‘ओ.. बाबाजान’

तर ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या १०० व्या प्रयोगाचे दिलीपकुमार प्रमुख पाहुणे ठरले. आता अध्यक्ष पाहिजे.

तर ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या १०० व्या प्रयोगाचे दिलीपकुमार प्रमुख पाहुणे ठरले. आता अध्यक्ष पाहिजे. तो ठरला शशी कपूर. शशी कपूर यांच्याशी संपर्क कसा झाला, या प्रश्नाच्या उत्तरासाठी जरा मागचे वळण घ्यावे लागेल. ते म्हणजे- जब्बारने एम. बी. बी. एस. झाल्यानंतर अंदाजे १९६७-७० दरम्यान पुण्याच्या रेल्वे स्टेशनमागे असलेल्या महानगरपालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रोग हॉस्पिटलमध्ये केलेला ‘बालरोग’ lok02या विषयाचा डिप्लोमा. त्याची रेसिडेन्सी चालू असताना त्याला हॉस्पिटल परिसरात क्वार्टर्स मिळाली होती. ती खोली आम्हा स्टडी सर्कलवाल्यांची एक अड्डाच बनली होती. सगळ्यांकडे एकच वाहन होते- ते म्हणजे सायकल. चर्चा सतत नाटक आणि फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये बघितलेल्या सिनेमांची. खास अ‍ॅट्रॅक्शन म्हणजे जब्बारच्या खोलीतल्या रेडिओवर कराची आकाशवाणी केंद्रात लागणाऱ्या मेहंदी हसनच्या गझला ऐकणे, नायडू हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधली पाव-मिसळ हाणणे. त्याचा कंटाळा आला तर चालत रेल्वे ओव्हरब्रिजवरून स्टेशनसमोरच्या ‘कॅफे डेक्कन क्वीन’मधला अत्यंत तेलकट, तिखट खिमा-पाव, नंतर शेजारी ‘शिवकैलास’ची मस्त थंडगार कुल्फी! सायकलीवरून सतत डेक्कन जिमखाना ते नायडू अशा आमच्या चकरा चालू असायच्या.
हॉस्पिटलच्या नर्सेस क्वार्टर्स पलीकडेच होत्या. तिथे त्यांच्या मेट्रन आणि त्यांच्या तीन मुली राहायच्या. पैकी मोठी अनिता सोलापूरला मेडिकल कॉलेजमध्ये होती. धाकटी मन्या आणि मधली रेणुकास्वरूप शाळेत जी होती ती म्हणजे नंतर प्रसिद्ध झालेली स्मिता पाटील. मेट्रन म्हणजे त्यांच्या आई विद्याताई पाटील. त्या राष्ट्र सेवा दलाशी संबंधित. आणि स्मिताचे वडील शिवाजीराव काँग्रेसच्या राजकारणात. काही काळ राज्यात मंत्री, सहकारी साखर कारखान्यांच्या भारतीय संघटनेचे प्रमुख. स्मिताची सख्खी मैत्रीण रोहिणी भागवत ‘घाशीराम’मध्ये ब्राह्मणीचे काम करायची. तिने स्मिताला थिएटर अ‍ॅकॅडेमीमध्ये आणले. तेव्हा ती नव्याने निघालेल्या दूरदर्शनवर मराठी बातम्या देत असे. ती अत्यंत फोटोजेनिक दिसे. त्यामुळे तिला सिनेमात कामे मिळू लागली. ७४ मध्ये मोहन गोखलेने सुहास तांबेचे ‘बीज’ नावाचे नाटक थिएटर अ‍ॅकॅडेमीमध्ये बसवले होते. त्याची नायिका होती स्मिता पाटील.  ७५ मध्ये स्मिताचे एकदम तीन चित्रपट आले. जब्बारचा ‘सामना’, श्याम बेनेगलांचे ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर.’ एकूणच तिच्या स्वभावामुळे म्हणा किंवा व्यक्तिमत्त्वामुळे म्हणा, तिच्याभोवती नेहमीच तरुणाईचा गराडा असायचा.
नेहमीप्रमाणे स्मिताची आणि शशी कपूर यांची ओळख आहे हे अखेर मोहन आगाशेच्या लक्षात आलेच. शशी कपूर कुटुंबाचा आणि नाटकांचा जवळचा संबंध सर्वाना ज्ञात होता. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कपूर या जुहूला प्रायोगिक नाटकांसाठी ‘पृथ्वी थिएटर’ बांधण्याच्या संकल्पनेने झपाटलेल्या होत्या. त्यांचा हा प्रकल्प अखेर १९७८ मध्ये सिद्धीस गेला आणि जुहूचे प्रसिद्ध ‘पृथ्वी थिएटर’ सुरू झाले. ७० च्या दशकात नाटकातील समांतर, प्रयोगशील संवेदनेला कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उभयतांचा हा व्यक्तिगत प्रयत्न किती दूरदृष्टीचा ठरला, हे आपण बघतोच आहोत. स्मिता आणि शशी कपूर यांचे बहुधा ‘घुंघरू’ या हिंदी सिनेमाचं एकत्र शूटिंग पुण्याजवळ चालले होते. त्यावेळी स्मिता आणि मोहनने शशी कपूर यांना भेटून ते येण्याचे नक्की केले.
