डॉ. मीरा कुलकर्णी
पद्मश्री डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यत आदिवासींसाठी आरोग्य स्वराज्य हे स्वप्न उराशी बाळगून काम करायला सुरुवात केली. १९८५ साली त्यांच्या ‘सर्च’ या संस्थेची स्थापना झाली. नंतर साधारण पंचवीस वर्षांच्या वैद्यकीय सेवेच्या अनुभवावर आधारित ‘Putting Women First’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकासाठी सुनंदा खोरगडे (सामाजिक कार्यकर्ती), रूपा चिनाय (पत्रकार) यांनी सहलेखन केलं आहे. राहुल गोस्वामी (पत्रकार) यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. नुकताच सुनंदा अमरापूरकर यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध झाला आहे.
हे पुस्तक एका मोठय़ा कालखंडाचा लेखाजोखा मांडतं. सर्वसाधारण दवाखान्याच्या कामाचे जे रिपोर्ट्स असतात त्यात इतक्या वर्षांत इतके पेशंट आले, इतक्या अॅडमिशन्स झाल्या, इतकी ऑपरेशन्स झाली, असे आकडे असतात. एखाद्या कामाचे यश सांगणारे असे आकडे हे शोकेसमध्ये टांगलेल्या वस्त्रासारखे असतात. त्यांना पाहून ते वस्त्र विणताना त्या विणकराने काय काय कष्ट घेतले, किती रात्री जागवल्या, त्याचे त्या धाग्यांशी काय अनुबंध होते याची पुसटशीही कल्पना येत नाही. हे पुस्तकदेखील एक नोंदवही आहे. पण यात आपल्याला ‘सर्च’मध्ये आलेले स्त्री पेशंट आकडय़ांच्या रूपात भेटत नाहीत, तर एक माणूस म्हणून भेटतात. त्यांच्या व्यथा वाचकाला समजतात. कथा मनाला अस्वस्थ करतात. डॉ. राणींशी झालेल्या त्यांच्या संभाषणातून आदिवासी गावांमधल्या लोकांचं जगणं समजतं. एक समांतर आरोग्य यंत्रणा ‘सर्च’मार्फत उभी करताना बंग दाम्पत्याने काय परिश्रम घेतले याची पण जाणीव होते. म्हणूनच हे पुस्तक वेगळं आहे.
यातल्या अनुभवांच्या नोंदी रंजक आहेत, तरीही अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या आहेत. डॉ. राणी बंग यांच्या शब्दांत सांगायचं तर त्या त्यांच्याकडे आलेल्या अनेक पेशंटच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत. एका डॉक्टरच्या दृष्टिकोनातून पाहिलेल्या आणि सांगितलेल्या. माझ्या मते, ही गोष्ट सांगणारी डॉक्टर एक अशी डॉक्टर आहे, जी फक्त कुशल स्त्रीरोगतज्ज्ञच नाही तर तिच्याजवळ अत्यंत संवेदनशील तरीही कणखर मन आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन आहे. आदर्श संस्था बांधणीचं कसब आहे. कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची वृत्ती आहे आणि सगळय़ात महत्त्वाचं आलेल्या पेशंटच्या आजारपणाच्या पलीकडे जाऊन तिच्या जगण्यातले कश्मकश समजून घेण्याचा समजूतदारपणा आहे.या पुस्तकातल्या लिखाणाचा परीघ फार मोठा आहे. ही नोंदवही कधी आपल्याला एखाद्या आईने तिच्या मुलामुलींवर केलेले संस्कार किती मार्गदर्शक आणि बळ देणारे असतात हे सांगते. तर कधी समाजासाठी काम सुरू करताना आणि ते पुढे नेताना येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांचा पट आपल्यासमोर मांडते. उपदेशाचा एकही शब्द नसताना हे पुस्तक समाजकार्य करणाऱ्यांसाठी पथदर्शक ठरतं.
