scorecardresearch

Premium

अभिजात : सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा..

१९८७ चा ऑक्टोबर महिना. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ब्रिटिश शिल्पकार हेनरी मूर (१८९८-१९८६) यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह लागला होता.

lk abhijat art

अरुंधती देवस्थळे

१९८७ चा ऑक्टोबर महिना. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ब्रिटिश शिल्पकार हेनरी मूर (१८९८-१९८६) यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह लागला होता. नंतर तो सहा महिने भारतातल्या निवडक शहरांत फिरणार होता. तो बघायची पहिली संधी आम्ही दोघे, अशोक जैन व प्रफुल्ल बिडवाई यांना गोविंदराव तळवलकर यांच्याबरोबर मिळाली हे आमचं भाग्य. तोवर हेनरी मूर हे एक दादा शिल्पकार आहेत, एवढंच सामान्यज्ञान होतं. पण गोविंदराव त्यांना मोठे  कलाकार मानतात म्हणजे ते थोरच असणार, ही खूणगाठ मनोमन बांधली गेली असणार. त्या प्रस्तुतीत दोनेकशे शिल्पं, स्केचेस, लिथोज आणि मकेट्स (शिल्पाआधी केलेलं मॉडेल) होती. शिल्पं मूर यांच्या सांगण्यानुसार मोकळ्या वृक्षराजीच्या सान्निध्यात उघडय़ा आकाशाखाली, हिरवळीवर  मांडलेली होती. या शिल्पांना ‘समोरून’ असं नसतंच काही.. ती त्यांच्याभोवती जाऊन अनुभवायची असतात. हा फेस्टिव्हल हेनरी मूर फाऊंडेशन, ब्रिटिश काऊंसिल आणि एन. जी. एम. ए. यांनी मूरसाहेबांच्या सल्ल्याने आयोजित केल्याचं कळल्याने ते आदल्याच वर्षी गेल्याची हळहळ वाटली होती. प्रदर्शनाच्या माहितीपत्रकात मूर यांची तीन-चार अवतरणे दिली होती. ती त्यांचं ‘आर्टिस्ट्स स्टेटमेंट’ असल्यासारखी आवडली होती. त्यांची कला तोवर अपरिचित असूनही! निसर्ग आणि शिल्पं यावर बोलताना ते सहज सांगून जातात, In Yorkshire, in Adele woods, there was a big rock amongst many, that I call Adele Rock. That influenced me quite a bit. For me, it was the first big bleak lump of stone set in the landscape surrounded by marvelous gnarled prehistoric trees. It had no features of recognition, no copying of nature-just a bleak powerful form, very impressive.’’ जंगलातल्या हिरवाईमधला तो कातळ किती सहजपणे आपल्या डोळ्यांसमोर शब्दांतून उभा करतो हा शिल्पकार! सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असतं. सुरुवात अशी होते..

Jawan Film Burst Firecrackers in Theater
नाशिकमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांचा प्रताप; थिएटरमध्येच फोडले फटाके, धक्कादायक VIDEO व्हायरल
Noida Police Shares Video Of python rescue
धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच
harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
vivo t2 pro launch india with bank offers
VIDEO: भारतात लॉन्च झाला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन; २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि…, फीचर्स एकदा बघाच