जुन्या षण्मुखानंद सभागृहात १६ मे १९७६ रोजी ‘घाशीराम’चा १०० वा प्रयोग नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल गेला. प्रमुख पाहुणे दिलीपकुमार आणि शशी कपूर यांची भाषणे जोरदार झाली. पाहुणे जायला निघाले. दिलीपकुमार आणि जब्बार यांची बरीच चर्चा चाललेली. पाहुणे गेले. ‘घाशीराम’च्या ब्राह्मणांची पंगत भोजनास बसली. अर्थातच आजचा मेन्यू खास होता. नेहमीप्रमाणे मुंबईच्या मुक्कामात प्रसिद्ध आराधना ट्रॅव्हलच्या श्री. व सौ. शरद किराणे यांची भोजन- व्यवस्था. त्यांची खासियत म्हणजे उत्तम व चविष्ट आमटी. वास्तविक केटरिंग हा काही त्यांचा व्यवसाय नव्हे. मुंबईचा आमचा प्रयोग व्यवस्थापक, बाउन्सर, आधारवड वगैरे असणाऱ्या विजय देसाई याच्या खास आग्रहावरून किराणे दाम्पत्य ‘घाशीराम’च्या ब्राह्मणांची भोजनव्यवस्था मनापासून पाहत असे.
या सगळ्यांत जब्बार मात्र गंभीर. त्याचा श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाचा ‘सामना’ हा चित्रपट गाजत होता. ७५ मध्ये तो बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला गेला होता. तर हे सगळे दिलीपकुमार यांना माहीत होते. आणि त्यांनी जब्बारला असे विचारले की, त्यांना- म्हणजे दिलीपकुमार यांना घेऊन चित्रपट करण्यात त्याला रस आहे का? हे जब्बार गंभीर असण्याचे रहस्य होते. नंतरची चक्रे  जरा वेगानेच फिरली. ती अशी..
दिलीपकुमारांच्या घरून गाडी आली. जब्बार त्यांच्या पाली हिलच्या घरी.. आय मीन बंगल्यावर दाखल. जाण्याच्या आधी त्याची अनिल जोगळेकरबरोबर एका उत्कंठावर्धक कथानकाविषयी उचित अशा गांभीर्याने चर्चा. शंभराव्या प्रयोगानंतर एका आठवडय़ाच्या आत जब्बार, अनिल आणि मी दिलीपकुमारांच्या ‘३४/ बी, पाली हिल’ या बंगल्यावर नियोजित चित्रपटाच्या पटकथालेखन चर्चेसाठी दाखल! यात मी कसा आलो, कुणास ठाऊक. पण आलो. कारण चित्रपट हा काही माझ्या खास आवडीचा विषय नव्हता. ते माध्यम मला फार दूरचे आणि तांत्रिक आहे असे वाटायचे. जो काही चित्रपटाशी संबंध तोपर्यंत आला होता तो समर नखातेच्या संगतीनं फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये दाखवतात त्या चित्रपटांपुरताच मर्यादित होता. त्यातल्या त्यात लोकप्रिय मराठी-हिंदी सिनेमे लहानपणी पुण्यात प्रभात, भानुविलास आणि विजय टॉकीज ऊर्फ ‘लिनाचिमं’ म्हणजे ‘लिमये नाटय़-चित्र मंदिर’मध्ये बघितलेले. जब्बार गोष्टी सांगण्यात तरबेज. तर अनिलचे वाचन उत्तम असल्याने त्याच्याजवळ तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी सदैव तय्यार. ‘निशांत’ या गाजलेल्या सिनेमाची गोष्ट अनिलला वृत्तपत्रात आलेल्या एका छोटय़ा बातमीवरून सुचली. ती त्याने तेंडुलकरांना जब्बारसाठी नाटक लिहिण्यासाठी सुचवली. पण अखेर त्यावर तेंडुलकरांनी श्याम बेनेगलांसाठी पटकथा लिहिली.. असा सगळा इतिहास.
