scorecardresearch

Premium

अभिजात : जेम्स टिसो : आसक्तीकडून आध्यात्मिकतेकडे!

वयाच्या बाविसाव्या वर्षी पॅरिसच्या सलोंमध्ये चित्रं दाखवायची संधी मिळाल्यानं त्यांचं नावही लवकरच झालं.

rench artist james tissot painting
टिसोंच्या चित्रांत निसर्गाची वेगवेगळी रूपं अपार रंगसामर्थ्यांने उमटलेली दिसतात.

अरुंधती देवस्थळे

एकोणिसावं शतक. पॅरिसमधला कॅफे रिश. त्यात अत्याधुनिक सुंदरींचा घोळका बसलेला. जवळच्याच एका टेबलावर एक सभ्य वाटणारा देखणा चित्रकार त्या घोळक्यापैकी एका उमराव पत्नीकडे बघत भराभर त्याच्या वहीत काहीतरी रेखाटतोय.. हे तिच्या लक्षात येताच ती अधिकच सुंदर पोज घेऊन बसते, तर लगेचच तो वही बंद करून टाकतो आणि वर्तमानपत्र उघडून समोरची कॉफी पिण्यात गर्क होतो. तिच्याकडे तो पुन्हा एक दृष्टिक्षेपही टाकत नाही. जरा वाट पाहून ती वेटरकडून त्याला जवळ बोलावून घेते आणि ‘तुम्हाला माझं चित्र काढायचं असेल तर अमुकतमुक पत्त्यावर आमच्याकडे या..’ असं निमंत्रण देते. गोंधळलेला तो तिला अभिवादन करून सांगतो, ‘‘हो, मी चित्रकार आहे. तुमच्या उदार आमंत्रणाबद्दल आभारी आहे. पण मला तुमच्या या पोशाखाचा नमुना हवा होता माझ्या कामासाठी. तो घेतला मी उतरवून..’’ असं सांगून अभावितपणे तिचा जरासा अपमानच करून तो तिची विनयाने रजा घेतो. हा विचित्र वाटणारं वागणारा युवक म्हणजे जेम्स टिसो!!

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

जेम्स टिसो (१८३६-१९०२) त्यांच्या  काळाच्या बहुतेक कलाकारांपेक्षा वेगळं भाग्य घेऊन एका सधन घराण्यात जन्मलेले. त्यामुळे संघर्ष किंवा पैशासाठी वणवण त्यांच्या नशिबी आली नाही. एक पाय फ्रान्स आणि दुसरा इंग्लंडमध्ये ठेवून दोन्ही संस्कृतींमधलं स्वत:ला आवडणारं ते घ्यावं अशी स्थिरता त्यांना मिळाली होती. त्यांनी व्यंगचित्रं ते कुटुंबांची तैलचित्रं किंवा बायबलमधल्या घटना ते पॅरिसमधल्या आधुनिक ललना अगदी तबियतीने चितारल्या. त्याकाळच्या बहुतेक चित्रकारांप्रमाणे तेही वडिलांचा विरोध पत्करून पॅरिसला येऊन इकोले द बूजामध्ये चित्रकला शिकले आणि ढिल्या, मोकळ्या फटकाऱ्यांतून लूव्रमधल्या मास्टर्सच्या कलेची अनुकरण करणारी चित्रं काढली. आई-वडील कापडाच्या धंद्यात असल्याने त्यांना फॅशनमध्ये विशेष रस असावा. परिणामी पॅरिसमधील ग्लॅमरस स्त्रियांच्या सौंदर्याइतकंच बारकाईने केलेलं त्यांच्या पेहरावांचं सुंदर चित्रण हे त्यांचं वैशिष्टय़ ठरलं. त्यांच्या कुटुंबावर कॅथॉलिक परंपरेचा पगडा असल्याने बायबलवर आधारित चित्रं काढावीशी वाटणं ओघाने आलंच. बहुतेक चित्रकारांनी त्या मार्गावर वाटचाल केल्याची उदाहरणं समोर असणारच. वयाच्या बाविसाव्या वर्षी पॅरिसच्या सलोंमध्ये चित्रं दाखवायची संधी मिळाल्यानं त्यांचं नावही लवकरच झालं.

