scorecardresearch

नाठाळ, ना-ताळ आणि नाताळ

नाताळातला सांताबाबा यंदा भेटवस्तूंऐवजी ‘खोकी’ घेऊन आला. असंख्य नाठाळ वाचाळवीरांची ना-ताळ वचनं, उद्धृतं, भाषणं, विधानं, वक्तव्यं, टोमणे आणि टोले यांच्या शब्दांनी भरलेली.

नाठाळ, ना-ताळ आणि नाताळ

गजू तायडे

नाताळातला सांताबाबा यंदा भेटवस्तूंऐवजी ‘खोकी’ घेऊन आला. असंख्य नाठाळ वाचाळवीरांची ना-ताळ वचनं, उद्धृतं, भाषणं, विधानं, वक्तव्यं, टोमणे आणि टोले यांच्या शब्दांनी भरलेली. वर्षभरात या शब्दयुद्धांनी किती घटका आणि पळे खर्च झाली आणि जणू तीच जीवनाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ असल्याचा आभास तयार करीत राहिली. सांताबाबाच्या या पोतडी-खोक्यांची छोटी कहाणी..

रविवार, शिवाय नाताळ अशा डब्बल सुट्टीचा लाभ घेत साखरझोपेत गुरफटलेल्या जंगूरावांना घराबाहेर घंटय़ांचा किणकिणाट ऐकू येऊन त्यांची झोप जराशी चाळवली. कूस बदलून ते पुन्हा घोरू लागले. थोडय़ा वेळानं हॉलमधून कसलीतरी खसफस ऐकू येऊ लागली.‘चोरबीर तर नसतील?’ जंगूराव धसक्यानं जागे झाले आणि हळूच, पाऊल न वाजवता हॉलमध्ये आले. अंधुक प्रकाशात त्यांना कोपऱ्यातल्या ख्रिसमस ट्रीजवळ (तसे जंगूराव आपल्या प्राचीन संस्कृतीचे अभिमानी असले, तरी मुलांची हौस म्हणून खिसमस ट्री चालवून घेतात.) रंगीबेरंगी अंगरखा घातलेला एक पांढरी दाढीवाला बसलेला दिसला.

