मनोहर पारनेरकर samdhun12@gmail.com

“Music is a discipline and a mistress of order and good manners. She makes people milder, gentler, more moral and more reasonable.”

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

‘संगीत ही एक अशी विद्याशाखा आहे, जी सुव्यवस्था आणि चांगली वर्तणूक शिकवते. ती माणसाला अधिक शांत, सौम्य, नैतिक आणि समंजस करते.’

– मार्टिन लुथर (१४८३-१५४६)

आज मार्टिन लुथरचे कट्टर अनुयायीदेखील त्याच्या वरील सुभाषितवजा विधानावर विश्वास ठेवणार नाहीत. कारण त्यात एक प्रकारचा मोहक भोळेपणा जरी असला, तरी एकूणच मानवी चारित्र्याची जी जाण आपल्याला कालानुसार झाली आहे तिच्याशी हे विधान मुळीच सुसंगत नाही. साहित्य, संगीत आणि कला यांच्याबद्दल प्रेम वाटणं किंवा तिटकारा असणं या गोष्टीचा माणसाच्या चारित्र्याशी- मग ते चांगलं किंवा वाईट असो- काहीच संबंध नसतो याची आपल्याला पूर्ण कल्पना आली आहे.

आणि जर मार्टिन लुथर हा त्याच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या मार्टिन लुथर किंग (१९२९-१९६८) याच्यासारखा विसाव्या शतकात जन्मला असता तर त्याने हे विधान निश्चितच केलं नसतं. कारण वंशसंहार करणारे विसाव्या शतकातले दोन राक्षस- हिटलर आणि स्टालिन हे दोघेही पाश्चात्त्य संगीताचे प्रचंड दर्दी होते याचे भरभक्कम पुरावे आता उपलब्ध आहेत. आणि हे क्रूर विडंबन या जर्मन प्रोटेस्टंट सुधारकाच्या दृष्टीतून नक्कीच निसटलं नसतं.

हिटलर आणि स्टालिन या दोघांपैकी जास्त भयकारी आणि क्रूर कोण होता याबद्दल मी इथे बोलणार नाहीए. (नव्या ऐतिहासिक पुराव्यानुसार त्यांच्यातल्या तरतमतेचा निकाल नाणेफेक करूनच लावावा लागेल.) पण ही दोन्ही तिरस्करणीय व्यक्तिमत्त्वं पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताची खरंच प्रेमी होती आणि त्याबद्दलच मी इथे लिहिणार आहे. या दोघांची सांगीतिक अभिरुची अपेक्षित वळणांनी पुढे जात नाही. काही वर्षांपूर्वी हाती आलेल्या नवीन पुराव्यानुसार, या दोन जुलमी हुकूमशहांनी आपल्या शत्रूच्या संगीतावरसुद्धा प्रेम केलं, हे आता सिद्ध झालं आहे. पहिल्यांदा या दोघांमधल्या जास्त कुप्रसिद्ध अशा हिटलरबद्दल!

हिटलरची सांगीतिक आवड काही ज्यू आणि रशियन कलावंतांपर्यंत गेलेली होती. अर्थातच जर्मन रचनाकार त्याला जास्त जवळचे वाटत. त्यातल्या त्यात बीथोवन आणि ब्रुकनर यांच्यावर त्याचं विशेष प्रेम होतं. पण रिचर्ड वाग्नरच्या ऑपेराने तो अक्षरश: झपाटला होता आणि त्याला तो आपला आध्यात्मिक गुरू मानायचा. (वाग्नर हा इतिहासातील सर्वात कडवा ज्यूद्वेष्टा- अठळक-रएटकळकउ म्हणून ओळखला जातो.)

आता ‘न्यू यॉर्कर’ मासिकाचा प्रसिद्ध संगीत समीक्षक अ‍ॅलेक्स रॉसच्या ‘द रेस्ट इज नॉइज’ या पुस्तकातील एक वेधक किस्सा ऐका. हिटलरचा जन्म एका अत्यंत गरीब ऑस्ट्रियन कुटुंबात झाला होता. ऑस्ट्रियन रचनाकार गुस्ताव माहलरने संचालित केलेला वाग्नरचा ‘त्रिस्तन अ‍ॅन्ड आयसोल्ड’ हा ऑपेरा बघायला त्याला व्हिएन्नामध्ये जायचं होतं आणि जवळ तर पैसे नव्हते. तेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले होते आणि तो ऑपेरा बघायला व्हिएन्नाला गेला होता.