मूरमधली कलेची प्रतिभा त्याच्या शाळेतील कलाशिक्षिका एलीस गॉस्टिक यांनी हेरून तिला उत्तेजन दिलं होतं. या दोघांमधील मैत्र आयुष्यभर टिकलं. त्यांच्या स्वत:च्या संग्रहातल्या कलाविषयक पुस्तकं आणि मासिकांनी आधुनिक आणि समकालीन कलेबद्दल आपल्या विद्यार्थिदशेतल्या ‘व्हिज्युअल इंटेलिजन्स’ला खतपाणी घातलं असं मूर म्हणत. आपण शिक्षक व्हायचं असं ठरवलेल्या मूर यांनी स्वेच्छेने अठराव्या वर्षी सैन्यात प्रवेश घेतला होता. पण फ्रान्सबरोबरच्या युद्धात ते जायबंदी होऊन परतले. नंतर त्यांनी लीड्सच्या कलाविद्यालयात शिल्पकलेसाठी प्रवेश घेतला. शिल्पकलेचे ते पहिलेच विद्यार्थी. आणि बार्बरा हेपवर्थ दुसऱ्या! तिथून त्यांना लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्सची स्कॉलरशिप मिळाली. जोडीला ते वेगवेगळी कलासंग्रहालयं पाहत निरीक्षणातून शिकत गेले. चेल्सी स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिल्पकला शिकवली. १९२० च्या दशकात ब्रांकुसीप्रमाणे त्यांनीही मॉडेल न बनवता थेट माध्यमात शिरून शिल्पं बनवायला सुरुवात केली. हे ब्रिटिश शिल्प परंपरेत एक धाडसी वळण ठरलं. नंतर बार्बरा हेपवर्थ आणि जॉन स्कीपिंग यांनीही तोच मार्ग निवडला.

१९२५ मध्ये त्यांना अभ्यासवृत्तीवर इटलीला जाऊन तिथल्या मास्टर्सच्या परंपरेतून शिकण्याची संधी मिळाली. विशेषत: तिथे त्यांना भित्तीचित्रं आणि अभिजात शिल्पं पाहता आली. विद्यार्थिदशेत त्यांनी ‘स्टोनिहज’ला भेट दिली होती. त्याने ते इतके झपाटले गेले की दुसऱ्याच दिवशी रात्री तिथे परत जाऊन चंद्रप्रकाशात नाहणारी तिथली भव्यता त्यांनी कागदावर उतरवली.. ५० लिथोग्राफज्च्या एका मालिकेच्या रूपात. त्यांच्याच शब्दांत- ‘It  enlarges everything, and the mysterious depths and distances made it seem enormous.’ या लिथोजमध्ये त्यांनी महाकाय कातळांच्या पृष्ठभागाचा जो फील आणलाय तो केवळ अद्वितीय! सुरुवातीच्या काळात त्यांच्या कलानुभूतीवर झालेले हे संस्कार आयुष्यभर त्यांना साथ देणार होते. शिल्पांसाठी त्यांनी दगड, लाकूड आणि मातीचा वापर केलाच, पण निसर्गातील काटक्या, झाडांच्या वाळलेल्या साली, पशुपक्ष्यांची हाडंही त्यांच्या कामी येत. त्यांच्या घरात आजही सांभाळून ठेवलेल्या स्टुडिओत यांचंच राज्य आहे. त्यातून त्यांना स्वत:ला आवडणाऱ्या विषयांची (‘मदर अँड चाइल्ड’, ‘पक्षी’ किंवा ‘रेक्लयिनग फिगर’) अंतर्मनात जडणघडण होत राहत असावी. युद्धात वीरतेच्या उदात्तीकरणापेक्षा होणारा विनाश आणि मनुष्यहानी लक्षात येताच त्यांनी युद्ध टाळण्यासाठीच्या प्रयत्नांत स्वत:ला झोकून दिलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लंडनच्या टय़ूब रेल्वे स्टेशनात आसऱ्याला येऊन बसणाऱ्या निर्वासित कुटुंबांची हृदयद्रावक चित्रं त्यांनी काढली, ती सर्वत्र दाखवली गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर दीर्घ अवकाशानंतर १९४८ मध्ये भरलेल्या व्हेनिस बिनालेमध्ये त्यांच्या शिल्पाला पहिलं पारितोषिक मिळाल्याने त्यांच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीला दुजोरा मिळाला. युनेस्कोचं पॅरिस मुख्यालय असो किंवा न्यू यॉर्कचं लिंकन सेंटर- दोन भागांतील मूरच्या दगडी रिक्लायिनग फिगर्स हिरवळीवर येणाऱ्या-जाणाऱ्यांना दृष्टिसुख देत असतात.

