वीस डिसेंबरला सकाळी सात वाजता फोन घणघणला. नेहमीचीच फोनची रिंग, पण त्या दिवशी काहीतरी अशुभ वार्तेचा आभास देऊन गेली. एका परिचिताचा.. गोविंद भार्गवजींचा फोन होता- ‘झरीनजींचं पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी निधन झालं.’ पायाखालची जमीनच सरकते आहे असा भास झाला. क्षणभरात मनात आलं- वाद्यसंगीतातील सुरेलपणा आणि लयकारी खऱ्या अर्थाने आज अनाथ झाली. डोळे भरून आले. त्या अश्रूंमध्ये तरंगतच त्यांच्या आठवणी मनात हेलकावे खाऊ लागल्या. मन चाळीस वर्षे मागे गेलं.

२४ ऑगस्ट १९७४ रोजी माझे तबल्याचे गुरू पं. रमाकांत म्हापसेकर यांच्यामुळेच मला आयुष्यातल्या पहिल्या रेकॉर्डिगमध्ये वाजविण्याची संधी मिळाली. ‘बॉम्बे फिल्म लॅबोरेटरी’मध्ये संगीतकार शारदाजींचं रेकॉर्डिग होतं. आयुष्यातल्या पहिल्याच रेकॉर्डिगची सुरुवात भैरवी रागातील आलापीने झाली. सर्व व्यवस्थित पार पडलं. त्याच रेकॉर्डिगला प्रसिद्ध सरोदवादिका झरीन दारूवाला यासुद्धा होत्या. लहानपणापासून रेडिओवर त्यांचं सरोदवादन ऐकलं होतं. पण त्यांच्याबरोबर रेकॉर्डिगमध्ये वाजवण्याची संधी मिळेल हे कधी स्वप्नातसुद्धा आलं नव्हतं. पं. रमाकांतजींनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. त्यांना मी विनंती केली की, त्यांनी मला शिकवावं. पण त्यांचं उत्तर नकारार्थी होतं.. ‘मला त्या वाद्याची माहिती नाहीए. मी नाही शिकवू शकणार.’

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
mahayuti, candidate, aurangabad constituency, lok sabha election 2024, Eknath shinde
महायुतीत औरंगाबादच्या उमेदवारीचा तिढा कायम
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

तांत्रिकदृष्टय़ा मी ‘स्वयंशिक्षित’ होतो. मला संतूर हे वाद्य समजलं होतं. पण मला त्याचं तंतकारी अंग अन् शास्त्र शिकायचं होतं. त्यांच्या नकारामुळे मी हिरमुसला झालो. पण त्याचक्षणी मनात पक्कं ठरवलं की, शिकेन तर झरीनजींकडेच शिकेन. त्याकरता कितीही काळ गेला तरी चालेल.
वडिलांकडून माझे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण सुरू होते. त्या जोरावर छोटय़ा छोटय़ा मैफिलींत संतूर वाजवण्याचा योग येत होता. रेकॉर्डिगमध्ये वाजवल्यानंतर सिने-इंडस्ट्रीमध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली : एक नवीन मुलगा संतूरवादक म्हणून आला आहे. त्या नवीन मुलाचं सगळ्यांनीच खूप स्वागत केलं. अन् कळत-नकळत मला रेकॉर्डिग आणि त्याकरता कशा प्रकारे वाजवावे, याबद्दलच्या तंत्राचं शिक्षण मिळत गेलं. मुख्यत: झरीनजींबरोबर सहकलाकार म्हणून वाजवण्याचे अनेकदा योग आले. त्यातून त्यांचा- माझा परिचय वाढत गेला. त्यांनी मला शिकवावं, ही माझी भुणभुण चालूच होती.
प्रसिद्ध संगीतकार- गायक के. महावीर यांच्या संगीत दिग्दर्शनात रचना आणि मधुरिता सारंग या दोघी भगिनींच्या ‘कुमारसंभव’ या नृत्यनाटय़ात आठवडाभर वाजवायची संधी मिळाली. तेव्हा सर्व तालवाद्यांचं संयोजन गुरू रमाकांतजींनीच केलं होतं. तेव्हा मला रमाकांतजींबरोबर सर्व तालांत- सात, नऊ अकरा, तेरा अशा विविध मात्रांच्या तालांत सतत टय़ुनिंगमध्ये वेळ न घालवता क्रॉमेटिक पद्धतीने संतूर वाजवताना पाहून झरीनाजींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. प्रसिद्ध व्हायोलीनवादक गजानन कर्नाड यांनीसुद्धा तेव्हा माझ्या टय़ुनिंग पद्धतीचं खूप कौतुक केलं.

