हृषीकेश पाळंदे

शहरापास्नं तसं दूरवर असलेल्या तीन गावांच्या मध्यात एक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज होतं. त्यात बारावीत शिकणाऱ्या तीन मुली. सावनी, साक्षी आणि प्रियन्सी. या तिघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी. स्मार्ट फोन हातात आल्यापास्नं तर एक दिवस असा गेला नाही की, त्यांनी त्यांच्या तिघींचा सेल्फी स्टेटसला टाकला नाही. सर्वात पहिल्यांदा स्मार्ट फोन आला तो सावनीकडे. त्यानंतर प्रियन्सीकडे. साक्षीकडे कधीच आला नाही. कारण तिच्या पप्पांची ऐपतच नव्हती. एकच फोन असला म्हणून तिघींमध्ये काही बिनसाबिनसी झाली नाही. कारण स्टेटसला त्या तिघींच्या फोटोंचं एक रील बनवून टाकलं की भागायचं. बारावीचं वर्ष संपत चाललं होतं. ‘पुढे काय करायचं?’ हा प्रश्न तिघींच्याही मनात वेगवेगळय़ा वेळी यायचा. आणि जेव्हा यायचा, तेव्हा त्या तीनतिघी तो प्रश्न मम्मीपप्पांकडे सराईतपणे ढकलायच्या. ढकलण्याचा प्रश्नच येत नाही; तो आपसूकच पप्पांकडे जायचा. कारण मम्मीपण पप्पांकडेच प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघायची. तिघींच्या पप्पांच्याही मनात तिघींना पुढे शिकवायचं असंच होतं. पप्पांच्या मनात नक्की काय चाललंय हे अजिबात कळत नव्हतं. त्यामुळे सकाळी पप्पा नसले की, या तिघींच्या मनात एकच यायचं- आपण शहरातल्या कॉलेजला जाऊन ग्रॅज्युएट तरी व्हायचंच. त्यावर तिघींनी मिळून सिक्रेट प्लॅनही बनवला होता. सावनी तिच्या पप्पांशी बोलून शहरात रूम मिळवेल, मग त्या तिघीपण तिथंच राहतील. शिक्षण, मजा, नि दोस्ती तिन्ही जिंदाबाद. हे सगळं सावनीच्या मनात यायला कारण म्हणजे तिची चुलत बहीण- जी मुंबईला असते आणि तिच्या मैत्रिणींसोबत राहून नोकरी करते. ती सावनीला सांगायची, तू ग्रॅज्युएट हो आणि इकडे ये. सावनीची ही चुलत बहीण इन्स्टावर रोज रात्री जागून एक तरी रील टाकायचीच. तिचे फॉलोअर्स तीन हजाराच्या घरात पोचले होते. तिचे रील्स या तिघी सकाळी कॉलेजला पोचल्या की बघायच्याच. त्याला लव्ह दिल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू व्हायचा नाही. ती चुलत बहीण या तिघींसाठी एक सेलिब्रिटी होती. जगायचं तर तिच्यासारखं. असं सगळं व्यवस्थित सुरू असताना तो दिवस उजाडला; दिवस नाही खरं तर रात्र. त्या रात्रीनंतर त्यांची आयुष्यंच बदलली. इतकी- त्यांनी देवाकडे कधीच सात जन्मासाठी कोणी मागितलं नसतं.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