‘डर स्पीगल’ या जर्मन साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखावरून असं दिसून येतं की, हिटलरची सांगीतिक अभिरुची ही जर्मनीच्या सीमा ओलांडून गेली होती. (दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हिटलरच्या बंकरमध्ये सापडलेल्या शंभरएक ध्वनिमुद्रिकांवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.) या संग्रहात चायकोव्हस्की, मसोरगस्की, रॅकमोनिनॉफ यांसारख्या महान रशियन रचनाकारांच्या रचना तर होत्याच, पण अनेक प्रख्यात ज्यू वादकांनी वाजवलेल्या रचनादेखील होत्या. त्यात प्रामुख्याने व्हायोलिनवादक ब्रेनिस्लाव ह्य़ुबरमन आणि पियानोवादक आर्टर श्नाबेल यांचा समावेश होता. (त्यातल्या ह्य़ुबरमनने जर्मनीतील नाझीवादाच्या उदयाचा जाहीरपणे कडवा निषेध केला होता, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.)

संगीताचा संग्रह करणाऱ्या माणसाला आज संगीताचा खजिनाच उपलब्ध असतो. प्रसिद्ध रचनांच्या शंभरेक वेगवेगळ्या आवृत्त्या उपलब्ध असतात. पण हिटलरच्या जमान्यात आपल्या पसंतीचं संगीत आपल्या संग्रहात आणण्यासाठी अनेक निर्बंध होते. पूर्णपणे अस्सल जर्मन संगीतकारांचा खजिना (इथं ‘नॉर्डिक वंशाच्या’ असं वाचावं.) बाळगणं या हुकूमशहाला नक्कीच आवडलं असतं आणि त्याने तसा संग्रह केलाही असता. पण त्या काळात ते केवळ अशक्य होतं.

आता स्टालिनकडे वळू या.

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण स्टालिनचा मृत्यू मोझार्टचा एक कनचटरे ऐकता ऐकता झाला होता. स्टालिन हा हिटलरइतका संगीतवेडा नव्हता. पण त्याचं संगीतप्रेम म्हणजे देखावा नक्कीच नव्हता. हा रशियन हुकूमशहा पाश्चात्त्य संगीताचा आस्वाद अनेकदा आनंदाने घेत असे. चायकोवस्की, ग्लिंका, बोरोडिन, रिम्स्की-कोरसाकॉव या रशियन संगीतकारांच्या रचना (विशेषत: त्यांचे ऑपेरे आणि बॅले) त्याला विशेषकरून आवडायच्या.

पुन्हा अ‍ॅलेक्स रॉसचा एक उतारा उद्धृत करतो.. ‘‘स्टालिनची अभिरुची फार चिंचोळी होती, पण अशिष्ट नव्हती. तो बोल्शोय थिएटरचा आश्रयदाता होता. रेडियोवर शास्त्रीय संगीत ऐकायचा आणि आपल्या उंच आवाजात तो लोकगीतं गात असे. रशियामधल्या प्रत्येक शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रणांचं तो परीक्षण करत असे. आणि त्यांच्या रेकॉर्ड्सच्या कव्हरवर ‘चांगलं आहे’, ठीक आहे,’ ‘वाईट आहे’ किंवा ‘कचरा आहे’ असे शेरेही मारत असे. त्याच्याकडे ९३ ऑपेरा रेकॉर्डिंग्जचा संग्रह होता.’’ असे जरी असले तरी ५ मार्च १९५३ रोजी स्टालिनचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या रेकॉर्ड प्लेयरवर चायकॉव्हस्की किंवा रिम्स्की-कोरसाकॉव यांच्या रचना वाजत नव्हत्या, तर जर्मन रचनाकार मोझार्टचा २३ वा पियानो कंचरटरे वाजत होता. मोझार्टच्या या प्रसिद्ध कंचरटरेच्या प्रेमात स्टालिन कसा पडला याची एक चित्तथरारक गोष्ट सांगतो. या घटनेवरून तुम्हाला स्टालिनच्या सांगीतिक अभिरुचीमधली विसंगती दिसेलच; शिवाय या रशियन हुकूमशहाच्या व्यक्तिमत्त्वातील एक हळवा कोपरादेखील दिसून येईल. ती गोष्ट अशी :

स्टॅलिनने एका संध्याकाळी मॉस्को रेडियोवर मोझार्टचा २३ वा पियानो कंचरटरे (के-४८८) पहिल्यांदा ऐकला तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. चौकशी केली तेव्हा त्याला असं कळलं की, त्याची अत्यंत आवडती पियानोवादक मारिया युदिना (१८९९-१९७०) हिने त्या कंचरटरेमध्ये पियानो वाजवला होता. स्टालिनच्या विनंतीवरून (म्हणजे फर्मानच की!) या प्रसारणाचं ध्वनिमुद्रण रातोरात केलं गेलं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या सुपूर्द करण्यात आलं. रशियाच्या या जुलूमशहाने खूश होऊन युदिनाला २०,००० रुबल्स पाठवले. तर वीर युदिनाने तात्काळ तिच्या चर्चला ही रक्कम देणगी म्हणून देऊन टाकली. मी मुद्दामच ‘वीर’ हे विशेषण वापरलं आहे. कारण त्या काळात रशिया पूर्णपणे निधर्मी होता आणि ती अत्यंत कट्टर कॅथलिक ख्रिश्चन होती. इतकंच नव्हे, तर ती या रशियन हुकूमशहाची आणि त्याच्या जुलमी राजवटीची कडवी टीकाकारही होती.