मला शिष्य म्हणून स्वीकारायला त्यांना चार वर्षे लागली, परंतु ‘कुमारसंभव’च्या रेकॉर्डिगमध्ये विविध रागांत आणि तालांत मला वाजवताना पाहून मनातून मात्र त्यांनी माझं गुरुत्व स्वीकारलेलं होतं. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला जवळ बोलावून सांगितलं की, ‘‘तुझी ही क्रॉमेटिक टय़ुनिंगची पद्धत मला खूप आवडली. मला कल्पना आहे की, वाजवायला हे थोडंसं अवघड आहे, पण असं वाजवणारा तू एकमेव आहेस. इंडस्ट्रीमधील बरेचजण तुझी दिशाभूल करायचा प्रयत्न करतील; पण तू कोणाचेही ऐकू नकोस.’’
मी लगेचच ‘हो’ म्हटलं. त्यांनी ज्या हक्काने मला सांगितलं त्याचा मी नक्कीच आदर केला आहे, करतो आहे आणि आयुष्यभर करीन. त्यांचं शिष्यत्व तर मी आधीच मनोमन स्वीकारलेलं होतं. त्यानंतर साधारण चार वर्षांनी १९७८ मध्ये रेडिओवाणी स्टुडिओमध्ये एका रेकॉर्डिगला आम्ही दोघेही होतो. त्यांना न्यायला त्यांचे डॅडी यायचे. त्या दिवशी मी धीर करून डॅडींना माझी झरीनजींकडे शिकण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. पण त्या अजूनही मला शिकवायला तयार नाहीत, हेही सांगितलं.

डॅडींनी लगेचच त्यांना म्हटलं की, ‘‘तुम हमेशा कहती हो की ये लडका इंटेलिजंट है। तो क्यू नहीं सिखाती? एक तो शागिर्द तयार करो- जो तुम्हारा नाम रख सके.’’

झरीनजींनी हसून माझ्याकडे बघितलं. त्याच आठवडय़ातील गणेश चतुर्थीपासून माझे त्यांच्याकडे शिक्षण सुरू झाले. जन्माने पारशी असल्या तरी त्या वागण्या-वावरण्यात हिंदूच होत्या. बरेच उपासतापास करायच्या. लहानपणी त्यांना मांसाहार आवडायचा. पण एका क्षणी मांसाहार सोडून त्या पूर्णपणे शाकाहारी झाल्या होत्या. गणेश मंदिरातसुद्धा कधी कधी त्या जायच्या. डॅडी त्यांना नेहमी चिडवायचे- ‘अगरबत्तीचा मोठा पुंजका लावला तर देव लवकर प्रसन्न होतो.’ कधी कधी हिंदू सणवार माझ्या लक्षात नसले तर कॅलेंडर न बघताही त्या मला आठवण करून द्यायच्या.
यमन रागापासून माझं शिक्षण सुरू झालं. तंतकारी अंगाची शास्त्रशुद्ध पायाभरणी सुरू झाली. आलाप, जोड, झाला यांच्या सादरीकरणाची पद्धत मनात रुजविली गेली. सुरुवातीला माझ्या स्वभावाप्रमाणे माझ्या वादनात शांतपणा नव्हता. त्यामुळे आलापीमधल्या शांतपणे राग उलगडण्याच्या पद्धतीला आत्मसात करायला मला थोडा वेळ लागला. त्या वेगळ्या पद्धतीने मला सांगू लागल्या- ‘‘आलाप आणि जोडमध्ये फरक दिसला पाहिजे. तुझ्या आलापी आणि जोडमध्ये काही फरक वाटत नाही. हे तुझ्या शिक्षणाची सिल्वर ज्युबिली होईपर्यंत तरी तुला येईल का?’’
पण ज्या दिवशी त्यांच्या मनासारखे वादन होई तेव्हा त्यांचं एक वाक्य ठरलेलं होतं- ‘‘आज काय आईने गोड शिरा बनवला होता?’’

