लोकेश शेवडे  lokeshshevade@gmail.com

आज आपण सगळी भौतिक सुखे उपभोगत असलो तरी विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपल्याला काहीच पडलेली नाही. ज्यांना सृजनाची देणगी लाभली आहे अशा साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांकडून तरी ही अपेक्षा करणे गैर आहे का? पण तिथेही ‘मला काय त्याचे?’ हीच वृत्ती दिसून येते. आज भोवतालची मळभलेली परिस्थिती पाहता नाशकात या आठवडय़ात भरणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आपल्याला.. स्वतंत्रपणे विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच पडायला हवा. नाही का?

यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द

तो एक श्रेष्ठ कलाकार. भोवतालच्या अन्याय, पिळवणूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचं बिंब आपल्या कलाविष्कारात उतरवणं हे त्याच्या कलासाधनेचं एक अविभाज्य अंग तो मानतो. म्हणून वर्षांनुवर्ष मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकारांनी तो ग्रस्त असला तरी शरीराची तमा न बाळगता स्वत:च्या देशातल्या हुकूमशाहीचं, अन्यायाचं चित्रण आपल्या कलाकृतींतून आणि स्फुटलेखनातून तो जगभर पोहोचवतो. त्यामुळे हुकूमशाहीच्या पाईक असलेल्या सर्व यंत्रणा त्याला कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यत अडकवून तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत असतात. तो देशाबाहेर जातोय असं कळल्यावर त्याला आयत्यावेळी राजधानीतल्या विमानतळावर अटक करून त्याचा पासपोर्ट जप्त केला गेला, कोणत्याही आरोपाशिवाय तुरुंगात डांबण्यात आलं आणि त्याच्या प्रकृतीची वाताहत होत असतानाही त्याला जामीन न मिळू देता तुरुंगात खितपत ठेवलं.. कित्येक विचारवंतांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून, सरकारकडे त्याला सोडण्याविषयी विनंत्या-आर्जवं करूनही सरकारचं मन द्रवलं नाही आणि कोणत्याही आरोपाविना चौकशीसाठी त्याला जवळपास तीन महिने तुरुंगातच सडवलं आणि काहीच आक्षेपार्ह सापडेना तेव्हा त्याच्यामागे ईडीचा (सक्तवसुली) ससेमिरा सुरू केला..  

ही घटना आहे याच शतकातली- २०११ मधली. कलाकाराचं नाव आहे आय वेवे आणि देशाचं नाव आहे चीन.

तो एक लेखक, कादंबरीकार, नाटककार आणि पत्रकार. काल्पनिकता-पारलौकिकता टाळत, सत्य आणि वास्तवाचा वेध घेऊन आपल्या साहित्यातून ते मांडणं, हे त्याला त्याचं परमकर्तव्य वाटतं. त्याच्या लेखनकाळात फितूर, देशद्रोही म्हणून बदनाम केल्या गेलेल्या अल्पसंख्याक धर्मीयांतल्या एका सेनाधिकाऱ्याला गोपनीय कागदपत्रं शत्रूला विकल्याच्या आरोपावरून तुरुंगात टाकलं गेलं आणि फितुरीच्या गुन्ह्यसाठी कोर्टानं त्याला जन्मठेप सुनावली. संपूर्ण देशभरातली जनता त्या अल्पसंख्य धर्मीयांविरुद्ध पेटली असताना तो मात्र त्या फितूर ठरवल्या गेलेल्या सेनाधिकाऱ्याच्या बाजूनं उभा राहिला आणि त्याने राष्ट्रपतींना अनावृत पत्र पाठवलं की, ‘तुम्ही चुकता आहात. निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार ठरवता आहात..’ यावर देशाच्या युद्धमंत्र्याने त्या पत्रलेखकावरच देशाच्या बदनामीचा खटला भरला आणि त्यालाही तुरुंगवासात धाडलं. 

ही घटना आहे सव्वाशे वर्ष जुनी- म्हणजे मागच्याच्या मागच्या शतकातली. १८९४ मधली. लेखकाचं नाव आहे एमिल झोला. तत्कालीन बदनाम धर्माचं नाव आहे ‘ज्यू’. सेनाधिकाऱ्याचं नाव आहे ‘ड्रेफ्युज’. आणि देशाचं नाव आहे    फ्रान्स.

