डॉ. सुजाता शेणई

वैचारिक आणि साहित्यिक देवाणघेवाण करणाऱ्या लेखिकांची, साहित्यप्रेमींची वर्धिष्णू संस्था म्हणून परिचित असलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाकडून आजपर्यंत स्त्री साहित्याच्या मागोवाचे खंड, भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा यांसारखे बृहत् ग्रंथ प्रकल्प स्वरूपात उभे राहिले आहेत. या परंपरेला साजेसा ‘भारतीय समाजसुधारक आणि विचारवंतांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान १८०० ते २०००’ हा खंडही नुकताच प्रकाशित झाला. स्त्रीच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रांतील विकासाच्या आलेखात अनेक विचारवंत आणि समाजसुधारक यांनी मोलाचे योगदान दिले. रुढी, परंपरांच्या बंधनातून स्त्रियांना मुक्त करून त्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय यांची प्रथम जाणीव व नंतर हक्क मिळवून देणाऱ्या समाजसुधारकांची व विचारवंतांची गणती करणे अशक्यच आहे. स्त्री जीवनाला समाजसुधारक आणि विचारवंतांनी दाखवलेली कृतिशील व विधायक परिवर्तनाची वाट आणि त्यातून स्त्रियांचा झालेला विकास याबद्दलची कृतज्ञता शब्दातीत असली तरी ती व्यक्त करणे अपरिहार्यच आहे, या कृतज्ञ भावनेने या बृहत् ग्रंथाची निर्मिती झाली.

Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने काढलेल्या या ग्रंथाचे संपादन डॉ. मंदा खांडगे, डॉ. स्वाती कर्वे, डॉ. विद्या देवधर आणि डॉ. कल्याणी दिवेकर यांनी केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. भारतात एकोणिसाव्या शतकात झालेल्या प्रबोधन युगाचे संक्रमण कसे होत गेले व त्यातून उभी राहिलेली चळवळ भारतभर कशी पसरत गेली याचा अभ्यासपूर्ण पट यातून वाचायला मिळतो. ही चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण भारतीय पातळीवर ती हळूहळू पसरत गेली. ती कशी पसरत गेली, त्या त्या प्रांतात त्याचे स्त्रियांच्या जीवनावर व विकासावर काय परिणाम झाले याची दखल अभ्यासक डॉ. गरिमा कलिता, डॉ. लक्ष्मी देवी, डॉ. सुमिता परमार, डॉ. सबिता त्रिपाठी यांनी शोधनिबंधातून घेतली आहे. आसाम, ओरिसा, आंध्र, कर्नाटक ते राजस्थान अशा एकूण चौदा प्रांतातील समाजसुधारक व विचारवंतांचे योगदान या प्रकल्पात शोधनिबंधातून समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

प्रकल्पातील लेखांचे अवलोकन करताना लेख वाचला, आकलन झाला आणि समजला इतके सहज व सोपे नाही. त्यासाठी वाचकाकडेही अभ्यासूवृत्ती असणे गरजेचे आहे. महिला परिषद, स्त्रीशिक्षण, कुप्रथा बंदी, राजकारणात स्त्रियांचा प्रवेश, स्त्रियांची नियतकालिके, स्त्रियांच्या चळवळी व त्यांचे कार्य, स्वमदतगट इत्यादी अनेक मुद्दय़ांचा परामर्श यानिमित्ताने घेतला गेला आहे. १९२७ मध्ये महाराणी चिमणाबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली देशव्यापी महिला परिषद भरली होती, ज्या घटनेला आज ९५ वर्ष उलटून गेली, ही अत्यंत महत्त्वाची नोंद यात वाचायला मिळते. बालविवाह, जरठबाला विवाह व बहुविवाह या कुप्रथांचा स्त्रियांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होणे स्वाभाविकच होते. अखिल भारतीय मैथिली महासभेबरोबरच राजा राममोहन रॉय, पंडित विद्यासागर, केशवचंद्र सेन, गौरमोहन विद्यालंकरार इत्यादींनी त्याविरुद्ध कसा आवाज उठवला हे मुळातून वाचायलाच हवे. ‘गांधीजींमुळे स्त्रिया राजकारणात उतरल्या’, या विधानाचे साधार घटनापूर्ण विवेचन डॉ. कुसुम कुमारी आणि डॉ. अरिवद कुमार यांनी ‘बिहारमधील स्त्रियांच्या विकासातील समाजसुधारकांचे योगदान स्वातंत्र्योत्तर कालखंड’ या लेखात केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात एकूण भारतात स्त्रियांची असलेली परिस्थिती, त्याचा राज्य आणि देशावर होत असलेला परिणाम, ही परिस्थिती बदलावी किंवा त्यात परिवर्तन व्हावे यासाठी अत्यंत तळमळीने त्या त्या प्रांतात झालेले प्रयत्न व त्याचा अन्य प्रांतांवर झालेला परिणाम, त्यातून होत गेलेली प्रगती या साऱ्याचा संदर्भ, ऊहापोह यात वाचावयास मिळतो. भारतीय पातळीवरील हा प्रकल्प असल्याने व तो मराठीत प्रकाशित करायचा असल्याने त्यातील भाषांतरकारांची भूमिकाही फार महत्त्वाची ठरते.

इ.स. १८०० ते २००० या कालखंडात जागतिक स्तरावराही अनेक घटना घडल्या- ज्याची नोंद डॉ. स्वाती कर्वे यांनी उपसंहारात घेतली आहे. पुराणकाळातील स्त्रीजीवन ते साधारणत: १८५० नंतर दर वीस-तीस वर्षांनी स्त्रियांच्या प्रगती व विकासासाठी केलेल्या कार्यात काय परिवर्तन होत गेले याचे अभ्यासपूर्ण विवेचन उपसंहारात वाचायला मिळते. एकविसाव्या शतकात स्त्रीविकास आणि त्यांचे कार्य यांना केवळ वाङ्मयीन किंवा सामाजिक दृष्टीने महत्त्व आहे असे नव्हे, तर स्त्रीजीवन, स्त्रीसाहित्य, स्त्रीसंघटनांचे कार्य या सर्वाना आता वेगळय़ा परिप्रेक्ष्यातून पाहण्याची गरज आहे, हे सदर प्रकल्पातून सिद्ध होते. स्त्रियांच्या विकासाचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा फक्त स्त्रियांपुरता राहात नाही तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजशास्त्रीय दृष्टीनेही मोलाचा दस्तऐवज ठरतो हे या प्रकल्पाचे व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे यश आहे.

‘भारतीय समाजसुधारक आणि विचारवंतांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान १८०० ते २०००’, संपादक – डॉ. मंदा खांडगे, डॉ. स्वाती कर्वे, डॉ. विद्या देवधर आणि डॉ. कल्याणी दिवेकर,
प्रकाशक- साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे,
पाने-४९२, किंमत- १२०० रुपये.