तर जब्बारने सांगितलेली गोष्ट दिलीपकुमारांना चक्क आवडली आणि आमच्या पाली हिलच्या प्रशस्त बंगल्यावर चकरा सुरू झाल्या. दिलीपकुमारांना सगळे ‘युसूफसाब’ म्हणत. मस्त बंगला. खाण्यापिण्याची चंगळ. एकदा तर सायराबानू यांनी स्वत: शिरा करून आम्हाला खायला घातला. ‘याऽऽऽहूं, चाहे कोई मुझे जंगली कहे, एहसान तेरा होगा मुझ पर..’ या हिट्  गाण्यांच्या नायिका सायराबानू यांनी स्वत: शिरा करून आम्हाला दिला, हे आम्ही उचित अशा गांभीर्याने पुण्यात टिळक रोडच्या नीलकंठ प्रकाशन अड्डय़ावर सांगितले तेव्हा संस्थेतल्या चेहऱ्यांवर उमटलेले संपूर्ण अविश्वासाचे भाव आणि ‘हं! शिरा खाल्ला? असं.. असं. सायराबानूंनी केलेला.. अरे.. हे काय म्हणतायत बघा. सायराबानू म्हणजे? त्या ‘जंगली’मधल्या?’ अशी आमची पूर्ण चेष्टा सुरू झाली. पुढे तर सायराबानूंचा उल्लेख पुण्यात ‘सायराकाकू’ असा व्हायला लागला. आमची राहण्याची व्यवस्था लिंकिंग रोडवरच्या एका हॉटेलात केलेली. दिलीपकुमार माणूस म्हणून किती सभ्य असावा? दिलेल्या वेळेआधी ते हजर असत. त्यांचे वाचन अद्ययावत असे. ते असं वागत असत, की आम्ही जणू फिल्म इंडस्ट्रीमधले अत्यंत मान्यवर आहोत. १६ मेला ‘घाशीराम’चा प्रयोग झाला आणि २५ जुलैला दिलीपकुमार यांनी अनिल आणि मला चक्क पटकथा लिहिण्यासाठी, तर जब्बारला दिग्दर्शनासाठी करारबद्ध केले. एक-दोन बैठकींत आमची भीड चेपली. हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा मानदंड तयार करणारा हा अभिनेता चक्क घरी अभिनयाचा रियाज करतो, हे बघून आम्ही थक्क झालो. त्यांना उत्तम मराठी समजते. ते मधूनच ग्रामीण ढंगात मराठी बोलत. त्यांचे कुटुंब खूप पूर्वी पेशावरमधून स्थलांतर झाल्यावर नाशिकजवळ देवळालीजवळ या कुटुंबाची शेती होती. भाईबंदांचा मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळांचा व्यवसाय होता.
स्वातंत्र्यपूर्व काळात ते पुण्याला लष्कर भागातील एका ब्रिटिश सैनिकाच्या बारमध्ये कामाला होते. शास्त्रीय संगीत तसेच बालगंधर्व यांच्या संगीताविषयी त्यांना पूर्ण माहिती. ते स्वत: हार्मोनियम वाजवीत. जुन्या मराठी संगीत नाटकांतली गाणी ते सहज, पण सुरांत गुणगुणत. पुण्याच्या आर्यभूषण थिएटरच्या लावण्यांविषयीही त्यांना माहिती. अण्णाभाऊ  साठे, अमरशेख यांची शाहिरी ऐकलेली. दुसऱ्या बाजूला इंग्रजी सिनेमाविषयी उत्तम समज. मार्लन ब्रांडो याच्या मेथड अ‍ॅक्टिंगविषयी त्यांचा अभ्यास होता. त्याचे सर्व चित्रपट त्यांनी बघितलेले. लॉरेन्स ऑलिविए, राल्फ रिचर्डसन, जॉन गिलगुड यांची नाटके लंडनला बघितलेली. असं सगळं त्यांचं. पण त्यांची अभिव्यक्ती सगळी लोकप्रिय व्यावसायिक, कलाभिमुख जरी असली, तरी त्यात स्वत:ची खास जागा त्यांनी आपल्या संयत अभिनयाने तयार केलेली होती. आणि तोच त्यांच्याबरोबरचा आमचा दुवा होता. आजूबाजूला सगळ्या तद्दन धंदेवाईक सिनेमांचा बाज असताना हा अभिनेता स्वत:चा बाज कसा वेगळा राखू शकतो, याचे आम्हाला प्रचंड कुतूहल वाटे.
सुरुवातीला मला वाटलं की, आम्हाला बोलावलं हा युसूफसाहेबांचा कौतुकाचा किंवा विरंगुळ्याचा भाग असावा. ते त्यावेळेला ५३-५४ वर्षांचे होते. त्यांना कदाचित जाणून घ्यावंसं वाटत असेल, की तरुण पिढीची आवडनिवड, अभिरुची काय आहे, वगैरे. पण तसे नव्हते. ते सांगायचे की, अभिनयात ते चुकून आले. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आले. त्यांची खरी आवड होती स्पोर्ट्स. ते स्वत: उत्तम फुटबॉल खेळत असत. त्यातच त्यांना करिअर करायचे होते.