तो एक तत्त्वज्ञ आणि वैचारिक लेखन करणारा लेखक होता. त्यानं देव-धर्म नाकारले आणि प्रचलित राज्यव्यवस्थेतील त्रुटींवर प्रहार केले. त्यावर राजसत्तेनं त्याच्यावर गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप ठेवून त्याला देहान्ताची शिक्षा ठोठावली. देहान्ताच्या शिक्षेत सूट म्हणून माफी मागून देश सोडून जाण्याचा पर्याय त्याला दिला गेला..

ही घटना आहे २४०० वर्ष जुनी- म्हणजे इसवी सनापूर्वी चौथ्या शतकातली. तत्त्वज्ञ- लेखकाचं नाव आहे सॉक्रेटिस. आणि देशाचं नाव आहे ग्रीस.

पहिल्या घटनेतल्या आय वेवेवर सरकारनं शेवटी करचुकवेगिरीचा आरोप करून दंडासह सव्वा कोटी युवान (१३ कोटी रुपये) सक्तवसुलीचा आदेश काढला. यावर कलाप्रेमी आणि कलावंतांनी त्याच्या स्टुडिओच्या भिंतीवर नोटांचे बाण करून मारत दंडाची रक्कम भरायला सुरुवात केली. त्यापैकी बहुतांश कलाप्रेमी आंदोलकांनी प्रत्येकी एकूण मारलेल्या या नोटादेखील एकूण ८९६४ युवानच्या असत. (४/ ६/ ८९ या दिवशी सरकारनं तिआनमेन चौकात लाखो विद्यार्थ्यांचं जे हत्याकांड केलं होतं, त्याविरुद्ध आय वेवे आपल्या चित्रांतून आवाज उठवत होता, हा संदर्भ ८९६४ या आकडय़ामागे आहे.) दहा दिवसांत जवळजवळ ३०,००० कलाप्रेमींनी तीन-चतुर्थाश रक्कम त्याच्या स्टुडिओच्या भिंतीवर नोटांचे बाण करून मारत भरली!!! शेवटी दंड भरल्यावर आणि वेवेला मुक्त केल्यावर हे नोटांच्या बाणांचं आंदोलन थांबलं. पुढे वेवे देश सोडून गेला..

दुसऱ्या घटनेत झोलाचं पत्र ‘ल ऑरोर’ नावाच्या एका प्रसिद्ध दैनिकानं मुखपृष्ठावर छापलं होतं. (त्या दैनिकावरही बदनामीचा खटला भरला गेला.) पण त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि विचारवंत, पत्रकार व माध्यमांच्या दबावामुळे शेवटी सरकारला ‘ड्रेफ्युज प्रकरणा’ची फेरचौकशी करावी लागली; ज्यात अंतिमत: तो निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. तथापि यावरची न्यायालयीन प्रक्रिया इतकी लांबली, की दरम्यान झोला मरून गेला होता.

तिसऱ्या घटनेतला सॉक्रेटिस पुढे जगातला सर्वात प्राचीन आणि थोर तत्त्वज्ञ म्हणून नावाजला गेला. पण त्यावेळी मात्र त्यानं माफी मागण्यास नकार दिल्यामुळे त्याला विषप्राशन करून मृत्यू स्वीकारावा लागला. (देवधर्म नाकारणाऱ्या आपल्याकडच्या चार्वाकाची कथा काहीशी अशीच आहे.)  

