अरुंधती देवस्थळे
कधी कधी काही माणसांची, विशेषत: कला क्षेत्रातल्या लोकांची कडू-गोड कीर्ती त्यांच्या कामाअगोदर आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागते. पण मग त्यांचं काम पाहिल्यावर आपण इतके प्रभावित होऊन जातो की त्या सांगोवांगीच्या कथा मनातल्या अडगळीत जमा होऊन कालौघात विसरल्याही जातात. आठवणीत राहतं ते त्या व्यक्तीचं जबरदस्त काम, कारण तेच लक्षात ठेवण्यासारखं असतं. या अनुभवाला अपवाद ठरतो फक्त एकच असामान्य चित्रकार मायकेलएंजेलो मेरीसी द कारावाजो- ज्याला आपण ‘कारावाजो’ या त्याच्या गावाच्या नावाने जास्त ओळखतो- याच्याशी तोंडओळख झाली होती रोममधल्या सेंट जॉन चर्चमधल्या ‘बिहेडिंग ऑफ सेंट मॅथ्यू’ या बायबलमधल्या कथेवर आधारित लांब-रुंद चित्रांतून. नंतर रुबेन्स आणि रेम्ब्राँच्या संदर्भात.. त्यांच्या बरोक शैलीवर कारावाजोचा प्रभाव बघताना. कारावाजोच्या चाळिशीच्या आधीच संपलेल्या जीवनात कला आणि हिंसा दोन्हींचं प्रमाण जवळपास सारखंच होतं, हे एक विश्वास बसू नये असं सत्य आहे; त्याच्या चित्रांतील प्रकाश आणि अंधाराच्या खेळासारखंच- विरोधाभास हेच वैशिष्टय़ असलेलं कौशल्य! जबरदस्त कला आणि तेवढंच विक्षिप्त वागणं. खोलात जावं तर कारवाजोची झालेली बदनामी अकारण नव्हती हे लक्षात येतं.
जन्म लोम्बार्डीतला. वडील आर्किटेक्ट. बालपणी प्लेगच्या साथीत आजी-आजोबा आणि वडील मृत्यू पावले. काही वर्षांनी आईही. म्हणून बालपणापासूनच त्याच्या विश्वाला हादरे बसत गेले. अतिशय हलाखीच्या अवस्थेत तो रोमला आला आणि छोटय़ा नोकऱ्या करत गुजराण करत राहिला. आणि सुप्रसिद्ध शिल्पकार टिशीअनचा विद्यार्थी सीमॉन पेटर्झानोकडे त्याने चार वर्ष चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं. फळं आणि फुलांची ‘स्टिल लाईफ’ चित्रं केली आणि ती मिळेल त्या किमतीला विकून तो तग धरून राहिला. ‘मला रोममधल्या अभिजात कलेच्या परंपरेशी किंवा ग्रेट मास्टर्सशी काही देणंघेणं नाही. रोमचे पॉकेटमार, दारुडे, वेश्या आणि भुरटे चोर वगैरेंनी भरलेले चौक आणि रस्तेच माझ्यासाठी स्फूर्तीचे स्रोत आहेत,’ असं तो म्हणे. सुरुवातीच्या काळातली त्याची ‘दि फॉच्र्युन टेलर’ आणि ‘दि कार्डशार्प्स’ ही चित्रं याच पार्श्वभूमीवर आधारित. तो विक्षिप्त आणि आत्मकेंद्री इतका, की भाडय़ाच्या घरात अमुक एक चित्र काढायला नैसर्गिक प्रकाश हवा म्हणून त्याने घराच्या छताला ड्रिल करण्याच्या प्रयत्नात मोठं भगदाड पाडलं आणि म्हणून मालकाने सामान रस्त्यावर फेकून देऊन त्याला घराबाहेर काढलं. रोममध्ये त्याला दहा घरं बदलावी लागली होती.
नंतर त्याने जुझापे शेझारी या नावाजलेल्या चित्रकाराकडे पेंटिंग कसं करावं हे पाहून पाहून शिकून घेतलं. शेझारी पोप क्लेमंटचे आवडते चित्रकार होते आणि समाजात त्यांच्या शब्दाला प्रतिष्ठा होती. अशाच काहीतरी निमित्ताने कार्डिनल फ्रांचेस्को दी मॉँट यांच्या पाहण्यात त्याची चित्रं आली आणि कारावाजोचं नशीब पालटलं. तो काळ होता कलेला अमीर-उमरावांकडून आश्रय मिळण्याचा. त्यांच्यामुळे इटलीतील पेंटिंग्ज डच आणि फ्रान्सच्या उच्चभ्रू वर्तुळात पोहोचत असत आणि बाजारांतही. त्यामुळे कलाकाराचं नाव होई. असंच कारावाजोच्या बाबतीतही घडलं. कार्डिनल दी मॉँट यांनी त्याला घर, स्टुडिओ देऊन समृद्ध जीवनशैलीत सामावून घेतलं. त्यांनी त्याला जवळच्याच चर्चमध्ये सेंट मॅथ्यूची तीन पेंटिंग्ज करायचं काम मिळवून दिलं. ही चित्रं ऑइल इन कॅनव्हासमधली. बरोक शैलीतली किआरास्कुरो तंत्राची. शिरच्छेदासारख्या प्रसंगातील नाटय़ उठावदारपणे मांडणारी. म्हणून सुरुवातीचं पॅलेट लेड व्हाईट, यलो, रेड-ऑकर आणि चारकोल ब्लॅक किंवा अर्थ (ब्राऊन) या रंगांचं. वयात आणि कामात येणाऱ्या ठहरावानंतर ते गडद आणि जरा हलक्या अर्थ-बेस्ड रंगांमध्ये बदललेलं दिसतं. चित्रं टचअप् करण्यासाठी सूक्ष्म फटकारे मारण्याची त्याची सवय मात्र शेवटपर्यंत कायम राहिली असावी.
