मिलान शहरात काहीसं एका बाजूला असलेलं ‘फोंडाझिओने प्रादा’ हे कलासंग्रहालय आतून मात्र झकपक आहे. मुळात ही जागा एका कारखान्याची होती. पण प्रादा हे फॅशन- जगतातलं अव्वल ब्रँड-नाव; त्यामुळे त्या जागेवरल्या कलासंग्रहालयाचं वास्तुकामही त्यांनी त्यांच्या तोलामोलाचं करून घेतलं. झकपक म्हणजे किती? तर या प्रांगणातल्या तीन इमारतींपेक्षा लहान, टेहळणी मनोरावजा इमारत अख्खी ‘गोल्ड लीफ’नं मढवलेली आहे! या अशा संग्रहालयाच्या एका तळघरात आपण शिरतो. ‘थॉमस डेमाँड (स्पेलिंग मात्र ‘डिमांड’ या शब्दासारखं!) : प्रोसेस्को ग्रोटेस्क : २००६’ अशी पाटी पाहत आत जातो. आतल्या भिंतीवर एका गुहेचं छायाचित्र फ्रेम करून लावलेलं दिसतं.. फक्त त्या फ्रेमपुरता प्रकाश. पुढे सगळा अंधारच. पण त्या अंधारातही अधूनमधून अंधुकसा प्रकाश दिसतो आहे.
होय अधूनमधूनच! कारण कमी-जास्त होतोय तो प्रकाश.. काय आहे तिथं?
प्रकाशाचा वेध घेत, अंधाराला डोळे सरावत आपण पुढे जात राहतो.. वळतो, तर समोर दिसते एक गुहा..
ही इथं मुळातच होती आणि प्रादावाल्यांनी तिचं जतनबितन केलंय की काय?
छे छे.. अजिबात नाही. पहिल्या नजरेत फसूही आपण; पण जरा पाहायला सुरुवात केल्यावर- म्हणजे ‘काहीतरी वेगळं’ पाहिल्याचा धक्का क्षणभरातच उतरून पुन्हा डोळे आणि डोकं यांचा संबंध पूर्ववत् होताक्षणी- आपल्या लक्षात येतं की, ही गुहा संपूर्णत: कृत्रिम आहे.. अगदी संगणकावरल्या ‘पिक्सेल’सारखे चौकोनी कण एकत्र जोडून ही प्रचंड गुहा बनवली असावी.. पण ते कसं शक्य आहे? गेली साधारण पाच-सात र्वष हळूहळू फोफावू लागलेलं ‘थ्रीडी प्रिंटिंग’चं तंत्र जर २००६ साली एवढं प्रगत झालेलं असतं तर त्या तांत्रिक प्रगतीचीच बातमी नसती का झाली? मग ‘लेगो ब्लॉक्स’सारख्या खेळण्याचा तर नसेल ना वापर केला? हो- असू शकतो.. ‘लेगो’च्या या ठोकळ्यांनी हान्स अँडरसनचा अख्खा पुतळा बनवलाय म्हणे डेन्मार्कमध्ये कुठेतरी- तसलंच काहीतरी असावं का या गुहेसाठी वापरलेलं?
नाही, नाही.. हे बघा नीट निरखून.. इथं कोपऱ्यात निरखून पाहिलंत तर सगळंच लक्षात येईल.. चक्क कार्डबोर्ड पुठ्ठय़ासारखं काहीतरी वापरलंय हो!
नजर जाणं.. नजर फिरवणं.. पाहणं.. निरखणं.. या सगळ्या क्रियांमधून समजा ‘तंत्र कोणतं?’ एवढंच शोधत असलात, तरीही एक खूणगाठ मात्र तेवढय़ा वेळात आपसूक बांधली जाते- ही गुहा केल्येय ती अगदी बारीकसारीक तपशिलांनिशी केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे.. तिच्या रूपात (‘निर्जन गुहा’ म्हटलं की कल्पनाचक्षूंपुढे येतं, तस्संच) भयभीषण काहीतरी आहे.. काय आहे ते? आणि ते तसंच कसं काय आहे?
कमी-जास्त होणारा प्रकाश नाटय़ निर्माण करतो. गुहेच्या दिसण्याची तीव्रता वाढवत नेतो आणि पाहणाऱ्याला गुहेचे तपशील दाखवू लागतो. ज्वालामुखीच्या लाव्हारसातून तयार झालेल्या आडव्या विवरासारखी ही गुहा आहे. तुम्ही अगदी सपाट जमिनीवरच उभे राहून तिच्याकडे पाहत असलात तरीही गुहेतली जमीन किती उंचसखल आहे, तिचं छतही कसं ओघळलेलं आहे, हे तपशील अगदी अंगात भिनणारे आहेत. ‘इथं आपण नाही बुवा राहू शकणार..’ अशी कबुली द्यायला लावणारे.. एखाद्या हिंस्र प्राण्याच्या वासलेल्या जबडय़ासारखी ही गुहा आहे. आणि जमीन वा छत यांमधले ते दगडी सुळके हे या जबडय़ातल्या सुळ्यांसारखे.. अशा व्यक्तिगणिक बदलू शकणाऱ्या प्रतिक्रिया ही गुहा पाहत असताना उमटू शकतात. एखाद्या साहसप्रेमीनं ‘मला इथेच राहायला आवडेल’ म्हटलं, तरी तीही व्यक्तिनिष्ठच प्रतिक्रिया. आणि मुख्य म्हणजे- तीसुद्धा गुहेच्या भयभीषणतेवर शिक्कामोर्तबच करणारी प्रतिक्रिया!