‘‘हात्त्याच्या! मी उगाच घाबरलो. हे तर आपले मोदीजी..’’ जंगूरावांना हायसं वाटलं आणि त्यांनी स्विच दाबून हॉलभर उजेड केला. दाढीवाल्यानं चमकून त्यांच्याकडे पाहिलं.
‘‘नमस्कार, मोदीजी. कसं काय येणं केलंत?’’ जंगूरावांना प्रचंड आनंद झाला होता. प्रत्यक्ष पंतप्रधान घरी येतात म्हणजे काय!
‘‘कोण मोदीजी? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी सांताक्लॉज.’’
‘‘खरंच की! आमचे मोदीजीपण असे वेगवेगळे कॉस्च्यूम घालत असतात ना, म्हणून.. पण सांताक्लॉजचे कपडे तर लालभडक असतात ना? मग तुझे कपडे असे फुलपाखरासारखे रंगीबेरंगी कसे?’’
‘‘काय करणार? तुम्हा लोकांनी रंगांचीपण विभागणी जात, धर्म, पक्ष, विचारसरणीनुसार करून टाकलीय ना! लाल कपडय़ांमुळे बरेच जण मला कम्युनिस्ट समजून माझ्यावर बहिष्कार घालण्याची भाषा करू लागले होते. तेव्हाच ठरवलं, कोणत्याही एका रंगाचे कपडे घालायचे नाहीत.’’ सांताक्लॉज आपल्या पोतडीतून काही गिफ्ट बॉक्सेस काढून ख्रिसमस ट्रीजवळ ठेवू लागला.
‘‘कसले खोके आहेत हे?’’ जंगूरावांनी विचारताच सांता दचकला आणि त्याच्या हातून गिफ्ट बॉक्सेस खाली पडले.
‘‘खोके म्हणू नकोस, प्लीज! खोके म्हटल्यावर भलतेच अर्थ निघतात त्यातून हल्ली.’’
‘‘सॉरी, पण काय आहे.. यांच्यात? यंदा आमच्या बबडय़ाला ‘एक्सबॉक्स सिरीज् एक्स’ हवा होता, िपकीला ‘आयफोन फोर्टीन प्रो’ आणि आमच्या हिला ‘स्मार्ट टीव्ही’. मलापण एखादी नवीन कार नाहीतर..’’
‘‘हा!’’ तुच्छतादर्शक उद्गार काढून सांता म्हणाला, ‘‘विसरा त्या भौतिक सुखाच्या गोष्टी आता. यापुढे तसलं काही मिळणार नाही!’’
‘‘मग? फक्त फुगे, पिपाण्या, रुमाल, बाहुल्या, वगैरे किरकोळ वस्तूच देणार का भेट म्हणून?’’ जंगूरावांचा जरा विरसच झाला.
‘‘नाही.’’
‘‘मग नेमकं आहे तरी काय या खो – आपलं – बॉक्सेसमध्ये?’’
‘‘यांमध्ये आहेत हल्लीच्या काळात आपल्याला सतत लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी.’’
‘‘ओके. म्हणजे डाळतांदूळ, शिधा-आटा, साखर, तेल, गॅस वगैरे..’’
‘‘छय़ा! त्यात कसलं आलंय जीवनावश्यक?’’
‘‘मग?’’
‘‘यांमध्ये आहेत शब्दांची रत्नं, वाक्यांच्या मौक्तिकमाळा..’’
‘‘ओह! म्हणजे पुस्तकं.’’
‘‘ते पण नाही.’’
‘‘हे बघ, आधीच झोपमोड झालीय. उगाच सस्पेन्स न ताणता त्यांत काय आहे ते सांगून टाक, नाहीतर जातो मी झोपायला,’’ जंगूराव कावून म्हणाले.
‘‘मला सांग,’’ सांता म्हणाला, ‘‘सध्या या देशात, राज्यात सर्वात स्वस्त गोष्ट कोणती आहे?’’
‘‘सर्वात स्वस्त म्हणायचं तर..’’ जंगूराव बुचकळय़ात पडले.
‘‘असू देत. मी सांगतो. सध्या सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे शब्द. शब्दांचा सुकाळ माजला आहे अगदी. जो उठतो तो तोंड उघडतो आणि मनात येईल ते बोलतो. सामान्य जनतेचं एक सोडून दे, पण सरकारातले वरपासून खालपर्यंत वेगवेगळय़ा पातळीवरचे राजनेते, विरोधी पक्षवाले, कलाकार, साधू, साध्व्या, स्वत:ला समाजसेवक म्हणवणारे लोक मनात येईल ते बडबडताहेत. टीव्ही चॅनलं, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या कृपेनं ते जे काही बोलतील ते पुढच्याच क्षणी व्हायरल होतं. मग त्यावरून कोणाच्या तरी भावना दुखावतात. ट्विटरयुद्धं सुरू होतात, फेसबुकावर लोक एकमेकांची आय-माय उद्धारू लागतात. व्हाट्सअॅपवर व्हच्र्युअल हाणामाऱ्या होऊ लागतात. टीव्ही चॅनलच्या चर्चामधले पॅनलिस्ट एकमेकांची टाळकी सडकतील की काय अशा आवेशात चर्चा करू लागतात. आसमंतात, सायबरस्पेसमध्ये, रेडिओ लहरींवर, छापील कागदांवर शब्दच शब्द भरून राहतात. सगळीकडे अभेद्य असा वावदूकपणा साचून राहतो!’’ सांता उद्विग्न होऊन म्हणाला. बोलून बोलून त्याला धाप लागली होती.
‘‘अरे, अरे, तू जरा दम खा बघू. पाणीबिणी देऊ का तुला? की चहा करायला सांगू हिला छान गरम-गरम, आलं घालून?’’ काळजी वाटून जंगूराव म्हणाले.

हात हलवत ‘नको-नको’ ची खूण करून सांता पुढं बोलू लागला, ‘‘पण हे एवढय़ावरच कुठं थांबतंय? एकानं वक्तव्य केलं रे केलं, की त्याचे विरोधक ‘पलटवार’ करतात. मग परत घमासान लढाई सुरू. त्यावर पुन्हा आधीची पार्टी प्रतिपलटवार करते, मग प्रतिप्रतिपलटवार, परत प्रतिप्रतिप्रतिपलटवार.. ’’
‘‘कळलं मला. तुला काय म्हणायचंय ते अगदीच लक्षात आलंय माझ्या, पण त्या बॉक्सेसमध्ये काय आहे ते मला अजूनही क्लिअर झालेलं नाहीय.’’
‘‘.. आणि किती नवनवे शब्द पाडताहेत ना लोक. ‘करेक्ट कार्यक्रम’ म्हणे. एके काळी एखाद्याचा काटा काढण्यासाठी गुंड लोक ‘करेक्ट कार्यक्रम करणे’, ‘गेम करणे’ असे शब्द वापरायचे. आता मात्र राजकारण्यांच्या तोंडी अगदी रुळून गेलाय हा टपोरी शब्द. फडणवीस म्हणतात, आम्ही मविआचा ‘करेक्ट कार्यक्रम केला’. उपमुख्यमंत्री झाल्यामुळे फडणवीसांचं डिमोशन झाल्याचं सांगून पटोले म्हणतात, फडणवीसांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाय. शिवाय कुणीसं म्हणालं, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जयंत पाटील काही जणांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार आहेत. जो उठतो तो ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो. ‘इनकरेक्ट कार्यक्रम’ कोणीच करत नाहीत.