कारावाजोचं आश्चर्यकारक वैशिष्टय़ म्हणजे तो उत्स्फूर्तपणे काम करणारा असल्याने थेटच कॅनव्हासवर पेंट रंगवीत असे. तो मॉडेलला समोर बसवून पेंट करत असे. त्याला चित्ररेखा वगैरे बा पूर्वतयारी लागत नसे. त्या काळात रंगीत दगड, वनस्पतींतून मिळणारं तेल, अंडी, निसर्गातलं काहीबाही मिळवून चित्रकारांना स्वत:च रंग बनवावे लागत आणि डुकरं किंवा खारींचे केस वापरून ब्रश. सोपं काम नसायचं. कारावाजो प्रायमरमध्ये दाट तेल आणि पिगमेंट्स मिसळून त्यात अर्थ किंवा सफेद लेड लावत असे. टेक्श्चरसाठी वस्त्रगाळ वाळू प्लास्टरमध्ये मिसळत. बायबलमधील कथांवर आधारित या चित्रांमध्ये अद्भुत, दैवी प्रकाशाचा भाव आणण्यासाठी मनुष्याकृतींच्या मधल्या रिकाम्या जागा लक्षपूर्वक भरल्या जात. त्यावर मंद चमक यावी असा प्रयत्न असे. हे सगळे सोपस्कार भराभर करणारा कारावाजो सलग दोन- दोन आठवडे काम करायचा. सुरुवातीच्या काळात एका दिवसात तो तीन-तीन ‘हेड्स’ करून विकायचा. लावलेला रंग सुकायच्या आधीच पुढचा रंग लावायचा. त्याच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल सांगायचं तर ‘दि कॉलिंग ऑफ सेंट मॅथ्यू’ व ‘मार्टरडम ऑफ सेंट मॅथ्यू’ या दोन चित्रांचं मिळून केलेल्या (१५९०-१६००) फ्रेंच चर्चमधल्या चित्राचं उदाहरण देता येईल. हे साधारण ११.५ ७ १२ फूट लांब-रुंद चित्र. ‘दि कॉलिंग ऑफ सेंट मॅथ्यू’ म्हणजे जीझसने येऊन मॅथ्यूला त्याच्या आयुष्यातलं परमकर्तव्य सांगण्यासाठी भेटण्याचा प्रसंग. करवसुलीचं काम करणारा मॅथ्यू चारचौघांच्या सोबतीत दारूच्या अड्डय़ावर बसलाय. आत गर्द पिवळसर अंधार. नेहमीप्रमाणे प्रकाशाचा नाटय़मय वापर. मॅथ्यूच्या चेहऱ्यावरील आभा म्हणजे टेनेब्रीझ्मच्या वापराचं उत्कृष्ट उदाहरण. जीझसची फक्त एक पाठमोरी झलक. अपरिचित माणूस का बोलावतोय म्हणून मॅथ्यूही गोंधळलेला. तोही स्वत:कडे बोट दाखवत ‘कोण.. मी?’ असं देहबोलीतून विचारतोय. हे चित्र आता चारशेहून अधिक वर्षांचं. दोन विश्वयुद्धं आणि अगणित आक्रमणं पाहिली त्यानं. आणि तरी ते त्याच दीप्तीने काँट्रेली चॅपलचं सौंदर्यस्थान बनून उभं आहे.
खरं तर त्या काळात कॅथॉलिसिझमला प्रोटेस्टंट्सकडून निर्माण झालेल्या खतऱ्यामुळे ही नाटकीय चित्रं लोकांसमोर सतत दिसावीत आणि त्यातून उदात्त संदेश जावा असा मूळ उद्देश होता. पण हे धर्मकृत्य गुंडगिरीसाठी प्रसिद्ध कलाकारानं करावं, हा एक विरोधाभासच होता. संतांच्या चित्रांमध्ये त्याने घातलेली इतर पात्रं- म्हणजे स्थानिक दारुडे, वेश्या किंवा गुंड चेहऱ्यांमुळे ओळखू येत आणि चित्र विवादास्पदही ठरे. १५९० च्या दशकात त्याने रोमन पुराणात मद्याचं दैवत असलेल्या बॅक्कसची अनेक चित्रं काढली आणि ती धडाधड विकलीही गेली. डोळ्यात हरवल्यासारखे भाव. काहींच्या मते, ही त्याची सेल्फ पोट्र्रेट्स आहेत. ‘बॉय बीटन बाय अ लिझर्ड’ हे त्याचं चित्रही जरा विचित्रच. त्यातल्या मुलाच्या केसात फुलं माळलेली. समोर ठेवलेल्या फुलदाणीजवळ फळांमध्ये लपलेली पाल त्याला मधल्या बोटाला अचानक चावलेली असावी. हा चेहराही रोममधील एका प्रतिष्ठितांकडे काम करणाऱ्या नोकराचा म्हणूनही चर्चेत रंग भरला.