त्या रात्री हायस्कूल आणि कॉलेजचं गॅदिरग होतं. मैदानात मस्तपैकी स्टेज सेट केलं होतं. रात्रीचे नऊ वाजले. तिन्ही गावातून लोक जमायला लागले. तिन्ही गावातून कोण कोण मान्यवर स्टेजवर आले. सुरुवातीला बक्षीस समारंभ झाला आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम म्हणजे फक्त डान्स आणि डान्सच. त्यात जास्त करून मुलींचेच डान्स होते. लावणीपासून ते अगदी ‘पुष्पा’मधल्या ‘सामे सामे’गाण्यावर मुली नाचणार होत्या. या तीनतिघींनीही एक गाणं ठरवून त्यावर प्रॅक्टिस केली होती. गॅदिरगच्या त्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच साक्षीचं मात्र कशातच लक्ष लागत नव्हतं. आणि रात्री आठ वाजता हायस्कूलला पोचेस्तोवर तिचं मन सैरभैर झालं होतं. ती वेगळय़ाच धुंदीत होती. त्यामागचं कारण होतं- नादिर. सावनीकडे जरी स्मार्ट फोन सर्वात आधी आला असला, तरी साक्षीला बॉयफ्रेंड सर्वात आधी मिळाला होता. साक्षी अकरावीत असतानाच एक वर्षांने मोठय़ा असलेल्या, तिच्याच हायस्कूलात असलेल्या, शेजारच्या गावातल्या मोहल्ल्यात राहणाऱ्या नादिरच्या प्रेमात पडली होती. आणि नादिरही तिच्या प्रेमात होता. हे सावनी आणि प्रियन्सीला माहीत होतं. त्यावरून त्या जेलसही होत्या. नादिर या नावावरून तिला चिडवायच्याही. पण त्या रात्री एवढं होईल असं त्या दोघींनाही जन्मात वाटलं नव्हतं. साक्षी आणि नादिरनं पळून जायचा प्लॅन आखला होता. आपल्या प्रेमाला आपले घरचे कधीच समजून घेणार नाहीत, हे त्या दोघांना चांगलंच माहीत असल्यानं ते या निर्णयापर्यंत पोचले होते. साक्षीचं लक्ष डान्समध्ये लागत नाहीये, हे बाकी दोघींच्या लक्षातही आलं नाही. त्या दोघी भलत्याच एक्साइट झाल्या होत्या. त्यांना डान्सचं रील बनवायचं होतं. नादिर हायस्कूलच्या भिंतीमागे येऊन थांबलेला होता. साक्षी बाथरूमचं कारण काढून तिकडे जाणार नि तिथून ते सटकणार, असा प्लॅन होता. सटकायच्या आधी स्टेजवर डान्स करून जावं, असंही तिच्या मनात असल्यानं तिचा पूर्ण गोंधळ उडाला होता. कारण परत आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणींसोबत नाचायला मिळण्याची शक्यता नव्हती. आपण गेलो नाही तर त्यांचीही गैरसमजूत होणार. फसवलं म्हणणार त्या. तिकडे नादिर तर कधीचा वाट बघतोय. त्याच्यासोबत एकदा गेलं की इकडे कोण काय म्हणतंय, याची पर्वा कशाला. गैरसमजूत झाली तरी मरू देत. असं उलटसुलट साक्षीच्या मनात चालू होतं. पण स्टेजवर नाचायचा मोह प्रचंड होता तिला. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या डान्सचा नंबर येईस्तोवर तिनं नादिरला गॅसवर ठेवलं. त्या तिघी दीड-दोन मिनिटाच्या ‘लेकर हम दिवाना दिल’ गाण्यावर नाचल्या. एक मिनिट झाल्यानंतर साक्षी सुटलीच. तिनं न ठरलेल्या, मनात येतील त्या स्टेप्स केल्या तेव्हा या दोघींना काय करावं कळेना. मग साक्षी एकटीच बेभानपणे नाचली नि त्या दोघी विंगेत पळाल्या. तिथून तिला ओरडल्या. तशी साक्षीही एकदम दुसऱ्या बाजूच्या विंगेत पळाली. तिथून न थांबता, कुणालाही न सांगता सुस्साट भिंत ओलांडून नादिरच्या इथं पोचली. तिथून ते दोघं हायस्कूलच्या मागच्या रानात पळाले.

दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात ही बातमी पसरली होती. साक्षीचे पप्पा, तिचे दोन मोठे भाऊ, तिचे चुलते, चुलत भाऊ, वाडीतले लोक असे सगळे सकाळपासूनच तिच्या शोधात दहादिशांना पांगले होते. सावनी आणि प्रियन्सीला हे जेव्हा समजलं तेव्हा त्यांना वेड लागायचं बाकी होतं. काय बोलावं हेच त्यांना कळेना. त्या घरातूनही बाहेर पडल्या नाहीत. सबंध दोन दिवस शोध सुरू होता. पण ते दोघं कुठं गेले असतील ते समजत नव्हतं. नादिरच्या घरच्यांनीही शोध चालू केला होता. अफवा तर भयंकर उठल्या होत्या. कोण म्हणत होतं मुंबईला गेले असतील, म्हणून मुंबईतल्या नातेवाईकांकडे दोघांचेही फोटो व्हॉट्सअॅपने पोचलेही होते. त्या दोघांनी काय काय केलं असेल,याबद्दल तर गावातले लुख्खे तरुण तिखटमीठ लावून बोलत होते. शेवटी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी नादिर साक्षीला घेऊन त्याच्या घरी प्रकटला. त्यांच्या अवतारावरून तीन दिवस चांगलीच उपासमार झाल्याचं दिसत होतं. नादिरच्या अब्बूनी वेळ न घालवता त्या दोघांना घेतलं नि शहरात पोलिसांकडे नेलं. तिथून साक्षीच्या घरच्यांना बोलावलं. साक्षीच्या पप्पांनी नादिरवर केस केली. पोलिसांनी नादिरला जेलमध्ये डांबलं. तिकडे साक्षीच्या पप्पांनी तिला घरात दोन आठवडे डांबून ठेवलं. पोलीस केस मिटल्यावर तिला मुंबईला तिच्या मावशीकडे पाठवून दिलं. त्यानंतर साक्षीचा चेहराही कोणी पाहिला नाहीये. नादिरचंही आयुष्य संपल्यात जमा आहे. कोण म्हणतं तिचं लग्न लावलं, कोण म्हणतं तिला धंद्याला लावलं, कोण अजून काय काय म्हणतं. तुम्हाला जर अवाढव्य पसरलेल्या मुंबईच्या गिचमिड वस्तीतल्या कुठल्यातरी घरात साक्षी दिसलीच, तर तुझा काही दोष नव्हता, हे तिला नक्की सांगा.

इकडे गावात साक्षीच्या प्रकरणानंतर सावनी आणि प्रियन्सीवर खूप दडपण आलं होतं. घरच्यांचा त्यांच्यावरचा पहारा वाढला. दोघींच्या फोनचे रिचार्ज बंद झाले. फोन भावांच्या ताब्यात असायचे. हळूहळू बांधबंदिस्तीची सवय त्या दोघींनाही झाली. बारावी परीक्षा आल्यावर मात्र त्यांनी चांगला अभ्यास केला. दोघीही पास झाल्या. सावनीला जास्त मार्क्स पडले. पास झाल्यावर सावनीच्या पप्पांनी तिला शहरात कॉलेजात घातलं. प्रियन्सीला पप्पा म्हणायचे, ‘तुला मुंबईला कॉलेजला टाकू.’ पण मुंबईत कुठल्या नातेवाईकाकडे पाठवायचं हे काही नीट ठरेना. कारण कोणीच तिची जबाबदारी घ्यायला तयार होत नव्हतं. त्यावरून पप्पा मम्मीकडच्या प्रत्येक नातेवाईकाला शिव्या द्यायला लागले होते. शेवटी प्रियन्सीचा एकेक दिवस घरातच जाऊ लागला. तिची आई तिच्याकडून सगळं घरकाम करून घ्यायला लागली. कधीतरी मुंबईला जाऊ या आशेवर प्रियन्सीनं एक वर्ष काढलं. मग मात्र तिचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. त्याच दरम्यान तिच्या लांबच्या नात्यातलाच एका मुलानं तिला मागणी घातली. तो तिच्यापेक्षा मोठा होता. मुंबईत चांगल्या नोकरीत होता. प्रियन्सी खूश झाली. इथं अडकण्यापेक्षा लग्न करून मुंबईला जावं. खरं तर तिच्या पप्पांना तो मुलगा फार आवडला नव्हता. पण मुंबईत नोकरी आहे या कारणामुळे त्यांनी मुलीला ‘देऊन टाकलं’. प्रियन्सी मोठय़ा ऐटीत लग्न करून, फोटो स्टेटसला टाकून मुंबईला गेली. हळूहळू स्टेटस कमी