अभिजीत ताम्हणे

कलायात्रेला प्रस्थान ठेवण्यापूर्वीचा हा लेख.. आधीपासून ओळखीच्या असलेल्या भारतीय कलाकृतींबद्दल आणखी सांगणारा. या साऱ्या कलाकृती यंदा ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये आहेत! ‘बिएनाले’ म्हणजे दर दोन वर्षांनी भरणारं दृश्यकलेचं महाप्रदर्शन. हल्ली जरी जगभरच्या २०० शहरांमध्ये अशी महाप्रदर्शनं भरत असली तरी व्हेनिसचा मान मोठाच. आणखी तीन आठवडे ही ‘कलायात्रा’ सुरू राहील. तुर्कस्तानातलं इस्तंबूल, फ्रान्समधलं फारसं माहीत नसलेलं लिऑन हे शहर- इथं यंदाच्या ‘कलायात्रा’ या लघुसदराचे मुक्काम असतील..

स्थळ : व्हेनिस. इथं एक मोठ्ठंच्या मोठ्ठं आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन मे महिन्यापासून भरलंय. त्यात ८० निवडक कलावंतांच्या कलाकृती पाहता येताहेत. आणि शिवाय जगभरचे ९५ देश स्वखर्चानं आपापले कलामंडप घालून इथं सहभागी झालेले आहेत. यंदा तर या ९५ देशांमध्ये भारताचाही  समावेश आहे. व्हेनिसमधलं हे मोठ्ठं कलाप्रदर्शन दर दोन वर्षांनी भरतं म्हणून त्याला ‘बायअ‍ॅन्युअल’/ ‘बायएनिअल’ किंवा इटालियन उच्चाराप्रमाणे ‘बिएनाले’ म्हणतात. आणि यंदा या प्रदर्शनाची  ५८ वी खेप असली तरी त्याचा इतिहास मात्र १५० वर्षांचा आहे. हे महाप्रदर्शन यंदा २४ नोव्हेंबपर्यंत खुलं राहणार आहे. गेल्या खेपेला ६,१५,००० जणांनी तिकिटं काढून व्हेनिस बिएनाले पाहिली होती. यंदा यापेक्षा अधिक लोक येणार नाहीत असं गृहीत धरलं तरी किमान लाखभर कलारसिकांनी व्हेनिसच्या या द्वैवार्षिकीला आतापर्यंत भेट दिली आहे.

अशी द्वैवार्षिक कलाप्रदर्शनं किंवा बिएनाले आताशा जगभरात २०० शहरांमध्ये भरतात. आपल्याकडे भारतात भरणाऱ्या ‘कोची बिएनाले’चं किंवा ‘पुणे बिएनाले’चं स्वरूप हे जागोजागी विखुरलेलं एकच द्वैवार्षिक महाप्रदर्शन असं असतं. व्हेनिसमध्ये मात्र मध्यवर्ती प्रदर्शनाखेरीज आणखीही बरंच अनुभवण्यासारखं असतं. एक मोठ्ठं मध्यवर्ती कलाप्रदर्शन, त्यात नियोजकानं किंवा गुंफणकारानं (इंग्रजीत ‘क्युरेटर’नं) निवडलेल्याच कलाकृती, तर बाकी देशोदेशींचे कलामंडप किंवा ‘पॅव्हिलियन’ अशी व्हेनिसच्या महाप्रदर्शनाची रचना असते. आणि किमान ३० देशांचे रीतसर इमारतीसारखेच उभारलेले कलामंडप इथं नेहमी असतात. त्यांत आणखी ६० ते ६५ देशांची भर दर खेपेस पडत असते. त्याबद्दल नंतर चर्चा करूच; पण आधी भारतीय सहभागाबद्दल..

