कलाकृती पाहून/ वाचून/ ऐकून विचारचक्र सुरू होणार की नाही, आणि हे विचार ‘आजकालचे’ असणार की नाही, हा कलाकृती आजकालची आहे की नाही, किंवा ‘समकालीन’ ठरते आहे की नाही, हे ठरवण्याचा कळीचा मुद्दा असतो..
अंगोला या आफ्रिकी देशामधला किलौंजी किआ हेन्डा हा दृश्यकलावंत गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला. त्यानं काही चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. फोटोग्राफीचा एखादा डिप्लोमासुद्धा केलेला नाही. अशा औपचारिक शिक्षणाविनाही राजा रविवर्मासारखे चित्रकार घडले होतेच; पण या अंगोलातल्या किलौंजी किआ हेन्डा नावाच्या दृश्यकलावंतानं निर्माण केलेली दृश्यं फार महान आहेत असं अजिबात नाही. महान नसतानासुद्धा त्याच्या कलाकृती घरोघरी पोहोचल्यात असंही नाही. मग कशाला घ्यायची किलौंजी किआ हेन्डाची दखल?
बरं, हा किलौंजी अंगोलात राहतो आणि स्वत:च्या देशाचीच खिल्ली उडवतो असंही काही वेळा दिसून आलंय. असले देशद्रोही चित्रकार कोणाला आवडणार?
बरोबरच आहे. खरं म्हणजे आपल्या रविवर्मा, एस. एम. पंडित, वासुदेव कामत ते देवदत्त पाडेकर अशा, आणि पाश्चात्त्यांच्याही मायकलँजेलो ते उदाहरणार्थ वॉल्टर लँगहॅमर अशा पिढय़ान् पिढय़ांच्या तुलनेत हा कोण किलौंजी म्हणजे कस्पटासमानच ठरेल. त्यामुळे त्याला कस्पटासारखं फेकून द्यायला काहीही हरकत नाही.
पण जरा दुसऱ्या बाजूनं विचार करू.. ज्यांना किलौंजीचं काम ‘आजकालच्या कलाकृतीं’मध्ये मोडणारं आहे असं वाटतं आणि म्हणून आवडतं, त्यांच्या बाजूनं :
‘‘महान’ असणं, ‘घरोघरी पोहोचणं’ ही खरोखरच कलेची साध्यं आहेत का?’ हा या बाजूकडून येणारा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा, की स्वत:च्या देशाची खिल्ली उडवली आणि स्वदेशातल्या हास्यास्पद गोष्टी दाखवून दिल्या, तर त्याला ‘देशद्रोह’ मानायचं का? (तसं असेल तर अमेरिकेनं मायकल मूरला देशद्रोहीच ठरवायला हवं!) तिसरा प्रश्न असा की, कलाकृती कोणते प्रश्न उपस्थित करते, हे महत्त्वाचं मानणार की नाही?
यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ‘हो, आहेतच’ असं असेल तर वाद मिटतो आणि ‘आजकालच्या कलाकृतीं’कडे पाठच फिरवायची हे नक्की ठरतं. दुसरा प्रश्न त्या- त्या उदाहरणापुरत्याच उत्तरांचा असल्याचं म्हणता येतं. पण खरा वाद आहे तो तिसऱ्या प्रश्नाबद्दल.
कलाकृतीनं ‘फक्त असावं’ अशी अपेक्षा असेल तर कलाकृती प्रश्न विचारतेय, हे काही पटणार नाही. फक्त असणाऱ्या कलाकृती या आधीपासून जे निकष (सौंदर्याचे, उदात्ततेचे वगैरे) ठरलेले आहेत, त्यांचं पालन करणाऱ्या असतात.. मग त्यांना ‘नवनिर्मिती’ कशाला म्हणायचं, हा प्रश्न अनाठायी ठरू नये. ‘मातृप्रेम श्रेष्ठ’ यासारखे चिरकालीन संदेश देऊन थांबणारी कलाकृती ‘महान’ असेल; पण ‘आजकालची’ कशी असेल? आणि आपला विषय हा ‘आजकालच्या कलाकृती’ असाच आहे. या आजकालच्या कलाकृती ‘संदेश’ वगैरे देण्यावर विश्वास ठेवतच नाहीत. कलाकृती पाहून/ वाचून/ ऐकून विचारचक्र सुरू होणार की नाही, आणि हे विचार ‘आजकालचे’ असणार की नाही, हा कलाकृती आजकालची आहे की नाही, किंवा ‘समकालीन’ ठरते आहे की नाही, हे ठरवण्याचा कळीचा मुद्दा असतो.
यासंदर्भात जर किलौंजीचा विचार केलात तर तुम्हालाही त्याची ‘इकॅरस- १३’ ही कलाकृती आवडेल.. लक्षात राहील.
भारतात ‘इकॅरस- १३’ प्रदर्शित झाली होती, ती दिल्लीच्या ‘माटी घर’ या दालनात- २०१४ च्या फेब्रुवारीभर सुरू राहिलेल्या ‘इन्सर्ट’ नामक एका प्रदर्शनात. दोन भिंतींवर बरेच फोटो शिस्तीनं मांडलेले. प्रत्येक फोटोखाली अगदी वर्तमानपत्रात असते तशी ‘हे अमक्या वास्तूचं/ घटनेचं/ क्षणाचं छायाचित्र आहे’ अशा छापाची माहितीओळ. मधोमध एका पांढऱ्या ठोकळ्यावर काचेच्या अर्धगोलात ठेवलेलं एक पांढरंशुभ्र लघुप्रतिरूप (स्केल मॉडेल) आणि सुरुवातीला एक मोठ्ठं निबंधासारखं लिखाण (जे कदाचित कुणीच वाचणार नाही!)- अशी या कलाकृतीची रचना होती.