 कवी, लेखक, कलाकार, विचारवंत यांचं आणि त्यांच्या विचार/ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं दमन जगभरच्या वेगवेगळ्या राजसत्तांद्वारे शतकानुशतकं का सुरू आहे? याचं उत्तर त्यांच्या विचारांत आणि अभिव्यक्तीत असलेल्या ताकदीत आहे. ते स्वत: वृद्ध, विकलांग, शक्तिहीन झाले असले तरी त्यांच्या अभिव्यक्तीत लक्षावधींना शारीरिक आणि वैचारिक ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असतं. लेखक, कलाकार आणि त्यांच्या अभिव्यक्तीत एवढं सामर्थ्य असेल तर मग सध्या जगभरचे साहित्यिक-कलाकार काय करताहेत? जगभरातल्या अनेक देशांतले वेगवेगळे सत्ताधीश आपापल्या देशांत हुकूमशहा बनून अन्याय, अत्याचार, दमन करत असूनही तिथले साहित्यिक-कलाकार स्वदेशातल्या हुकूमशहांविरुद्ध, त्यांच्या अन्याय-अत्याचारांविरुद्ध उभे राहताहेत का? विद्यार्थ्यांच्या लोकशाही चळवळीसाठी हुकूमशाहीविरुद्ध वेवे उभा राहिला, वेवेच्या बाजूनं कलाप्रेमी-कलावंत उभे राहिले; ड्रेफ्युजच्या बाजूनं सरकारविरुद्ध झोला उभा राहिला; तसे कोणी साहित्यिक-कलाकार आज उभे राहत आहेत का? हुकूमशहांच्या विरुद्ध उभे राहण्याची शक्ती नसेल तर निदान जे अन्यायग्रस्त, कष्टी, पीडित आहेत, त्यांच्या बाजूनं कसेबसे तरी उभे राहत आहेत का? जे पीडित चळवळ करत असतील त्यांच्या बाजूनं चळवळीत उतरताहेत का? गेल्या शतकभरामध्ये जगात साक्षर आणि सुशिक्षितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यातच आता ट्विटर, फेसबुक, ब्लॉग्स, यूटय़ूब, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीची साधनं कधी नव्हे एवढी मुबलक झालेली असताना आणि प्रत्येक विषयाची माहितीदेखील आंतरजालावर ओथंबलेली असताना जगभर विचारवंत, लेखक, कलाकारांची संख्या वाढलेली असणारच. आणि परिणामत: त्यांच्या लेखन-कलाविष्कारांची संख्याही वाढलेली असायला हवी. मग सत्ताधीशांनी केलेल्या दमन-अन्यायाविरुद्ध लेखक-कलाकारांनी उठवलेले आवाज जगभर ऐकू येताहेत का? हा प्रश्न जगभरातील अनेक देशांतील दमन-अन्याय-अत्याचारांशी जितका संबंधित आहे, त्यापेक्षा जास्त तो संबंधित आहे (आंतरजाल आणि समाजमाध्यमं सर्वदूर पसरल्यापासून) जगभरातल्या सत्ताधाऱ्यांच्या वाढलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीशी! वर दिलेल्या तीन घटनांपैकी पहिली चीनमधली आहे. तिथे लोकशाही नाही. दुसरी घटना फ्रान्समधली. सव्वाशे वर्ष जुनी. त्या काळापर्यंत जगात आणि फ्रान्समध्ये लोकशाही पुरेशी रुजलेली नव्हती. तिसरी घटना २४०० वर्ष जुनी आहे. तेव्हा तर लोकशाही जगाला माहीतच नव्हती. त्यामुळे या तिन्ही घटनांमागे मूळ हुकूमशाही- आणि पर्यायानं दमन असणं स्वाभाविक मानता येईल. परंतु आता तर जगातल्या बहुतांश देशांत लोकशाही रुजली आहे, तरीही अन्याय, दमन थांबलेलं नाही. याचं कारण काय? तर, लोकशाही प्रक्रियेतदेखील हुकूमशाही बेमालूम दडू शकते, हे आहे.

