‘‘आई, मी खाली खेळायला जातोय.’’ निनादने पायात चप्पल घालता घालता आईला ओरडून सांगितलं आणि तो बाहेर पडला. मात्र जाताना खिशात दोऱ्याचं रीळ टाकायला तो विसरला नाही. रीळ कशासाठी, तर खालच्या बागेत फुला- पानांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांना पकडून त्यांचे पाय बांधून आपला खेळ करण्यासाठी. शाळेतून आल्यावर त्याचा हा रोजचा आवडता कार्यक्रम.
पकडलेल्या फुलपाखराला ठेवण्यासाठी त्यानं आईकडून एक काचेची बरणी मिळवली होती. बरणीतील ऑक्सिजन संपल्यावर ही फुलपाखरं मरून जात, मग त्यांचे रंगीबेरंगी पंख तो एका वहीत चिकटवून ठेवत असे. आई-वडीलही त्याच्या या खेळाला मना करीत नसत. त्यांचं म्हणणं, ‘‘मारामारी तर करत नाही ना, कोणाच्या खोड्या तर काढत नाही ना मग झालं!’’ पण तो मुक्या जिवांच्या खोड्या काढतोय हे त्यांच्या गावीही नव्हतं.
त्या दिवशी तर निनादसाठी खाली मेजवानीच होती. फुलपाखरांबरोबर चतुरांचा एक जथ्थाही पाना- फुलांवर बागडत होता. तो उत्साहानं पुढे सरसावला. चतुरांचे पाय बांधल्यावर त्यांना हातानं अर्धगोलाकार फिरवू लागला. सुटण्यासाठी त्यांची चाललेली पंखांची फडफड पाहून खिदळू लागला.
इतक्यात ‘‘बाळा मला ओळखतोस का?’’ मागून आवाज आला. मागे वळून बघतो तर सोसायटीत नव्यानंच राहायला आलेले साठेकाका उभे होते. त्यानं मानेनंच हो म्हटलं. तेव्हा खाली खेळणाऱ्या सर्व मुलांकडे पाहात ते म्हणाले, ‘‘मुलांनो, आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगतो, ऐकणार?’’
गोष्ट म्हटल्यावर सगळी चिल्ली-पिल्ली खेळ सोडून त्यांच्यापाशी गोळा झाली. निनादही पकडलेली फुलपाखरं व चतुर घरातील बरणीत सोडून पटकन खाली आला. साठेकाकांनी बागेत हिरवळीवरच बैठक जमवली आणि मुलांना प्रश्न केला- ‘‘तुम्हाला गौतम बुद्धांचं आधीचं नाव माहीत आहे?’’
‘‘हो, सिद्धार्थ… तो एक राजकुमार होता. त्याचं वाचन दांडगं होतं.’’ प्रथमेशनं उत्तर दिलं.
‘‘बरोब्बर! त्या सिद्धार्थचीच ही गोष्ट आहे.’’
१०- १२ वर्षांचा सिद्धार्थ एकदा राजवाड्याबाहेरील विस्तीर्ण बगिच्यात एका झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. तितक्यात त्याला एक पक्षी जमिनीवर कोसळल्याचा भास झाला. डोळे उघडून बघतो तो काय एक हंस त्याच्यासमोरच तडफडत होता. तत्क्षणी उठून त्यानं त्या पक्षाच्या अंगात रुतलेला बाण बाहेर काढला. तो काढताना त्या पक्षाला असह्य वेदना झाल्या. रक्त वाहू लागलं. सिद्धार्थनं आपला शेला त्याच्या जखमेला हळुवारपणे बांधला आणि बाजूच्या हौदातील पाणी त्याला पाजलं. सिद्धार्थ त्याला वैद्यांकडे घेऊन जाणार तोच त्याचा आत्तेभाऊ देवदत्त तिथे आला.
देवदत्त अत्यंत आक्रमक स्वभावाचा होता. त्याला आपल्या धनुर्विद्योचा अतिशय अहंकार होता. सिद्धार्थच्या हातातील हंस बघून तो रागानं म्हणाला, ‘‘सिद्धार्थ, ही माझी शिकार आहे. यावर माझा हक्क आहे. त्या हंसाला निमूट माझ्याकडे दे.’’
‘‘या निरपराध पक्ष्याला मारून तुला काय मिळणार आहे? मी याला तुझ्याकडे कदापि देणार नाही.’’ सिद्धार्थ शांत पण ठाम स्वरात म्हणाला.
‘‘तुला शिकारीचे नियम माहीत नाहीत, कारण तू कधी हातात धनुष्यच धरलं नाहीस. तुझ्या माहितीसाठी सांगतो, ज्यानं शिकार केली, त्याचाच त्या शिकारीवर अधिकार असतो. दुसऱ्यानं त्या शिकारीला हात लावायचा नसतो. तू राजपुत्र असलास तरी तुलाही हे नियम लागू पडतात.’’ देवदत्त तार स्वरात म्हणाला.