यमनची झपतालातील पहिलीच बंदिश बहारदार होती. त्यांच्या सर्वच बंदीशी अस्थाई, जोड आणि अंतरा यांसह परिपूर्ण असायच्या. बऱ्याच वेळा आपण बघतो- ‘साचा (मीटर) तोच असतो, फक्त हरएक रागाप्रमाणे सूर बदलून वेगळ्या रागातील बंदिश होते. झरीनजींचं तसं नव्हतं. त्यांची प्रत्येक रागाची तालानुसार वेगळ्या घाटणीची बंदिश असायची. याचा माझ्यावर बराच प्रभाव पडला.

त्यांनी दृष्टी दिली; मी त्यांचा दृष्टिकोन घेतला. माझी एकही बंदिश दुसऱ्या बंदिशीसारखी नसते.
तीच गोष्ट तिहाईची. त्यांचं तालावर इतकं प्रभुत्व होतं, की कोणत्याही तालात कोणत्याही मात्रेपासून तिहाई तीन समान विभागात अलगद समेवर यायची.

त्यांच्या स्वभावातील एक गोष्ट शिकण्यासारखी होती. कार्यक्रम कोठलाही असो- रेडिओत वाजवणं असो, एखाद्या संस्थेत फक्त त्यांचं एकटय़ाचं तीन तास वादन असो, किंवा संगीत संमेलनात असो- त्यांच्या सादरीकरणात कसलाही फरक नसायचा. त्यांच्या वाजवण्यातील सच्चेपणा, रागशुद्धता वादातीत असे. सध्या बाहेरच्या जगात बघायला मिळतं ते ‘गिमिक्स’- चमत्कृती, ढोंगीपणा या कशाचाच लवलेश त्यात नसायचा. त्यांनी कोणत्याही कारणासाठी तत्त्वाशी आणि कलेशी कधी तडजोड केली नाही. वाजवताना खाली मान घालून तन्मयतेने राग सादर करणं एवढंच त्यांना जमलं. कसलाही आविर्भाव आणायची गरजच त्यांना नव्हती.
वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी पं. मनोहर चिमोटे यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमवादनाचे धडे घेतले आणि बघता बघता ‘सूरसिंगार’मध्ये एकलवादन केलं. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांच्या वादनाची ऌ.ट.श्. ने रेकॉर्ड काढली. या हार्मोनियम एकलवादनाच्या साथीस उस्ताद अल्लारखाँसाहेब होते.
पुढे काही वर्षांनी कावसजी जहांगीर हॉलमध्ये पं. रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांच्या सितार-सरोदवादनाची जुगलबंदी होती. या जुगलबंदीला डॅडी त्यांना घेऊन मुद्दाम गेले होते. लहानग्या झरीनने ‘ते आडवं वाद्य आहे नं, ते मला शिकायचंय..’ असं डॅडींना सांगितलं. हे सरोदचं भाग्य होतं, की भविष्यात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी सरोद हे वाद्य त्या इवल्याशा मुलीनं निवडलं.
त्यांचं सरोदचं शिक्षण पं. हरीपाद घोष यांच्याकडे झालं. ‘घोषबाबू’ या नावाने ते प्रसिद्ध होते. अतिशय सात्त्विक भावनेने घोषबाबूंचा आशीर्वाद अन् त्यांचा सदिच्छापूर्ण हात त्या वाद्याला लागल्यामुळे ते त्यांना ‘लाभलं’, यावर झरीनजींचा खूप विश्वास होता. त्यामुळे मलासुद्धा त्या घोषबाबूंकडे आशीर्वाद घ्यायला घेऊन गेल्या होत्या. घोषबाबूंच्या पाया पडल्यावर त्यांच्याकडून मिळालेल्या आशीर्वादातून मलाही बरंच काही मिळालं.

