्यायपंथी अशा या विद्यार्थी संघटित शक्तीला सलाम करावा वाटतो.

हैदराबाद युनिव्हर्सिटी वा टाटा इन्स्टिटय़ूटमधले सामाजिक आणि आर्थिक विज्ञानाच्या पार जाऊन परिवर्तनासाठी झटण्याची ओढ असलेले विद्यार्थी हे केवळ दलित, आदिवासी वा नापास झालेले नसतात. अत्यंत उच्चभ्रू अशा आई-वडिलांच्या पोटी जन्मलेली ही तरुणाई नर्मदेच्या लेकरांच्या अन्याय विस्थापनाविरुद्धही विव्हळते. २००६  मधल्या उपोषणात दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या सर्वच प्राध्यापक मित्रांसह जंतरमंतरवर आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठीही उभी ठाकते. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीत असो वा पुण्याचे इंडियन लॉ सोसायटीचे विश्वविद्यालय- तिथल्या उच्चवर्गीयच काय, अगदी कॉपरेरेटी वाटणाऱ्या वातावरणातही विकासाविषयीचा केवळ एक पाठय़क्रमच नव्हे तर चिंतनही चालूच असताना आमच्या कार्यात महिन्याभरासाठी येणाऱ्या युवा विद्यार्थ्यांचेही अनेक अनुभव कुणी व्हॉटस् अ‍ॅपमधून ‘व्हॉटस् अ‍ॅप’च पाहणार, ‘‘व्हॉटस् डाऊन करून पाहा रे’’ असं सांगायला लावणारे तर कुणी पूर्ण वेळ झोकून देऊन काम करणारे. ‘श्रमप्रतिष्ठा’ विषयावर आम्हाला राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात मिळाले तसे धडे आणि कार्यानुभव न घेता आलेल्या सुखवस्तू घराण्यातल्या मुलीही बावरून का होईना, झाडूपोछा करतात तेव्हा धन्य वाटते. पहाडी गावात कुणी तर गरीब वस्त्यांमध्ये, कुणी डोंगर पाडय़ावर किंवा गलिच्छ परिसरात पत्र्यांच्या शाळांत बैठका घेतात तेव्हा वस्ती संघटना वा ग्रामीण विकासाचे खरे पाठ त्यांना मिळाल्याचे त्यांनाही जाणवते. मदुराईच्या वा बंगलोर, कोलकात्याच्या धर्म-अध्यात्माचे शास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एक ते तीन महिने, अनेकदा ना हिंदी ना इंग्लिश धड येते- अशा अवसथेत पाठय़क्रम रचून अनुभव देण्यात नर्मदेच्याच काय अनेक आंदोलनांचे विद्यापीठाचे कार्यच पुढे जाते आणि आमचीही परीक्षा होत राहते.

या साऱ्यांपेक्षा अगदी वेगळी धाटणी असते ती आदिवासी आणि ग्रामीण युवकांची. आदिवासी युवती आल्याच तर बहुधा त्यांच्या महाविद्यालयाद्वाराच. तळोद्यातल्या जयसिंगराव शिंदेंसारख्या पुरोगामी विचाराच्या आणि युवांना सामाजिक कार्याचे सतत भान आणि अभिमान जाणवेल असे नाते त्यांच्याशी बांधणाऱ्या प्राध्यापकामुळे! तिथल्या आदिवासी मुलीही बालमेळासारख्या कार्यक्रमाच्या यशात हातभार लावतात. मात्र आदिवासी युवकांचे आंदोलनात उतरणे हे अलीकडे कमी होण्याचे मुख्य कारण सरकारी नोकऱ्यांची ओढ. ‘कायमी’चा शिक्का बसला की रोजगारा काय, आयुष्य सुरक्षित होतं म्हणून समाजासाठी मन द्रवतानाही नोकरी मिळवूनच काम करून जमेल तितके ही वृत्ती आता पक्की होताना दिसते. या वातावरणातही वडिलांसह कार्यक्रमांमध्ये सामील होत होत कार्यकर्ते बनणारी दुसरी पिढी ही विशेष गुण घेऊनच येते- तो म्हणजे बांधिलकीचा. अनेक वर्षे टिकूनच नव्हे तर स्वत:चाही विकास करत पुढे जात राहणाऱ्या, पण धिम्या गतीच्या अशा कार्यकर्त्यांची फळीच नर्मदा आंदोलनात असो, की मुंबईच्या ‘घर बचाओ’ आंदोलनात असो; आम्हा जुन्या-जाणत्या म्हणवणाऱ्यांना साथ देत राहते. यात ग्रामीण युवकही येतात ते कधी घरातले ‘करणी सेने’चे भारावलेपण डावलून. कधी दलितांना ‘हरिजन’ म्हणत गांधीजींचा कळवळा न समजता अस्पृश्य मानूनच व्यवहार करत आलेला युवक आंदोलनाच्या रणमैदानातच जातिपातींच्या भेदभावासह चार हात लढतो आणि जिंकतोही! राहुल यादव शासनकर्त्यांपासून माध्यमकर्त्यांपर्यंत सर्वाना कळत-नकळत हाताळू लागलो तर रोहित ठाकूर देशभरची संविधान सन्मान यात्रा करून आल्यावर कार्यातली व्यापकता समजून स्वत:ही आंदोलनापलीकडे जाऊ पाहतो. प्रसाद बागवे हा काल्र्याच्या लेण्यांच्या पायथ्याशी दरीत उतरून जीव वाचवणारा युवक. महेंद्र कंपनीच्या ‘एसईझेड’चे आक्रमण गावावर आले तेव्हा तिथला प्रश्न घेऊन आमच्याकडे आला अन् वांग मराठवाडी टाटा धरणग्रस्त वा लावासा प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी योगदान देऊ लागला. मुंबईतल्या स्लममधली जमिला वस्ती जागरणाबरोबरच राजकारण जाणून नगरसेवकाकडून कामं करवती झाली, तर श्रीराम असो वा पूनम, त्यांच्याही कार्यात वैचारिक समज आणि वक्तृत्व काय नि कलावृंद काय, वाढते प्रभावही पाहता आले सारे. साधनविहित कार्य हे धनावर नाही तर यांच्या जीवावरच चाले ते सांगावे व पटवावे कुणाला?