एखादीच्या कपाळी कुंकू-टिकली नाही म्हणून संस्कृतीरक्षक म्हणवणारे भिडे गुरुजी एखाद्या मुलीला अपमानास्पद बोलतात. रामदेव बाबासारखा योगगुरू – कम – उद्योजक सार्वजनिक मंचावर ‘बायकांनी अंगात काही घातलं नाही तरी त्या चांगल्या दिसतात’ असं धडधडीत अश्लील विधान करतो आणि आश्चर्य म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या स्त्रियादेखील त्यावर फिदिफिदी हसतात. नितेश राणेंनी मशालीला आईस्क्रीम कोन म्हणून हिणवताच ‘राणेंनी तो तोंडात घेऊन पहावा’ असं द्वयार्थपूर्ण बोलल्याशिवाय वायकरांना राहवत नाही. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांना तर वादग्रस्त विधानं केल्याखेरीज जेवणच जात नसावं. पूर्वी संजय राऊतांचा दिवस बडबडीनं सुरू व्हायचा. आता सुषमा अंधारेंचा होतो. मग त्या लोकांच्या श्रद्धास्थानांवर काहीतरी बोलतात. त्यावर स्वत:ला ‘राष्ट्रीय’ म्हणवणारं कुणीतरी भयंकर सात्त्विक शिवीगाळ करतं. चंद्रकांत पाटलांसारखे सीनियर लोक कोणताही विचार न करता वंदनीय व्यक्तींनी ‘भीक मागून संस्था उभारल्या’ यांसारखं वक्तव्य करतात.

एवढय़ा सगळय़ा लोकांचा बडबडघोटाळा कमी पडेल की काय या भीतीनं असेल कदाचित, पण ज्यांनी आपल्या पदाचा आब राखून वागण्याची अपेक्षा असते असे महामहीम राज्यपालदेखील सतत छत्रपतींबद्दल, फुले दाम्पत्याबद्दल बिनबुडाचं काहीतरी बोलत असतात. अगदी जनतेनं निषेध मोर्चे काढणं, बंद पुकारणं, वगैरे करेपर्यंत.’’
‘‘थांब थांब. अरे, किती बोलशील!’’ आता जंगूरावांनाच धाप लागली.
‘‘भोवताली पसरलेल्या शब्दबंबाळपणाची मलाही लागण होणारच ना! असो. ही नुसती वानगी झाली. सध्या तिन्ही-त्रिकाळ, अष्टौप्रहर, ट्वेंटीफोर बाय सेव्हन ही शब्दयुद्धं सुरू आहेत. आणि त्यात सर्वात आधी तुझ्या, माझ्या, सर्वाच्या विवेकाचा बळी जातोय. ‘शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू’ याची अशी प्रचीती येईल असं कधी वाटलं नव्हतं.
लोकांनादेखील हे वाचाळ वातावरण हवंहवंसं वाटतं हे अगदी उघड आहे. म्हणूनच यंदा नाताळाची भेट म्हणून मी या बॉक्सेसमध्ये असंख्य नाठाळ वाचाळवीरांची ना-ताळ वचनं, उद्धृतं, भाषणं, विधानं, वक्तव्यं, टोमणे आणि टोले भरून आणलेत. हा बॉक्स उघडला, की एकमेकांवर केलेले घाणेरडे आरोप ऐकू येतील. या बॉक्समध्ये महापुरुषांबद्दलची अपमानास्पद विधानं, या बॉक्समध्ये टोमणे. शिवराळ, द्वेषयुक्त भाषणं ऐकावीशी वाटली, की हा बॉक्स उघडायचा. आपापल्या धर्म-संस्कृतीची गर्वगीतं आणि परधर्म-संस्कृतीची निंदानालस्ती ऐकण्यासाठी हा बॉक्स. झालंच तर..’’
‘‘पण कशाला? का म्हणून ऐकायचं हे सगळं?’’ जंगूरावांनी विचारलं.
‘‘का म्हणजे? हेच सध्या जीवनावश्यक आहे म्हणून सांगितलं ना तुला आधीच? हेच खरे जीवनमरणाचे प्रश्न आहेत. तसं नसतं, तर तुम्हा लोकांनी या बडबडीवर प्रतिक्रिया देत बसण्याऐवजी आणि एकमेकांत शाब्दिक मारामाऱ्या करण्याऐवजी गरिबी, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण, भ्रष्टाचार, देशाच्या सीमांवर होणारी अतिक्रमणं, वगैरे विषयांवर रान उठवलं नसतं का?’’
जंगूरावांकडे उत्तर नव्हतं. सांता उठला. जायला निघाला. त्यानं आपली टोपी काढली आणि जंगूरावांच्या हाती दिली.

‘‘म – मला कशाला?’’
‘‘असू दे तुझ्याकडे. मी स्वत: सांताक्लॉज असूनही ही सांता टोपी घालायची भीती वाटू लागलीय मला हल्ली. येतो मी आता. बऱ्याच घरांना भेटी द्यायच्यात अजून. ऊध्र्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, मनुष्यांवर कृपा असो.’’ असं म्हणून सांता अदृश्य झाला. बाहेर पुन्हा घंटा किणकिणल्याचा आवाज आला, विरत-विरत नाहीसा झाला.
gajootayde@gmail. com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 02:28 IST

संबंधित बातम्या