१९ ६० नंतरच्या हिंदी साहित्यातील विष्णू खरे हे एक सव्यसाची लेखक आहेत. त्यांची कविता खरोखरच भारतीय पातळीवरची कविता आहे, हे चंद्रकांत पाटील यांनी भाषांतरित केलेला ‘विष्णू खरे यांची कविता’ हा संग्रह वाचल्यानंतर कळते. ज्याला स्वत:चे विचार नाहीत, पण भावना आहेत असा सामान्य माणूस भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून भरडला जात आहे. त्याच्या वेदनांचा सल कोणाच्याही काळजात उठत नाही. समाजच्या समाज कोणत्या ना कोणत्या वेदनेने ग्रस्त, त्रस्त आहे. आणि हे आपण बदलू शकत नाही, या दु:खात काही समाजपुरुष असतात. हे दोघेही असहाय आहेत. हतबल विचारी मन आणि सवयीने सारे सहन करणारा विचारहीन, आवाजहीन समाज या विष्णू खरे यांच्या कवितेच्या प्रेरणा आहेत. कवीचा संवेदनस्वभाव भावनाधीन न होण्याचा दिसतो. अत्यंत शुष्क कोरडेपणाने ते आपल्या हृदयातील सल आविष्कृत करतात. अशा प्रकारच्या संवेदना व्यक्त करणारा आणि असाच आविष्कारविशेष असणारा मराठीतला कवी म्हणजे वसंत आबाजी डहाके. पण विष्णू खरेंचा आवाका प्रचंड दांडगा आहे. पौराणिक काळापासून ते वर्तमानकाळापर्यंत आपल्यात सामावून घेणारा हा कवी आहे. संदर्भ देऊन आपल्या वाचकाला विचार करायला प्रवृत्त करण्याची शैली कवीला साध्य झाली आहे.
परिस्थितीशी विद्रोह करून वाचकाला चेतवणाऱ्या कविता असतात, परंतु परिस्थितीचा विद्रोह स्पष्ट न करता वाचकालाच विचार करायला लावणारी कविता ही कालजयी वाटते. तिला तात्काळ वर्तमान प्राप्त होत नाही, परंतु ती वर्तमानातून निसटू शकत नाही. ती काळाचे संदर्भ बाजूला काढते आणि मानवी संबंधाचा लेप आपल्याभोवती ठेवते. वरवर शांत, संयत दिसणाऱ्या या कवितेत कालातीत अक्राळविक्राळपणा आहे. व्यक्तिभावनांच्या पलीकडे जाऊन सामान्यांच्या भावना या कवितेमध्ये व्यक्त झाल्या आहेत. दैन्य आणि दारिद्रय़ हा या कवितांचा विषय नाही. अशा भावुक विषयापेक्षा यावर मात करणाऱ्या विषयांना कवीने आपल्या कवितेत स्थान दिले आहे. खरे यांच्या कवितेत परंपरागत अध्यात्म आणि तत्त्वज्ञान आहे. महाभारतामधील अनेक दाखल्यांनी ही कविता गच्च भरलेली आहे. त्यामुळे आपोआपच ही कविता कथात्म आणि कथनपर स्वरूपाची झाली आहे. परंपरेपासूनच भारतीयांना दु:खे प्राप्त झाली आहेत. ती संवेदनशीलतेने कथन करताना भरीव आशय-विषयामुळे त्यांची कविता दीर्घ झाली आहे. कारण तीत व्यक्तीपातळीवरील वेदना नसते. दु:खाच्या डोहाची सखोलता सहानुभूतीने कवीने प्रकट केलेली आहे. ‘पोलीस इन्स्पेक्टर, मुलीचे वडील, मुलगी, नरसिंह राव, बदनाम स्त्री, चेला, पुनरावतरण’ या व्यक्तीवरील कविता नाहीत, पण त्यात व्यक्तींचेही घुसमटणारे श्वास प्रकट होतात. पी. व्ही. नरसिंह रावांच्या राजनीतीचे परिणाम सांगणारी बहुधा विष्णू खरे यांचीच एकमेव कविता असावी. नरसिंह रावांनी आज पंतप्रधान असलेल्या डॉ. मनमोहन सिंगांना अर्थमंत्री करून खुली अर्थव्यवस्था आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारून परराष्ट्रीय उद्योजकांना आकर्षित केले तेव्हा एतद्देशीय लोकांची भाकरी हिरावली गेली. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली. त्यालाही रावांचे धोरण कारणीभूत ठरले. रावांच्या काळात हवाला प्रकरण झाले. तांत्रिक चंद्रास्वामी प्रकरण उद्भवले. भारतीय राजकारणाचा चेहराच बदलला. आज समाजकारणाच्या मुळावर हे राजकारण बसू पाहत आहे. खरे यांनी हे सर्व बुद्धिवादाने घेतले आहे.