नंतर पं. एस. एन. रातंजनकर, पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले, भीष्मदेव वेदी, पं. व्ही. जी. जोग, पं. र.उ.फ. भट यांच्याकडून त्यांनी रागशास्त्राचे धडे घेतले. खास उल्लेख करण्यासारखा पं. व्ही. जी. जोग यांच्या बंदिशी व रचनांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
जोगसाहेबांची एक आठवण त्या सांगायच्या. एकदा जोगसाहेबांनी अतिशय अवघड अशी तान व्हायोलीनवर वाजवली. अन् झरीनजींना म्हणाले, ‘‘ही तान जर तू वाजवलीस तर तुला मी पन्नास रुपये बक्षीस देईन.’’
झालं! गुरूप्रति श्रद्धा, जिद्द आणि जबरदस्त आत्मविश्वास सर्व एकवटून आलं. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हुबेहूब ‘तान’ वाजली गेली.

पण बक्षीस काही मिळालं नाही. ‘‘तू पैशाच्या लोभानं तान वाजवलीस,’’ असं प्रमाणपत्र मिळालं.
पण तान वाजून गेली होती, हे सत्य होतं.

शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाप्रमाणेच पाश्चात्त्य संगीताचं, मुख्यत: स्टाफ नोटेशनचं शिक्षण त्यांनी संगीतकार प्यारेलालजी यांचे वडील रामप्रसाद शर्मा यांच्याकडून घेतलं होतं, अन् त्यात त्या पारंगत होत्या. म्हणूनच ऌ.ट.श्. कडून जेव्हा त्यांना रेकॉर्डसाठी आमंत्रण दिलं गेलं तेव्हा याच एका मुद्दय़ावरून त्यांचे कंपनीशी मतभेद झाले. झरीनजींचं म्हणणं होतं, जे त्या छ.ढ. मध्ये वाजवतील त्याचं स्टाफ नोटेशन पुस्तिकेच्या रूपात त्या रेकॉर्डबरोबर द्यायचं. अगदी आलाप, जोड, झाला, विलंबित गत, द्रुतगत.. एवढंच काय, तर तबलजीने वाजवलेल्या बोलासकट! त्यांचा या आग्रहामागचा उद्देश होता- आपलं भारतीय संगीत पाश्चात्त्य वादकांनासुद्धा वाजवणं सोयीचं व्हावं, त्याचबरोबर आपल्या संगीताचा प्रसार योग्य तऱ्हेने व्हावा!
पण झालं भलतंच. वाद्य लीलया लावणाऱ्या झरीनजी आणि ऌ.ट.श्. चे लोक यांच्यात ‘टय़ूनिंग’ होऊ शकलं नाही. तत्त्वासाठी तडजोड स्वभावातच नसल्यामुळे ती छ.ढ. झालीच नाही. पण यामुळे ऌ.ट.श्. चं आणि जागतिक स्तरावर संगीताचं काय नुकसान झालं, याची कोणाला जाणीव असेल?

पुढे बऱ्याच वर्षांनी ‘स्वरश्री’ आणि कालांतराने ऌ.ट.श्. ची कॅसेट उ. ऊ. आली.
सरोदसाठी फक्त घोषबाबू आणि रागशास्त्रासाठी विविध पठडीतील गुरूंकडून शिक्षण घेऊन परिपूर्णतेच्या एका उंचीवर जाऊनसुद्धा जसं झरीनजींनी शिष्यत्व सांभाळलं, तसंच गुरुत्वपण सांभाळलं!