हेही वाचा >>> अभिजात : फॉलिंगवॉटर : फ्रॅंक लॉईड राइट यांची कलाकृती

 ‘The Prodigal Son’ची कथा आपल्या सगळ्यांच्या ओळखीची. तिच्यावर त्यांनी एक अतिशय सुंदर मालिका काढली. (ऑइल ऑन कॅनव्हास- १८६२). या मालिकेतलं ‘दि रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन’ (११५ ७२०६ सें. मी. ) हे चित्र केवळ अप्रतिम आहे. मध्ययुगीन दृश्यांची उत्कृष्ट रंगसंगतीतली, छायाचित्रांत असावी तशी सर्व तपशिलांनिशी काढलेली चित्रं म्हणजे सुखवस्तू शेतकऱ्याचं घर, गृहसज्जा, त्याचं समाजातलं स्थान दाखवणारी वेशभूषा, स्थापत्याची श्रीमंती.. छानच. पण चित्रातील सर्वाची देहबोली- म्हणजे वात्सल्याने झुकून पुढे येणारे वडील आणि गर्वाचे घर खाली  होऊन घरी परतलेला पश्चात्तापदग्ध नवयुवक आणि दयनीय अवस्थेत परतलेल्या मुलाची घरवापसी बघायला जमलेल्यांचे चौकस चेहरेही या चित्राला जिवंतपणा देणारे. याच काळात काढलेलं ‘फाउस्ट अँड मार्गारिते इन द गार्डन’ हे तैलचित्र (७८ ७ ११७ सें. मी.) हेही अभिजात शैलीतल्या रंगसंगतीचं. बागेतला डोळ्यात भरणारा लाल बाक, त्यावर बसलेला दणकट फाउस्ट आणि विचारांत गढून गेल्याने तिथे असून नसल्यासारखी मार्गारिते! टिसोच्या चित्रांतल्या बहुतेक स्त्रिया आपल्याच विश्वात हरवलेल्या असतात, किंवा स्वत: चित्राचा भाग नसल्यासारख्या अलिप्ततेने पाहणाऱ्याकडे बघत असतात असं वाटतं.. हे कोणा फ्रेंच समीक्षकाचं म्हणणं इथे बरोब्बर आठवतं. याचबरोबर सेनच्या काठावरच्या म्यूझी डॉर्से कलासंग्रहालयात भेटणाऱ्या ‘टू सिस्टर्स’ (२१०  ७ १३५ सेमी, ऑइल ऑन कॅनव्हास- १८६३) या श्वेतवसना, मुग्ध बहिणींच्या चित्राने या मतास दुजोरा मिळतो. नदीकिनारी झाडाखाली उभ्या या दोन बहिणी उच्च घराण्यातल्या असाव्यात हे त्यांच्या सुरुचिपूर्ण, उंची फॅशनेबल गाऊन्सने आणि केशभूषेने समजतंच. दोघींमध्ये वयाचा बराच फरक असल्याने मोठी गृहिणी असावी आणि धाकटी किशोरी. दोघींच्या चेहऱ्यावर फक्त शांती.. इतर कुठलाही भाव नाही.

हेही वाचा >>> अभिजात : सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा..

१९६० च्या दशकात युरोपच्या कलावर्तुळात जपान आणि जपानी कलांबद्दल आकर्षण वाढू लागलं होतं. टिसोही या लाटेला अपवाद नव्हते. त्यांनी अनेक जपानी वूडकट्स आणि कलावस्तू खरेदी केल्या आणि आपला स्टुडिओ जपानी शैलीत सजवला. मॉनेनी त्यांच्या प्रिय जपानी कलाकारांसाठी घरात एक दालनच उघडलं होतं. टिसोंना जपानी सिल्क आणि किमोनोंचं अप्रूप होतं. त्यांनी आपल्या घरात जपानचं एक सलों उघडलं होतं. तिथे काही वर्ष जपानचे राजपुत्र अकिताके त्यांच्याकडे चित्रकला शिकायला येत. मध्यंतरी त्यांनी जपानी कलांचा त्यांच्यावरचा प्रभाव दाखवणारी एक मालिकाही केली.

