|| पंकज भोसले

अमेरिकी प्रकाशन जगतात दोन महायुद्धांदरम्यान लगदा कागदावर छापल्या जाणाऱ्या मासिकांसाठी जो बहराचा काळ आला, त्यात वाचकांना भुरळ घालणाऱ्या शेकडो नरपुंगवांचा जन्म झाला. मात्र, अल्पजीवी आयुष्य असलेल्या ‘पल्प’ मासिकांमधून अवतरूनही कालजयी ठरलेल्या जननायकांमध्ये झोरो हा अग्रभागी राहिला. ९ ऑगस्ट १९१९ रोजी ‘ऑल स्टोरी’ साप्ताहिकातून झळकलेल्या या व्यक्तिरेखेने गेल्या शतकभरातील चित्रपट, कॉमिक बुक्स तसेच रहस्यकथांमधील अनेक मुखवटेवीरांना प्रेरणा दिली. आणखी शंभर वर्षेदेखील विस्मृतीत जाण्याची शक्यता नसलेल्या या झोरोविषयी..

‘पल्प फिक्शन प्रोजेक्ट’ नामक एक ऑनलाइन उपक्रम २०११ पासून सुरू आहे. १८९६ पासून ते १९५५ या काळातील हलक्या आणि स्वस्त कागदावर छापल्या गेलेल्या मासिकांचे जतन करण्याचा. आर्गसी, अ‍ॅडव्हेंचर, ऑल स्टोरी वीकली, ब्लू बुक, फ्लाइंग स्टोरीज्, डिटेक्टिव्ह आणि विज्ञानकथा छापणाऱ्या शेकडो मासिकांच्या हजारो प्रती या संकेतस्थळावरून वाचता किंवा डाऊनलोड करून घेता येतात.

यांतील अंकांकडे पाहिले तर त्यात आफ्रिकेतील जंगलांतल्या साहसांच्या कथा, परग्रहवासीयांच्या हल्ल्यांना तोंड देणारे पृथ्वीवासीय आणि धाडसाच्या बळावर रंकाचा राव बनणाऱ्या कथांचा भरणा अधिक होता. खून-दरोडय़ांचे रहस्य सोडविणाऱ्या डिटेक्टिव्ह जमातीने या मासिकांमधून अफाट मौज केलेली आढळेल.

हे साहित्य तेव्हा (अन् आताही) अभिजात किंवा मुख्य धारेतील म्हणून गणले जात नसले तरी मध्यम/ निम्न मध्यमवर्गीय घरांत आणि रोजगाराच्या शोधात गाव सोडून शहरांमध्ये दाखल झालेल्या तरुणांमध्ये स्वस्तातील मनोरंजन म्हणून लोकप्रिय होते. अन् त्यात लिहिणाऱ्या लेखकांमध्ये हयातीत मान्यता न मिळालेल्या एच. पी. लव्हक्राफ्ट यांच्या भय-विचित्र कथा होत्या. ब्रिटिश लेखक एच. जी. वेल्स यांच्या वैज्ञानिका होत्या. पुढे टारझन या जंगलवीरामुळे ओळखल्या गेलेल्या एडगर राईस बरोज यांचा मंगळवीर जॉन कार्टरच्या साहसकथा होत्या. लगदा कागदावरून पांढऱ्या कागदामध्ये परावर्तित झालेल्या अन् आजही वाचल्या जाणाऱ्या या मोजक्या पल्प-साहित्यिकांमध्ये जॉन्स्टन मखली हे नाव आपल्याला जरी अपरिचित वाटत असले, तरी त्यांच्या झोरो या मानसपुत्राचा लौकिक गेल्या शतकभरापासून कायम राहिलेला आहे.