मूर यांच्या सर्जनाचा ‘किंग अँड क्वीन’ हे रिप्रेझेंटेशनल शिल्प (१६४ x ८४. ५ से. मी., ब्रॉन्झ- १९५२) ते ‘नाईफ एज’ (१९७६- ब्रॉन्झ) हा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रवासही त्यांच्याच शब्दांत सांगायचा तर-  ‘‘My Sculpture is becoming less representational, less an outward copy and so some people call it more abstract. But I believe that this way I can present the human psychological content of my work with greatest directness and intensity’’ हे  वाचल्यावर ते कलेबद्दल नेमकेपणाने बोलणारे शिल्पकार असं जे वाटून गेलं होतं, ते वेळोवेळी प्रत्ययास येतं. त्यांची कला आणि तिच्याबद्दलची विधानं यांत कुठेही विसंगती दिसत नाही. मूर यांना याची जाणीव असावी, की शिल्पं आकार आणि रूप धारण करताना मानवी स्मृतीच्या खोलीतून काहीतरी वर आणत असतात. उदाहरणार्थ, युद्धकाळात मनात घर केलेली हेल्मेट्स (शिरस्त्राणे) त्यांच्या शिल्पांत स्वतंत्रपणे उतरलेली आहेतच, पण त्यांचा आकारही असाच कुठेतरी अचानक उमटलेला दिसतो. म्हणून त्यांच्या कलेवर अमुक एका अभिव्यक्तीचं लेबल लावणं अशक्य होऊन बसतं. असं म्हणतात की, मानवी शरीराच्या वर्णनासाठी मूर यांनी नवीन शब्दसंपदा निर्माण केली. फार पूर्वी ग्रीकांनी केली होती तशी. ती भाषेचा इतका सहज भाग बनली, की त्यामुळे त्यांची कला इतरांना अधिक स्पष्टपणे आकळू लागली. म्हणून त्यांना रेडिओ आणि टीव्हीवर अनेकदा कलेविषयी बोलण्यास आमंत्रित केलं जाई आणि ते आनंदाने विषयाची उकल करून तो जनसामान्याला समजेल अशी त्यांची मांडणी करत. त्यातून सर्वाना कलाकृतीचा आस्वाद घेता यावा हे ते बघत. त्यांनी राजघराण्याकडून मिळणारा कोणताही श्रेष्ठतादर्शक सन्मान स्वीकारला नाही. म्हणजे ते ‘सर’ किंवा ‘लॉर्ड’ न बनता फक्त हेनरी मूरच राहिले. त्यांची जीवनपद्धती चारचौघांसारखीच राहिली. हेही त्यांच्या लेकीच्या- मेरी मूरच्या मनोगतातून कळल्याने त्यांच्याबद्दलचा आदर मनोमन द्विगुणित झाला होता.