मी शिकायला जाताना त्या दिवशी त्या शिकवणार असलेल्या रागाचे, बंदिशीचे नोटेशनसुद्धा लिहून तयार असायचे. एक कागदावर अन् त्याची कॉपी वहीवर! ‘‘हरवलंस तर..?’’ असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव असायचे.
शिष्यासाठी एवढा विचार करणारा गुरू माझ्या ऐकिवातही नाही अन् मी बघितलेलाही नाही. आता आणखी काही बघायची इच्छाही नाही. माझ्या क्रोमॅटिक टय़ूनिंगचं महत्त्व लोकांना पटावं म्हणून त्यांनी माझ्यासाठी नऊ रागांचा ‘रागसागर’ रचला अन् मला तो शिकवला. तो यमन रागावर आधारित होता. यमन, किरवाणी, जनसंमोहिनी, चारुकेशी, मिश्र पिलू, अभोगी, अहिरभैरव, मालकंस आणि भैरवी असे ते नऊ राग होत.

एकदा नाशिकला माझा एकटय़ाचा पूर्ण कार्यक्रम होता. तीन तास सुरुवातीला राग जोग, मिश्र खमाज धून, मध्यंतरानंतर मालकंस अन् मग ‘रागसागर’ असं ठरलं. पण माझी एक अडचण होती, की मुख्य राग जोग आणि मालकंस- दोन्ही बंदिशी झपतालामध्येच होत्या. मला ते कसंसंच वाटत होतं. शक्यतो तालाचीसुद्धा पुनरावृत्ती व्हायला नको, या मताचा मी आहे. विचार करता करता दीदींनी शिकवलेलीच मालकंसची झपतालाची बंदीश मी थोडा बदल करून ‘रूपक’ तालात बांधली आणि त्यांना ऐकवली. त्या खूप खूश झाल्या. म्हणाल्या, ‘‘पोस्टमॉर्टेम करण्यात तू एक्स्पर्ट आहेस!’’ तेव्हापासून बंदीश रचण्याचा मला छंदच लागला.
एकदा एक स्वरसमूह मनात आला. याचा राग होऊ शकेल असं वाटलं. लगेचच येणाऱ्या रविवारी शिकायला गेल्यावर दीदींच्या परवानगीने त्यांना तो स्वरसमूह ऐकवला. त्यांनी अतिशय आनंदाने त्याचं स्वागत केलं. म्हणाल्या, ‘‘छान आहे. नक्कीच वेगळं आहे. नवीन आहे. मी थोडा अभ्यास करून सांगते.’’
त्यांनी दोन दिवस बऱ्याच पुस्तकांत शोधलं. कोठेही यासारखं काही नव्हतं. कर्नाटक संगीतातसुद्धा शोधलं. शिष्यासाठी कोण एवढं करेल?

दोन दिवसांनी मी गेलो. गेल्या गेल्याच त्या म्हणाल्या, ‘‘कोठेही तुझ्या रचनेशी साम्य असलेलं काही मिळत नाही. फक्त कर्नाटक संगीतात ‘थाट विध्वंस’ या शीर्षकाखाली एक स्वरावली आहे. पण त्यात कोमल निषाद नाहीये; जो तुझ्या स्वरसमूहात आहे. हा तुझा राग म्हणू शकतोस. आता याला साजेसं नाव ठेव. बंदिशीची रचना कर अन् मला ऐकव.’’
त्या दिवशी मी वेगळ्याच समाधानानंदात घरी गेलो. गुरूआज्ञा असल्यामुळे झपतालची बंदीश लगेचच झाली. रागाला साजेसं नाव सुचवण्यात मोठा भाऊ आनंद याने मदत केली. मला सकाळचा राग म्हणून तो वाजवायचा होता. त्याला बंदीश ऐकवली. सुरावट ऐकून त्याच्याकडून पटकन् नाव आलं- ‘पारिजात.’
पारिजातकाची अतिशय नाजूक, सुरेखशी फुलं नेहमी पहाटे पडलेल्या त्याच्या सडय़ानंतर माणसांच्या पायाखाली तुडवलेली आढळतात. या रागाचं तसंच होतं. अतिशय सुरेल स्वरगुंफण; पण त्याला थोडीशी करुणेची छटा होती.