हे पुस्तक म्हणजे गडचिरोलीतल्या आदिवासी पेशंटच्या आरोग्याच्या प्रश्नांचा, त्यावरच्या उत्तरांचा एक प्रकारचा शोध आहे. तरीही हे पुस्तक कुठल्या मेडिकल जर्नलमध्ये छापल्या जाणाऱ्या शोधनिबंधासारखंही नाही. या गोष्टी आहेत आदिवासी स्त्रीच्या जगण्याच्या, त्यांच्या मनातल्या चूक-बरोबरच्या संकल्पनांच्या, आदिवासींमधील परंपरांच्या, स्त्री-पुरुष संबंधांच्या, तरुण मुलामुलींच्या नात्याच्या, व्यसनाधीनतेच्या, स्त्रीभ्रूण हत्येच्या. त्यांच्याकडे आलेल्या पेशंटच्या प्रश्नाच्या मुळाशी त्या कित्येकदा समाज कार्यकर्ता ताईच्या माध्यमातूनपण पोचतात आणि मग त्या समस्येचं निराकरण होईल असा मार्ग त्या संवादातून सांगतात.
आजच्या वैद्यकीय शिक्षणात आम्हा डॉक्टर्सना समुपदेशन आणि संवादकौशल्य याविषयी काहीच शिकवलं जात नाही. त्या लिहितात की, या संपूर्ण प्रवासात त्या हे शिकल्या की, जर मला चांगलं डॉक्टर व्हायचं असेल तर चांगलं सोशल वर्कर व्हायला हवं. खूपदा तपासायला आलेली स्त्री डॉक्टरच्या जवळ फक्त शारीरिक त्रासाबद्दल बोलते. पण सामाजिक कार्यकर्ता ताईजवळ इतरही बऱ्याच गोष्टी बोलते. ज्यामुळे अचूक निदान करण्यासाठी मदत होते. ही जवळीक डॉक्टरला साधता आली पाहिजे. हे पुस्तक नवशिक्या डॉक्टरला पेशंटचा असा समग्र विचार करायला शिकवतं.
यातल्या कथांमधल्या व्यथांशी जगातली कुठलीही सामान्य स्त्री स्वत:ला जोडून घेऊ शकते. हे पुस्तक डॉ. राणीताईंनी जगभरातल्या स्त्रियांना अर्पण केलं आहे. अर्पण पत्रिकेत त्या पुढे म्हणतात की, स्त्रीचं आयुष्य फार मोलाचं आहे. म्हणून ‘ती’च्या आरोग्याला जागतिक स्तरावर प्रथम प्राधान्य द्यायला हवं. पहिला विचार ‘ती’चा व्हायला हवा.
या पुस्तकातल्या पेशंटच्या अनेक गोष्टींपैकी वानगीदाखल एक सांगते. एका सधन व्यापाऱ्याची पत्नी सर्चमध्ये उपचारासाठी आली. तिला तीन मुले होती. तिच्या तक्रारी होत्या छातीत दुखणे, चक्कर येणे, दम लागणे वगैरे. तिला मेडिसिन विभागात दोन वर्षे ट्रीटमेंट दिली. पण तक्रारी कमी झाल्या नाहीत. तिला डॉ. राणींकडे पाठवण्यात आले. त्यांनी तिच्याशी बोलायला सुरुवात केल्याबरोबर ती ढसढसा रडू लागली. खोदून विचारल्यावर तिनं सांगितलं की, नवरा तिला खूप छळतो. कारण आता ती त्याला लैंगिक सुख देऊ शकत नाही. आता तर तो दुसरे लग्न करायची धमकी देतो आहे. राणी ताईंनी तिला तपासले. तिच्यात काही दोष नव्हता. त्यांनी तिच्या नवऱ्याला बोलावून समजावले की योग्य लैंगिक नाते ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. पण वैवाहिक जीवनाचं यश हे एकमेकांवरचा विश्वास, आदर, मैत्री या गोष्टींवर अवलंबून असतं. पुढच्या संभाषणातून त्यांनी त्या दोघांना लग्नाचा असा खरा अर्थ समजावून दिला. इतक्या खोलवर जाऊन पेशंटचा विचार करणाऱ्या राणीताईंसारख्या डॉक्टर विरळाच. त्या जेव्हा पेशंटशी, तिच्या नातेवाईकांशी संवाद साधतात त्यांच्या बोलण्यातून माणुसकीचा, सहृदयतेचा झरा झुळझुळ वाहतो. वैद्यकीय सत्य पेशंटला सांगताना एखाद्या आईच्या ममत्वाने त्या ते सांगतात. यातून त्या पेशंटला एक भावनिक बळ मिळतं. पुस्तकाच्या पानापानांवर विखुरलेल्या संवादातून याची प्रचीती येते.