मूर श्रेष्ठ शिल्पकार होतेच, पण माणूस म्हणूनही खूप स्नेह देणारे आणि घेणारे होते. म्हणूनच त्यांचा लोकसंग्रह फक्त कलाक्षेत्रापुरताच मर्यादित राहिला नाही. ते हर्टफोर्डशायरमध्ये येऊन राहायचं मुख्य कारण निसर्गसान्निध्य किंवा शांततेपेक्षा कविमित्र वॉल्टर डी ला मेअरच्या आसपास राहावं, हे होतं! डच पेंटर पीट मोन्द्रीआनशीही त्यांची  अशीच मैत्री!! त्याच्या मृत्यूनंतर त्याचा स्टुडिओ विकत घेऊन मूर अनेक वर्ष त्यातच काम करत असत. काही वर्षांनी भेटायला येणाऱ्या लोकांना खुला प्रवेश असावा म्हणून घराला जोडून मूर यांच्या संभाषणासाठी वेगळी खोली घराला लागूनच बांधली गेली होती. त्यात त्यांच्या आवडत्या कलाकृतींच्या कोंडाळ्यात मूर त्यांचे चाहते /विद्यार्थी /व्यावसायिक यांच्या भेटीगाठी घेत. ती खोली उपयोगात आल्यावर आपले वडील चारचौघांपेक्षा वेगळे असल्याचं जाणवलं. तोवर घरात मध्यमवर्गीय वातावरण सहजच राखलं गेल्याने आपण काही विशेष आहोत असं काही वाटलं नव्हतं असं त्यांची लेक मेरीने वडिलांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील त्यांचे चाहते मोकळेपणे त्यांच्या घरी येत-जात असत. विशेषत: मूर यांच्याकडून शिकायच्या उद्देशाने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे दरवाजे कायम उघडे असत. मोठे असून त्यांचा दबदबा वाटू नये असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांची शिल्पं सार्वजनिक प्रदर्शनासाठी मागायला आलेल्या संस्थांना त्यांनी कधी नकार दिला नाही. त्यामागे आपली कला जास्तीत जास्त लोकांना पाहता यावी हाच एक उद्देश होता. खास जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या टेट मॉडर्नमध्ये त्यांनी ट्रस्टी म्हणून १५ वर्ष काम केलं. नंतर त्यांना त्यांनी अनेक चित्रांचे लिथोज, पिंट्र्स आणि काष्ठ, दगड आणि ब्रॉन्झमधली ३६ शिल्पं दान केली. या अमूर्ततेत वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रवाह मिसळलेले भौमितिक आणि जैविक आकाराचं मिश्रण आहे. टेटमध्ये दोन कक्षांत मूर यांची कला मांडलेली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या हेनरी मूर फाऊंडेशनचा भर नव्या दमाच्या कलाकारांना प्रोत्साहन आणि मदत देण्यावर आहे. मूरचे घरही त्यांचं एक स्मृतिस्थळ बनवण्यात आलं आहे. फाऊंडेशनमध्ये मूर यांची १२००० शिल्पं, शिल्पांची मॉडेल्स, चित्रं, त्यांनी डिझाइन केलेल्या टेक्स्टाइल्स, रेखाटनं आणि पुस्तकांची दशकांनुसार मांडणी अभ्यासकांसाठी ठेवली असून प्रवेश मोफत आहे. ‘बीइंग हेनरी मूर’ या अनौपचारिक शैलीतील आत्मकथनात त्यांनी आपल्यावरील मायकेलएंजेलो आणि रोडाँइतकाच असणारा आफ्रिकन लोककला, एॅझटेक आणि सायकॅडेलीक शैलींचा प्रभाव सांगत १९२० पासूनच्या स्वत:च्या कामाचा आढावा घेतलाय. यात बार्बरा हेपवर्थ, लिओन अंडरवूड, ब्राँकुसी, पिकासो, हेन्री गौडीए-ब्रेझस्कासारख्या समकालीन कलाकारांशी संवादही असल्याने हा बहुमुखी ग्रंथ संग्राह्य़ झाला आहे. अतिशय सुंदर शिल्पं घडवणारे मूर अद्भुत कलाकार होतेच, शिवाय साध्या शब्दांत सांगायचं तर त्यांनी सामान्यजनांना शिल्पं कशी पाहावीत हे शिकवलं.. एखाद्या मित्रासारखं. आणि हे त्यांचं योगदान त्यांच्या कामापलीकडे जाणारं आहे. मूर गेले तेव्हा देशभरात घरातलंच वडीलधारं माणूस गेल्यासारखं वाटलं होतं !!

arundhati.deosthale@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhijat arundhati devsthale modern art sculptor retrospective artist ysh

First published on: 21-08-2022 at 00:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×