तुम्हाला त्या कृत्रिम गुहेशी ‘वागायला’ लावणं- मघाशी भिंतीवरला असल्याच गुहेचा मोठा फोटो पाहून तुमच्या ज्या प्रतिक्रिया यायला हव्या होत्या, पण आल्या नव्हत्या, त्या प्रतिक्रिया तुमच्या मनात नीट उमटवणं, हे काम या प्रचंड कार्डबोर्ड-शिल्पानं नक्कीच केलेलं आहे.
पण- ‘ही गुहा छानच साकारलीय; पण गणपतीचं डेकोरेशन किंवा चित्रपटाचा सेट असाच असू शकतो ना!’ ही प्रतिक्रिया व्यक्तिनिष्ठ नव्हे; ती कला-अभ्यासातल्या प्रश्नाशी निगडित अशी प्रतिक्रिया आहे. भले तुम्ही स्वत:ला कलाभ्यासक समजत असा वा नसा.
पण कलाभ्यासक काय म्हणतील?
‘मिमेसिस’ हे तत्त्व अ‍ॅरिस्टॉटलनं मांडलं. कला ही निसर्ग किंवा नैसर्गिक जीवन यांची प्रतिमा किंवा आवृत्ती असते, असा त्याचा अर्थ. अजूनही ‘व्यक्तिचित्रण आणि निसर्गचित्रण म्हणजेच ‘खरी’ कला’ असं मानणारे या निसर्ग-आवृत्तीवादी विचाराचे असतात. पण कलेतिहासात पुढे इतकी वळणं आली, की ‘माझी कलाकृती हीसुद्धा एक स्वतंत्र कृतीच असल्यामुळे तिला नैसर्गिकतेसारखाच अस्सलतेचा दर्जा द्यावा..’ असं कलाकार मानू लागले. अख्खी पाश्चात्त्य (आणि गेल्या २०० वर्षांत त्यांनी भारतासारख्या महान देशासह सर्वत्र रुजवलेली) दृश्यकला  ‘आधुनिक’ झाली, ती या ‘मिमेसिस’ तत्त्वाच्या पाडावातून! त्याही पुढल्या- मानवी प्रगती आणि ‘निसर्गावर मात’ वगैरेवरला विश्वास डळमळीत झाल्यानंतरच्या ‘उत्तराधुनिक’ विचारानुसार तर ‘दृश्यकलेच्या इतिहासात भर घालणं’ हा सुस्पष्ट हेतू असलेली कोणतीही कृती/ कलावस्तू / वस्तू म्हणजे ‘कलाकृती’च! तेव्हा गणपतीचा किंवा सिनेमाचा सेट ‘केवळ पाहण्या’साठीच (गणपतीविना / सेटवरल्या कोणत्याही घडामोडीच्या मागमूसाविना) मांडलात, तरी आम्ही त्याला कलाकृती समजू..
ही अभ्यासकी विचारपद्धत जरा चक्रावणारी वाटली, तरी (१) निसर्ग-आवृत्तीवर भर देणारं ‘मिमेसिस’, (२) कलाकृतीचं सार्वभौमत्व मानणारा आधुनिकतावाद, आणि (३) पाहण्याचा हेतू सर्वोच्च मानणारा उत्तरआधुनिकतावाद – हे तीन महत्त्वाचे टप्पे तुम्ही ही कलाकृती पाहताना ‘जगलेले’ असता! पाहा बरं आठवून.. गुहा ‘खऱ्यासारखी’ वाटणं, तिच्या तंत्राबद्दल कुतूहल वाढणं आणि ती कार्डबोर्डनं केल्याचा ‘शोध’ लागणं, पुढे ‘हिलाच काय म्हणून कलाकृती म्हणावं?’ असा प्रश्न पडणं.. हे होऊ शकलंच ना?
आधीचे दोन टप्पे मात्र पार पाडणारी ही कलाकृती (चित्रपटाचा सेट आणि गणपतीचं डेकोरेशन या ‘अदर’ची जाणीव करून देऊन) ‘इज इट आर्ट?’ – हिला कला म्हणावं का? हा प्रश्न तुमच्यावर सोपवते;  त्या अर्थी ती ‘आजकालची’ आहे.
‘काय म्हणजे कला, हे आम्हाला सांगू नका. आम्ही ठरवू आमचं काय ते!’ असं पिकासोपासून अनेक आधुनिकतावादी चित्रकारांनी म्हणून झालंय कध्धीच.
आता पाळी आपली आहे- ‘आजकालच्या’ प्रेक्षकांची!
अभिजीत ताम्हणे – abhijit.tamhane@expressindia.com