लोकशाहीत सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीत बहुमत मिळवणं हाच मार्ग असतो. त्यामुळे बहुसंख्याक गटाचं तुष्टीकरण करत बहुमत गाठणे हा मार्ग गैर असला तरी अवलंबला जात असे. तथापि, बहुसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी त्यांच्या अस्मिता फुलवणे, अल्पसंख्याकांबाबत भीती व द्वेष तयार करून त्यांच्याविरुद्ध (आपल्या बाजूने) बहुसंख्याकांचे मत तयार करणे ही अत्यंत धोकादायक पद्धत गेली काही र्वषे जगभरातल्या बऱ्याच देशांमध्ये वापरली जाऊ लागली आहे. यासाठी आंतरजाल, समाजमाध्यमं यांचे अल्गोरिदम, त्यातून ‘घडवला’ जाणारा मतदार याबाबत सध्या जगभरातले त्या विषयातले तज्ज्ञ चिंतेत आहेत. मात्र, अल्पसंख्याकांचं हनन करून त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणाऱ्या आणि बहुसंख्याकांच्या अस्मिता फुलवणाऱ्या खोटय़ा वेबसाइट्स, खोटय़ा बातम्या, खोटी आकडेवारी, खोटा इतिहास मांडणाऱ्या पोस्ट्स अधिक चिंताजनक आणि वेगळ्या प्रकारे लोकशाहीच्या सध्याच्या अवस्थेशी थेट संबंधित आहेत. या साऱ्या प्रकारामुळे बऱ्याच देशांत लोकशाही ही ैबहुसंख्याकांची हुकूमशाही बनू पाहते आहे. आणि अशा स्वरूपाचा धोका अमेरिकेसारख्या भक्कम आणि प्रगल्भ व्यक्तिस्वातंत्र्यवादी देशासमोरदेखील येऊन ठेपला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, सुव्यवस्था, सुबत्ता या सर्वच बाबतींत अमेरिका हा देश जगात उच्च स्तरावरचा मानला जात असतानाही तिथे धार्मिक आधारावर व्हिसा नाकारणं, खोटय़ा बातम्या, खोटी आकडेवारी, द्वेषमूलक पोस्ट्स पसरवणं या बाबी घडू लागल्या होत्या. हा धोका दूर करण्यात तिथल्या कवी, लेखक, कलाकार यांचा सहभाग आणि योगदान इतर देशांतील लेखक-कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल.

‘अमेरिकेला ‘पुन्हा’ श्रेष्ठ बनवू या’ (लेट अस मेक अमेरिका ग्रेट ‘अगेन’!) असं अगोदरच्या राज्यकर्त्यांना हिणवण्यासाठी ट्रम्प म्हणू लागले तेव्हा मॅडोना, ऑलिविया वाईल्ड अशा किमान ५०-६० गाजलेल्या सिनेतारकांनी व नाटय़-चित्रपट कलावंतांनी ‘पुन्हा’ या शब्दावर आक्षेप घेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जाहीर निषेध केला. ट्रम्प यांनी व्यासपीठावर एका अपंग वार्ताहराला वेडावून दाखवलं याबद्दल मेरील स्ट्रिपनं त्यांची निर्भर्त्सना केली. रॉबर्ट-डी-निरो यानं ‘हा माणूस हुशार असता तर अधिक धोकादायक ठरला असता..’ असं म्हटलं. तर रिचर्ड गेरे या ज्येष्ठ अभिनेत्यानं ‘ट्रम्प हे अमेरिकेचं सर्वात मोठं दु:स्वप्न आहे. निर्वासित आणि दहशतवाद हे दोन शब्द एकत्र आणणं हा ट्रम्पचा सर्वात मोठा गुन्हा आहे,’ असं विधान बीबीसीवर जाहीर मुलाखतीत केलं. ट्रम्पच्या विरुद्ध हजारो लेखकांनी शहरोशहरी मोनिका यॉन व अन्य कवींच्या कविता म्हणत मोर्चे काढले. ट्रम्प किती वेळा आणि काय खोटं बोलले, हे अनेक अमेरिकन दैनिकांत आणि न्यूज चॅनल्सवर पत्रकारांकडून मांडलं गेलं. अमेरिकेसारख्या  विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, सुव्यवस्था असलेल्या देशातले लेखक-कलाकार जर तिथे अन्याय-दमन असल्याचा दावा करत असतील, तर इतर देशांत काय अवस्था असेल आणि तिथल्या लेखक-कलाकारांनी आपापल्या देशांत काय करावं? बाकीच्या देशांचं सोडा, आपल्या देशातले लेखक-कलाकार काय करत आहेत? गेली अनेक वर्ष चित्र-शिल्प-नृत्य-नाटय़-लेखन अशा अनेक प्रकारच्या अभिव्यक्तींच्या चर्चासत्रांचं, परिसंवादांचं आयोजन जागोजाग होत असतं,. नाटय़-साहित्य संमेलनांचे सोहळे नित्यनेमानं धामधुमीत पार पडतात. त्यांत किती  वेवे, झोला उभे राहतात? किती लेखक-कवी-विचारवंत खोटय़ा बातम्या, खोटय़ा आकडेवारीविरुद्ध, दमनाविरुद्ध रस्त्यावर येतात? स्वत: रस्त्यावर येऊ शकले नाहीत तर किमान पीडितांच्या चळवळींत तरी सामील होतात का? सामील नाही झाले तरी पािठबा तरी देतात का? पाठिंबा नाही दिला तरी चळवळीत कोणी मृत्युमुखी पडल्यास त्याबद्दल जाहीर दु:ख व्यक्त करतात का?  किती मेरील स्ट्रिप अगोदरच्या राज्यकर्त्यांना हिणवण्याबद्दल आक्षेप घेतात? किती रिचर्ड गेरे धार्मिक आधारावर भेद करण्याबद्दल जाब विचारतात? .. की आपल्याकडे कुठली चळवळ होतच नाही? आणि झाल्यास त्यात कोणी मृत्युमुखी पडतच नाहीत? व्यासपीठावरून कोणाला कधी वेडावून दाखवलंच गेलं नाही का? अन्याय, अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं दमन घडतच नाही का ? म्हणजे आपल्याकडे सारं काही आलबेल आहे की काय? याचं उत्तर काहीजण ‘होय’ असं देतीलही!