मुत्सद्देगिरीच्या राजकारणातून या चुका झाल्या तरी त्या धोरणात्मक गोष्टी होत्या, हे सांगण्यासाठीच की काय, त्यांची गोध्राकांडावरही ‘विनंती’ ही कविता आहे. तिचा नायक गोध्राचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. डब्यात पेट्रोल शिंपडताना, मुले, बायका जळताना व जाळताना पाहणारे ते सामान्य!
धर्म व राजकारण फार पूर्वीपासून एकत्र नांदत आहेत. परंतु आता सिंहासनावर येण्यासाठी जात व धर्म वापरला जातो. आणि एकदा का सिंहासनावर आल्यानंतर अमाप पैसा आणि अमर्याद सत्ता हाती आल्याने नीतिशून्यतेमुळे सामान्य माणूस विसरला जातो, ही कवीची वेदना आहे.
महाभारत हा नेहमीच कवींच्या चिंतनाचा विषय राहिला आहे. या महाकाव्यातून मानवी वर्तनातील नीतिमत्ता प्रकट झाली आहे. राजकारण, धर्मकारण, युद्धकारण हे भारतीय समाजमनातील विचारव्यूह या महाकाव्यातूनच आपल्याला सापडतात. म्हणूनच ते नीती-अनीतीचे न्यायकोश, संस्कृतीचा परंपराकोश बनून राहिल्याने संवेदनशील व सर्जनशील विचारी मन महाभारताकडे झेपावते. त्यांच्या ‘अखेरीस, द्रौपदीच्या संदर्भात कृष्ण, अज्ञातवास, अग्निरथ उवाच, सर्पसत्र’ या कवितांमध्ये विलक्षण अशी बुद्धिमत्ता व अनन्य अशी कल्पनाशक्ती प्रकट झाली आहे. मानवी संबंध आणि समस्यांच्या गुंतागुंतीचे विश्लेषण महाभारतातील प्रसंगांद्वारे केले आहे.

विष्णू खरे सामान्यांच्या जगण्याच्या कल्पनेशी  एकरूप होतात. तसेच ते आपल्या वर्णव्यवस्थेमधील ‘डोक्यावर मैला वाहून नेण्याच्या अमानवी प्रथा’बद्दल अनुकंपा, वृंदावनच्या विधवांबाबत सहानुभूती दाखवतात. ‘विष्णू खरे यांच्या कविता’मधून १९६० नंतरच्या सबंध भारतभराचे चित्र दिसते. महाभारतातील प्रसंग हा केवळ तेव्हाचा चिखल नसून तो आताचाही आहे. अत्यंत बुद्धिमान आणि सुजाण मनाने, अत्यंत संयमशीलतेने भारतीय समाजाचे घडवलेले दर्शन म्हणजे विष्णू खरेंची कविता होय. मानवी संबंधांच्या विशालतेबरोबर स्वार्थाध कोतेपणा, कल्पिताबरोबरच वास्तव, राजकारणाबरोबरच समाजकारण, तत्त्वज्ञानाबरोबर अध्यात्माचे आविष्कार खरे यांनी घडविले आहेत. सोबत इतिहास, चित्र-नाटय़ही डोकावते. वैचारिकतेच्या बाबतीत ही पक्की कविता आहे. पण अशा स्वरूपाची वैचारिकता मराठी कवितेत दिसत नाही, म्हणून विष्णू खऱ्यांच्या कवितांचा आपण अनुवाद केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे, ते काही योग्य नाही. वसंत आबाजी डहाक्यांच्या कवितेचे विशेष थोडय़ाफार फरकाने हेच आहेत. शिवाय त्यांच्या आशय, विषय नि शैलीमध्येही साम्य आहे. हे खरे, की ‘विष्णू खरे यांच्या कवितां’चा प्रभाव हा अधिक व्यापक आहे.
‘विष्णू खरे यांची कविता’, अनुवाद- चंद्रकांत पाटील, शब्द प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- १२०, मूल्य- १५० रुपये.