व्हेनिसमधला भारतीय सहभाग

‘व्हेनिस (आर्ट) बिएनाले’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाप्रदर्शनात भारताचा कलाप्रदर्शन-मंडप  यापूर्वी फक्त २०१३ साली होता.  त्यावेळी विविध भारतीय आर्ट गॅलऱ्यांच्या अनौपचारिक सहकार्यातून अखिल भारतीय ‘ललित कला अकादमी’नं हा कलामंडप साकारला होता. यंदा मात्र ‘किरण नाडर कला संग्रहालय’ या मोठय़ा खासगी संस्थेचं औपचारिक सहकार्य ललित कला अकादमीनं घेतलं आहे. त्यामुळे ‘किरण नाडर संग्रहालया’मध्ये  नियोजक म्हणून गेली काही वर्ष जबाबदारी सांभाळणाऱ्या रुबिना करोडे याच यंदा भारतीय कलामंडपाच्या नियोजक आहेत. शकुंतला कुलकर्णी, अतुल दोडिया आणि जितीश कलाट हे मुंबईकर चित्रकार- दृश्यकलावंत, दिल्लीत राहणारे जी. आर. इरण्णा आणि अशिम पुरकायस्थ हे दोघे कलावंत, तसंच नंदलाल बोस (१८८२-१९६६) आणि रुमाना हुसेन (१९५२-१९९९) हे दोघे दिवंगत कलावंत यांचा सहभाग या कलामंडपात आहे.

‘गांधीजींची १५० वी जयंती’ ही या भारतीय मंडपातील चित्रनिवडीमागची मध्यवर्ती कल्पना आहे. अहिंसेच्या गांधीप्रणीत आग्रहाचा इतिहास आणि वर्तमान, गांधीजींच्या प्रतिमांशी आज होणारा व्यवहार, गांधी आणि चित्रकला यांचा संबंध, गांधीविचार आणि स्त्रीवाद, कलेतली भारतीयता आणि गांधीविचार.. असे विविध पैलू या कलाकृतींमधून प्रकटतात. शकुंतला कुलकर्णी यांनी स्त्रियांना परिधान करता येतील असे वेताचे पोषाख विणून घेतले आहेत. कारागिरीचं मूल्य इथं आहेच; पण वेताचे हे पोषाख चिलखतासारखे दिसतात. लढाईत शत्रूला मारता मारता स्वत:चा बचाव करण्यासाठी लोखंडी चिलखतं वापरली जातात; मग ही वेताची चिलखतं काय करणार आहेत? कसाही वाकू शकणारा, काठी/ काटकी/ दोरी यांपैकी कसंही रूप धारण करू शकणारा वेत किती संरक्षण करणार? या प्रश्नांची उत्तरं स्त्रियांसह सर्वच प्रेक्षकांना शोधायला लावणाऱ्या शकुंतला कुलकर्णी यांच्या या कलाकृती यापूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयातही (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) प्रदर्शित झाल्या होत्या. त्याच संग्रहालयात पुढे जितीश कलाटचं ‘कव्हरिंग लेटर’ हे मांडणशिल्पही प्रदर्शित झालं होतं. अतुल दोडिया यांची कपाटाचा वापर केलेली आणि पाश्चात्त्य, भारतीय अशा अनेकपरींच्या प्रतिमांच्या साहचर्यातून आशय घडवणारी मांडणशिल्पंही याआधी मुंबईत प्रदर्शित झालेली आहेतच. जितीशच्या मांडणशिल्पात अंधाऱ्या खोलीत धुकं पसरलेलं असतं. खोलीतल्या हलत्या पडद्यावर प्रोजेक्टरद्वारे काही अक्षरं दिसू लागतात आणि आपण ती वाचू लागतो.. हे आहे महात्मा गांधी यांनी अ‍ॅडॉल्फ हिटलरला १९३९ साली लिहिलेलं पत्र.. त्यात ‘युद्ध करू नका’ अशी विनंती गांधीजींनी केली होती! त्या पत्राची प्रतिमाच आपल्यासमोर पडद्यावरून सरकते आहे.. वाचता येते आहे. थोडय़ा वेळानं लक्षात येतं की पडदाच धुक्याचा आहे. खोलीभर धुकं पसरलंय ते या पडद्यातूनच. या धुक्याइतकं नश्वर काय आहे? अहिंसा? की हिंसाच नश्वर असते?