आपल्याकडे कोणीतरी सत्ताधीशांचं कौतुक करतं, अगोदरच्या राज्यकर्त्यांना हिणवतं आणि मग त्या कौतुकाला आणि हिणवण्याला स्वत:चे विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा दावा करतं. ट्रम्प यांनी व्यासपीठावर एका अपंग माणसाला वेडावून त्याची नक्कल केली याबद्दल मेरील स्ट्रिप बाई गप्प बसल्या असत्या, निर्वासितांना दहशतवादी म्हटलं याबद्दल रिचर्ड गेरे बुवांनी मौन बाळगलं असतं, आणि या दोघा बाई-बुवांनी ‘ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा श्रेष्ठ बनवलं, त्यांच्यापूर्वी अमेरिका भिकार होती,’ असं म्हटलं असतं तर त्याला त्यांचं ‘विचार किंवा अभिव्यक्ती’ स्वातंत्र्य म्हणता येईल, की लांगूलचालन की खोटेपणा? कला आणि अभिव्यक्तीबद्दल थिओडॉर एॅडोर्नो हा विख्यात जर्मन तत्त्ववेत्ता म्हणतो, ‘कला (अभिव्यक्ती) हा एक न केलेला गुन्हाच असतो. कला ही निसर्गत:च प्रस्थापित स्थितीला आव्हान देत असते.’ म्हणजे ‘प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देऊनच अभिव्यक्ती/ विचार (स्वातंत्र्य) साकारतं.’ किंवा ‘कलेच्या अभिव्यक्तीमागे कलाकाराने वैचारिक गुन्हा केलेला असतो.’ गेली अनेक वर्ष व्हॉट्सअ‍ॅपवर इतिहासाची मोडतोड केलेला किंवा पूर्णत: खोटा इतिहास असलेला मजकूर फिरवला जात आहे. त्यात अनेकदा ‘स्वातंत्र्यलढय़ात गांधीजींचं काहीही योगदान नव्हतं,’ असं नमूद केलेलं असतं. याउलट, नरहर कुरुंदकर यांनी ‘शिवरात्र’ या पुस्तकातल्या ‘श्री. गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी‘ या १९६९ सालच्या लेखात लिहिलंय, ‘हैद्राबादचा लढा हा तर मुस्लीमविरोधी होता. भारताची एकात्मता निर्माण करणारा होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढय़ात तरी काय भाग घेतला? निझामावर बॉम्ब फेकणारा पुन्हा गांधींचा जयघोष करणाराच असतो. हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासीम रिझवी दिसला नाही. निझाम व जिना दिसले नाहीत. या पिस्तुलातली गोळी इ. स. १९२० नंतर इंग्रजांच्याही विरोधी झाडली गेली नाही. जणू ही गोळी फक्त गांधींसाठी होती!’    एॅडोर्नोच्या मते यापैकी कोणत्या मजकुराला अभिव्यक्ती किंवा विचार म्हणता येईल? व्हॉट्सअ‍ॅप की कुरुंदकर? या प्रश्नांची उत्तरं कला-अभिव्यक्ती विषयांचे अभ्यासक देऊ शकतील. किंवा त्यावरही एॅडोर्नोच्या नावे व्हॉट्सअ‍ॅप मजकूर कोणीतरी पाठवेलच. आणि त्यात ‘गांधीजींनी एॅडोर्नोला पंतप्रधान केलं असतं तर फाळणी टळली असती,’ असंही नमूद असेल..

