आदिवासी संवेदना आणि जीवनाविषयी धूसरता सर्वच काळात सर्व मानवी समुदायांमध्ये दिसते. विशेषत: आदिवासी शहाणीव समजून घेण्यासाठी आधुनिक विचारप्रक्रियेत कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असे अबुझमाडमध्ये दीर्घकाळ राहिलेल्या नरेंद्र यांना वाटते. ‘अबुझमाडचे अनुनाद’ हे अवधूत डोंगरे यांनी केलेले मराठी भाषांतर. अबुझमाडचा अनुभव घेतल्यावर नरेंद्र असा निष्कर्ष काढतात की, ‘‘माणसाने भूगोल नि गणित यांच्यासारखंच आपला धर्म नि तत्त्वज्ञान रचलं. आपण झाडांपासून आणि डोंगरापासून दूर होऊ लागतो, तेव्हा धर्म, तत्त्वज्ञान, गणित इत्यादींची गरज भासते.’’

माडियांचा आदिम रहिवास असलेला ‘अबुझमाड’ हा मध्य भारतातील असा एक प्रदेश, जो आजही मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टीने एक मिथच आहे. ‘बस्तर’ आणि ‘दंडकारण्य’ हाही त्यालगतचाच प्रदेश. दिल्लीतील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ या संस्थेच्या एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने नरेंद्र १९८० पासून २०१३ पर्यंत बस्तर-अबुझमाड प्रदेशात निवास करून राहिले. त्या अनुभवांवर आधारित त्यांची ‘बस्तर डिस्पॅचेस’ (हार्पर कॉलिन्स, २०१८), ‘अ सेन्स ऑफ होम’ (हार्पर कॉलिन्स, २०२०) ही ‘आदिवासी लोक-समाज : कुछ अनुभव, कुछ अनुभूति’ (नमस्कार बुक्स, २०२२) अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अवधूत डोंगरे यांनी या सर्वच पुस्तकांमधील निवडक भागांचे संपादन करून भाषांतर केले आहे.

‘अबुझमाडचे अनुनाद’ हे पुस्तक समाजशास्त्रीय किंवा प्रवासवर्णनपर नाही. किंवा बस्तर व अबुझमाडमधील दंतकथांच्या जवळ जाणार्या आदिम जमातीच्या गूढ गोष्टी रोमांचक रीतीने कथन करणारे (जसे मराठीत मारुती चितमपल्ली यांचे लेखन आहे) पुस्तक नाही. तर तेथील घनदाट जंगल, निसर्ग आणि तेथील माडिया लोक यांच्यासंबंधी एक नवा ता्त्विवक दृष्टिकोन वाचकांसमोर निर्माण करणारे कथन आहे. अनुभवसिद्ध लालित्य आणि काव्यात्म शैली, ही त्यांच्या कथनाची वैशिष्ट्ये आहेत.

एकूण ४६ प्रकरणांतून नरेंद्र यांचे अबुझमाडसंबंधीचे निवेदन येते. काव्यात्म व प्रवाही निवेदन हे त्यांच्या कथनाचे वैशिष्ट्य. या कथनाला खोल ता्त्विवक चिंतनाचे अस्तर आहे. जंगलातील प्रवास, रात्र, पाऊस, गाव, पायवाटा, वाघ-अस्वल, झोपडी, शेकोटी, शिकार, गोटुल, माडियांचे नृत्य आणि माडियांचे अभौतिक विश्व याबद्दलचे लेखकाने नोंदविलेले निरीक्षण टीपकागदासारखे निर्मळ आहे.