‘ऑल स्टोरी वीकली’च्या मुखपृष्ठावर ‘द कर्स ऑफ कॅपिस्ट्रानो’ या नावाने पाच भागांत झळकलेल्या कादंबरीतील झोरो या नायकाचे वैशिष्टय़ हे होते की, काळा मुखवटा चढवून तो अन्यायाचा सूड घेण्यासाठी सज्ज होत असे. एकोणिसाव्या शतकातील मध्य अमेरिकेत अराजक, सरंजामी व्यवस्था यांत पिचलेल्या दीन-दलितांच्या बाजूने उभा राहणारा, त्यांना मदत करण्यासाठी कायदा हातात घेऊन आपल्या तलवारबाजीचे अजब कसब दाखवणारा हा झोरो वाचकांमध्ये हिरो होणे अटळ होते. कारण अत्यंत चपळ विनोदबुद्धीने शत्रूला पराभूत करून त्याच्या गालावर, मानेवर, कपाळावर किंवा छातीवर तलवारीने ‘झेड’ ही विजयी स्वाक्षरी कोरणाऱ्या या नायकाला वर्षभरातच सिनेमाच्या पडद्यावर अवतरण्याचे भाग्य लाभले. त्या काळातील मूकपटांत विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या डग्लस फेअरबँक या अभिनेत्याने लंडनच्या प्रवासात ‘द कर्स ऑफ कॅपिस्ट्रानो’चे भाग वाचले आणि याच कादंबरीच्या सुरुवातीला लोकांमध्ये चालणाऱ्या चावडी चर्चामधील ‘मार्क ऑफ झोरो’ या वाक्याला चित्रपटाचे शीर्षक बनविले. सहा तास वाचण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मूळ कादंबरीबरहुकूम काढलेल्या सव्वा तासाच्या सिनेमामध्ये (यूटय़ूबवर हा १९२०चा मूक चित्रपट उपलब्ध आहे.) झोरोच्या धाडसांची, लढायांची आणि प्रेमिकेला जिंकण्यासाठी केलेल्या उचापतींची गोष्ट आहे. प्रेक्षकांना एकीकडे डॉन डिअ‍ॅगो व्हेगा हा संथ, मंद आणि सुस्तावस्थेतला सरंजामही दिसतो आणि गरज पडताच प्रसंगी मुखवटा आणि काळा वेश परिधान केल्यानंतर त्याच्यात संचारणारा युक्ती-शक्तींचा लढवय्याही ओळखता येतो. एकाच व्यक्तीची ही दुहेरी रूपे केवळ कथेतील व्यक्तिरेखांना अनभिज्ञ असल्याने चालणाऱ्या गमतींनी झोरोच्या चित्रपटाला आणि त्यातल्या डग्लस फेअरबँक या नायकाला लोकांनी डोक्यावर घेतले. जॉन्स्टन मखली या झोरो-पित्याचेही नाव दुमदुमू लागले. पुस्तकरूपाने ‘मार्क ऑफ झोरो’ १९२४ मध्ये प्रकाशित झाले.

जॉन्स्टन मखली पेशाने पत्रकार होता. वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी बातम्या गोळा करतानाची भटकंती त्याने अनुभवलीच; त्याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील ताण्या-बाण्यांनी चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही त्याने भोगली. त्यानंतर मात्र आपल्या विविधांगी अनुभवांचा आधार घेत १९०६ ते १९५८ या कालखंडात पल्प मॅगझिन्सना तब्बल ८०० हून अधिक कथा-कादंबऱ्यांची रसद त्यांनी पुरवली. त्यातील ६० हून अधिक झोरो या त्यांच्या लाडक्या नायकाच्या होत्या. तर तब्बल आठ टोपणनावे अंगीकारून झोरोसारख्याच डझनभर मुखवटेधारी नायक-खलनायकांना त्यांनी जन्म दिला. त्यातील ‘ब्लॅक स्टार’, ‘थंडरबोल्ट’, ‘ग्रीन घोस्ट’, ‘द स्पायडर’, ‘मॅन इन पर्पल’ आणि ‘क्रीम्सन क्लोन’ यांनी पल्प मॅगझिन्सच्या खपाच्या आकडेवारीची गणितेच बदलून टाकली. मात्र, झोरोसारखे अमरत्वाचे भाग्य या शिलेदारांना लाभले नाही.

डग्लस फेअरबँकच्या चित्रपटानंतर झोरो करामतींना मागणी वाढू लागली आणि झोरो या व्यक्तिरेखेवर चित्रपटांचा धडाकाच सुरू झाला. १९४० च्या दशकात ‘बॅटमॅन’ या व्यक्तिरेखेला कॉमिकरूपात साकारणाऱ्या बॉब केन याने आपल्या नायकाची प्रेरणा ही ‘मार्क ऑफ झोरो’ असल्याचे स्पष्ट केले. दुर्जनांच्या काळ्या कृत्यांना उलथवून टाकण्याची क्षमता असणारा हाडामांसाचा सामान्यातील सामान्य वाटेलसा नायक त्यांना निर्माण करायचा होता. झोरोसारखाच मुखवटा आणि वेशांतर करून धडाडी दाखविणारा बॅटमॅनने घडविलेला इतिहास आता सर्वज्ञातच आहे. बॉब केन यांनी ब्रूस वेनच्या (म्हणजेच लहानग्या बॅटमॅनचे) आई-वडिलांची हत्या ते डग्लस फेअरबँकचा ‘झोरो’ पाहून येत असताना झाल्याचे आपल्या पहिल्या ‘बॅटमॅन’ कथेत मांडले आहे.

कॉमिक बुक्स आणि नवसाहित्य मासिकांच्या उदयानंतर पल्प फिक्शन मॅगझिन्सची सद्दी संपली. तरीही ‘मार्क ऑफ झोरो’ या कादंबरीवर दरेक दशकामध्ये चित्रपट येतच राहिले. अमेरिकेतच साठ-सत्तरहून अधिक सिनेमे आणि डझनावरी टीव्ही मालिका ‘झोरो’ या शीर्षकानिशी आलेल्या आहेत. युरोप-आशिया खंडापर्यंत साठच्या दशकातच झोरोची ख्याती पोहोचली होती. कॉमिक बुक साहित्यामध्ये झोरोसमान व्यक्तिरेखा तयार झाल्या. जपानी सामुराई चित्रपटांमध्ये प्रतिस्पध्र्यावर तलवारीने ‘झेड’ कोरणारे नायक तयार झाले. नव्वदच्या दशकात तर झोरोची खेळणी आणि भेटकार्डेही तयार झाली. गेल्या दशकापासून झोरोवरच्या व्हिडीओ गेम्सनीदेखील धुमाकूळ घातला आहे.