एकदा डॉ. राणींनी आदिवासी स्त्रियांच्या मेळाव्यात विचारलं की, सगळय़ात कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात. बायांनी सांगितले, ‘‘अडलेलं गुंतागुंतीचं बाळंतपण आणि वंध्यत्व. बाळंतपण झालंच नाही तर त्यात बाई फक्त एकदाच मरते. पण वंधत्व असेल तर तिला रोज मरावं लागतं.’’ आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे वास्तव सगळीकडे सारखंच आहे. आज ‘शोधग्राम’मध्ये चाललेलं काम पाहून असं वाटतं की, आरोग्य स्वराज्याच्या त्यांच्या स्वप्नाकडे त्यांची यशस्वी वाटचाल चालू आहे. पण हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की हा प्रवास सोपा नव्हता.
मला हे पुस्तक वाचताना वारली चित्र आठवलं. त्यात घराच्या आतली माणसं, घराबाहेरची माणसं, घराबाहेरचे प्राणी, पक्षी, गाव, जंगल सारं एकाच प्रतलावर मांडलेलं असतं. ते चित्र आपल्याला एकाच दृष्टिक्षेपात संपूर्ण गावाचा, त्या परिसराचा अनुभव देतं. राणीताईंनी या पुस्तकात स्त्रियांच्या आरोग्याच्या सध्याच्या परिस्थितीचं असंच सर्व समावेशक चित्र आपल्यासमोर ठेवलं आहे. स्त्रीच्या मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आरोग्याच्या प्रश्नातले खाचखळगे पेशंटच्या अनुभवातून आपल्यापर्यंत पोचवले आहेत. त्यावरचे उपाय पण सुचवले आहेत. हे पुस्तक आपल्या जाणिवांना जागृत करण्याचं, विस्तारण्याचं काम करतं. फक्त मी आणि माझं जग या कोषातून बाहेर पडून, स्वत:त आणि समाजमनात डोकावून पाहायची प्रेरणा देतं. हे पुस्तक वाचताना वाचकही आपल्या आयुष्यातल्या व आजूबाजूच्या लोकांच्या प्रश्नाशी तुलना करू शकतो, जोडला जाऊ शकतो. डॉ. राणी म्हणतात की, हे जे जोडला जाणं असतं त्यातून माणसाला स्वत:ला बदलण्याची प्रेरणा मिळते. वाचकाला या बदलाकडे नेणं हा कदाचित या पुस्तकाचा मूळ उद्देश असावा.
पुस्तक वाचताना जाणवत राहतं ते या दोघांच्या डोक्यावरचं कार्यकर्तृत्वाचं विशाल आकाश; आणि त्याच वेळी मनाला स्पर्शून जातो तो या पुस्तकातल्या कथनातला नम्रतेचा अंत:प्रवाह. लक्षात येतं की, आदिवासींना आरोग्य स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारी ही ध्येयवादी पावलं गेली अनेक वर्ष अथकपणे गडचिरोलीतल्या मातीत चालताहेत. हे पुस्तक पुन्हा एकदा लक्षात आणून देतं की, त्यांच्या चालण्याला तिथल्या संस्कृतीचा सुगंध आहे.
‘पुटिंग विमेन फस्र्ट’(ग्रामीण भागातील स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य)
राणी बंग, सुनंदा खोरगडे, रूपा चिनाय
अनु.- सुनंदा अमरापूरकर,
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
पाने- ३७२, किंमत- ५५०/-