अमेरिकेतले लेखक-कलावंत ज्याप्रमाणे वागतात तसे जगातल्या अन्य राष्ट्रांतले लेखक वागू शकतील ही अपेक्षा करणं अतार्किक ठरेल. त्यांच्यासारखी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अवस्था असूनही ते अन्यत्र जमणं दुरापास्त आहे. कारण त्यासाठी तसा प्रतिसाद देणारे साहित्य-कलाप्रेमी, तसे कायदे आणि कायद्यांची अंमलबजावणी करणारे सरकारी नोकरशहादेखील असणं आवश्यक आहे. अनेक सृजनबा कारणांनी मुळातच दुर्बळ असलेल्या लेखक-कलाकारांचं आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं राजसत्ता किती क्रूर दमन करत असते याचा दृष्टान्त देताना ‘इस्किलार’ या कादंबरीतल्या एका पात्राच्या मुखातून जी. ए. कुलकर्णी म्हणतात, ‘‘शहाणा असशील तर कधी लिहू नकोस. लिहिलेस तर कोणाला वाचून दाखवू नकोस. पैसा असेल तर पोटभर खा, नाहीतर उपाशी राहून झाडाप्रमाणे वाळून जा; पण कागद आणि शाई यांच्याशी संबंध येऊ देऊ नको. माझा वृद्ध बाप सतत लिहीत असे आणि नंतर रात्रभर जे लिहिले त्याच्या सुरळ्या घेऊन सकाळी लोकांमध्ये वाटत असे. परवा उघडय़ा तलवारी घेतलेले राक्षसासारखे सैनिक आले. त्यांनी त्याचे सारे कागद जाळून टाकले आणि बापाला घेऊन निघून गेले. माझा बाप इतका भयंकर आहे हे मला माहीतच नव्हतं. तो अगदी जवळून चालला तरी अंगणातल्या चिमण्यादेखील कधी भीतीने बाजूला होत नसत. तो लिहीत असताना खिडकीवर पारवा घुमू लागला तरी त्याला हुसकण्याऐवजी तो लिहिणे थांबवून स्वस्थ बसे. आजूबाजूला दीड-दोन वर्षांचं एकही पोर नसेल- ज्यानं माझ्या बापाची दाढी ओढण्याचा खेळ केला नसेल. परंतु असा हा माणूस म्हणे भयंकर होता! कारण त्याच्यापासून राजसत्तेला धोका होता.’’ ‘इस्किलार’ ही कादंबरी जीएंनी ५० वर्षांपूर्वी लिहिली. तथापि ही कादंबरी कितीही वेळा वाचली तरी कथानक जगातल्या कुठल्या भागात, कुठल्या काळात (शतकात) घडतंय याचा थांग लागत नाही, अशी काही वाचकांची तक्रार असते. वास्तविक सर्वसाधारण वाचकाच्या मते, कादंबरी म्हटल्यावर त्यात सारं काल्पनिकच असणार. मग ते कोणत्याही काळात, कुठेही घडलं असल्याचं धरलं तरी काय फरक पडतो?