झोरो सुरुवातीला लोकप्रिय होण्याच्या कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचे कारण- सामान्यांमधून निर्माण झालेली त्याची दुष्ट आणि अन्यायकर्त्यांविरोधात उभी ठाकलेली मूर्ती हेच होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात मेक्सिको आणि कॅलिफोर्निया प्रांतातील राजकीय अराजकतेमध्ये सर्वसामान्य माणूस हा बऱ्यापैकी दबलेल्या अवस्थेत आणि सरकारी यंत्रणांकडून दमन व शोषणाच्या अवस्थेतून जात होता. रोजगारासाठी शहराशहरांतून स्थलांतर करीत भटकणाऱ्या तरुणाईच्या जथ्थ्यांना विविध मार्गानी अन्याय आणि गुन्हेगारीला सामोरे जावे लागत होते. त्यात दीन-दलितांचा बचाव करणाऱ्या झोरोच्या कारवायांमध्ये वाचक स्वत:ला पाहू लागला. वाचकांमध्ये स्फूर्ती आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटविण्यामध्ये पल्प फिक्शनमधील अनेक हिरोंपेक्षा झोरोचे योगदान मोठे आहे.

कोल्ह्य़ासारखा धूर्त आणि चपळाई अंगी असल्यामुळे स्पॅनिशमध्ये कोल्ह्य़ासाठी वापरले जाणारे ‘झोरो’ हे नाव मखली यांनी आपल्या या व्यक्तिरेखेला दिले होते. रॉबिनहूडचा या शतकातील अवतार इतका लोकप्रिय होईल आणि शंभर वर्षांनंतरही तितक्याच चवीने वाचला जाईल याची थोडीदेखील जाणीव त्यांना नव्हती.

इसाबेल आलिअंदे नावाची चिलीमधील एक लेखिका आहे. दक्षिण अमेरिकेच्या मुख्य धारेतील साहित्यात ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या नावांपैकी एक अशी तिची ख्याती आहे. २००५ मध्ये या लेखिकेने ‘झोरो’ नावाची महाकादंबरी लिहिली. त्यासाठी संदर्भ घेतला तो जॉन्स्टन मखली यांच्याच कादंबरीचा. मात्र, आलिआंदे यांची कादंबरी १७९० ते १८४० च्या दरम्यानच्या कालखंडात झोरो कसा तयार झाला, याचा काल्पनिक अदमास घेत ‘मार्क ऑफ झोरो’पर्यंत येऊन पोहोचते. लगदा मासिकातील नायकाचा सर्वाधिक खपाच्या मुख्य धारेतील साहित्यिकेने दक्षिण अमेरिकेच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणासह घेतलेला हा वेध म्हणजे झोरो या व्यक्तिरेखेचा शतकभरातील सर्वात मोठा सन्मान आहे. बाकी हा सगळा महिना झोरोच्या चाहत्यांकडून जगभरात त्याची शताब्दी साजरी करण्यात रंगणार आहेच.

झोरो, मखली आणि आपण..

झोरोच्या कथा मराठीमध्ये थेट आल्या नसल्या तरी मखली हा साठोत्तरीतल्या रहस्यकथाकारांचा आवडता लेखक असल्याचे संदर्भ सापडतात. अनिल टी. कुलकर्णी यांच्या तिरंदाज कथांचे झोरोकथांशी साधर्म्य असल्याचे जाणवते. मुखवटाधारी असलेल्या या नायकाकडे तिरंदाजीचे अभूतपूर्व कौशल्य असल्याचे दाखविण्यात आले आहे. गुरुनाथ नाईकांचा गरुड म्हणजेच मेजर भोसले कामगिरीवर निघताना वेषांतर आणि मुखवटा चढवून जातो. दिवाकर नेमाडे यांचा चित्रगुप्त हा नायक मुखवटा धारण करण्यापूर्वी सुधीर नावाचा साधारण पोलीस अधिकारी आहे. सुभाष देशपांडे यांचा इन्स्पेक्टर राज आपल्या पोशाखातून अचानकपणे चाकूंची बरसात करून शत्रूला नामोहरम करतो. तर हेमन् कर्णिक म्हणजेच शरश्चंद्र वाळिंबे यांच्या ब्लॅकस्टार कथा मराठी वाचकाला थेट मेक्सिको आणि कॅलिफोर्नियाच्या परिसरात नेतात. मखलीच्या ब्लॅकस्टार कथांतील पात्रांची नावे आणि जागादेखील न बदलता करण्यात आलेली ही रूपांतरे सत्तरच्या दशकात तुफान खपाची ठरली होती. भ्रष्टाचार, अफरातफर, खून, दरोडे, जुगार यांच्या सान्निध्यात या नायकांचे कारनामे वेस्टर्न सिनेमाची अनुभूती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवीत होती.

pankaj.bhosale@expressindia.com