अबुझमाडचे अनाघ्रात अरण्य तेथील प्राणी आणि माडिया यांच्या अस्तित्वातील नैसर्गिक एकात्मता आणि बाहेरच्या मानवी प्रगतीचा त्यांच्याशी कोणताही संबंध नसणे हे लेखकाच्या चिंतनाचे मुख्य सूत्र आहे. राज्यसंस्था, शिक्षण किंवा आरोग्याच्या व्यवस्था आणि व्यापार या सगळ्या गोष्टी माडियांसाठी परग्रहासारख्या आहेत. निसर्ग, अरण्यातील प्राणी आणि माडिया यांच्यात ‘जगणे’ ही गोष्ट एकाच प्रकारची आहे. समस्या, भीती, आजार, संकटे आणि जगण्याचे व्यवस्थापन अशा प्रगत समाजातील गोष्टींचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्या दिनक्रमात किंवा एकूण आयुष्यात अशा गोष्टींचे अस्तित्वच नाही. त्यामुळे अबुझमाडमधील जीवनासंबंधी विचार करताना बाहेरचे मानवी जग हेच निस्संदर्भ ठरते, अशी नरेंद्र यांची भूमिका ठरते.

महात्मा गांधी यांच्या ‘हिंदस्वराज’मधील आणि त्या विचारव्यूहातील बौद्ध तसेच जगप्रसिद्ध लेखकांची अवतरणे लेखकाने प्रकरणांच्या प्रारंभी नमूद केली आहेत. त्यावरून लेखकाची देशीवादी विचारसरणी स्पष्ट होते. पण पुस्तकाच्या विवेचनात ती एक विचारसरणी म्हणून व्यक्त होत नाही. ‘गांधींची प्रस्तुतता’ आणि ‘देशीय दृष्टी’ या शीर्षकाची दोन प्रकरणे आहेत, पण त्यातही बस्तरमधील लोकांच्या जगण्यातील घटना, व्यक्ती आणि दृश्यांचे वर्णन लेखक करतो, त्याचा थेट गांधींशी संबंध नाही. नरेंद्र यांची वैचारिक जडणघडण मात्र गांधीवादी पर्यावरणात झाली आहे. १९७७ मध्ये ते विनोबांच्या पवनार आश्रमात आणि त्यानंतर काही काळ सेवाग्राममध्येही राहिले होते.

अबुझमाडमधील माडिया आणि बाहेरचे जग यात ‘जमीन-अस्मानाचे’ अंतर आहे. ‘जमिनीची मालकी’ ही आधुनिक संस्कृती आणि राज्यसंस्थांचे मूलभूत लक्षण आहे. तर बस्तर किंवा अबुझमाडमधील लोकांना जमीन आणि आकाश सारख्याच रीतीने मुक्त आहेत. त्यावर कोणाचीही मालकी असू शकत नाही असा त्यांचा विश्वास आहे. नरेंद्र लिहितात, ‘‘मालकी असलेल्या जागा लोकांसाठी किती महत्त्वाच्या असतात, हे अबुझमाडला गेलो नसतो तर मला कदाचित कधीच समजलं नसतं. या जागांच्या सीमा अनिश्चित व प्रवाही असतात. अबुझमाडमधील संपूर्ण चार हजार चौरस किलोमीटर यांची जागा अर्थातच कोणाच्या मालकीची नव्हती. राज्यसंस्था किंवा लोक किंवा इतर कोणी मानवी कृतीसंस्था या जागेची मालकी राखून नव्हती. हा प्रदेश म्हणजे भ्रमनिरास झालेल्या आधुनिकतेचा काही प्रमाणात कल्पित आदर्श होता, असं म्हटलं तर फारसं चुकीचं होणार नाही.’’