हे फोटो कशाचे होते? ते नंतर पाहू.. आधी, या फोटोंमधून काय ‘दाखवलं’ होतं, हे पाहू या..
‘‘अंगोला या आफ्रिकी देशानं थेट सूर्यावर अंतराळयान न्यायचं ठरवलं. यान बांधण्यात यशही आलं. यानावर नियंत्रण ठेवणारी प्रयोगशाळा सज्ज झाली. मग सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अनंत अवकाशातल्या आकाशगंगा ओलांडून हे यान सूर्याकडे गेलं.. यानावरल्या उपकरणांनी वेळोवेळी पाठवलेले फोटो इथं तुमच्यासमोर आहेतच.. अखेर सूर्यावर यान गेलं आणि परतसुद्धा आलं.. हे पाहा- इथं या गच्चीत जे अवशेष पडलेत ना, ते त्या यानाचेच.’’
अशी तद्दन खोटी गोष्ट ‘दाखवण्या’चा प्रयत्न या सर्व फोटोंनी केला होता. कोणताही देशप्रेमी आपल्या देशातल्या वैज्ञानिक भराऱ्या दाखवणाऱ्या फोटोंची मांडणी जितक्या नीटनेटकेपणानं करेल, तितक्याच नीटनेटकेपणानं किलौंजीनेही मांडणी केली होती. फरक असा की, या कपोलकल्पित मांडणीतून किलौंजी खिल्लीच उडवत होता. ‘सूर्य तर आफ्रिकेचाच!’ असं दपरेक्तीवजा विधान चित्रांशेजारच्या माहितीमध्ये करणं, हाही खिल्ली उडवण्याचाच भाग होता.
पण फोटो कशाचे तरी असणारच ना? ते ‘कपोलकल्पित’ कसे म्हणता येतील? अंगोलातलं एक बंद पडलेलं थिएटर किलौंजीनं टिपलं, त्याला ‘नियंत्रण प्रयोगशाळा’ असं फोटो-ओळींमध्ये म्हटलं. किंवा रशियानं एक नादुरुस्त अवकाशयान अंगोला या देशाला ‘भेट’ म्हणून नुसतं शोभेसाठी ठेवायला दिलं होतं, ते ‘सूर्ययान’ आहे, असं फोटोखालच्या ओळीतून किलौंजीनं भासवलं. सूर्याचे आणि आकाशगंगेचे म्हणून दाखवलेले फोटो तर अंधारात दिवे लावून त्यांचेच काढलेले होते!
या कलाकृतीतून आफ्रिकी देशांची खिल्ली उडवल्यासारखं कदाचित वाटेलही; पण खिल्ली उडवली आहे ती ‘अंतराळ कार्यक्रम म्हणजेच प्रगती’ असं मानणाऱ्या ‘प्रवृत्ती’ची. आजही अनेक आफ्रिकी देशांकडे अवकाश कार्यक्रम नाही. बाकीचे देश ‘आम्ही किती प्रगत!’ असं आपापल्या अंतराळ-भराऱ्यांची प्रदर्शनं मांडून सांगत असतात तेव्हा आशाळभूतपणे पाहणं, हेच आफ्रिकेच्या हाती. पण हे जे बाकीचे देश अंतराळ-भराऱ्या घेत आहेत, ते जगाच्या भल्यासाठी काही करताहेत की फक्त देशहितापुरतंच? अंतराळ काय या देशांचंच आहे का? ते तर जगातल्या सर्वाचं आहे ना? मग त्यातल्या संशोधनाचा किती फायदा आज आफ्रिकेला मिळतोय? त्याची वाटणी विषमच आहे की नाही? याला उत्तर म्हणून आफ्रिकी देशानं अंतराळ कार्यक्रम आखलाच, तर ‘आधी गरिबीकडे पाहा’ अशी टीकाच होणार.. किंवा, तो कार्यक्रम किती परभृत आहे, किंवा तो कसा फसतोच आहे याचाच गवगवा होणार. असं का?
हे प्रश्न किंवा यासारखे प्रश्न किलौंजीच्या या कलाकृतीकडे पाहून पडतील. त्या प्रत्येकाची उत्तरं समाधानकारकच असतील असं नाही. काही प्रश्नांची व्यावहारिक उत्तरं अत्यंत साधी-सोपी आहेत. पण तात्त्विक उत्तरं?
ही चर्चा सुरू करणाऱ्या या कलाकृतीचं नाव ‘इकॅरस’ असं का? यासाठी मात्र विकिपीडिया वगैरे पाहावा लागेल. ग्रीक मिथ्यकथेत ‘सूर्याकडे झेपावणाऱ्या आणि त्या प्रयत्नात जिवास मुकणाऱ्या पक्ष्याचं नाव इकॅरस’ हे माहीत झाल्यावर कलाकृती आणखी आस्वादक्षम झाल्यासारखं वाटेल.
किंवा न का वाटेना! कलाकृती ‘आजकालची’ आहे हे लक्षात येण्यासाठी या नावाचा आणखी एक उपयोग आहे.. मिथ्यकथा वा पुराणकथांमधली नावं कुठल्याही देशाच्या अंतराळ कार्यक्रमात आजही वापरली जातातच!
हे कुठलं विचित्र मिथ्याकर्षण? असा आणखी एक प्रश्न किलौंजी समोर आणतो. त्याला त्याच्या कलाकृतीबद्दल धन्यवाद देण्याचं हे आणखी एक निमित्त ठरतं.
अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com