खुद्द गांधीजींनी १९३८ साली नंदलाल बोस यांना काँग्रेस अधिवेशनासाठी भारतीय लोकजीवनाची काही चित्रं काढायला सांगितलं होतं. ती ‘हरिपुरा पोस्टर्स’ म्हणून ओळखली जाणारी चित्रमालिकाही प्रतिमारूपानं इथं आहे. तर अशिम पुरकायस्थ यानं टपाल तिकिटांवरल्या ‘खुशहाल किसान’ या प्रतिमेचे आजचे हाल काय आहेत, हे आपल्या कातरकामातून दाखवून दिलं आहे. इरण्णानं भिंतभर खडावा मांडून एक मोठं मांडणशिल्प केलं आहे.. गांधीजींनी कधीच खडावा वापरल्या नसल्या, तरी गांधीजींची पदयात्रेची संकल्पना इरण्णाच्या ‘नावु’ (कन्नडमध्ये ‘आपण सारे’ ) या नावाच्या मांडणशिल्पातून साकार होते. खडावाच इरण्णानं का वापरल्या? तो म्हणतो की, लाकडी खडावांतून भारतीयता आपोआप दिसलीच, पण त्याहीपेक्षा प्रत्येक खडावाच्या लाकडावर कोरून, त्या लाकडाचा वापर फळ्यासारखा किंवा पाटासारखा करून प्रत्येक खडावाला एकेक निराळं व्यक्तिमत्त्व देता आलं. यातून विविध व्यवसायांतले, निरनिराळ्या सामाजिक-आर्थिक स्तरावरचे लोक कसे एकाच पातळीवर, एकाच दिशेनं साध्या-सरळ ध्येयासाठी वाटचाल करू शकतात, हे प्रतीत होऊ लागलं!

इथं आधीच स्पष्ट करायला हवं की, प्रस्तुत लेखकानं ५८ वी व्हेनिस बिएनाले प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी हे लिखाण केलेलं आहे.. अर्थात, इथं उल्लेख केलेल्या भारतीय कलाकृती मात्र कधी ना कधी पाहिलेल्याच आहेत. शिवाय इरण्णा, शकुंतला कुलकर्णी, जितीश कलाट, अतुल दोडिया हे सारे व्हेनिसहून परतल्यानंतर त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं. भारतीय कलामंडपाच्या नियोजक रूबिना करोडे यांना नाही गाठता आलं. तोवर व्हेनिसकडे प्रयाणाची प्रस्तुत लेखकाचीच तयारी सुरू झाली!

‘पाहण्यासारखं’ आणि अनुभवलेलं.. 

भारतीय कलामंडप हे यंदाची व्हेनिस बिएनाले पाहण्याचं नवलाईचं कारण आहेच. केवळ दुसऱ्यांदाच भारतीय कलामंडप व्हेनिसमध्ये आहे, तोही ‘आर्सेनाले’सारख्या- मध्यवर्ती प्रदर्शनाचा मोठा भाग जिथं असतो त्याच- टापूत आहे, एवढंच महत्त्वाचं नाही. तसं तर पाकिस्तान, घाना, मादागास्कर आणि डोमिनिकन रिपब्लिक याही देशांचे कलामंडप यंदा पहिल्यांदाच आहेत. पण ते व्हेनिसभर कुठे ना कुठे विखुरलेले आहेत. पण ‘गांधीजीं’ची आठवण कलेद्वारे जिवंत ठेवणारा भारतीय कलामंडप हा युरोपातील ‘फायनान्शिअल टाइम्स’सहित अनेक देशी-विदेशी प्रकाशनांना ‘पहिल्या दहा प्रेक्षणीय कलामंडपां’पैकी वाटला, हेही उल्लेखनीय आहे.

याउलट, अनेक जणांना- अनेक समीक्षक, इन्स्टाग्राम किंवा अन्य समाजमाध्यमं वापरणारे सामान्य कलारसिक यांना- यंदाच्या व्हेनिस बिएनालेत काय महत्त्वाचं वाटतंय, काय ‘पाहण्यासारखं’ वाटतंय, याची माहिती इंटरनेटवरून मिळवता येतच असते. पण कलाकृती प्रत्यक्ष अनुभवणं आणखीन निराळं.  विविध देशांच्या कलाकल्पना, सौंदर्यकल्पना आपल्यावर आदळत असतात आणि त्यापैकी काही तर झरझर पाहताना  बिनमहत्त्वाच्याही वाटू शकतात. यातून मार्ग असा की, बिनमहत्त्वाचं वाटणारंही पाहून ठेवायचं आणि त्यावर नंतर कधीतरी विचार करायचा.