नरेंद्र पुढे म्हणतात, ‘‘विनामालकीच्या तत्त्वासंदर्भातील भाषा आणि संवाद वेगाने लुप्त होत असताना त्यातला जीव टिकवून ठेवणं हे जमिनीचा मालकी हक्क नाकारण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं. आचार-विचार, प्रेरणा किंवा जीवनसृष्टी टिकवून ठेवायच्या असतील तर त्यासोबतची भाषा टिकावी लागते. पण प्रत्यक्ष व्यवहारात या दृष्टिकोनाला काही आधार उरलेला नाही. अशा जीवनरीतींचं मूल्य वेगाने घटत चाललं आहे. त्यामुळे शाश्वत देशी स्वास्थ्याचं संपूर्ण विश्वच वेगाने कोलमडून पडताना दिसतं आणि त्याजागी स्थानिक पूर्वपरंपरा नसणार्या परक्या व शक्तिशाली आधुनिक व्यवस्था प्रस्थापित होत आहेत.’’

२८२ पृष्ठांच्या या पुस्तकाला अवधूत डोंगरे यांनी ३२ पृष्ठांचे स्वतंत्र टिपण जोडले आहे. ते औपचारिक असे भाषांतरकाराचे रूढ भाष्य नाही. ‘परंपरेचं अरण्य आणि आधुनिकतेचं अभयारण्य’ असे डोंगरे यांच्या टिपणाचे शीर्षक आहे. हे टिपणदेखील मराठीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. लालित्य आणि ता्त्विवक चर्चा यांचे अजोड मिश्रण अवधूत डोंगरे यांच्या या टिपणात आहे. निसर्ग, अरण्य, मानवी जीवन, मानवी उत्क्रांती-संस्कृती, प्रबोधन, आधुनिकता, उत्तर-आधुनिकता, विकास आणि देशीवाद, अशा अनेक संदर्भात त्यांनी नरेंद्र यांच्या लेखनाच्या संदर्भांत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातून ब्रिटिश वसाहती, तेथील आणि युरोपमधील प्रवासी-अभ्यासक यांच्या नोंदी, नक्षलवादी-माओवादी, राज्यसंस्था, प्रशासन, व्यापारी आणि विकासाच्या अलीकडच्या नव-भांडवली संकल्पना, धरणे-प्रकल्प, विस्थापन आणि त्यातून उद्भवलेली हिंसक-शोषक जीवन पद्धती या मुद्द्यांच्या संदर्भात नरेंद्र यांच्या लेखनाची आणि विशेषत: देशीवादाची चिकित्सा केली आहे.

देशीवादाच्या परिप्रेक्ष्यातून अबुझमाडमधील जीवनाकडे पाहताना अवधूत डोंगरे महाभारतातील द्रोणाचार्य आणि एकलव्य यांच्यात घडलेल्या गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागण्याच्या गोष्टीची विस्तृत चर्चा करतात. आपल्या भौतिक परिसरात कोणाचे अंगठे कापले जात आहेत, हे समजून घेण्यासाठी ती गोष्ट वर्तमानात उपयोगी पडायला हवी. परंतु ‘अबुझमाडचे अनुनाद’ या पुस्तकातला बहुतेक भाग ‘द्रोणाचार्यां’शी संपर्कच न आलेल्या ‘एकलव्या’विषयीचा आहे, असे त्यांना वाटते. आता तर एकलव्याचा नुसता अंगठा मागितला जात नाही, त्याचे अख्खे शरीर, त्याचा समूह, त्याचा संपूर्ण परिसर आणि त्याची सारी सभ्यता आपण मागतो. या वस्तुस्थितीकडे पाहणार्या नरेंद्र यांच्या देशीवादी दृष्टीबद्दल अवधूत डोंगरे असमाधान व्यक्त करतात. एकूणच, सध्याचे नव-भांडवलशाहीकेंद्री राजकारण आणि आदिवासींच्या अस्तित्वाचे प्रश्न, या पार्श्वभूमीवर देशीवादी भूमिकेची पुनर्तपासणी या पुस्तकातून केली आहे.

‘अबुझमाडचे अनुनाद’

नरेंद्र, भाषांतर : अवधूत डोंगरे

पपायरस प्रकाशन, पाने- २८२, किंमत- ४९९ रुपये.

upramodmunghate304@gmail.com