जनसंघटनांकडे अशी युवाशक्ती केवळ खेचणेच नव्हे तर तिला घडवणे, विचारांचे चिलखत दोन भोवतालच्या अनेक उपभोगवादीच काय, हिंसक वृत्ती-प्रवृत्तींपासून दूर ठेवणे हे काम अत्यंत जिकिरीचेच! यासाठी आपल्यालाच त्यांना विविध अनुभव देण्याचे, सतत कृतीतूनच संघटनकौशल्य वा विवादातून मार्ग काढण्याचे कसब असो, साऱ्या बारकाव्यांसह विशद करण्याचे सातत्य टिकवावे लागते. वृद्धत्व तनमनावर झाकोळून पसरत असतानाच पुढच्या पिढीसाठी सतत तरुण होत राहणेच आमच्यासारख्यांच्या नशिबी येते. यात कार्याचा बोज वाढला तरी आपलेही कार्यायुष्य वाढत राहते. आजकाल या तरुणांच्या हातातली साधने आमच्या बोथट झालेल्या काही तर कालबातेची झलक दागवणाऱ्या रणनीतीला धार आणते. गावपाडय़ात फिरून, वस्त्यांमध्ये तासन् तास ठाण मांडून संघटित शक्ती उभारणारे आम्हीही फेसबुकद्वारा फेसलेस म्हणावे असे, बिनचेहऱ्याचे संदेशवहन आणि त्यातून संघटन अशा क्लृप्त्यांनी चकितही होतो. मात्र यात नसलेली वैचारिक शिबीर परंपराही टिकवू पाहतो. त्यात कमी पडलो तर आंदोलनातूनच वक्त होणाऱ्या तरुणांचा साज आणि गजहाही कमी पडत जातो.

बाबा आमटेंच्या सोमनाथ छावणीने अनेकांना वा राष्ट्र सेवादलाच्या शिबिरांनी जे माझ्यासारख्यांना दिले, तेच नेमके आम्हाला पोहोचवायचे आहे या साऱ्या तरुणांपर्यंत मात्र आमच्या कार्यात त्यांना गुंतवून एक वर्ष तरी करिअरिस्ट बनण्यापूर्वी त्यांनी आम्हाला द्यावे, असे आवाहन करीत. आज कुठे दंगा, कुठे विद्यार्थी संघटनांमधला विवाद, रोहित वेमुल्लासारख्याची आत्महत्या वा जामिया मिलियावरचा हल्ला झाला, की तत्काळ रस्त्यावर उतरणारी विद्यार्थी शक्ती ही आजच्या वा उद्याच्या शासकांनाच नव्हे, तर व्यवस्थेलाच प्रश्नचिन्ह लावणारी परिवर्तनसेना घडवण्याची गरज पर्यायी व्यवसथेची आस धरून, आपले कौशल्य, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात, शिक्षण असो वा ग्रामीण निरंतर विकासाचे तंत्रज्ञान, पणाला लावणारी अशी फौज निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारले तरच आजची बेरोजगारी वा बेघरवारीची समस्या पलटवण्याचा विश्वास आम्ही बाळगू शकतो, अन्यथा नाहीच.