‘‘मी एक सामान्य युवक असतो तरीही मी हेच केलं असतं. दया हा मानवतेचा सर्वोच्च गुण आहे. त्यानुसार याला जीवदान दिल्यानं, मी त्यावर आता माझाच अधिकार आहे. मी या पक्ष्याला तुझ्याकडे सोपवणार नाही म्हणजे नाही.’’
कोणीच माघार घेईना. तेव्हा देवदत्तनं थेट राजसभेत राजा शुद्धोधनांकडे तक्रार करायचं ठरवलं आणि तो भराभर पावलं टाकीत निघाला. सिद्धार्थनं जखमी हंसाला एका सेवकाकडे दिलं आणि त्याला राजवैद्यांकडे न्यायला सांगून तोही देवदत्तपाठोपाठ निघाला.
राजसभेत गेल्यावर ‘‘महाराज, मला न्याय द्या,’’ असं म्हणत देवदत्तनं झालेली घटना राजा शुद्धोधनाला कथन केली. इतक्यात सिद्धार्थनंही राजसभेत प्रवेश केला.
राजा शुद्धोधन त्याला म्हणाला, ‘‘सिद्धार्थ, देवदत्त सांगतो ते बरोबर आहे. ज्यानं शिकार केली त्याचाच त्या शिकारीवर हक्क असतो. दुसऱ्याच्या शिकारीवर उपचार करणे क्षत्रियाला शोभा देत नाही.’’
‘‘महाराज, तुम्हीच मला सांगितलं आहे की, राज्यातील कोणाचंही रक्षण करणं हा क्षत्रियाचा परमधर्म आहे म्हणून. मग एका निरपराध्याचं रक्षण करून मी माझ्यातील क्षत्रियत्वच सिद्ध केलं आहे ना?’’ सिद्धार्थनं आपली बाजू मांडली.
तो पुढे म्हणाला, ‘‘कोणत्याही जिवावर दुसऱ्या जिवाचा अधिकार असणंच मला मान्य नाही. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. निसर्गानं प्रत्येक जिवाला जीवनाचं वरदान दिलं आहे. ते कारण नसताना हिरावून घेणं हा अधर्म आहे. मी एक राजपुत्र आहे. मी माझ्या राज्यात तडफडणाऱ्या जिवावर उपचार केले नाहीत तर मला राजपुत्र म्हणून घेण्याचा अधिकारच नाही.’’
राजानं सिद्धार्थ त्याचा पुत्र असल्यानं निर्णय घेण्याची जबाबदारी दरबारातील शाक्य संघावर (तत्त्वज्ञानी विद्वानांचा संघ) सोपवली. संघातील वरिष्ठांनी चर्चा करून निर्णय घोषित केला तो असा…
देवदत्तनं पक्ष्याची शिकार केल्यानं त्यावर त्याचा अधिकार होता. पण त्याच्या बाणानं तो मेला नाही. त्या तडफडणाऱ्या जिवाला सिद्धार्थनं जीवदान दिलं आहे. जो जीवदान देतो, त्याचा त्या जीवदानप्राप्त जिवावर प्रथम अधिकार असतो. त्यामुळे सिद्धार्थचा त्या पक्ष्यावर अधिकार आहे.
क्षणभर थांबून साठेकाकांनी विचारलं, ‘‘मुलांनो, तुम्हाला कोणाची बाजू बरोबर वाटते?’’
‘‘सिद्धार्थची.’’ मुलांनी एकमुखानं गजर केला. एकटा निनाद गप्प होता. त्याचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरले होते. गोष्ट संपल्यावर बाकीची मुलं उठून खेळायला गेली तरी तो जागेवरच बसून होता. काकांनी जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘बाळा, मला माहीत आहे की तुला तुझी चूक समजलीय. एक लक्षात ठेव, हातून चूक होणं हा अपराध नाही. मात्र आपलं वागणं चुकीचं आहे हे कळूनही ती कृती पुन्हा घडणं हा गुन्हा आहे. तू समंजस आहेस, तुला जास्त काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.’’
यावर काकांना ‘जरा थांबा’ असं सांगून निनाद धावतच घरी गेला आणि काही क्षणातच फुलपाखरं व चतुर ठेवलेली काचेची बरणी घेऊन खाली आला. बरणीचं झाकण उघडून त्यानं त्या मुक्या जिवांना मुक्त केलं आणि पाठी वळून तो काकांना बिलगला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू पाझरत होते. काकांनी त्याला मिठीत घेतलं. त्या मिठीला गुरू-शिष्य नात्याचा गंध होता.
● waglesampada@gmail.com