मला ‘पारिजात’ हे नाव माझ्या रागासाठी योग्य वाटलं. झरीनाजींनी पण आनंदाने ते स्वीकारलं. माझ्या विलंबित झपताल, द्रुत तीनतालच्या बंदिशी तयार होत्या. ‘‘आता जेव्हा रेडिओचा कार्यक्रम येईल तेव्हा ‘पारिजात’ वाजव..’’ गुरूआज्ञा शिरसावंद्य मानून त्यादृष्टीने रियाझ सुरू केला. काही दिवसांतच रेडिओचं रेकॉर्डिग आलं. ‘पारिजात’ वाजवला. तेथील संगीत विभागातील लोकांचे कान टवकारले गेले अन् भुवया वर गेल्या. सगळेच ‘‘हा कुठचा राग आहे?’’ या प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते. मी सांगितलं, ‘‘हा पारिजात.. माझा राग आहे.’’ त्याचं प्रसारणही ठीक झालं. लोकांना आवडलं.
पुढे दोन महिन्यांत कहरच झाला. झरीनदीदींना रेडिओचं कॉन्ट्रॅक्ट आलं. एक दिवस मी शिकायला गेलो असताना त्यांनी मला विचारलं, ‘‘मला तुझी परवानगी हवी आहे. मी तुझा ‘पारिजात’ राग वाजवला तर चालेल?’’

मी फक्त पडायचा बाकी होतो.
‘‘असं काय विचारताय? माझं काही नाहीये. सगळं तुमच्यामुळेच आहे. तुम्ही ‘पारिजात’ वाजवलात तर त्याला जनमान्यता मिळेल..’’ मी म्हटलं.
‘‘ठीक आहे. मग मला तुझी बंदीश शिकव.’’ – दीदी.
‘‘आता खूप झालं ना!’’- मी.
‘‘राग तुझा आहे, रचना तुझी आहे. मला शिकव.’’ दीदींचा हट्ट कायम.
मी शिकवतोय कसला? फक्त बंदीश सांगितली.
खरं तर आश्चर्यानंद तर पुढेच आहे. रेडिओवर जेव्हा त्यांनी ‘पारिजात’ सादर केला तेव्हा पुन्हा तिथल्या लोकांचे कान टवकारले गेले. भुवया पूर्वीपेक्षा वरती गेल्या. प्रश्नार्थक नजर होतीच.
त्या लोकांनी काही प्रश्न विचारायच्या आतच झरीनजींनी उत्तर दिलं- ‘‘तुमची शंका बरोबर आहे. हा माझा शिष्य उल्हासचा राग आहे- पारिजात.’’

केवढं मोठं मन त्यांचं! केवढा सच्चेपणा! खुल्या मनाने त्यांनी आपल्या शिष्याचं केलेलं भरभरून कौतुक! शिष्याच्या मिळालेल्या यशाबद्दल स्वत:च लोकांना जाहीरपणे सांगणं! मला असा गुरू लाभला यापरतं दुसरं भाग्य ते कोणतं?
त्यांच्याकडून जेवढं मिळालं ते माझं मोठं भाग्यच. मनापासून त्याचा रियाझ ठेवावा.. सादरीकरणात कधी ‘बाजारूपणा’ येऊ देऊ नये.. त्यांनाच स्मरून नवनिर्मितीचे महाल उभारावेत.. सच्चेपणा पदोपदी सांभाळावा.. मनापासून शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना भरभरून द्यावं.. त्यांच्यासारखीच आपल्या वाद्याची काळजी घ्यावी.. हीच त्यांना वाहिलेली खरी स्वरांजली.. श्रद्धांजली ठरेल.
कधी कधी वाटतं, देवसुद्धा कधी कधी स्वार्थीपणा करतो. आपली आवडती माणसं स्वत:कडे बोलावून घेतो.