मोरित्झ रेटश, पीटर व्हॉन कॉर्नेलिअस (जर्मनी), मॉने, मॅने आणि देगा यांची छान, परस्परांना स्फूर्ती देणारी मैत्री.. अगदी एकमेकांच्या घरी जाऊन राहण्याइतकी. टिसोंच्या चित्रांत निसर्गाची वेगवेगळी रूपं अपार रंगसामर्थ्यांने उमटलेली दिसतात. सुंदर बागा, झाडं आणि रंगीबेरंगी फुलं. अनेक चित्रांमधून डोकावणारा पानगळीचा सुंदर ऋतू आणि निसर्गावरलं प्रेम चित्रांत उतरवण्याची असोशी पाहून इंप्रेशनिस्ट मित्रांनी त्यांना आपल्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, हे समजण्यासारखंच. पण टिसोना आपलं स्वातंत्र्य जपायचं होतं म्हणून त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं नाही. देगा आणि टिसो यांनी परस्परांची पोट्र्रेट्सही काढलेली. तरुण वयात सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या पॅरिस कम्यूनचं त्यांनी सदस्यत्व घेतलं होतं. पण सरकार आणि क्रांतिकारी यांच्यातला रक्तरंजित संघर्ष नकोसा झाल्याने ते लंडनला निघून गेले आणि तिथे त्यांनी आपली कला परत सुरू केली. आणि ११ वर्षांनी ते परत शांत झालेल्या पॅरिसला परतले. लंडनमध्ये असताना एकीकडे रॉयल अकादमीत त्यांची चित्रं दाखवली जात होतीच; दुसरीकडे त्यांनी ‘व्हॅनिटी फेअर’ या त्याकाळी फॅशन आणि डिझाइन्ससाठी कला विभागात काम केलं. त्या काळात त्यांनी टोपणनावाने थोरामोठय़ांची २३०० नर्मविनोदी व्यंगचित्रं काढली. हे जोड- उत्पन्न त्यांना लंडनमध्ये राहताना उपयोगी पडत होतं. टिसोनी आपलं कौशल्य बाजारात काय विकतंय ते निर्मिण्यासाठी वापरलं. विशेषत: फॅशन्स. त्यामुळे त्यांना अमीर-उमरावांच्या कुटुंबांकडून पोट्र्रेट्सची खूप कामं मिळत गेली. त्यांना थेम्सचं आकर्षण होतंच. नदीवरल्या बोटी, सहलीला निघालेली कुटुंबं, बोटी/ जहाजांवरील दृश्ये त्यांच्या अनेक चित्रांचे विषय बनली. ‘दि सर्कल ऑफ दि रु रोयाल’ (१८६८), ‘दि कॉन्सर्ट’ (१८७५), ‘दि बॉल’ (१८७८) यांसारख्या चित्रांतून ऐश्वर्यात जगणाऱ्या समाजाच्या कुलीन जीवनशैलीचा सोहळा बारकाव्यांसहित जसा टिसोनी मांडला, तसा इतर कोणत्याही चित्रकाराने मांडला नसावा. पण हे चित्रण सदैव सुरुचिपूर्ण राहिलं. आयरिश घटस्फोटिता कॅथलीन न्यूटनशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ती त्यांच्या अनेक चित्रांत मॉडेल असे. त्यांच्या प्रेमाला व्हिक्टोरियन मूल्ये जपणाऱ्या रूढीवादी समाजात मान्यता मिळणं कठीणच होतं, तरीही त्या दोघांनी बदनामी धुडकावून आपलं नातं जपलं. तिच्या १८८२ मधल्या निधनानंतर आठवडाभरात शोकाकुल टिसो पॅरिसला परतले. पॅरिसला परतल्यावर त्यांनी माध्यमांचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. त्यांनी ‘वीमेन इन पॅरिस’ ही मालिका केली, पण तिचं म्हणावं तसं स्वागत झालं नाही.

हेही वाचा >>> अभिजात : क्षण एक पुरे सौंदर्याचा..

१८८५ मध्ये चर्चमधल्या सामूहिक प्रार्थनेनंतर एका आध्यात्मिक अनुभूतीने त्यांच्या कलेची दिशाच पार वळवली. त्यांनी न्यू टेस्टामेन्टमधल्या कथांवर आधारित चित्रं जलरंगात काढायला सुरुवात केली. जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनात अचानक घडून आलेला हा बदल त्यांच्यात खूप मोठं परिवर्तन आणणारा ठरला. आंतरिक ओढीने त्यांनी जेरुसलेम आणि रोमच्या चर्चला अनेक भेटी दिल्या. त्यांना आधुनिक जगात प्रचलित ज्ञानापेक्षा ख्रिस्त आणि ख्रिश्चानिटीकडे स्वानुभूतीने बघायचं होतं. त्याने त्यांची चित्रं सच्ची होतील असं त्यांना वाटे. ही त्यांची सातशेहून अधिक चित्रं.. त्यापैकी अनेक विकली गेली आणि नंतर त्यांचे दोन खंड प्रसिद्धही झाले. टिसोंनी हे कमाईसाठी केलेलं नव्हतं. पण त्या काळात धार्मिक चित्रांना कलेच्या बाजारात मागणी वाढली होती आणि त्यामुळे त्यांच्या या मनापासून केलेल्या चित्रांना भरपूर किंमत आली.

दुब नदीच्या काठावर वडिलोपार्जित भव्य, निसर्गसुंदर शातोमध्ये एकटेच राहणारे, शांत वृत्तीचे टिसो अचानक गेले. जवळच्याच चॅपलमध्ये त्यांची अगदी साधीशी कबर आहे. त्यांनी आपल्याला निरपेक्षपणे गुप्त मदत केली असं अनेकांनी त्यांच्या परोक्ष बोलून दाखवलं. त्यात गावातल्या एक आजीबाईपण होत्या. त्यांच्या लेखी- टिसो एक दैवी देणगी लाभलेले चित्रकार होतेच; पण अतिशय कनवाळू वृत्तीचे माणूसही होते. त्यांनी आजीबाईंना त्यांचं सुंदरसं चित्र काढून भेट दिलं होतं.

arundhati.deosthale@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2022 at 01:11 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×