त्यांच्याबरोबर आमच्या सात-आठ वेळा मुंबईत, पुण्याला आणि दिल्लीत बैठका झाल्या. बैठक दोन-तीन दिवस चाले. वेळेला गणित नव्हते. कधी दिवसभर, तर कधी दोन-तीन तास. तर कधी नुसत्याच गप्पा, खाणे. नियोजित सीनचा ढाचा त्यांना आम्ही सांगितला की ते क्षणभर विचार करून अंतर्मुख व्हायचे. त्या सीनचा विस्तार करत तो पडद्यावर कसा दिसेल, याचे संवादासकट साभिनय वर्णन करायचे. त्यांची भूमिका होती मध्यमवयीन बँक मॅनेजरची. एक दिवस त्या बँक मॅनेजरला लक्षात येते की, काही अनोळखी माणसं त्याच्यावर पाळत ठेवून आहेत. त्या माणसांना वाटत असतं, की हा त्यांचा पूर्वीचा बराच काळ परागंदा झालेला अंडरवर्ल्डमधला बॉस ‘बाबाजान’ आहे. बाबाजानच्या फोटोत आणि त्या बँक मॅनेजरच्या दिसण्यात विलक्षण साम्य आहे. मग त्या बँक मॅनेजरला खरंच वाटायला लागतं, की आपण ‘बाबाजान’ आहोत. आणि त्याच्या वागण्यात, स्वभावात हळूहळू बदल होत होत तो पूर्णपणे ‘बाबाजान’ होतो.. अशी साधारणपणे कथा होती.
दिलीपकुमार आम्हाला ही दोन्ही व्यक्तिमत्त्वं साभिनय उलगडून दाखवत होते. बँक मॅनेजरचा असलेला मध्यमवर्गीय स्वभाव, हातवारे, आवाज, भावनादर्शन हळूहळू बाबाजानच्या व्यक्तिरेखेत कसे बदलत जाते, हे तासन् तास बघणे ही आमची कार्यशाळाच होती. रिहर्सल चालू असताना पाली हिलच्या बंगल्याच्या परिसरात ते चालत-बोलत ते बँक मॅनेजर किंवा बाबाजान म्हणूनच. या दोन माणसांच्या आयुष्यात येऊ  शकतील असे प्रसंग कल्पून ते पडद्यावर कसे दिसतील, याचे इत्थंभूत भावनाप्रधान दर्शन होत असे. एकेका सीनचे इम्प्रोव्हायझेशन ते १५-२० मिनिटे सलग आणि सहज करीत. बघता बघता आमची तंद्री लागत असे. असे अभिजात अभिनयाचे दर्शन बघण्याचे प्रसंग फार कमी येतात. स्वत:च्या अभिनयाचे व्याकरण निर्माण करणारे नट बघायला मिळणे तर दुर्मीळच. शंभू आणि तृप्ती मित्र हे अजून एक उदाहरण. आज नव्वदीच्या पुढे असलेला हा अभिजात नट आम्हाला त्याच्या पन्नाशीत खासगीत अभिनय करून दाखवत होता. आम्ही भाग्यवानच म्हटले पाहिजे.
दिल्लीच्या बैठकीत जरा मजा म्हणून आम्ही फुटबॉल खेळलो. नंतर कोठे माशी शिंकली कोण जाणे. पण चित्रपटातले एखादे दृश्य विरत जावे तशा ‘ओ.. बाबाजान’ या नियोजित सिनेमाच्या बैठकी हळूहळू विरळ होत गेल्या. ७६ साली करारबद्ध झालेला हा सिनेमा काही निघाला नाही. पण युसूफसाब आणि सायराकाकू यांची झालेली ओळख मात्र टिकली. पुढे २००२ मध्ये जब्बारला ‘पुण्यभूषण’ पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला.
पुण्यात एकदा टर्फ क्लबवरच्या बैठकीच्या वेळी युसूफसाहेब आणि सायराकाकू यांनी ‘घाशीराम’च्या सर्व टीमला चहापानास बोलावले होते. त्यावेळी संस्थेतील काही चाणाक्षांनी सायराकाकूंना प्रत्यक्षच विचारून त्यांनी शिरा खरंच केला होता की नाही, याची शहानिशा मात्र करून घेतली. तर अशा न निघालेल्या ‘ओ.. बाबाजान’ या चित्रपटाची ही कहाणी सुफळ संपूर्ण.       (उत्तरार्ध)     

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 100th performance of ghashiram kotwal in pune