अलिकडेच, अनेक वर्षांनंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत, पाणी प्रश्नावर बोलत असताना, देशभर घडणाऱ्या प्रश्नांचीच उकल नाही, तरी जाण बाळगून आंदोलनकारी कार्याला थोडी भावुक, तर बरीच समजदार मान्यता देणाऱ्या युवांना पाहून विश्वास दाटून आला. आजकाल अशा नव्या पिढीतील युवांना ‘कॉपरेरेट प्लेसमेंट’ पद्धतीने नोकऱ्यांमध्ये खेचत, आपापल्या कब्जात नव्हे तरी कवेत घेणाऱ्यांशी आमची स्पर्धा नसते आणि असूही शकत नाही. नसावीही. पण आमच्यावर होत असलेले आरोप वा केसेसच काय, बदनामीचे प्रयत्नही चालूच असताना आमच्याशी म्हणजेच आमच्या लढवय्या शेतकरी – शेतमजुरांशी असलेले त्यांचे नाते तुटत नाही हेही नसे थोडके! नव्या पिढीतल्याच, कुणा परिवर्तनाचेही ग्लॅमर असलेल्या वा स्वत:च वंचना भोगून एखाद्या दलित, ग्रामीण, गरीब कुटुंबातूनच शिक्षण पीठांपर्यंत पोहोचलेल्या अशाही युवांना आमचे आवाहन पोहोचवण्यासाठी अम्हालाही कंबर कसावी लागेल की, आमच्याही आंदोलनांना संस्थात्मक रूप देऊन आर्थिक सुबत्ता कमवावी लागेल? आजवर विदेश वा देशी मोठे स्रोत न धुंडता आम्ही टिकवलेला चळवळींचा मार्ग हा बदलावा तर नाही लागणार ना? या चिंतेने ग्रस्त होणार नाही, आम्ही चालतो आहोतच.. आणि अनेक तरुण कार्यकर्ते बनून सोबत येत आहेतच.

कौतुक वाटावे अशा आजच्या तरुणांच्या परिवर्तनवादी शक्तीला ओळखणेच नव्हे, तर आपली बुद्धिजीवी तशीच साधनयुक्त संस्थेची साथ देणारे अध्यापक – प्राध्यापक जिथे आणि जेव्हा भेटतात, तेव्हा त्यांचेही ध्येय आणि कार्य आंदोलनकारीच असल्याचे जाणवते. संपूर्ण समाजाला नव्हे तरी आपल्यापुढे बसलेल्या युवाशक्तीला कुठे कसे वळवावे वा वळवू नये याचे भान ठेवणारे असे सानेगुरुजी, अण्णासाहेब शिंदे महर्षी कर्वेच काय, इव्हान इलिच आणि पॉलो फ्रेअरेच्या परंपरेलाच मानायला हवे. वयात येणाऱ्या मतदान करणाऱ्यांचा वेध घेणारे राजकीय नेतृत्व हेच दैवत मानून भक्तिभावे त्यांच्यासोबत जाणारे हे ‘मतदान’ करत आपले नागरिकत्व दाखवू पाहतात. पण नागरिकत्वाची खरी कसोटीही मतपेटीच काय, केवळ कागदी पुराव्यांवरही नाही, तर समाजातील तळागाळातल्या आपल्याच सोबतीने चालू पाहणाऱ्या कष्टकरी घटकांसाठी देऊ शकू अशा योगदानातूनच दडलेली असते; हा विचार पसरवण्याचीच गरज आहे. त्यात कमी पडत असताना आठवते ते आमच्या आधीच्या पिढीतल्या सेनानींचे महान कार्य..

कुलदीप नय्यरजीच्या लेखमालेतून झळकायचे एकेक आंदोलन! ते मात्र १४ ऑगस्टच्या रात्री वाघा बॉर्डरवरच नव्हे, तर सीमांत समुदायांसह अगदी काठीवर जोर देतही ठाम उभे राहत असत. राजेंद्र सच्चरजींचा न्यायदर्शीपणा हा अन्य काही निवृत्तीनंतरही कार्यरत संवेदनशील न्यायाधीशांच्याही पलीकडचा! लक्ष्मीचंदजी जैन आणि देवकीजी, त्यांचा आता वकील आणि माध्यमकर्ते झालेल्या मुलांच्या परिवारासह आंदोलनांना भावपूर्ण साथ देणारे आणि माझ्यासारखीला साथ देणारे.. विचारधन हे पिढय़ान् पिढय़ांसाठी कसे टिकवावे, जोपासावे तेही आम्हीच विचारात घ्यायला हवे ना?

medha.narmada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 4:28 am

Web Title: youth power in social wars narmada movement medha patkar abn 97
Next Stories
1 सिनेमा माध्यमातलं एक मोठं घटित
2 टपालकी : मी पुन्हा येईन!
3 मूर्तिमंत रंगधर्मी
Just Now!
X