इस्तंबूल आणि लिऑन

व्हेनिस बिएनालेच्या काळातच अनेक कला-उपक्रम घडत असतात, त्या उपक्रमांना जोडूनच व्हेनिस बिएनाले पाहणं हे ‘अधिकस्य अधिकं फलम्’! पण इस्तंबूलमध्ये १४ सप्टेंबरपासून सुरू होणारं द्वैवार्षिक महाप्रदर्शन आणि फ्रान्सच्या लिऑन या शहरात सप्टेंबरच्याच १८ तारखेपासून खुलं होणारं महाप्रदर्शन ही दोन्ही प्रदर्शने निराळा अनुभव देणारी ठरतील. यापैकी इस्तंबूल बिएनाले ही यंदा (१६ वी खेप) पूर्णत: ‘प्लास्टिक प्रदूषण’ या विषयाला वाहिलेली आहे. जगभरच्या समुद्रांत इतका प्लास्टिक कचरा आहे की हा ढिगारा एकवटल्यास सातवा खंडच तयार होऊ शकेल. म्हणून ‘सेव्हन्थ कॉन्टिनेन्ट’- सातवा खंड- हे यंदाच्या महाप्रदर्शनाला नाव दिलं गेलं आहे. तर लिऑन बिएनाले ही यंदा या शहरातल्या प्रचंड मोठय़ा, पण आता बंद पडलेल्या ‘फॅगोर फॅक्टरी’च्या जागेत होणार आहे. रंगचित्रं, शिल्पं, मांडणशिल्पांसह अन्य प्रकारच्या कलाकृतींना मोठय़ा आकारात वाव देणं, हे यंदा १५ व्या खेपेत असलेल्या लिऑन बिएनालेचं वैशिष्टय़ ठरेल. लिऑनचं आणखीही एक वैशिष्टय़ आहे.. तरुणांचा सहभाग! इथं यंदा कलाकृती प्रदर्शित करणारे बहुतेक जण तिशीचे आहेत.

किलकिलं दार..

मोठ्ठे डोळे!

‘कलायात्रा’ हे अधूनमधूनच ‘लोकरंग’मध्ये येणारं सदर याआधी जून २०१७ मध्ये प्रकटलं होतं. त्याहीवेळी एक निमित्त व्हेनिस बिएनाले हेच होतं. पण त्यासोबतच ‘डॉक्युमेंटा’ हे जर्मनीच्या कासेल या शहरात दर पाच वर्षांनी भरणारं आणि ‘राजकीय-सामाजिक आशयाच्या कलेचं महाद्वार’ म्हणून ओळखलं जाणारं महाप्रदर्शन हे महत्त्वाचं होतं. यंदा व्हेनिससोबत लिऑन आणि इस्तंबूल आहेच. विशेष म्हणजे इस्तंबूल बिएनाले येत्या मंगळवारी (१० सप्टेंबर), तर लिऑन बिएनाले पुढल्या रविवारी (१५ सप्टेंबर) आपली दारं कलासमीक्षकांसाठी उघडणार आहे. दारं किलकिली असली तरीही आत शिरल्यावर चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, व्हीडिओ-कला हे सारं भरपूर, डोळे भरून आणि मेंदू जागृत ठेवून पाहायचंच असतं.. त्यासाठी डोळे कितीही ‘मोठ्ठे’ करावे लागले तरी बेहत्तर.. हे कलायात्रेचं आणखी एक महत्त्वाचं कारण. १४ आणि १८ सप्टेंबर या तारखांपासून  कोणाही कलारसिकाला तिकीट काढून (अनुक्रमे इस्तंबूल आणि लिऑनची) महाप्रदर्शनं पाहता येतील. पण कशाला काढावं तिकीट? खरंच जाण्यासारखं असेल का लिऑन? इस्तंबूल शहर चांगलंच आहे म्हणतात, पण तिथली बिएनाले कशी असेल?

याचीच खबर काढण्यासाठी तर ही ‘कलायात्रा’ आहे! पुढल्या रविवारी इस्तंबूलच्या अनुभवांसह ‘कलायात्रा’ पुढे जाईल..

abhijeet.tamhane@expressindia.com