झाले. ती व्हॉट्सअॅपवर ऑनलाइनही दिसेना. लग्नाला पाच महिने झाल्यावर ती खूप आजारी पडली. एवढं एक कारण पुढे करून नवऱ्यानं तिला गावी पाठवलं. सुरुवातीला सर्वाना वाटलं, ती प्रेग्नंट आहे. पण चार महिने झाले ती घरातच. तिचं पोटही दिसेना. मग एके दिवशी प्रियन्सीनं सांगितलं की, नवऱ्यानं माझं व्हॉट्सअप त्याच्या मोबाइलवर लिंक करून ठेवलं होतं. माझं कोणाशी तरी अफेअर चालू आहे असा डाऊट घेऊन मला इकडे पाठवलंय. आता तो माझ्याशी बोलत नाही. त्यानं मला व्हॉट्सअॅपला ब्लॉक केलंय. मग प्रियन्सीच्या पप्पांनी भावकीतल्यांशी बोलून तिच्या नवऱ्याला भेटायला बोलावलं. नवरा आणि त्याच्या घरचे आले तेच मुळी वाद घालायच्या हिशेबाने. बैठकीच्या दिवशी प्रियन्सीच्या घरी मारामाऱ्या झाल्या. तेव्हाच तिचं लग्न तुटल्यात जमा होतं. नंतर नवऱ्यानं लग्नाचा अर्धा खर्च मागून प्रियन्सीला परत तिच्या पप्पांना ‘देऊन टाकलं’. प्रियन्सीच्या पप्पांना तिचं लचांड परत गळय़ात पडल्याचं जाणवताच ते चिडचिडे झाले. त्याभरात त्यांचं दारू पिणं वाढलं. मग घरी येऊन प्रियन्सीवर राग निघायला लागला. तिची आईही तिलाच बडबडायला लागली. शेवटी तिनेच ओळखपाळख काढून शहरात नोकरीला लावून घेतलं. प्रियन्सी सकाळी सात वाजता जी बाहेर पडते, ते संध्याकाळी वस्तीच्या गाडीनं म्हणजे रात्री आठपर्यंत घरी येते. कमाई फक्त चार हजार रुपये महिना. त्यातून एसटीच्या पासचे बाराशे रुपये जातात. घरात बसून राहण्यापेक्षा नोकरीत तिचा वेळ बरा जातो. मुख्य म्हणजे डोक्यात वाईटसाईट विचार येत नाहीत तिच्या. त्यामुळे ती तशी खूश आहे. आता ती फक्त स्वत:चे विविध स्टायलींमधले फोटो स्टेट्सला लावते. सावनीच्या हॅपी बड्डेचा स्टेटस हमखास असतोच. सावनी त्यावर लव्ह पाठवते. त्या दोघी इकडचंतिकडचं बोलतात. त्यांच्यात मैत्री अशी एक दिवसापुरती राहिलेली आहे. आता जर तुम्हाला एस्टीतून जातायेता प्रियन्सी भेटली तर तिच्याकडे बघून फक्त छान स्माईल द्या बास..

तिकडे सावनी खूप शिकली. ग्रॅज्युएट होऊन पोस्ट-ग्रॅज्युएशनसुद्धा तिनं केलं. तेव्हा घरातल्यांना, भावकीला प्रचंड आनंद झाला. तिचे फ्लेक्स लागले गावात. मग घरची माणसं तिचं लग्न जमवायचा विचार करू लागले. तीनेक वर्ष गेली तरी तिचं काही लग्न जमेना. काही ना काही खोट निघायची. पोरगी पोस्ट-ग्रॅज्युएट आहे, या एका कारणामुळेच कोणी पोरगा तयार होत नव्हता. आणि ज्यांना ती आवडायची, त्या पोरांचं शिक्षण बारावीपर्यंत असायचं, त्यांना नोकरी नसल्यानं, सावनी त्यांना नापसंत करायची. या घोळात तिनं वयाची तिशी गाठलीये. तिला मुंबईत नोकरी आहे. आणि तिची ती ‘रील्स की सेलिब्रिटी’ चुलत बहीण लग्न करून नवऱ्याच्या गावातल्या घरी गेलीये. सावनी लग्नसंस्थेच्या अगदी परिघावर आहे. आणखी एक वर्षांत ती बाहेर फेकली जाईल, या भीतीनं तिचे पप्पा काही करून लग्न जमवायच्या मागे आहेत. इतके की, त्यांना एकदा हार्ट अटॅकही येऊन गेला. सावनीला आता कसलीच इच्छा उरली नाहीये. पण तरी ती डीपी रोज बदलते. ऑफिसचे, कॅफेजचे, कलिग्सबरोबरच्या फोटोंचे स्टेटस ठेवते. तेव्हा तुम्हाला जर कधी सावनी भेटलीच तर तिला एवढं नक्की सांगा- तू बिनधास्त एकटी राहा.
अशा या तीनतिघींमधल्या दोघींची ‘रील लाईफ’ सतत बदलत असते; आणि एकीचा डीपीसुद्धा दिसत नाही.