त्याची चित्रं बहुचर्चित ठरत आणि विकलीही जात. पण पैसा हाती येताच त्याच्यातला भांडखोर पशू जागा होई. जुगार, मद्यपान, वेश्यागमन इत्यादी व्यसनांमध्ये तो स्वत:ला बुडवून टाकी. कमरेला तलवार लटकवून एक हरकाम्या गडी बरोबर घेऊन गावात फिरू लागे, जे बेकायदेशीर होतं. रोममध्ये जम बसतो ना बसतो तोच एका तरुणाशी त्याची कशावरून तरी बाचाबाची झाली आणि कारावाजोने त्याला तलवारीने मारून टाकलं. शिक्षेने होणाऱ्या देहदंडापासून वाचायला तो नेपल्सला पळून गेला. तिथून कधी माल्टाला, तर कधी सिसिलीला. जिथे असेल तिथे तो चित्र काढतच राही. सिसिलीत त्याने ‘बीहेडिंग ऑफ सेंट जॉन’ रंगवलं होतं. तेव्हा माल्टा हे स्वतंत्र राज्य होतं. त्याच्या कलेवर लुब्ध होऊन तेथील शासन त्याला ‘नाईटहूड’चा सन्मान देणार होतं. पण त्याने एका ज्येष्ठ दरबाऱ्याला मारहाण केली आणि सन्मानाऐवजी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. नंतर काही महिन्यांनी त्या दरबाऱ्याच्या माणसांनी कारावाजोला गाठून त्याच्यावर हल्ला करून त्याचा चेहरा विद्रूप केला. कलेच्या इतिहासात कारावाजो असा एकमेव चित्रकार असावा, ज्याची कमीत कमी ११ वेळा तरी कोर्टात पेशी झालेली होती. चित्रांचे विषयही अनेकदा हिंसक ‘डेव्हिड विथ दि हेड ऑफ गोलायथ’ असो की ‘सलोमी विथ द हेड ऑफ जॉन द बाप्टिस्ट’!
तरीही पोपला त्याची चित्रं देऊन त्याच्या मित्रांनी माफी मंजूर करून घेतली होती. पण तो निरोप त्याला पोहोचण्यापूर्वी माल्टातून निसटून जाण्याच्या प्रयत्नात त्याने आपलं सगळं सामान बोटीवर पाठवून दिलं होतं. त्याला धक्क्यावर पोहोचण्यास उशीर झाल्याने जहाज निघून गेलं. दोन दिवस कारावाजो त्यामागे धावत होता आणि शेवटी तो किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला. तो तापाने मरण पावला, की त्याचा खून झाला, की चित्रांत लेडचा वापर करताना रक्तात लेड शिरत गेलं आणि ते जीवघेणं ठरलं..? या वादग्रस्त गोष्टी आहेत. एका एकाकी कलाकाराचा असा अकाली अंत व्हावा हे दुर्दैवच! जाण्यापूर्वी त्याने कुठलंही चित्र अपुरं सोडलेलं नव्हत,हेही विशेष!
इटालियन माफिया सफाईदार गुन्ह्यंसाठी प्रसिद्ध आहेतच. त्यांनी पळवून नेलेल्या कारावाजोच्या चित्रांमध्ये साधारण ९ ७ ६ फुटी ‘नेटिव्हिटी विथ सेंट फ्रान्सिस अँड सेंट लोरेन्स’चा समावेश आहे. हे नंतर कोणाच्या दृष्टीस न पडलेले चित्र फक्त माफियांच्या महत्त्वाच्या बैठकींमध्ये दाखवले जाई. हे चित्र- ज्याची किंमत आज २० मिलियन डॉलर्सच्या आसपास लावली जाते- ते खराब झाले असावे किंवा भांडणात नष्ट केले असावे असंही मानलं जातं. आयुष्यभर सडाफटिंग राहिलेल्या कारावाजोवर खात्रीशीर मानलं जावं असं फार काही उपलब्ध नाही. तरी त्याच्या वादळी व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणारी एक फिल्म ‘कारावाजो’ १९८६ मध्ये बनवली गेली होती. तिची बर्लिन फेस्टिवलमध्ये सिल्वर बेअर सन्मानासाठी निवडही झाली होती. कारावाजोचं कलंदर एकलेपण समजावून घेण्याचा प्रयत्न दुनियेनं शतकं लोटल्यावरही केला होता..
warundhati.deosthale@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A never ending field art beheading of st matthew amy
First published on: 29-05-2022 at 00:04 IST