..तर २०,००० रुबल्सचा तो चेक मिळाल्यानंतर युदिनाने स्टालिनला एक आभाराचं पत्र लिहिलं. त्यात तिने लिहिलं, ‘‘माझ्या जीवात जीव असेपर्यंत दररोज आणि दररात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणं मी चालूच ठेवेन. एक लक्षात ठेवा की, परमेश्वर हा अमर्याद दयाळू असल्यामुळे त्याचं तुमच्यावरही प्रेम आहे. आपल्या देशबांधवांविरुद्ध आणि मातृभूमीविरुद्ध जी अनेक पापं तुम्ही केली आहेत त्याबद्दल तो तुम्हाला निश्चितच क्षमा करेल.’’

या असल्या टोकाच्या विरोधी मतप्रदर्शनाबद्दल ती खरं म्हणजे अदृश्यच व्हायला हवी होती (म्हणजे तिची सैबेरियात रवानगी व्हायला हवी होती.), पण युदिनाच्या बाबतीत मात्र असं काही घडलं नाही. याचं एक कारण म्हणजे ती स्त्री होती. दुसरं कारण म्हणजे ती स्टालिनची अत्यंत आवडती पियानोवादक होती. आणि तिसरं कारण म्हणजे- काहीजण असं म्हणतात की, हा हुकूमशहा खोल मनात कुठल्याशा  धार्मिक अंधश्रद्धेने ग्रस्त झाला होता.

अर्थात युदिनाला कोणतीच शिक्षा झाली नाही असंही नाही. तिच्या शिकवण्यांवर आणि तिच्या कार्यक्रमांवर अधूनमधून बंधनं घातली जायची. पण विसाव्या शतकातला अग्रणी रशियन रचनाकार दिमित्री शोस्टाकोव्हिच आणि १९५७ सालचा नोबेल पारितोषिकविजेता आणि ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीचा लेखक बोरिस पास्तरनाक या तिच्या दोन मित्रांची जशी मानहानी झाली आणि त्यांना ज्या प्रमाणात दु:खं सोसावी लागली, त्यामानाने तिला काहीच त्रास झाला नाही. नवलाईची गोष्ट म्हणजे पास्तरनाकच्या ‘डॉ. झिवागो’ या जगप्रसिद्ध कादंबरीचं पहिलंवहिलं वाचन त्याने फेब्रुवारी १९४७ मध्ये युदिना हिच्याच घरी केलं होतं.

..आणि या लेखाचा शेवट आणखी चार उदाहरणांनी जरा शोकानंदी सुरावटीवर करतो. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण रशियन क्रांतीचा शिल्पकार आणि सोव्हिएट युनियनचा पहिला प्रमुख आणि स्टालिनचा बॉस लेनिन हादेखील शास्त्रीय संगीताचा प्रेमी होता. आपल्या लहान वयात त्यानं पियानोवादनाचे धडे घेतले होते आणि बीथोवनने पियानोसाठी लिहिलेला Appassionata हा पियानो सोनाटा त्याला विशेषकरून आवडत असे.

आता अमेरिकेबद्दल बोलायचं तर हॅरी ट्रमन, रिचर्ड निक्सन आणि बिल क्लिंटन हे तिघेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते हे आपल्याला माहीतच आहे. पण मी त्यांचा एकत्र उल्लेख करण्याचं कारण म्हणजे हे तिघेही संगीतप्रेमी असून बऱ्यापैकी संगीतवादकही होते. ट्रमन आणि निक्सन हे दोघे पियानो वाजवायचे, तर क्लिंटन हे सॅक्सोफोनवादक आहेत. हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्याचा ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय जरी प्रेसिडेंट ट्रमन यांना घ्यावा लागला होता तरी ते आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात एक अतिशय प्रामाणिक आणि चांगले गृहस्थ होते. तर दुसरे दोघे- निक्सन (वॉटरगेट प्रकरण) आणि क्लिंटन (मोनिका लेव्हिन्स्की प्रकरण) या दोघांनाही ‘गंभीर अपराध आणि गैरवर्तन’ या कारणांसाठी  महाभियोगाला सामोरं जावं लागेल की काय अशी वेळ आली होती. पण ती कशीतरी टळली. ही चारही उदाहरणं लेखाच्या सुरुवातीला मी दिलेल्या thesis ला पाठिंबाच देतात. म्हणजे.. माणसाचं चारित्र्य त्याच्या कला किंवा संगीतप्रेमावर कधीच अवलंबून नसतं.

शब्दांकन : आनंद थत्ते